माझ्या शिवप्रेमी मित्रांनो...

माझ्या शिवप्रेमी मित्रांनो,
                  आत्ताच एक बातमी वाचली,शिवप्रेमी कार्यकर्त्यांकडून बहुलकर यांना मारहाण. शिवराज्य पक्षाने या कामगीरीची जबाबदारी स्विकारली आहे. संभाजी ब्रिगेड आणि शिवराज्य पक्षाबद्दल मलाही सहानुभुती आहे,मी त्यांना आपले लोक मानतो,पण ही बातमी वाचली तेव्हा मनात जरासं वाईटच वाटलं.म्हणजे मला बहुलकर या माणसाविषयी काही सहानुभुती आहे असं नाही,पण तरीही अश्या घटनांमुळे माझ्या संघटनेचीच बदनामी होते असं मला वाटतं.


हिंसाचारामुळे कोणतेच प्रश्न सुटत नसतात. सरदार भगतसिंगांनी जेव्हा संसदेत बाँब टाकलेत तेव्हा हिंसा करणं हा त्यांचा हेतू नव्हताच,त्यांना फ़क्त झोपलेल्यांना जागं करायचं होतं.तसं झोपलेल्यांना जागं करण्यासाठी अश्या घटना घडाव्याच लागतात.पण कुणाला नुसतं जागं करून भागत नाही,त्यांच्यापर्यंत आपली बाजूही पोहोचवायला हवी.महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात जो बहुजन समाज आहे त्यांची आपली बाजू पोहोचली नाही तर आपली प्रतिमा फ़क्त विध्वंसकाची होईल आणि तेच आपल्याला नको आहे. 


आपली बाजू समाजात पोहचवायची तर आपल्याकडे प्रसारमाध्यमे असणं गरजेचं आहे,आणि तिथेच आपण कमी पडत आहोत.आपली काही मासिकं आहेत,साप्ताहिकं आहेत पण त्यांचं circulation किती आहे याचा विचार करावा लागेल.त्यांना फ़क्त असेच लोक वाचतात जे आधीपासुनच आपल्या विचारांची आहेत.आणि उरलेल्या बहुजन समाजाकडे फ़क्त प्रस्थापितांची वर्तमानपत्र, न्युज़ चैनल्स एवढच आहे. ही माध्यमं आपला आवाज फ़क्त दाबून ठेवतात. आणि या महाजालाची तर आपल्या बहुतांशी लोकांना माहीतीच नाही.


अश्या घटना सहसा घडू नयेत असं मला वाटतं,आणि घडल्याच तर त्यांच्यासोबतच आपली बाजूही ठामपणे समाजात पोहचायला हवी. बहुलकर हा माणूस The epic of shivaji  या जेम्स लेनच्या पुस्तकाचा सहलेखक आहे. या पुस्तकात शिवरायांचा संबंध होमरच्या महाकाव्यातील इडीपसशी जोडला आहे. हा इडीपस शूर होता हे मान्य आहे तरीही त्याची दुसरी बाजू अशी आहे की त्याचे त्याच्या मातेसोबतच अनैतिक संबंध होते. अश्या इडीपसशी राजांचा संबंध जोड्णाऱ्या प्राण्याला शिक्षा ही व्हायलाच हवी पण , आपला समाज ज्याच्यापर्यंत आपली बाजू पोहचतच नाही त्याच्यामध्ये आपली प्रतिमा वाईट व्हायला नको. आपण ज्या समाजाच्या स्वाभिमानाच्या प्रश्नावर लढत आहोत तोच समाज गैरसमजाने आपल्यापासून दूर होणं आपल्याला परवडणारं नाही.


मला माहीत आहे ,इथे माझ्या विचाराचे लोक नगण्य आहेत. एक अर्थानं मी आंधळ्यांच्या बाजारात आरसे विकत आहे,पण मला फ़क्त आमची बाजू लोकांपर्यंत न्यायची आहे. एकजरी माणूस मला 'आपला' भेटला तरी या पत्राचं सार्थक झालं असं मला वाटेल.


          आपल्या कडूगोड उत्तरांची अपेक्षा आहे.


                                       आपला,


                                              शिवश्री गणेश


(संदर्भ- दै.देशोन्नती नागपूर आवृत्ती) इ आवृत्ती मध्ये ही बातमी दिसू शकली नाही,लिंक दिली असती.