शास्त्र व विज्ञान २

पितांबर व पुजेचे वस्त्र  


धार्मिक प्रसंगी पीतांबरासारखे वस्त्र किंवा पूजा तसेच विवाहदी मंगल कार्ये खास कपड्यांवर करण्यामागे काही शास्त्रीय व वैज्ञानिक कारणे असल्याचे दिसून आले आहे.


'गणवेश' ही कल्पना विविध क्षेत्रांत प्रचलित झालेलीच आहे. वातावरण निर्मीती होण्यास आपण घातलेले कपडे हे मदतच करतात. देवकार्य म्हणजे पूजा, होम व नित्य आन्हिक आणि पितृकार्य (म्हणजे श्राद्ध) या धार्मिकप्रसंगी अंगावर नेहमीचे कपडे असणे योग्य नाही. यामागे नुसता धार्मिक दंडक आहे असे नाही तर वैज्ञानिक कारणेही आहेत. उदाहरणार्थः विवाहादिप्रसंगी कडक सोवळे पाळणे हा मुळीच उद्देश नसतो. (ज्या धार्मिकप्रसंगी पुण्याहवाचन केले जाते तेथे स्वयंपाकधरात व बाहेरही कडक सोवळ्याची मुळीच अपेक्षा नसते.) परंतु विवाहादि धार्मिक प्रसंगी म्हटल्या जाणाऱ्या मंत्रांचा जास्तीत जास्त परिणाम देह, मन, बुद्धी ह्यांवर व्हायचा असेल तर त्या व्यक्तीने समाजात वापरलेला, कुसंस्कारांनी भरलेला पोषाख वरवर स्वच्छ दिसत असूनही वापरू नये. शिवाय ईतरांपेक्षा निराळा पोषाख परिधान केल्यावर त्या व्यक्तीबरोबर इतरांनी संपर्क साधण्याची क्रिया आपोआपच मंदावल्यामुळे धार्मिक कार्यांत त्याचे पूर्ण लक्ष लागण्यास मदत होते.


ज्या प्रमाणे सर्कसच्या झुल्यांवर जिवघेणे खेळ सादर करणाऱ्यांनाही एक गणवेश असतो व तो- सहसा ते बदलत नाहीत किंवा मल्लाने लंगोटी चढवून आखाड्यात उतरायची तयारी केली की त्याला स्फुरण चढते त्याचप्रमाणे स्वच्छ विशिष्ठ वस्त्र व उपरणे धारण करुन स्थानापन्न होताच त्या व्यक्तीस धार्मिक संस्कारा- विषयी श्रद्धा व आवड निर्माण होते. संगणक कक्षात किंवा शल्यक्रियागृहात गणवेषा शिवाय प्रवेश नसतो त्यामागचे उद्दिष्ठ हेच असते की नेहमीच्या कपड्यांवरील जीवाणू व धुळ ही कितीही स्वच्छ केली तरी काही अंशी कायम राहते - तेथील चप्पलाही वेगळ्या असतांत-तेथे चप्पल घालू नका असे नाही म्हणत- तेथे नेहमीची चप्पल न घालता आमच्या कडील खास चप्पल घालूनच प्रवेश करा असा दंडक असतो.


हाच दंडक पुजे किंवा पवित्र धार्मिक कार्यांबाबत असतो - नेहमीच्या कापड्यांवरील धुळ च नव्हे तर संस्कारही त्यांच्यावर काही अंशी कायम राहण्याची शक्यता असते. तेच बघा जर आपण पुजा विधींचे वेगळे कपडे सांभाळून ठेवलेले असतील तर नेहमी पुजेलाच वापरल्याने त्या कपड्यांवर फक्त चंदन, हळद-कुंकु ह्यांचेच डाग लागतील व संस्कारही त्याच विधींचे येतील.


वैज्ञानिक दृष्ट्या विचार केल्यास पुजेला रेशिम किंवा लोकरीचे कपडे अधिक लाभदायक ठरतात कारण धार्मिक कार्यांच्या वेळी मंत्रोच्चारातून उठणारी ध्वनीस्पंदने व विद्द्युत- लहीरी शीघ्रपणे अंगभर फिरण्यासाठी अंगास घर्षण होणारे रेशमी किंवा लोकरीचे वस्त्र अधिक लाभदायक ठरते. शिवाय ती वस्त्रे स्वच्छ करण्यास सोपीही असतात.


म्हणुनच पूजा, जप, संस्कार, अनुष्ठान, पुरश्चरण इत्यादि धार्मिक कार्यांच्या प्रारंभी पीतांबर, लोकरीचे वस्त्र नेसून अंगावर उपवस्त्र (उपरणे) घ्यावे. ह्या बाबत एक श्लोक असा आहे ....


"चीनांशुकं ऊर्णवस्त्रं धूतवस्त्रं तथैव च । धर्मकार्यसिद्यर्थं उत्तरोत्तरं प्रश्यस्यते ॥"    


-माधव कुळकर्णी.