रिलोडेड!

रंगीबेरंगी ५ वरून पुढे. रंगीबेरंगी ५ वाचले नसेल तर कृपया आधी वाचावे, अन्यथा अर्थग्रहणात अडसर येईल आणि न विसरता कथेच्या सुरुवातीची भूमिका आणि वैधानिक इशारा सुद्धा वाचावा ही नम्र विनंती.

"काही नाही रे....पण प्रेम हे ठरवून केलं जात नाही, आपोआप होतं"
"अस्सं, मग मी त्याला होऊ देणार नाही"
"थोडे दिवस थांब, होईल"
"काय बाई, माझ्याशी लग्न करण्याचा विचार आहे की काय?"
"शशांऽऽऽक" ती रागावल्याचा अभिनय करत म्हणाली


मीही हसलो, खरं तर कधी नव्हे ते मनातलं बोललो होतो, पण स्वत:च तयार केलेल्या बिनधास्त आणि निष्काळजी अशा प्रतिमेत अडकलो होतो. ती सुद्धा एकदम शांत झाली. बराच वेळ कुणीच काही बोललं नाही. मी घड्याळ पाहिले साडेतीन वाजले होते. तिलाही परत ऑफिसमध्ये जायचे होते. मला सुद्धा जाणे भाग होते.


"माझा नंबर आहेच तुझ्याकडे" मी
"हो, करेन मी कॉल तुला"
"ठीक, चल तर मग, भेटू परत"
"नक्कीच"


ऑफिसमध्ये परतलो. सहकाऱ्याने बातमी दिली की सिदचा चार वेळा फोन येऊन गेला. मी लागलीच त्याचा नंबर फिरवला.

"सिद? शशांक"
"अरे कुठे होतास तू? चारवेळा फोन केला मी"
"अरे हां ... एका जरूरी मिटिंग मध्ये होतो" सिदला इतक्यात सांगायला नको
"ठीक आहे, आज आटप लवकर काम, आपल्याला लवकर जायचेय...९ वाजता"
"का?"
"अरे मंदार आज शुक्रवार नाही का? आजकल लक्ष कुठे असतं तुझं? समीर तिकडेच येईल साडेनऊ वाजता" (मुलाने मंदपणा केला की आमच्याकडे त्याला "मंदार" म्हणण्याची प्रथा आहे, मुलीने केला तर "मंदाताई")

रात्री नऊ वाजता म्हणजे लवकर? वाचकांना प्रश्न पडेल. हो आमची कंपनी म्हणजे "कानिफनाथ रसवंतीगृह" वाल्यासारखी आहे. अगदी शेवटच्या थेंबापर्यन्त पिळणार, १२ ते १४ तास काम केल्याशिवाय ते काम नाहीच असा दृढ (गैर)समज.

हुश्शऽऽ... चला पटापट कामं उरकायच्या तयारीला लागलो. झर्रकन वेळ चालला होता, कामासाठी आलेल्या कमी महत्त्वाच्या व्यक्तिंना "सोमवारी पाहू, आज वेळ नाही" असे लगच्यालगेच उडवून लावले. प्रकल्प नेत्याला (प्रोजेक्ट लीडर) सांगितले की आज लवकर जायचे आहे म्हणून. तो सहसा मला नाही म्हणत नाही कारण त्याच्या कामापैकी बरीचशी बौद्धिक कामे मीच करतो. ८:५० झाले. मी पटापट आवरले, मांडी-संगणक त्याच्या दप्तरात कोंबला आणि निघालो.


"अरे आज लवकर?" आ.पो. (तीच ती आगाऊ पोरगी) गेल्या जन्मी ही बहुतेक मांजर असावी, नेमक्या वेळी आडवं जायची सवय. दिसतेही मांजरीसारखी. बिचाऱ्या समीरला, मांजर जसे मारण्याआधी उंदराला खेळवते, तशी खेळवत होती.
"तुला कॅय करायचयं?" असं अगदी जिभेच्या टोकाला आलेलं वाक्य मी आत ढकललं. "हो, आज लवकर, काम आहे थोडं" मी आपलं तिला टाळण्याच्या उद्देशाने म्हंटले.
"शुक्रवार साजरा करायचा आहे वाटतं? मी समीरला सख्त ताकीद दिलिये तिथे गेलास तर बघ, म्हणून"
आता मात्र मला रहावले नाही. "ए, तुला काय वाटतं? समीर तुझं ऐकून तिथे येणार नाही? जा जरा तोंड धुवून ये. समीरसाठी तुझ्यापेक्षा आम्ही जास्त महत्त्वाचे आहोत समजलं? खात्री करायची असेल तर १० वाजता माझ्या मोबाईलवर कॉल कर"

मी सटकलो तिथून. बरोबर ९:३० वाजता मी आणि सिद IIT समोर "सुजाता पॅलेस" च्या दारात उतरलो. समीर वाटच पाहत होता. आज दिवसभर आराम केल्याने खुशीत दिसत होता. आता थोड्यावेळाने याचे कसे होणार? हम्म.. बघुया गंमत. माझा आसुरी-आनंद बोलला.

आत जाताच प्रबंधकाने हासून स्वागत केले. आम्ही थेट वातानुकूलित कक्षात प्रवेश केला. त्या दोघांनी आपापली आवडती पेये मागवली. मी संत्र्याचा रस मागवला. समीर आज खुशीत असल्याने पटापट दोन ग्लास रिचवले. मी ही त्याला अडवले नाही. बरोबर १० वाजता आ.पो. चा फोन आला. मी विचार केला हिचा समीरपेक्षा माझ्यावर जास्त विश्वास आहे ही ही ही.
"शशांक..." मी
"शशांक, मी बोलतेय, समीर आहे तिथे?" आ.पो.
"आर यू श्युअर, यू वाँट टू टॉक टू हिम?" मी आंग्लभाषेतून वाक्य फेकले. कोरडेपणा दाखवायला इंग्रजी बरी असते.
"येस" ती जोरात म्हणाली.
आज काय समीरची धडगत नाही
"ओके" समीरकडे बघून, "समीर कोणालातरी तुझ्याशी बोलायचेय"
"कौन है?" समीर पिल्यावर हिंदीत बोलतो.
"काही माहीत नाही कोण आहे" पुन्हा आगाऊपणा.
"हेल्लो"
दोन मांजरे आपापसात भांडत असताना जसा आवाज येतो, तसे काहीतरी आम्हाला ऐकू येत होते.
"लेकिन मै ... तुमने तो ... सुनो तो ... कबसे के" अजूनही हिंदीतच बोलतोय, पूर्ण उतरलेली दिसत नाही.
"कुठे आहेस तू?" पलिकडून जोरदार विचारणा झालेली आम्हालाही ऐकू आली.
"सुजाता पॅलेसमध्ये..." उतरली सगळी!
......
शनिवारची सकाळ. मी साडेनऊ वाजता उठलो, समीर सकाळी सकाळी डोक्याला हात लावून बसला होता.

"काय झाले रे?"
"तू काही बोलू नकोस"
"अरे पण काय झाले सांगशील तर का नाही?"
"काल रात्रीच्या प्रकाराबद्दल बोलतोय मी, तुझ्यामुळे, केवळ तुझ्यामुळे ती रागावलीय माझ्यावर आणि परत भेटायचा प्रयत्नही करू नको असा दम दिलाय"
"छान! सुंठेवाचून खोकला गेला. ती तुझी मैत्रिण कमी आणि बॉस जास्त वाटत होती. आणि उठसुठ दम कसला देते? तुला काही स्वाभिमान वगैरे आहे की नाही? उसने तेरी खुद्दारीको ललकारा है यार, क्या कर रहा है? बी अ मॅन. मर्द बन!" हिंदीत बोललेले समीरला पटते हे मला माहीत होते.
"अरे, मी कधी असा विचारच केला नव्हता"
"वाटलंच होतं मला" मी
"आता जरा बरं वाटतंयं"
"गुड! आता जाऊन खालच्या भैय्याकडून आपला नेहमीचा मसाला घेऊन ये पाहू, ३/४ मिरच्या, २ कांदे, लिंबू, आले, कढिपत्ता आणि कोथिंबीर, सिदला कांदेपोहे करायला लावू"
"ओके, अरे, कोथिंबिरीला हिंदीत काय म्हणतात रे?"
"धनिया"


मस्त भरपेट पोहे खाऊन झाले. मटा, लोकसत्ता, सकाळ, सामना, मिड डे, टाईम्स नुसती रेलचेल होती वर्तमानपत्रांची. निवान्त पडून वाचन चालले होते. इतक्यात मोबाईल वाजू लागला. नंबर पाहिला, "तिचा" होता, नेहमी न जाणवणारी धडधड जाणवू लागली, उसने अवसान आणून मी नेहमीच्या स्टाईल मध्ये बोललो. तिने मला संध्याकाळी ठाण्याला "गडकरी रंगायतन" जवळ यायला सांगितले


ठाण्याला बऱ्याचदा जातो आम्ही. आमच्या भागातली अमराठी हिरवळ पाहून कंटाळा आला की मऱ्हाटमोळ्या पोरी बघायला दादरला किंवा ठाण्याला जावे लागते. ठाणे जास्त सोईचे कारण येताना मुलुंडच्या आर-ऍडलॅब्ज मध्ये रात्री १० ते १ एखादा पिक्चर टाकून १:२० च्या ५२३ ने परत येता येते. २ च्या दरम्यान पोहोचायचे घरी आणि मग निवान्त झोप.

पण फोन ठेवल्यावर विचारचक्र सुरू झालं, आज अचानक का बरं बोलावलं? काही स्वाभाविक उत्तर सापडेना. काय होईल ते जाऊन पाहू.


क्रमश: