मत! चर्चा!! वाद!!! भांडण!!!!

नमस्कार मनोगती मित्रमैत्रीणींनो!


मनोगतवर एखादा काही मत मांडतो आणि त्यावर ज्या काही चर्चा होतात त्याचे स्वरूप साधारणतः वरील शीर्षकाप्रमाणे दिसते. (अर्थात ह्याला अपवाद आहेत)


मी जवळजवळ १ वर्ष मनोगतचा सभासद आहे.  सुरवातीच्या काळात माझा मनोगतवर वावर खूप(च) कमी झाला. नंतरनंतर मी मनोगतला जास्त भेटी द्यायला लागलो. मी आतापर्यंत पाहिलेल्या मराठी संकेतस्थळांमध्ये मला मनोगत जास्त आवडले. मनोगतची मांडणी, त्यावरील विषयप्रकार, सामान्य मराठीप्रेमी माणसाला उपलब्ध असलेले मुक्त (व फुकटसुद्धा) व्यासपिठ ह्यामुळे अल्पावधीतच मनोगत आवडीचे होते.


मनोगतवर समाज, राजकारण, विज्ञान, विनोद, कविता, कथा इ. विषयांवर भरपूर लेखन होते. त्याचे वाचन होते. त्यावर जाणकारांचे आणि माझ्यासारख्या अल्पज्ञानी मनोगतींचे मतप्रदर्शन होते. ह्यामुळे खूप काहि जाणून घेता आले. वेगवेगळ्या मनांतून प्रकटलेले वेगवेगळे विचार, प्रत्येकाची दिशा, त्यासाठीचे दिलेले दाखले इ. मुळे आपल्यालासुद्धा वेगळ्यापद्धतीने सखोल विचार करण्याची सवय लागते. (मनोगतवर वावर वाढल्यानंतर ह्याबाबतीत माझा अनुभव चांगला आहे)


मनोगतवर प्रामुख्याने चर्चा हा विषय जास्त लोकप्रिय आहे. (हा विषय जगात लोकप्रिय आहे तर इथे असणारच). मनोगतवरील चर्चा हि प्रत्यक्ष समोर बसून केलेल्या चर्चेप्रमाणे भासते. मनोगतवर सततचा वावर असणाऱ्या अनेकजणांच्या मतांचे विविधपैलू पहायला मिळतात. चर्चेचे पैलू हे विषयाला एक वेगळीच चमक आणत असतात.


पण आजकाल हे पैलू वेगळ्याच पध्दतीने पडले (पाडले म्हणा हवं तर) जात आहेत. आपल्या मनोगतवर चर्चेचे रूपांतर भांडणात होत आहे. चर्चा करताना विषयाला लक्ष्य करण्यापेक्षा लेखकाला लक्ष्य करण्याचे प्रमाण वाढत आहे. एखादा विषय कसा कमकूवत आहे हे सांगण्यापेक्षा लेखक किती बावळट आहे / तो किती आढमुठेपणा करतो किंवा प्रतिसाद देणाराच स्वतःला शहाणा समजतो ह्यावरच वाद जास्त होतात. हळूहळू हि गोष्ट वैयक्तिक पातळीवर येते व आरोप प्रत्यारोप सुरू होतात.


मझ्या प्रिय मनोगतींनो, मनोगत हे मराठी माणसाठी त्याचे साहित्य प्रसिद्ध करण्याचे, वेगवेगळे विचार मांडून त्या विषयावर चर्चा करण्याचे माध्यम आहे असे वाटते. आजकाल स्वतःच्या मनातील राग काढण्यासाठी तसेच स्वतःचा मोठेपणा सिद्ध करण्यासाठी मनोगतचा वापर होतो आहे.


त्यामुळे मनोगतला विधानपरिषद न बनवता त्याचे मुळ रूप कायम ठेऊन त्यामध्ये जास्तीतजास्त सुधारणा करावी असे मला वाटते.


म्हणून प्रांजळपणे मांडले मी माझे मनोगत.


(जर कोणी दुखावले गेले असेल तर कृपया क्षमस्व. वाचकांनी माझ्या वरील विचाऱांवर मत प्रदर्शन करावे. माझ्यावर नको.)