शुभ्र गालिचा

जेमिमा आणि खुर्शिद पश्चिम अफगाणमधील 'हेरात' नामक एका छोट्या शहरात आनंदाने संसार करत होते. खुर्शिदचे एक छोटेसे दुकान होते ज्यात तो गालिचे विणून विकायचा. एका महिन्यात तो जेमतेम १०-१५ गालिचेच विणू शकायचा. घरकामातून उरलेल्या वेळात जेमिमादेखील त्याला त्याच्या कामात मदत करायची. त्यांचं उत्पन्न हे फक्त त्यांचा व त्यांची मुले झाकीर व आलम यांच्या जेवणाखाणाचा प्रश्न सुटू शकेल इतपतंच होतं, पण प्राप्त परिस्थितीबद्दल त्यांची कूरकूर अशी अजिबात नव्हती. खुर्शिद जेमिमाला दरवर्षी म्हणायचा की,"माझ्याकडे जेव्हा थोडे पैसे उरतील, तेव्हा मी तुला नविन साडी घेऊन देईन." पण वर्षानुवर्षं जेमिमा हे नुसतंच ऐकत होती ! प्रत्येक वेळेस ती त्याच्याकडे बघून मंद हास्य करायची आणि विणकाम चालू ठेवायची. तिला त्यांची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे माहित असल्याने ती त्याला समजून घ्यायची. मुलांना एका छोट्या शाळेत घालणेच त्याने कसेबसे जमवले होते, हे ती जाणून होती.

सगळं सुरळीतपणे चाललेलं होतं जोवर अमेरीकी हल्ल्याची बातमी आली नव्हती. शहरात सगळीकडे या बातमीवर मतमतांतरे जोर धरत होती.

त्यादिवशी रमहतुल्लाह खुर्शिदच्या दुकानात आला. रहमत म्हणजे खुर्शिदचा जिगरी दोस्त.

"का रे, तू बातमी ऐकलीस का?" रहमत.

खुर्शिदला या बातमीने काहीच फरक पडलेला नव्हता जणू. "ह्म्म.. अरे हा माझा नविन गालिचा बघ. आजवर मी बनवलेल्या सर्व गालिचांमध्ये हा सर्वात उत्तम विणला गेलेला आहे."

तो एक पांढऱ्याशुभ्र रंगाचा गालिचा होता ज्यावर अप्रतिम रंगसंगती साधून ताजमहाल विणलेला होता.




रहमतने त्याकडे एकदम निरखून पाहिलं आणि म्हणाला,"खरंच रे ! पण हा काय उपयोगाचा? आपल्याला हे शहर २-३ दिवसांत सोडून दुसऱ्या एखाद्या सुरक्षित ठिकाणी जावं लागेल. अमेरिका आपल्यावर हल्ला करणार आहे. तू याबद्दल काही ऐकलं नाहीस का?"

इतकी सुंदर कलाकृती समोर अनुभवत असताना कोणाच्या मनात इतर विचार येऊच कसे शकतात? या विचाराने खुर्शिदला खूप विषाद वाटला. "जर तुला वाटत असेल की मी हे शहर सोडून अन्यत्र जाईन, तर तू चुकतो आहेस. मला सांग अशा कोणत्या सुरक्षित ठिकाणाबद्दल तू बोलतो आहेस? तुला वाटतं अशी सुरक्षित जागा कुठे असेल असं?"

रहमतला एकदम उत्साह आला,"इराण ! हो.. आपण इराणला पळून जाऊया. माझा एक मित्र ट्रान्सपोर्ट एजंट आहे, सीमा ओलांडायला तो नक्कीच आपली मदत करेल. तुझा जर होकार असेल तर मी तुझ्याही कुटुंबाबद्दल त्याला विचारेन. बोल काय म्हणतोस?"

"तुझी कळकळ मला समजतेय रहमत. पण मी कुठल्याही परिस्थितीत ही जागा सोडून जायला तयार नाही.", एकदम आवेशात खुर्शिद बोलला.

"जशी तुझी मर्जी. मी उद्या सकाळी निघणार आहे. मी तुला परत म्हणतोय की तू परत एकदा विचार कर, जेमिमावहिनींशी चर्चा कर याबद्दल. तुला दोन मुलं आहेत, किमान त्यांचा तर विचार कर."

खुर्शिद काहीच बोलला नाही.

"मी तुझी वाट बघेन."

"मी येणार नाही."

रहमत निघून गेला. अर्ध्या तासाने खुर्शिदने त्याचा तो नविन गालिचा गुंडाळला आणि तो हातात घेऊन घराकडे चालायला लागला. दुकानापासून जेमतेम १५ मिनिटाच्या अंतरावर त्याचं घर होतं. रस्त्यात त्याने काही लहान मुले इकडेतिकडे बागडताना पाहिली आणि त्याचे विचारचक्र सुरू झाले.. झाकिर आणि आलम काय करत असतील? ते पडवीत खेळत असतील बहुदा. आज जर ते मला परत त्या बदरसोबत खेळताना दिसले तर मी ठोकून काढेन त्यांना. तो बिघडवायच्या मागे दिसतो माझ्या मुलांना. मी जेमिमाला म्हणालो त्यांच्याकडे लक्ष दे असं. किती निष्काळजी आहे तीही ! पण ती तरी काय करेल म्हणा? ती किती कष्ट करते.. घरकाम संपलं की मलाही तर मदत करते. मी तिला दोष नाही देऊ शकत..." असे विचार करतकरत तो कधी घरी येऊन पोहोचला त्याला कळलं देखिल नाही.

आज सगळंच वेगळं दिसलं त्याला. दोन्ही मुलं झोपून गेली होती आणि जेमिमा त्यांच्याजवळ बसून त्यांना थोपटत होती. खुर्शिदला बघताच तिने तिचे पाणावलेले डोळे झटकन पुसले आणि सगळं ठीक आहे असं भासवत वावरायला सुरूवात केली. खुर्शिद काहीच न बोलता खाली बसला. तिने त्याला जेवायला वाढलं आणि नविन गालिचा बघायला सुरूवात केली,"वाह ! काय सुंदर झालाय गालिचा !! पण पांढरा रंग कशाला वापरला?"

"पांढरा रंग मनाला भावतो माझ्या. तो शांततेचा रंग आहे !"

"शांतता? !!! मग तू हा गालिचा अमेरिकी सैन्याला का भेट देत नाही? या घटकेला पांढरा रंग कोणीच विकत घेऊ इच्छिणार नाही,असं नाही का वाटत तुला?" जेमिमा काहीशा कुत्सित स्वरात म्हणाली.

"नाही घेणार तर गेले उडत ! इथे कोणाला विकायचा आहे हा गालिचा? मी तो आपल्यासाठीच राहू देणार आहे एक आठवण म्हणून. काय अप्रतिम चीज जन्मली आहे आज आपल्या कष्टातून!"

"ते सोड.. तू ती बातमी ऐकलीस का? आपण काय करणार आहोत मग आता?" एका दमात तिने विचारलं.

"काहीच नाही. आपण आपली जागा सोडून कुठेही जाणार नाही आहोत. दुसऱ्या राष्ट्रात भिकाऱ्याचं जिणं जगण्यापेक्षा मी आपल्या राष्ट्रात मरणे जास्त पसंत करेन. तुला तुझ्या आयुष्याची खूप काळजी वाटत आहे असं दिसतंय.", काही घडलंच नाही आहे अशा अविर्भावात तो बोलला.

"नाही. मी माझ्या आयुष्याची काळजी करत नाही आहे. झाकिर आणि आलम यांची चिंता मला खाते आहे. माझ्या नजरेसमोर त्यांना मरताना नाही बघू शकणार मी. तू बघू शकशील का?" जेमिमा कळवळली.

"मग मी काय करावं असं तुझं म्हणणं आहे?"

"रहमतभाई आले होते संध्याकाळी. त्यांनी सुचवलं त्याप्रमाणे आपण इराणला जाऊन नव्याने आपलं आयुष्य सुरू करूया." अंमळ शांततेने घेत ती म्हणाली.

"तुला जायचं तर तू खुशाल जाऊ शकतेस. मी येणार नाही."

"काहीच्याकाही काय बरळतो आहेस? तुला सोडून मला जाववेल असं वाटलंच कसं तुला?"

"मग तू का उगीच मला याबाबत मनवण्याच्या मागे लागली आहेस? जा आणि झोप निवांत." खुर्शिद काहिशा तुटकपणे बोलला.

"तू कधीच एक चांगला नवरा नव्हतास पण आता तू एक चांगला वडीलही उरला नाहीस." असं बोलून ती स्वयंपाकघरात निघून गेली.

त्या रात्री खुर्शिद झोपूच शकला नाही. तो त्याच्या बालपणीचे , तारुण्याचे दिवस आठवत होता. खूप वाईट प्रसंगीही त्याला कधीही इतका एकटेपणा वाटला नव्हता. त्याने अंगावर शाल ओढून घेतली आणि तो घराबाहेर आला. जेमिमाचे शब्द त्याच्या मनात घुमत होते. त्याला त्याच्या भावनांना आवर घालणे कठीण जात होते. परिस्थितीपुढे मनाविरुद्ध हार पत्करणे मान्य नव्हते त्याला. आतल्याआत जीवघेणी घुसमट होत होती त्याची. डोळ्यातून घळघळ अश्रू वाहायला लागले त्याच्या.

जेमिमाला सहज जाग आली आणि खुर्शिद शेजारी दिसला नाही. काळजात चर्र झालं तिच्या. दरवाजा उघडा दिसला म्हणून ती घरातून बाहेर येऊन बघते तर काय? खुर्शिद धाय मोकलून रडत होता. तिने त्याचे हात हातात घेऊन दिलगीर आवाजात "माफ कर रे मला. मी तुला टोचेल असं बोलून गेले अनवधानाने. पण झाकिर आणि आलमच्या चिंतेमुळे तसं झालं..."

"नाही.. तुझं बरोबरच आहे जेमिमा. मी एक चांगला नवराही नाही आणि चांगला वडीलही नाही. मी तुला कधीच काहीच देऊ शकलो नाही."

"पण मला काहीच नको आहे आपल्या कुटुंबाच्या सुखाशिवाय. मी खूप खूप सुखी आहे तुझ्याबरोबर." त्याचे डोळे पुसत ती त्याला घरात घेऊन गेली.

दुसऱ्या दिवशी सकाळी, खुर्शिद ४ लाच उठला आणि जेमिमाला म्हणाला की गरजेच्या वस्तू बांधून घे पटापट. त्याने अखेर हेरात सोडायचा निर्णय घेतला होता ! रहमतकडे जाऊन "माझ्या कुटुंबाकरता थांब." असंही सांगून आला. तो रहमतकडून परतला तेव्हा जेमिमा तो शुभ्र गालिचा बांधून घेताना दिसली.

"तो गालिचा इथेच सोडून जाऊ. तो विकला जाणार नाही."

"पण..."

खुर्शिद तिला बोलू न देता म्हणाला,"आपल्याला जे हवं आहे आणि जे प्रत्यक्षात आपल्याला मिळतं त्यातला फरक मला आता कळला आहे. इथून पुढे मला काहीच नको आहे, जे मिळेल ते स्विकारायला मी तयार आहे आता."

सुर्याच्या पहिल्या किरणासरशी त्यांनी हेरात सोडलं.


मूळ लेखक - शकुन अग्रवाल
स्वैर अनुवाद - वेदश्री जोशी