महाभारत कथा (१३)

महाभारत कथा (१३)
बालकृष्ण, मुरलीधर, द्वारकाधीश, राजकारणी आणि महाभारताचा सूत्रधार अशा अनेक रूपांत श्रीकृष्णाचे व्यक्तिमत्त्व उलगडते.
चमत्कारांच्या कथांपलीकडेही संकटसमयी धावून जाणारा सखा, द्रौपदीचा रक्षक आणि अर्जुनाचा मार्गदर्शक असा युगंधर कृष्ण महाभारताच्या केंद्रस्थानी उभा राहतो.

पृथ्वीतलावर जी जीवसृष्टी अस्तित्वात आहे त्यात मानव सर्वश्रेष्ठ आहे आणि त्याचे कारण म्हणजे बुद्धिमत्ता. बुद्धीचा वापर करून मानवाने सर्व पृथ्वी व्यापली आहे. माणसाने समूहाने राहून वसाहती निर्माण केल्या. मानवी वस्तीबरोबरच समाज आणि सामाजिक जीवनपद्धती अस्तित्वात आली. त्यात अनेक स्थित्यंतरे झाली, काळाप्रमाणे रीती, प्रथा, समजुती यामध्ये बदल घडत गेले. वर्तमान काळाचे निकष लावून महाभारत कथा वाचणे योग्य होणार नाही कारण त्या कथा प्राचीन काळाच्या समाजाची चित्रे दाखवितात. ऐतिहासिक आणि पौराणिक कथा वाचताना मनातील प्रश्नचिन्हे बाजूलाच ठेवावीत असे मला वाटते. अभ्यासक त्या प्रश्नांची उत्तरे शोधतील कदाचित, आपण मात्र कथा वाचाव्यात आणि जमल्यास त्यातून काही बोध घ्यावा.

महाभारतात नातीगोती, परस्पर व्यक्तीगत संबंध यांची अनोखी गुंतागुंत आहे. त्यादृष्टीने पहिले तर महाभारत हे मानवी भावभावनांचे सर्वंकष चित्रण आहे असे जाणवते. यात टोकाचे वाईट लोक आहेत आणि चांगलेही आहेत. परिस्थितीनुसार भावनांवर व्यावहारिक तथ्ये मात करतात हे नेहमीच दिसून येते.  

आतापर्यंत आपण कौरव, पांडव आणि कुरुकुळाचा इतिहास बघितला. कर्तृत्ववान राजा महाराजांनी कुरुकुळाची कीर्ती दिगंतापर्यंत नेली होती. कुरु साम्राज्य भारतातील एक सामर्थ्यवान राज्यांपैकी एक होते. विविध राज्यांचे राजे कुरु साम्राज्याचे अंकित झालेले होते,काही नातेसंबंधामुळे जोडलेले होते. अशा सामर्थ्यशाली आणि समृद्ध राज्याचे राजपुत्र कौरव आणि पांडव. त्यांच्यात घडलेल्या सत्तासंघर्षाची कथा म्हणजेच महाभारत. कौरव, पांडव यांच्याइतक्याच प्रभावी व्यक्तिरेखा आहेत ज्यांना महाभारतामध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे. गुरु द्रोण, दौपदी आणि भगवान श्रीकृष्ण. खरेतर श्रीकृष्णच महाभारताचे कर्ते.करविते आहेत असेच सर्वजण समजतात.         

श्रीकृष्णाच्या कथा अती रसाळ आहेत, बाळकृष्णाच्या लीला घरोघरी भक्तिभावाने कथन आणि श्रावण केल्या जातात. माखनचोर कृष्ण कन्हैय्या आबालवृद्धांना प्रिय आहे. महाराष्ट्रामध्ये जन्माष्टमीच्या दिवशी दहीहंडी फोडण्याची प्रथा आहे, आणि नैवेद्य म्हणून गोपाळकाला दिला जातो. यशोदेचा कान्हा, राधेचा कृष्ण, गीताबोध देणारा गोविंद अशी श्रीकृष्णाची अनेक रूपे आहेत आणि भारतीयांना ती प्रिय आहेत. 

भगवान श्रीकृष्ण श्रीविष्णूंचा अवतार आहेत अशी मान्यता आहे. वसुदेव-देवकीचा पुत्र देवकीनंदन, वासुदेव, नंद-यशोदेचा नंदलाला, गोपाळांचा कन्हैय्या, नंदाघरीच्या गाई राखणारा गोपाळ, यशोदेचा कान्हा, गोकुळीचा (गोवर्धन) गिरीधारी मोहन, गोपिकांसमवेत रासलीला रचणारा सखा श्रीहरी, राधेचा मुरलीधर घनश्याम, सुदामाचा परममित्र मुकुंद, मुरारी, रुक्मिणी, सत्यभामेचा प्रियपती माधव, द्वारकाधिपती जगन्नाथ, द्रौपदीचा बंधू केशव आणि पार्थाला गीतामृत देणारा चक्रपाणी, अर्जुनाचा सारथी पार्थसारथी, आणि महाभारताचा सूत्रधार योगेश्वर श्रीकृष्ण अशी त्याची अनेक रूपे आहेत. 

श्रीकृष्णांच्या जन्मापासून अनेक चमत्कार घडताना दिसतात. पण चमत्कार करणारा आणि करविणारा इतकीच त्यांची ओळख मर्यादित नाही. बालवयापासून श्रीकृष्णाच्या आयुष्यात अनेक कसोटीचे क्षण आले. अनेक संकटांवर मात करून त्यांनी सामान्यांच्या आयुष्यालादेखील आधार दिला. दैवीगुणांनी परिपूर्ण असे व्यक्तिमत्त्व लाभलेले श्रीकृष्ण जनसामान्यांच्या आयुष्यात सहजतेने सहभागी होताना दिसतात. रानावनात गोपांबरोबर गाई राखण्याकरता जातात आणि गोपिकांबरोबर रासलीला करतात.

मथुरेचा राजा कंस हा देवकीचा बंधू आणि श्रीकृष्णांचा मामा आहे. कंस दुष्ट होता, अन्यायी आणि सत्तालोलुप होता, त्याने अनेकांवर अत्याचार केले, सख्ख्या बहिणीला तिच्या पतीसह कैदेत ठेवले. श्रीकृष्णाची हत्या करण्याचे त्याने अनेक प्रयास केले पण ते असफल झाले. अखेरीस श्रीकृष्णांनी दुष्ट कंसाचा वध केला.

श्रीकृष्णाचे चारित्र्य अनोखे आहे, अनेक दैवीगुणांनी युक्त आहे. मित्रांचा मित्र आणि शत्रूंचा शत्रू असे त्यांचे वर्णन करता येईल. बलरामाला त्यांनी नेहमीच ज्येष्ठ भ्रात्याचा सन्मान दिला, शिशुपालाच्या मातेला वचन दिले म्हणून त्याचे शंभर अपराध सहन केले. श्रीकृष्ण द्वारकाधिपती आहेत पण सांदिपनी मुनींच्या आश्रमशाळेतील गरीब सहध्यायी सुदामाची ओळख ते विसरत नाहीत. सत्यभामेचा हट्ट पुरविण्याकरता ते स्वर्गलोकीचा प्राजक्त पृथ्वीतलावर आणतात. रुक्मिणीने मनोभावे अर्पण केलेल्या तुळशीपत्राने त्यांची तुला संपन्न होते. अष्टपत्नींचे पती असण्याचे कर्तव्य ते निभावतात आणि जरासंधाने बळजबरीने बंदी केलेल्या सोळाहजार दुर्दैवी अनाथ स्त्रियांचे पालकत्व स्वीकारतात.

माखनचोर किंवा गोपिकांबरोबर रासलीला करणारा इतकीच त्यांची ओळख मर्यादित नाही. श्रीकृष्ण पराक्रमी आहेत, धुरंधर राजकारणी आहेत, अनाथांचा नाथ आणि संकट समयी सहाय्यकर्ता अशीही त्यांची ओळख सांगता येईल.

श्रीकृष्ण आणि द्रौपदीच्या नात्याच्या अनेक कथा सांगितल्या जातात. द्रौपदीला श्रीकृष्णांनी भगिनी मानले होते आणि ते नाते त्यांनी निभावले. द्रौपदीच्या अनेक संकट प्रसंगी सहाय्यकर्ता नारायण आहेत.

द्रौपदी आणि कृष्णाचे नाते वैशिष्ट्यपूर्ण आहे. द्रौपदीची खरेतर अनेक नावे आहेत. पांचाल देशाची राजकन्या म्हणून पांचाली, द्रुपदराजाची कन्या म्हणून द्रौपदी, यज्ञातून जन्मलेली म्हणून याज्ञसेनी, आणि सावळी अंगकांती असलेली म्हणून कृष्णा. काहींच्या मते श्रीकृष्णाची मानलेली भगिनी म्हणून तिला कृष्णा असे संबोधले जाते. कृष्णाने तिला अनेकवेळा संकटकाळी सहाय्य केल्याचे उल्लेख येतात. त्यांनीच तिला अक्षयपात्र दिले आणि दुर्वास ऋषींच्या कोपापासून तिचे रक्षणही केले.

यज्ञप्रसंगी कौरवांनी तिची अवहेलना करण्याचा प्रयत्न केला होता. आमंत्रितांच्या भोजनाची व्यवस्था करत असताना तिचे वस्त्र ढळले होते, ते सावरण्याकरता तिला अंतःपुरामध्ये जाणे आवश्यक होते, परंतु सर्वांसमोर तिला लज्जित करण्याकरता तिथे उपस्थित असलेल्या दुर्योधन, दुःशासन, कर्ण, शकुनी इत्यादींनी सतत निरनिराळ्या पदार्थांची मागणी करणे सुरू केले. अतिथींची मागणी पूर्ण न करता निघून जाणे तिला शोभणारे नव्हते. द्रौपदीची अशी अवस्था जाणून श्रीकृष्णांनी तिथे मायाजाल पसरवले. तिथे उपस्थित सर्व दासी देखील द्रौपदीच्या रूपात दिसू लागल्या आणि द्रौपदी भोजन पंगत सोडून अंतःपुरामध्ये जाऊ शकली. ती तिथून परत आल्यानंतर कृष्णाच्या मायेचा प्रभाव संपला. हे असे सर्व घडले असेल किंवा नसेल, परंतु श्रीकृष्णाने घडवून आणलेला एक चमत्कार म्हणून त्या प्रसंगाचे वर्णन केलेले दिसते .

कौरव सभेत द्युतामध्ये हरलेल्या युधिष्ठिराने द्रौपदीला पणाला लावले होते. शकुनीमामाच्या कपटनितीमुळे त्या खेळीत त्याला हार पत्करावी लागली होती. इंद्रप्रस्थाची महाराणी द्रौपदी आता कौरवांची दासी होती. तिच्या लांब, मोकळ्या सोडलेल्या केसांना धरून, ओढत तिला सभास्थानी आणले होते. तिने सर्व उपस्थिताकडे मदतीची याचना केली पण तिला निराशाच मिळाली. दुर्योधनाचा उन्माद इतका अनावर की त्याने तिचे वस्त्रहरण करण्याची आज्ञा केली. तिला कुणाचेच सहाय्य नव्हते, कितीही धैर्यशाली असली तरी ती एक स्त्री होती. तिने कृष्णाचे स्मरण करून मनोमन मदतीची याचना केली. दुःशासन तिला निर्वस्त्र करण्याचा प्रयत्न करत होता परंतु असंख्य वस्त्रे फेडूनही द्रौपदीला तो निर्वस्त्र करू शकला नव्हता. भरसभेमध्ये द्रौपदीचे लज्जारक्षण त्यांनीच केले होते.

हा प्रसंग फारच अनोखा वाटतो, कारण सभास्थानी श्रीकृष्ण उपस्थित नाहीत. (काहींच्या मते हे आध्यात्मिक रूपक आहे. अनन्य भावाने केलेली भक्ती ईश्वरापर्यंत पोहोचते आणि तो संकटकाळी भक्तांचे रक्षण करतो वगैरे ) द्रौपदीने केवळ स्मरण केले आणि कृष्णाने तिची अवस्था जाणली. हा प्रसंग चमत्कार म्हणून वर्णन केलेला आहे कारण घडलेल्या घटनेचे स्पष्टीकरण देता येत नाही म्हणून. ते काहीही असले तरी कुठल्यातरी मार्गाने श्रीकृष्णाने द्रौपदीचे लज्जारक्षण केले, जे तिचे पाचही पती करू शकले नाहीत.

कौरव-पांडवांच्या कलहामध्ये श्रीकृष्णाची महत्त्वाची भूमिका आहे. युद्ध आणि जीवितहानी होऊ नये म्हणून त्यांनी राजदूताची भूमिका स्वीकारली. त्या प्रसंगी ते एका प्रगल्भ राजकारणी दिसतात. दुर्योधनाच्या दर्पोक्तीला दुर्लक्षून त्यांनी कुरु दरबारामध्ये पांडवांची बाजू प्रभावीपणे मांडली. त्यांच्या शिष्टाईला यश आले नाहीच उलट गर्वाने उन्मत्त झालेल्या दुर्योधनाने त्यांचा अपमान केला. गाई राखणारा गुराखी आणि गोपिकांसमवेत रासलीला करणारा लंपट भोगी म्हणून हिणवले. त्या वेळेस कृष्णाने विराट रूप धारण करून कौरव सभेला विश्वरूप दर्शन घडविले. त्या रुपासमोर नतमस्तक होताना भीष्म, द्रोण, विदुर आदी विद्वान राजकारण्यांनी जाणले होते की युद्ध अटळ आहे आणि कौरवांचा पराभवही.  

विश्वरूप दर्शनाचे उल्लेख आणखी दोनवेळा तरी आलेले मला स्मरतात. एक बालकांड मध्ये आहे. बाळकृष्ण जेव्हा मटक्यातले लोणी चोरून खात असतात, तेव्हा यशोदामैय्या तिथे येते, कृष्णाला रागे भरते. श्रीकृष्ण सांगत असतात मी लोणी खाल्ले नाही त्यावर यशोदा म्हणते तुझे तोंड उघड आणि माझ्या शंकेचे समाधान कर. त्यावेळी कृष्णाच्या मुखात तिला विश्वरूप दर्शन घडते आणि यशोदेला जाणीव होते की तिचे मूल सामान्य बालक नसून दैवी आहे.

पांडवांनी खांडववनाचे दहन करून इंद्रप्रस्थ नगरी वसवली, राजसूय यज्ञ केला. युधिष्ठिर चक्रवर्ती सम्राट झाला होता. यज्ञस्थानी सर्व राजे, महाराजे असताना अग्रपूजेचा मान श्रीकृष्णाला दिला जातो. तिथे उपस्थित असलेल्या कुणाचाही आक्षेप नसतो पण शिशुपालाला ते मान्य नसते. भरसभेमध्ये तो कृष्णाचा अपमान करतो. त्यावेळी श्रीकृष्ण विराट रूप धारण करून सभेला विश्वरूप दर्शन घडवतात.

विश्वरूप दर्शन घडले म्हणजे नक्की काय घडले असावे याबद्दल नेहमीच कुतूहल वाटते. या प्रसंगाचे वर्णन बहुतेक कथांमध्ये एकसारखेच आहे.

तेजस्वी प्रकाशाने आसमंत व्यापला होता, परिसरातील वास्तू, वस्तू, मनुष्य आणि इतर सर्वकाही दिसेनासे झाले होते. वाद्यांचा कल्लोळ ऐकू येत होता त्यातही श्रीकृष्णाच्या शंखाचा ध्वनी आणि बासरीचा सुस्वर घुमत होता, दैवी सुगंध पसरला होता आणि एक सुंदर विराट मूर्ती नजरेसमोर साकार होत होती. त्या मूर्तीला अनेक भुजा होत्या त्या भुजांमध्ये कमळ, बासरी, सुदर्शन चक्र, गदा, शुभ्र तेजस्वी शंख इत्यादी दिसत होते . एक हात आशीर्वादाकरता उंचावलेला दिसत होता. चेहऱ्यावर चिरपरिचित हास्य होते. गळ्यामध्ये तुळशीची माळ आणि मुकुटामध्ये मोरपीस डोलत होते. काही क्षणांनंतर प्रकाश विरला, वाद्यकल्लोळ शांत झाला आणि उरली एक विलक्षण शांतता.

श्रीकृष्ण आणि चमत्कार यांचे अतूट नाते आहे. श्रीकृष्णाचे माता-पिता वसुदेव आणि देवकी हे कंसाच्या कारागृहात बंदी होते. खरेतर देवकी कंसाची भगिनी पण तिच्या विवाह प्रसंगी आकाशवाणी झाली -- देवकीचा आठवा पुत्र कंसाचा वध करेल. कंसाने वसुदेव देवकीला बंदी केले आणि तिच्या सात पुत्रांचा जन्मतः वध केला. पण श्रीकृष्ण मानवी बालक नव्हते तर प्रत्यक्ष ईश्वरी अंश होते. कृष्ण जन्म होताक्षणी कारागृहाचे दरवाजे उघडले गेले आणि पहारेकरी निद्राधीन झाले होते. अष्टमीची रात्र, मुसळधार पाऊस कोसळत होत, यमुना दुथडी भरून वाहत होती. यमुनेच्या पैलतिरी गोकूळ होते जिथे वसुदेवाचे परममित्र नंदराजाचे राज्य होते. वसुदेवांनी यमुनेच्या प्रवाहामध्ये प्रवेश केला. त्यांच्या डोक्यावर टोपली होती आणि त्यात बाळकृष्ण होते. नदीचे पाणी डोक्यावरून वाहू लागले तरीही वसुदेवांनी हार मानली नाही यमुनेचे पाणी त्यांच्या मस्तकावरील टोपली पर्यंत आले, बाळकृष्णाच्या पायाच्या अंगठ्याचा स्पर्श होताच यमुनेचे पात्र दुभंगले आणि वसुदेवांनी पैलतीर गाठला.

कृष्णजन्माचे असेच वर्णन मी कथा कीर्तनातून ऐकले आहे, वाचले आहे. तो एक दैवी चमत्कार होता अशीच सर्व भारतीयांची धारणा आहे. ज्या घटनेचे सुसंगत स्पष्टीकरण देता येत नाही त्या घटनेचे वर्णन चमत्कार म्हणून केले जाते असे मला वाटते. पौराणिक कथा या कथाकथनाच्या स्वरूपातच सर्वत्र ज्ञात झाल्या होत्या. मोठ्या कालावधींनंतर त्या लेखनबद्ध करण्यात आल्या. त्यामुळे त्यातील काही संदर्भ, स्पष्टीकरणे नष्ट झाली असावीत किंवा कथाकारांनी आणि श्रोत्यांनी ते संदर्भ गाळून चमत्कार म्हणून वर्णने सांगितली असतील.

त्यामुळे दैवी चमत्काराने किंवा अन्य काही उपायाने वसुदेवांनी श्रीकृष्णाला नंदाघरी पोहोचवले, आणि नंदाची पत्नी यशोदेचे नवजात बालक (जी एक कन्या होती) घेऊन ते कारागृहांमध्ये परतले.

अशा रीतीने कृष्ण कथेची सुरुवातच चमत्काराने होते. नंतर पुतनामावशीचा वध, कालियामर्दन, कंसाने पाठविलेल्या अनेक असुरांचा वध, वरुणाच्या प्रकोपाने बरसणाऱ्या अविरत पर्जन्यधारांनी निर्माण झालेल्या प्रलयातून गोकुळवासीयांना वाचविण्याकरता गोवर्धन पर्वताला केवळ करांगुलीवर तोलणे असे सर्व पराक्रम करताना कृष्ण एक बालक आहेत. बासरीच्या स्वरांनी गोप गोपीच नाही तर मुक्या प्राण्यांनाही मोहित करणारा तो मुरलीधर मनमोहन आहे.

राधा आणि कृष्णाचे नातेही अनोखे आहे आणि जनरीतीच्या विपरीत आहे, कारण राधा विवाहित स्त्री आहे. परंतु राधा कृष्णाच्या कथा आजही घराघरात, मंदिरात सांगितल्या जातात आणि ऐकल्याही जातात. कृष्ण मंदिरात रुक्मिणी, सत्यभामा नाही तर राधेची मूर्ती असते. आणि नाम जप करताना "गोपाळ कृष्ण - राधेकृष्ण" असेच म्हणले जाते.

त्यानंतर कुब्जेची कथा आहे. मथुरेच्या बाजारात फुले विकणारी ती एक कुरूप स्त्री आहे, तिच्या पाठीवर कुबडही आहे. समाजाने केलेली हेटाळणी आणि तिरस्कार सहन करत जगणारी ती एक सामान्य स्त्री आहे. सर्व वाईट अनुभव घेऊनही तिचे मन मात्र निर्मळ आहे. मत्सर, द्वेष, कपट इत्यादी दुष्ट भावनांचा तिला स्पर्शही नाही. म्हणूनच कृष्णकृपेने तिचे परिवर्तन एका सुंदर स्त्रीमध्ये होते.

विपरीत परिस्थितीमध्ये चित्त शुद्ध ठेवून, राग लोभाचा त्याग करून कर्तव्य पालन केले असता परमेश्वरकृपा प्राप्त होते ... असा काहीसा संदेश देणारी ही एक रूपककथा असावी असे मला वाटते.

कृष्णाने केलेला कंसवध ही देखील एक अनाकलनीय घटना आहे. बलाढ्य, महापराक्रमी कंसाला एक बालक द्वंद्वयुद्धाचे आव्हान देतो, मथुरेचा राजा कंस ते स्वीकारतो आणि पराभूत होतो. परंतु श्रीकृष्ण परमेश्वराचा अवतार आहे हे मान्य केले की शंकेला जागाच शिल्लक राहत नाही.

कंसमामाचा वध केल्यांनतर कृष्ण त्यांच्या मातापित्यांना कारागृहातून मुक्त करतात. त्यांचे दुर्दैव संपुष्टात येऊन आता सुखाचे दिवस असतात. कृष्ण, बलराम सांदिपनी ऋषींच्या आश्रमात विद्याध्ययनाकरता जातात. विद्याभ्यास पूर्ण केल्यांनतर वसुदेव त्यांच्या पुत्राला .. श्रीकृष्णाला द्वारकेचे राज्य देतात. पुराण कथांमध्ये वर्णन करण्यात येते की द्वारका नगरी सोन्याची आहे. बहुदा ऐश्वर्य संपन्न द्वारकेचे वर्णन करताना सुवर्णनगरी असा द्वारकेचा उल्लेख केला असावा. श्रीकृष्ण उत्तम राज्यकर्ते होते, राजधर्माचे सर्वतोपरी पालन करणारे होते आणि त्यांच्या छत्रछायेखाली द्वारकानिवासी सुखी आयुष्य जगत होते.

श्रीकृष्ण अष्टपत्नींचे पती आहेत. त्यांच्या आठ विवाहाच्या कथादेखील श्रीकृष्ण कथेत सांगितल्या जातात. गायी राखणारा गोपाळ, गोपांचा प्रियमित्र कन्हैय्या, गोपिकांसमवेत रासलीला करणारा  मुरारी, यशोदेचा कान्हा, राधेचा मोहन अशी सर्व रूपे आता भूतकाळात जमा झालेली आहेत. आता श्रीकृष्ण सुवर्णनगरी द्वारकेचे स्वामी आहेत. राजकारण धुरंधर, नवकोट नारायण अशी त्यांची ओळख आहे. आणि आता पांडवांचा श्रीकृष्णकथेमध्ये प्रवेश होतो. पांडव काही कृष्णासाठी अपरिचित नाहीत उलट त्यांचे जवळचे नाते आहे. पांडवांची माता कुंती, श्रीकृष्ण पिता वसुदेव यांची कनिष्ठ भगिनी आहे. परंतु त्यांचा प्रथम परिचय होतो पांचाळ नगरीमध्ये, द्रौपदी स्वयंवर प्रसंगी.

पांडव आणि श्रीकृष्णाचे अतूट नाते आहे. रक्ताचे नाते तर आहेच पण त्याहूनही अधिक मैत्री, सल्लागार, सहायक अशा विविध रूपाने कृष्ण पांडवांचे आयुष्य व्यापून राहिले आहेत. युद्ध टाळण्यासाठी त्यांनी केलेली शिष्टाई असफल झाली. युद्ध आरंभ होत असताना समोर सगळे आप्तस्वकीय पाहून अर्जुनाला धनुष्याला बाण लावण्याचे धैर्य होईना. तेव्हा श्रीकृष्णांनी त्याला उपदेश केला आणि त्याच्या कर्तव्याची आठवण करून दिली. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे असे सांगून युद्ध करण्यास प्रवृत्त केले.

श्रीकृष्ण कथेतील चमत्कारांचा भाग बाजूला केला तरीही एक दैदीप्यमान, प्रगल्भ आणि दैवी स्वरूप सामोरे येते. युगंधर श्रीकृष्णाशिवाय महाभारत अपूर्ण आहे.

***