सुगंधित आठवणी

मला माहीत नाही हा लेखाचा विषय होऊ शकतो की नाही पण वाटले कदाचित माझ्यासारख्याच तुमच्याही काही सुगंधित आठवणी असतील. (अजून कोणाला चांगले शिर्षक सुचले तर सांगा)

मागच्या एक दोन आठवड्यापूर्वी मला भयंकर सर्दी झाली होती. रोज रात्री नाकावर विक्स चोपडून झोपावे लागे. जेव्हा जेव्हा मी विक्स लावायची तेंव्हा मला आजीची आठवण यायची. माहेरी असताना मी आणि आजी एकाच खोलीत झोपत असू. रोज झोपायच्या आधी ती विक्स, झंडू बाम, खोबरेल तेल, कैलास जीवन असा सरंजाम घेऊन झोपायची. त्यामुळे तो वास इतका नाकात भरून राहिलाय की कधी ती नसताना तिची चादर घेऊन झोपले तरी आजी जवळच असल्याचा भास व्हायचा.
काही माणसे, काही जागा आणि त्यांच्याशी निगडित असलेले वास यांनी डोक्यात अगदी घर केलेले असते.
आता हॉस्पिटल म्हटले की स्पिरिट, डेटॉल चा वास अपरिहार्य. मी काही वर्षे हॉस्पिटलमध्ये व्यवस्थापन विभागात नोकरी करत होते.  पण मला डेटॉलपेक्षा माझ्या सरांच्या खोलीतून येणारा धुपाचा वास जास्त लक्षात राहिलाय. रोज सकाळी ९.३० ही माझी आत जाण्याची वेळ ठरलेली. तेंव्हा नुकतीच सरांच्या इथे असलेल्या गणपतीच्या फोटोची पूजा झालेली असायची. तो धुपाचा वास मी अजूनही विसरू शकत नाही. दिवसाची सुरुवात एकदम प्रसन्न व्हायची.
आमच्या घरी कुळधर्म होतात तेंव्हा पुरणावरणाचा स्वयंपाक असतो. लहान असताना पुरण शिजण्याचा तो गोड वास आला की आम्हा भावंडांची भूक अशी खवळून उठायची की बस्स!
प्रत्येकाच्या घरातही एक प्रकाराचा वास भरून राहिलेला असतो. माझ्या एका मैत्रिणीकडे गेले की तिच्याकडे नेहमी होमाचा, धुराचा वास यायचा (त्यांच्याकडे रोज अग्निहोत्र असे).  आमचे शेजारी होते त्यांच्याकडे भाकरी आणि शेणाने सारवलेल्या जमीनीचा असा काहीतरी संमिश्र वास यायचा. माझ्या काकूची खानावळ होती त्यामुळे त्यांच्या घरात कधी गेले की भाज्या आमट्यांचे, फोडणीचे वास घरभर दरवळत असायचे.
मुंबईला माझे आजोळ आहे. पूर्वी तिकडे दर सुट्टीत जाणे व्हायचे. तेंव्हा मला आजीच्या न्हाणीघरातून येणारा हमाम चा वास फार आवडायचा.
लोकल ट्रेन मध्ये एक विशिष्ट प्रकारचा वास सगळ्यांनी अनुभवला असेलच (बराच वेळ प्रवास केला तर कपड्यांनाही तो वास लागतो) पण त्याचबरोबर गजऱ्याचे, सामोश्याचे, भेळीचे, शेंगदाण्याचे वास आले की कसे प्रवास करण्यात मजा येते. 
सिनेमाला गेले की पॉपकॉर्नचा, बटाटेवड्याचा, पानाचा वास (एकपडदा असलेल्या चित्रपटगृहांमध्ये यायचा, आता माहीत नाही) आला नाही तर अगदी चुकल्याचुकल्यासारखे होते. 
मुंबई-पुणे (जुना) महामार्गावर पिंपरी आले हे कसे समजते? उग्र औषधांच्या वासावरूनच! (तेथे हिंदुस्थान ऍंटिबायोटिक्स आहे!!)
देवळाच्या गाभाऱ्यात गेलात की तिथून येणारा फुलांचा, उदबत्तीचा, फोडलेल्या नारळांचा वास आला की कसे छान वाटते.
जून मध्ये शाळा सुरू झाली की येणाऱ्या नव्याकोऱ्या वह्या, पुस्तकांचा, दप्तराचा आणि ओल्या मातीचा सुगंध मी अजूनही मनात जपून ठेवलाय.
अरे, हा कसला वास येतोय? ह्म्म... चहा उकळला.... अहाहा.. अगदी अमृततुल्य!!