महाभारत कथा (१४)

महाभारत कथा (१४)
द्रोणाचार्यांच्या विलक्षण युद्धकौशल्याइतकेच त्यांच्या चरित्रातील नैतिक पेचही विचार करायला लावतात.
शिष्यांमध्ये केलेला भेदभाव, एकलव्याची गुरुदक्षिणा, कर्णाची अवहेलना आणि द्रुपदावरील सूड यांतून आदर्श गुरुच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उभे राहते.
ज्ञान श्रेष्ठ होते, पण ते देणाऱ्याचे आचरणही तितकेच श्रेष्ठ असावे का?

महाभारत कथेमध्ये नात्यांची सरमिसळ दिसून येते. विविध राजघराणी आणि त्यांचे प्रमुख यांचे आपसातील वैर, मैत्री इत्यादीचा उल्लेख वेळोवेळी दिसतो. महाभारत जरी कौरव पांडवांमधील वैराची कथा असली तरी त्यात इतरही अनेक राजा महाराजांचे संदर्भ येतात.

श्रीकृष्ण हे द्वारकाधिपती आहेत. मथुरेचा राजा कंस याचा वध करून त्यांनी त्यांचे माता-पिता म्हणजेच वसुदेव-देवकी यांची कैदेतून सुटका केली. वसुदेव आणि देवकी कारागृहामध्ये बंदी असताना बालकृष्णाचे संगोपन गोकुळीच्या नंद आणि यशोदेने केले होते. गोकुळातील नंदराजा गोपालक होते आणि त्यांच्या समवेत श्रीकृष्ण देखील गायी राखण्याचे काम करीत असत. सर्वसामान्य गोप गोपींमध्येच त्यांचा वावर होता पण असे असूनही त्यांचे दैवी गुण वेळोवेळी प्रकट झाले होते. यमुनेच्या पात्रामध्ये राहून सारे पाणी विषारी करत असलेल्या कालिया सर्पाला त्यांनी ठार केले होते. संपूर्ण गोकूळ पाण्यामध्ये बुडवण्याकरता बरसणाऱ्या वरुणाच्या कोपापासून वाचविण्याकरता त्यांनी गोवर्धन पर्वत उचलून अंगुलीवर तोलला होता. कंसमामाने वेळोवेळी कृष्णाच्या वधाकरता पाठवलेल्या असुरांचा त्यांनी नि:पात केला होता. या आणि अशा सर्व घटनांवरून गोकूळवासीयांच्या लक्षात आलेच असणार की यशोदेचा कान्हा हा कुणी सर्वसामान्य बालक नव्हे.

श्रीकृष्ण देवतास्वरूप आहेत कारण त्यांना गर्व, तिरस्कार, द्वेष, मत्सर अशा मानवी अवगुणांचा स्पर्शही नव्हता. वैयक्तिक मान-अपमान बाजूला ठेवून त्यांनी उच्च ध्येय साध्य करण्यासाठी प्रयास केले आणि त्यात ते सफल झाले. त्यांना अनेकांनी गुराख्याच्ग पोर म्हणून हिणवले पण त्या टीकेला त्यांनी कधी प्रत्युत्तर दिले नाही आणि टीका करणाऱ्याला वैरी मानले नाही. दुर्योधनाने राजसूय यज्ञप्रसंगी त्यांचा अपमान केला. पांडवांचे प्रतिनिधी म्हणून ते कुरुसभेत आलेले असताना त्यांचा अपमान करण्यात आला होता. पण तरीही युद्धासाठी मदत मागायला दुर्योधन आला तेव्हा त्याचा उलट अपमान न करता त्याला मदतच केली. संपूर्ण यादवसेना दुर्योधनाच्या बाजूने  युद्धामध्ये सहभागी झालेली होती. वरकरणी रसिक, रंगेल आणि लाघवी भासणारे त्यांचे व्यक्तिमत्व किती प्रगल्भ आणि साक्षेपी आहे ते दिसून येते.

श्रीकृष्णाचे वर्णन द्रष्टा राजकारणी असे करण्यात येते. ऐश्वर्यसंपन्न द्वारकेचे अधिपती असूनही ते भोगविलासात रमले नाहीत. पांडव आणि श्रीकृष्ण यांचे अतूट नाते आहे. पांडवांची माता कुंती ही वसुदेवांची भगिनी होती. पांडवांच्या सर्व कठीण प्रसंगी, संकटकाळी श्रीकृष्ण त्यांचे सहाय्यकर्ते, सल्लागार आणि प्रसंगी उपदेशकही होते.

पाचही पांडवांचा जन्म दुर्वास ऋषींनी दिलेल्या मंत्राच्या प्रभावाने झाला होता. पांडवांच्या बालपणीचा सुरुवातीचा काळ रानावनातच व्यतीत झालेला होता. पंडूराजाच्या निधनानंतर पितामह भीष्मांनी त्यांच्या पालन पोषण आणि शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. पांडव हस्तिनापुरामध्ये वास्तव्यासाठी आले. पितामह भीष्मांनी त्यांच्या शिक्षणाची उत्तम व्यवस्था केली होती. ज्ञानसंपन्न आणि युद्धविद्येमध्ये निपुण असलेल्या द्रोणाचार्यांची नियुक्ती राजगुरू म्हणून करण्यात आली होती.

गुरु द्रोणाचार्यांची कथा -

गुरु द्रोणांची पत्नी, कुरुसभेत महत्त्वाचे स्थान असलेल्या कृपाचार्याची भगिनी आहे. द्रोणाचार्याची एक कथा नेहमी सांगितली जाते. सर्व विद्यांमध्ये पारंगत असलेले द्रोण दारिद्र्यापुढे हतबल झालेले होते. अनेक प्रयत्नांती त्यांना उपजीविकेचे साधन मिळू शकत नव्हते. त्यांचा पुत्र अश्वत्थामा भुकेनं व्याकुळ झालेला होता, परंतु त्याला देण्यासाठी थोडेसे दूधही त्यांच्या घरात नव्हते. द्रोणांच्या पत्नीने कसलेसे पीठ पाण्यात कालवून तिच्या पुत्राला दूध म्हणून दिले.

घरातली अशी परिस्थिती द्रोणांना पाहवेना. आजवर ते नेहमीच स्वाभिमानाने आयुष्य जगले होते. त्यांनी कधीच कुणाला मदतीची याचना केली नव्हती किंवा दान मागितले नव्हते. खरेतर ते ब्राह्मण होते त्यामुळे भिक्षा मागण्याचा त्यांना अधिकार होता. ब्राह्मणास भिक्षा देणे हे पुण्यकर्म समजले जात असे (वर्तमान काळात देखील ती समजूत जनमानसात रुजलेली आहे ). द्रोणांना कुणासमोर हात पसरणे अपमानास्पद वाटत असे. परंतु आता त्यांचा नाईलाज होता. पुत्रप्रेमाने त्यांच्या स्वाभिमानावर मात केली होती.

द्रोणाचार्य पांचालदेशीच्या द्रुपदराजाच्या राजदरबारात आले. द्रुपदराजा युवराज असताना द्रोणांचा सहाध्यायी होता. एकाच गुरुकुलामध्ये त्यांनी अध्ययन केले होते आणि त्यांच्यात मैत्रीचे नाते निर्माण झालेले होते. त्या मैत्रीला स्मरूनच द्रोण द्रुपदराजाच्या दरबारी उपस्थित झाले होते, परंतु त्यांचा अपेक्षाभंग झाला होता. फक्त अपेक्षाभंगच नाही तर अपमानही झाला होता. राजाने त्यांना पाहून ओळखसुद्धा दर्शवली नाही, मित्रत्वाने स्वागत करणे दूरच. दरबाराचे कामकाज सुरू होते आणि द्रोण इतर सामान्य ब्रह्मवृंदांच्या समवेत थांबलेले होते. त्यांनी विचार केला, राजाचे कर्तव्य महत्त्वाचे, द्रुपद आता युवराज नसून प्रजेचा पालनकर्ता सम्राट आहे, त्याच्या कर्तव्यात व्यग्र आहे.

दरबारी कामकाज संपल्यावर ब्राह्मणांना दक्षिणा देणे सुरू झाले. इतर सामान्य ब्राह्मणांप्रमाणे द्रोणांच्या झोळीतही काही सुवर्णमुद्रा दिलेल्या होत्या. न राहवून द्रोणांनी द्रुपदराजाला विचारले की तो त्यांची ओळख विसरला आहे का? राजाने मोठ्या अनिच्छेने द्रोणांना दरबारी येण्याचे कारण विचारले. द्रोणांनी त्यांची स्थिती वर्णन करून सांगितली आणि एखादी गाय त्यांना मिळू शकेल का? अशी विचारणा केली. द्रुपद राजा कुत्सितपणे म्हणाला, इतके विद्याध्ययन करूनही भिक्षुकीच करावी लागते आहे ना तुम्हाला? द्रोणांना संताप अनावर झाला, ते म्हणाले आज त्यांच्या पुत्राला दूध मिळावे म्हणून गायीचे दान मागण्यासाठी ते आले होते. राजाने मैत्रीधर्म पाळला नाहीच पण तो राजधर्मही विसरला. आता द्रोण द्रुपदा समोर येतील तेव्हा द्रुपदाला त्याच्या प्राणांची भिक्षा मागावी लागेल.

निराश होऊन ते स्वगृही जाण्यासाठी निघाले. एका अरण्यातून जात असताना त्यांनी पाहिले काही कुमार विट्टी-दांडूचा खेळ खेळत होते, ते राजघराण्यातील असावेत असेच दिसत होते. ती मुले म्हणजे हस्तिनापूरचे राजपुत्र कौरव आणि पांडव होते. खेळताना अचानक त्यांची विट्टी बाजूला असलेल्या एका खोल आणि पडक्या, कोरड्या विहिरीत जाऊन पडली. सगळी मुले विहिरीभोवती जमली पण विट्टी कशी बाहेर काढावी? ते काही त्यांना समजत नव्हते. द्रोणांनी ते पाहिले, त्यांनी त्यांच्या धनुष्यावर बाण चढवला, प्रत्यंचा ताणली आणि बाण विहिरीच्या तळाला पडलेल्या विट्टीमध्ये रुतला. एकामागून एक अशा अनेक बाणांची एक शृंखलाच तयार झाली आणि द्रोणांनी ती विट्टी अलगद ओढून बाहेर काढली. राजपुत्रांच्या आश्चर्याला पारावार राहिला नव्हता, मुलांनी द्रोणांचे आभार मानले. राजगृही परतल्यानंतर घडलेली हकीकत त्यांनी पितामह भीष्मांना कथन केली. पितामहांना देखील आश्चर्य वाटले. त्यांनी द्रोणांना हस्तिनापुरामध्ये येण्याची विनंती केली.

पितामह भीष्मांनी द्रोणांचा योग्य तो आदर सत्कार केला, त्यांची सर्व माहिती जाणून घेतली. भीष्म त्या वेळेस राजपुत्राच्या शिक्षणाची कशी व्यवस्था करावी या विवंचनेत होते. द्रोणाचार्य हे राजपुत्रांकरता योग्य गुरु आहेत असे भीष्मांना वाटले. त्यांनी द्रोणांना ती जबाबदारी स्वीकारायची विनंती केली जी द्रोणांनी आनंदाने स्वीकारली.

गुरु द्रोणाचार्य यांचे ज्ञान, युद्धकौशल्य अजोड होते यात काही शंकाच नाही. त्यांनी कौरव आणि पांडवांना उत्तम प्रशिक्षण दिले. त्यांनी अर्जुन, भीम यांसारखे सर्वोत्तम योद्धे घडवले, युधिष्ठिरासारखा राजनीतिज्ञ त्यांचाच शिष्य होता. गुरू म्हणून आणि नंतर कौरवांचे सेनानी म्हणून त्यांचे कार्य बहुमोल आहे.

द्रोणाचार्यांच्या चरित्रातील महत्त्वाचे प्रसंग -

(१ ) विद्यादान करताना गुरुदेवांचे वागणे निष्पक्ष असणे अपेक्षित असते. सर्व शिष्य त्यांच्यासाठी समान असायला पाहिजेत. गरीब-श्रीमंत, सामान्य-उच्चकुलीन असे भेदभाव त्यांनी करायला नको. जेव्हा कर्ण त्यांच्या गुरुकुलामध्ये शिक्षण घेण्याच्या इच्छेने आला तेव्हा द्रोणांनी प्रथम त्याला शिष्य म्हणून स्वीकारण्यास नकार दिला कारण तो सूतपुत्र होता. नंतर त्याला गुरुकुलामध्ये प्रवेश देण्यात आला. त्याला राजपुत्रांहून वेगळी वागणूक देण्यात आली. गुरुकुलातील विद्यार्थ्याच्या स्पर्धेच्या प्रसंगी जेव्हा कर्ण अर्जुनासमोर प्रतिस्पर्धी म्हणून आला तेव्हा द्रोणांनी तो राजपुत्र नाही म्हणून त्याला स्पर्धेमध्ये सहभागी होण्यास परवानगी नाकारली. त्या वेळेस दुर्योधनाने कर्णाला अंगदेशाचा राजा म्हणून अभिषेक केला. कर्ण आता राजा असल्याने स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकत होता. अर्थात त्या वेळेस त्याला अर्जुनाकडून हार पत्करावी लागली होती पण अर्जुनाबद्दलची वैरभावना त्याच्या मनात कायमची रुजली होती. हा सर्व तमाशा घडत असताना राजमाता कुंती तिथे उपस्थित होती. कर्णाची जन्मजात कवचकुंडले पाहून तो तिचा पुत्र आहे हे तिला नक्कीच समजले असणार, पण तिनेही त्याची अवहेलना थांबविण्याचा प्रयत्न केला नाही.

(२) विद्यादान करताना गुरूने भेदभाव न करता  ज्ञान, सर्व विद्यार्थ्यांना एकसमान पद्धतीने देणे अपेक्षित असते. द्रोणांनी शिष्य अर्जुन आणि स्वपुत्र अश्वत्थाम्यालाच ब्रह्मास्त्र विद्या दिली होती. अर्जुन त्यांचा प्रिय शिष्य होता याचे कारण कदाचित अर्जुनाची योग्यता खूप उच्च दर्जाची होती. द्रोणपुत्र अश्वत्थामा त्यांच्या गुरूकुलामध्ये अध्ययन करीत असे. धनुर्धारी अर्जुन उत्तम योग्यतेचा असला तरीही त्यांच्या पुत्राहून तो श्रेष्ठ असू नये अशीच त्यांची इच्छा होती.     

(३) आदिवासी जमातीतील भिल्लराजाचा पुत्र एकलव्याला सुद्धा द्रोणांनी गुरुकुलामध्ये प्रवेश नाकारला होता कारण तो उच्च्कुलीन राजघराण्यातील नव्हता. एकलव्य जिद्दी होता, त्याला धनुर्विद्येवर प्रभुत्व मिळवायचे होते. त्याने गुरुद्रोणांचा पुतळा घडवला आणि त्या पुतळ्याला साक्षी ठेवून तो एकाग्रतेने धनुर्विद्येचा सराव करू लागला. बराच मोठा काळ सराव केल्यानंतर तो उच्च दर्जाचा धनुर्धर झाला होता.

एकदिवस द्रोणाचार्य त्यांच्या सर्व शिष्यासमवेत अरण्यांमध्ये मृगयेसाठी आलेले होते. त्यांच्याबरोबर काही श्वाने होती. त्यातील एक कुत्रा सतत भुंकत दूरपर्यंत गेला होता. काहीवेळाने त्याचा आवाज बंद झाला आणि तो परत द्रोणांपाशी आला. आश्चर्य म्हणजे त्याचे तोंड उघडे होते कारण एक बाण अचूक त्यांच्या तोंडामध्ये असा लागलेला होता की त्याला इजा तर झालेली नव्हती पण तोंडही बंद करता येत नव्हते. द्रोणांनी तो बाण काढून घेतला, त्यांच्या लक्षात आले होते की असे करणे कुणा श्रेष्ठ धनुर्धारीलाच शक्य होते. द्रोण मागोवा घेत पुढे निघाले तेव्हा त्यांना त्यांचीच भव्य मूर्ती दिसली आणि तिथेच एक भिल्ल युवक एकाग्रपणे धनुर्विद्येचा सराव करीत होता. द्रोणांना पाहताच तो युवक नम्रपणे पुढे आला, द्रोणांना प्रणाम करून त्यांच्यासमोर उभा राहिला, तो होता एकलव्य. त्याने सांगितले की अनेक वर्षांपासून द्रोणांच्या प्रतिमेला गुरु मानून त्याने धनुर्विद्येचा सराव केला आहे. द्रोण आश्चर्यचकित झाले होते. एकलव्याचे कौशल्य पाहून त्यांना त्याचे कौतुक वाटत होते पण त्यांना आता एक चिंता सतावत होती, त्यांनी अर्जुनाला -- त्यांच्या शिष्याला वचन दिले होते की तोच सर्वश्रेष्ठ धनुर्धर असेल त्याच्यापेक्षा श्रेष्ठ कुणीही असणार नाही. पण आता त्यांच्यासमोर असा धनुर्धर उभा होता ज्याने कदाचित अर्जुनाला पराभूत केले असते.

द्रोणांनी एकलव्याला आशीर्वाद दिले आणि म्हणाले त्यांना गुरु मानून एकलव्याने विद्या प्राप्त केली आहे तर आता गुरुदक्षिणा द्यायला पाहिजे. एकलव्याने सांगितले की ते मागतील ती गुरुदक्षिणा तो देईल. द्रोणांनी त्याला त्याच्या उजव्या हाताचा अंगठा देण्यास सांगितले. अंगठा नसेल तर धनुष्यावर बाण चढवून तो प्रत्यंचा ताणू शकला नसता आणि त्याच्या विद्येचा कधीच उपयोग करू शकला नसता. एकलव्याने एक क्षणही न गमावता त्याचा अंगठा कापून दिला. द्रोणांना समाधान होते की त्यांनी अर्जुनाला दिलेले वचन भंगले नव्हते. एका शिष्याला श्रेष्ठत्व देण्याकरता त्यांनी दुसऱ्या कुणाचे नुकसान केले होते, त्यांचे ते वर्तन आदर्श गुरूच्या व्याख्येला छेद देणारे होते.

(४ ) अध्ययन पूर्ण झाल्यावर कौरव-पांडवांनी त्यांना विचारले की गुरुदक्षिणा म्हणून त्यांनी काय द्यावे? द्रोणांनी त्यांना पांचालदेशावर आक्रमण करून द्रुपदराजाला बंदी करून आणण्यास सांगितले. क्रोध, द्वेष, मत्सर, ईर्ष्या, सूडभावना हे सर्व तामसी गुण आहेत, आदर्श गुरु स्वतः अशा अवगुणांपासून दूर राहतातच आणि त्यांच्या शिष्यांना देखील अशा दुर्गुणांपासून दूर राहण्याची शिकवण देतात. दया, क्षमा, शांती, औदार्य असे उत्तम गुण असणे हेच आदर्श गुरुचे व्यवच्छेदक लक्षण आहे परंतु गुरुद्रोणांनी त्यांच्या शिष्यांना द्रुपदराजाबरोबर युद्ध करण्यास प्रवृत्त केले. पांचालदेश खरे तर हस्तिनापुराचे मित्रराज्य होते. कौरव-पांडवांचे द्रुपदाशी काहीच वैर नव्हते. कौरव-पांडवांनी द्रोणांची इच्छा पूर्ण केली, बंदी केलेल्या द्रुपदाला द्रोणांनी मुक्त केले. स्वतःच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्यांनी दोन राज्यांमध्ये युद्ध घडवून आणले होते.

(५ ) गुरुद्रोण हे राजगुरू होते आणि राजपुत्रांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही त्यांना दरबारात मानाचे स्थान होते. दुर्योधनाची अनेक कपट कारस्थाने त्यांनी पाहिली पण जराही विरोध केला नाही. द्रौपदीचे वस्त्रहरण, द्युतामध्ये धर्मराजाची फसवणूक, पांडवांच्या हत्येचे प्रयत्न आणि शिष्टाईसाठी आलेल्या श्रीकृष्णाचा अपमान या सर्वांचे ते साक्षीदार होते. त्यांनी उघडपणे कधीच पांडवांची बाजू घेतली नाही. राजनिष्ठा म्हणून असेल पण पांडवांची बाजू न्यायाची असूनही युद्धामध्ये त्यांनी कौरवसेनेचेच नेतृत्व केले.

पितामह भीष्माचार्यांनंतर द्रोण कौरवांचे सेनापती होते आणि त्यांनी त्यांच्या युद्धकौशल्य आणि नेतृत्वाने कौरवांच्या सेनेला उत्तम मार्गदर्शन केले होते.

***