मराठीने केला अमराठी भ्रतार

खूऽऽऽप वर्षांपूर्वीची गोष्ट. माझ्या एका मराठी मैत्रिणीनं नुकतंच बंगाली मुलाशी लग्न केलं होतं. नव्या नवरीनं सासूसमोर नवऱ्याचा नावाने उल्लेख केला मात्र आणि ऐकणारे सारेच चपापले! मैत्रिणीची तिच्याहून आठनऊ वर्षांनी मोठी मावससासू तिला एकीकडे घेऊन समजाऊन सांगत म्हणाली, "सासूसमोर नवऱ्याचं नाव घ्यायचं नसतं. तिच्यासमोर नवऱ्याचा उल्लेख ’तुमचा मुलगा’ (आपनेर छेले) असा करायचा."

माझंही लग्न साधारण वर्षभर आधी झालेलं होतं.  मी मैत्रिणीला म्हटलं, "बरं झालं बाई, महाराष्ट्रात असं नाहीये. नाहीतर पंचाईतच होईल. "

ती म्हणाली, "पंचाईत काय त्यात? "

मी म्हटलं, "म्हणजे असं बघ.  मी सासुबाईंना म्हटलं की ’तुमच्या मुलाचं पत्र आलंय.’ (त्यावेळी आमचं तू तिकडे अन मी इकडे असं चाललं होतं. त्यामुळे पत्रापत्री बरीच होत असे. ईमेलच्या आधीचा जमाना तो! ) तर ते किती उद्धट वाटेल आणि ते उद्धट वाटतं म्हणून ’तुमच्या चिरंजीवांचं पत्र आलंय.’  असं म्हणावं तर आणखीच उद्धट वाटेल! "

त्यावर आम्ही दोघी खूप हसलो आणि ती मैत्रीण म्हणाली, "अरेरे, ह्यातली गंमत माझ्या नवऱ्याला कळणार नाही आणि त्याचं बंगालीत भाषांतर करून सांगावं तर त्यातली सगळी गंमतच निघून जाईल. "

तर मैत्रिणींनो, तुमच्यातही असे आंतरप्रांतीय विवाह केलेल्या काही जणी असतील. मनोगतावर अर्धा/पाव डझन तरी सापडतील. हे भाषिक भेद, रीतिरिवाजांमधील भेद यांमुळे काही गमती, घोटाळेही झाले असतील. तर तुमचे असे काही अनुभव तुम्ही आम्हाला सांगावेत अशी विनंती ह्या प्रस्तावाद्वारे करत आहे. म्हणजे आम्हालाही त्यातली गंमत थोडीफार अनुभवता येईल. अर्थात हे करताना दुसऱ्याच्या भाषेची, प्रांताची टिंगल ह्यासारख्या गोष्टी इथे टाळाव्यात हे वेगळे सांगावयास नकोच.

चर्चेचं शीर्षक ’मराठीने केला अमराठी भ्रतार’ असं असलं तरी ’मराठीने केले अमराठी कलत्र’ अशा सदस्यांनीही आपले अनुभव सांगितले तर त्यांचं स्वागतच आहे.