कधी मी स्वत: रंग अन्‌ ढंग केले

कधी मी स्वतः रंग अन्‌ ढंग केले
कधी मेनकांनी तपोभंग केले
 
गुरू तेच अध्यात्ममार्गावरीचे

सग्यासोयर्‍यांनीच निःसंग केले

 
मना मोह होता सदोदीत श्रीचा

मुखे नित्य "श्रीरंग, श्रीरंग" केले

 
दगड तो, नका त्यास शेंदूर फासू

अशानेच नाच्यास नटरंग केले

 
कशाला, सखे, मंदिरी जाग्रणे ती?

तुझ्या बाहुपाशात सत्संग केले

 
पहा दूर सारून हा शब्दपडदा

मनाचे उघड अंग-प्रत्यंग केले