मनोगती संमेलन - एक कल्पनाविलास

हे लिखाण वाचण्यापूर्वी काही गोष्टींचा खुलासा करणे आवश्यक आहे.
१. या लिखाणाचे वर्गीकरण पहा. विनोद आणि विरंगुळा यापलिकडे हे लिखाण गांभीर्याने घेऊ नये.
२. लिखाणाच्या सोयीसाठी सर्व पात्रांचा एकेरी उल्लेख केला आहे.  वय, अनुभव याविषयी संपूर्ण आदर ठेवूनच. 
३. सर्व पात्रे प्रत्यक्षातील.  प्रसंग संपूर्णपणे काल्पनिक.
४. पुन्हा एकदाः  विनोद आणि विरंगुळा यापलिकडे हे लिखाण गांभीर्याने घेऊ नये.
तर आता


मनोगती संमेलन - एक कल्पनाविलास
फार दिवसांपासून होणार होणार म्हणून गाजत असलेले मनोगतींचे संमेलन एकदाचे घ्यायचे हे नक्की झाले. "अशी संमेलने घेणे हे वैचारिक दिवाळखोरीचे लक्षण आहे" असे सन्जोपचे (नेहमीप्रमाणे) ठाम मत होते. तसे त्याने दोन चार वेळा म्हणूनही  दाखवले. पण कुणीच लक्ष देत नाही हे ध्यानात आल्यावर "ही वैचारीक दिवाळखोरी शिंची असते तरी कशी हे बघावे" असे म्हणून तो ही त्यात सामील झाला.  त्याच्या "शिंची" या शब्दावर आबजेक्शण घ्यायला डॉ.माधवी गाडगीळ सरसावल्या होत्या. पण "जाऊ दे ग माधवीताई, असतो एकेकाचा स्वभाव....  आपण लक्ष नाही द्यायचं" असे म्हणून विसोबांनी त्यांना सावरले.


हे संमेलन घ्यायचे कुठे यावरचीच चर्चा एवढी रंगली की त्यात मूळ संमेलनच रद्द होते की काय अशी भीती शशांक व नंदन ला वाटू लागली.  मनोगतचे प्रायोजक अमेरिकेत असल्याने हे संमेलन अमेरिकेतच भरवले पाहिजे असे प्रियालीचे मत होते.  या मतावर अपेक्षेप्रमाणेच सचिन तुटून पडला.  प्रियालीच्या प्रस्तावाला विरोध करताना त्याने एवढा लांबलचक प्रतिसाद नोंदवला, की " सचिन, तू म्हणत असशील तर तुझ्या घरी घेऊ संमेलन पण तुझा प्रतिसाद आवर बाबा......" असे म्हणून प्रियालीने माघार घेतली.  "प्रियाली तुझे नको आणि सचिन तुझेही नको, आपण इंग्लंड मध्ये घेऊ संमेलन, म्हणजे मला जवळ पडेल" असे  मृदुलाचे म्हणणे होते.  पण तिला कुणीही अनुमोदन दिले नाही. शेवटी मिसळ हा संमेलनाचा महत्वाचा भाग असल्यामुळे मेनू (आणि एकंदरीत खर्च) याचा अंदाज घेता संमेलन भारतातच घ्यायचे ठरले.  भारतात संमेलन म्हणल्यानंतर ते ठाण्यातच होणार अशी का कुणास ठाऊक विसोबांना उगीचच खात्री होती.  त्या अनुषंगाने ते कुणीही न विचारता मामलेदार कचेरीतली मिसळ या विषयावर बोलू लागले.  "थांबा, थांबा" मागून आवाज आला.  नाना उठून उभा राहिला होता. त्याला पाठिंबा म्हणून की काय कुणास ठाऊक, पण चिकूही त्याच्याबरोबर उठून उभा राहिला होता. " मिसळ काय फक्त ठाण्यालाच मिळते तात्या? आमच्या श्री ची किंवा श्रीकृष्णची मिसळ खाऊन बघा एकदा....." नाना तावातावाने बोलू लागला.
"सहमत." मिलिन्द जोशी म्हणाला.
"हेच म्हणतो." चित्त ने त्याची री ओढली.
"संपूर्ण भारतातील मिसळ मिळण्याची ठिकाणे इथे पहा." 'तो' गंभीरपणे म्हणाला.  तेवढ्यात सर्वसाक्षीने नाना व चिकूला कोपऱ्यात नेऊन काय केले कोणास ठाऊक, पण परत आल्यावर ते दोघे बराच वेळ "ठाणे, ठाणे" एवढेच म्हणत होते.
दरम्यान संमेलनाच्या दिवशी स्त्रियांनी नऊवारी साडी आणि पुरुषांनी कुर्ता पायजमा घालावा असा प्रस्ताव साती व संवादिनीने मांडला होता.  "यालाच मी झब्बट म्हणत होतो...." असे  सन्जोप तात्याच्या कानात कुजबुजला.  पण तात्याचे तिकडे लक्षच नव्हते.  "लग्नातले झब्बे आम्हाला आता बसत नाहीत" मागच्या रांगेतून कुशाग्र ओरडला. बराच वेळ आपण कुणाला अनुमोदन दिले नाही हे लक्षात येऊन तात्या "सहमत, सहमत" असे ओरडला.  पण वात्रट आणि टग्या त्याच्याकडे चमत्कारिक नजरेने बघू लागले, तसा तो वरमून खाली बसला. 
"लग्नानंतर पुरुषांची पोटे सुटणे या विषयावरील माहिती इथे वाचा." 'तो' म्हणाला.
इकडे मयुरेश व धोंडे पाटील पुढे आलेले होते. "संमेलनाच्या निमंत्रणाचे आणि स्वागताचे पद्य आम्ही म्हणू" असे  म्हणून त्यांनी एकदम गायला सुरुवात केली.
"एंक बार आंजा आंजा आंजा आंजा आंऽऽऽऽऽऽजा......"
"आयायायाया...." तात्याने जांभई दिली.  कुणीतरी त्या दोघांना शर्टाला खेचून खाली बसवले.  तेवढ्यात हातातले कवितेचे कागद सावरत अज्जुका उभी राहिली.  "याला म्हणतात आगीतून फुफाट्यात पडणे" चक्रपाणि टग्याला सांगत होता.  "कुणाला आवडो किंवा न आवडो, संमेलनात मी माझ्या कविता सादर करणार आहे. माझी पहिली कविता आहे, ज्याच्या त्याच्या हातात...." मागील बाजूने, "निषेध, निषेध, गप्प बसा, श्शू....." असा गलबला ऐकू आला. त्याकडे लक्ष न देता अज्जुकाने खणखणीत आवाजात कविता वाचायला सुरुवात केली.
"ज्याच्या त्याच्या हातात
आपापली रेखा...."
"बोंबला, ज्याच्या त्याच्या हातात रेखा, तर अमिताभच्या हातात काय? खि.. खि.. खि..."  टग्याचा आवाज अज्जुकाने ओळखला.  संतापाने फणफणत ती खाली बसली.  कवितेचे नाव काढल्यानंतर पेंगत असलेले चित्त व कुमार 'जेमिनी बॉईज' प्रमाणे पुढे आले. "संमेलनाच्या निमित्ताने "मिसळ व त्याचे शरीरावर होणारे परिणाम" या विषयावर आम्ही एकएक गझल लिहीली आहे‌.  सादर करत आहोत..."
"इर्शाद.." गर्दीत कुणीतरी ओरडले. बऱ्याच लोकांनी संशयाने तात्याकडे पाहिले.
चित्त ने सुरुवात केली.



"मी उदास आहे उदास आहे चित्त
किती आले गेले हाती काय ते वित्त


ही मिसळ नव्हे, हा आत्मा हो तात्याचा


 "तात्याचाच का म्हणून?" कुणीतरी ओरडले. क्षणभर चित्त गोंधळला, पण क्षणात स्वतःला सावरून त्याने परत सुरुवात केली. "तात्याचा कुठं म्हणालो मी? नीट ऐका.."


ही मिसळ नव्हे, हा आत्मा होता  त्याचा
चाखून पाहिली मी, उसळले पित्त


किती सांभाळू, सांभाळेना हे जठर
ही ऍसिडीटीची व्याधी लागली नित्य"


"आता मी, आता मी"  कुमार म्हणाला.


फरसाण, मोड अन कांदा, कोथिंबीर
कट ओता, चापा नाही जीवाला घोर


दिन मोठा आज, हाणा, बडवा ठोका
कुणी सांगावे की कुठे उद्याचे दार


उद्या उद्याचे, आज काय हो त्याचे
"कैलासजीवन" उद्याचा आधार."


इकडे खेडुताने हॅम्लेटला पकडले होते.
"अरं ये भुता, वाईच तमाखु हाय का तुज्याकडं काळी? बायली या वेदश्रीचं बोलनं आयकून आन लिवनं वाचून तोंडाला आळशी आली! लई गुळमाट राव! काड की मर्दा चिमूटभर, इब्राहीमभाई सातारी असली तर..."
"मजकडें चिपळूणकर जर्दा आहे. चालेंल?"  तात्या.
"तंबाखूचे दुष्परिणाम इथे वाचा." 'तो'. दुसरं कोण असणारं?


दुसरीकडे राजीव "काय ग प्रियाली, आलं का तुझ्या मुलीला डायव्हींग? , काय अनु, वजन काही कमी झालेलं दिसत नाही तुझं," असं विचारत फिरत होता. "तरण्याताठ्या पोरींना चारचौघात असं एकेरी बोलावणं शोभत का या अप्पा भिंगार्ड्याला?" सन्जोपने विनायकला कोपऱ्यात घेतले होते.  "यात असूयेचा भाग नाही ना सन्जोप? नाही, मझ्या शोधनिबंधासाठी हे महत्वाचं आहे म्हणून विचारतो." विश्वास मध्येच म्हणाला.
'बघीतलंस, माझ्याविरुद्ध कशी गटबाजी चालते ती, विनायक..' सन्जोप म्हणाला "आता याला लिहू दे नवीन काही, आपण दोघे मिळून प्रतिसादात फाडू .."
मी वैज्ञानिक आहे सन्जोप. तत्वात बसणार नसेल ते काही करणार नाही मी. शेवटी तत्वं महत्वाची. गीतेत म्हटलंच आहे..." विनायक गंभीरपणे म्हणाला. सन्जोपने हात जोडले. 'भीक नको पण कुत्रा आवर' म्हणजे काय ते कळालं बाबा... तो मनाशी म्हणाला.



(अपूर्ण)