मराठीतील काही चुकार व घुसखोर शब्द

मराठीत काही शब्द चुकीच्या अर्थाने वापरले जातात. तसेच अलीकडे हिंदीतील शब्द मराठीत घुसडायची प्रथा आली आहे. सकाळमधे आलेल्या एका पत्राने मला हा विषय सुरु करावासा वाटला.


दर्शकः हा शब्द हिंदीत अत्यंत चुकीच्या अर्थाने वापरला जातो. याचा प्रेक्षक अशा अर्थी म्हणून वापर होतो. आणि हा चुकीचा शब्द मराठीतही घुसखोरी करु लागला आहे.
व्यस्तः मी कामात गर्क आहे, व्यग्र आहे वा मग्न आहे याऐवजी व्यस्त आहे. मुळात मराठीत हा शब्द इन्व्हर्सली प्रपोर्शनल (माफ करा याला व्यस्त सोडून अन्य योग्य मराठी पर्याय माहित नाही.) असा वापरला जातो.


संपन्नः एखादा कार्यक्रम साजरा झाला म्हणण्याऐवजी हिंदीप्रमाणे संपन्न झाला म्हणायची पध्दत बनली आहे.
विदेशीः परदेशी हा मराठी शब्द जास्त प्रचलित आहे.
सुविधाः सोय हा शब्द जास्त प्रचलित आहे.


अजून एक शब्द म्हणजे नेत्रदीपक. डोळे दिपवणारे अशा अर्थाने वापरला जात असला तरी तो योग्य आहे का? नेत्र म्हणजे डोळे आणि दीपक म्हणजे दिवा. मग इथे दिपवणे कुठे आहे?

सुस्वागतम् इथे सु दोनदा आला आहे आणि तसे करणे चूक आहे. सु+सु+ आगतम् ऐवजी सु+आगतम् इतके पुरे आहे.