दिनांक २६.०७.२००५ (न विसरता येण्याजोगी आठवण- २ )

दिनांक २६.०७.२००५ (न विसरता येण्याजोगी आठवण-१) वरुन पुढे सुरु


आगीतून फुफाट्यात (नंतर सुखरुप)


आता पाणी ओसरेल नंतर ओसरेल असं म्हणता म्हणता सात... आठ... नऊ वाजले. पाऊस थांबला होता. रस्त्यावरचे पाणी मात्र तसूभर घटले नव्हते. वाहनं दिसत नव्हती पण लोक रस्त्यावरून हळूहळू चालत होते. रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांच बोलणं ऐकून येत होतं.... रेल्वे, बसेस, इतर वाहतूक ठप्प होती. कुठे घरं पाण्याखाली गेली होती, शहरातली बऱ्याच ठिकाणची वीज बंद होती, कुणीतरी वाहून जाणाऱ्या जीवाला हात देऊन आलं होतं तर कुणीतरी वाहून जाणाऱ्यांकडे असहाय नजरेने पाहत हळहळून आलं होतं. एक एक गोष्ट ऐकून जीवात धडकी भरत होती. कसही करून या संकटातून सुटका कशी होईल ही एकच ओढ लागली होती. गोरेगाव गाठणं केवळ अशक्य होतं निदान प्रभादेवीला मावसबहिणीकडे जाता येईल का पाहावं म्हणून तिला फोन करायचं ठरवलं. माझ्याकडे सेल फोन नसल्याने इमारतीतील एकांकडून ताईला फोन लावला आणि झाला प्रकार सांगितला. कसही करून आणि कितीही उशीर झाला तरी तुझ्या घरी पोहोचतो असं सांगून मी तिला सहजच विचारलं की, 'समुद्राला ओहोटी लागली का? पाणी का ओसरत नाहीये?'


'ओहोटी तर कधीच लागली, दोन तास होऊन गेले असतील,' तिने सांगितलं आणि माझ्या डोक्यात प्रकाश पडला की हा प्रकार काहीतरी वेगळा आहे. ओहोटी बरोबर जर हे पाणी ओसरणार नसेल तर संपूर्ण रात्र, उद्याच्या दिवसात तरी ते उतरेल की नाही कुणास ठाऊक आणि इतक्या पाण्यातून टॅक्सी जाणे केवळ अशक्य होते.  म्हणजे संपूर्ण रात्र रस्त्यावर काढायची की काय या विचाराने जीवाचा थरकाप उडाला. आपल्या बरोबर एक लहान मूल आणि दोन वयस्क माणसं आहेत आणि त्यांची जबाबदारी आपल्यावर याची प्रकर्षाने जाणीव झाली.


'असं करा तुम्ही जिथे आहात तिथपासून माझं घर फार लांब नसावं, तुम्ही चालत का येत नाही? प्रयत्न तर करून पाहा,' ताईने सुचवलं. पण हे करणं तितकंसं सोपं नव्हत. अनोळखी जागा, रात्रीची वेळ, साचलेले पाणी, परिसराची वीज गेल्याने सर्वत्र अंधार, त्यातून बाबांचा पाय वयोमानाने दुखरा, भरलेल्या पाण्यात मुलीला कडेवर उचलून घ्यावे लागणार होते. कुठे पाय घसरला, खड्डा असला, पाण्यातून शॉक लागला तर काय करायचं? सारच कठीण वाटत होतं. कुणाच्यातरी सोबतीची गरज होती.



टॅक्सीवाल्याला विचारलं तसा तो रस्ता दाखवायला तयार झाला. दोन अडीच किलोमीटर चालावं लागेल म्हणाला. आई बाबा घाबरत होते पण करणार काय म्हणून चालायचं ठरवलं. टॅक्सीवाल्याला बाबांचा हात धरण्याची विनंती केली. थोडं पुढे जातो न जातो तोच पाणी वाढू लागले. मुलीला मी कडेवर उचलून घेतले आणि आम्ही जवळ जवळ छातीभर पाण्यातून आम्ही रस्ता काढू लागलो. पंधरा वीस मिनिटे पाणी तुडवल्यावर कूर्मगतीने दादरच्या दिशेने जाणारी एक बस दिसली. 'चला बरं झालं, बस निदान आपल्याला पुढे तरी नेईल या विचाराने आम्ही धावत पळत बसच्या दिशेने जाऊ लागलो, बसही आमच्यासाठी थांबली आणि आम्ही आत जाऊन बसलो. पण कसंच काय, आमच्यासाठी थांबलेली बस काही केल्या सुरू होईना.. तिथेच ढेर झाली आणि आमची परिस्थिती आगीतून फुफाट्यात अशी झाली.


रात्रीचे दहा वाजून गेले होते. बसमध्ये १०-१२ माणसे होती. सर्वांच्या डोळ्यात काळजी दिसत होती. संपूर्ण परिसरात अजूनही वीज नव्हती. पाणी कमरेवर होतेच. बसच्या दुसऱ्या तिसऱ्या पायरीपर्यंत पोहचत होते. त्या पाण्यातूनही बरेचजण रस्ता काढत आपलं घर गाठण्याचा प्रयत्न करत होते. त्यातल्या एकाने खालनच बसमध्ये डोकावून पाहिले. पटकन आपल्या बॅगमधून बिस्किटांचा पुडा काढून  माझ्या हातात कोंबला,"तुमच्या मुलीला द्या. भूक लागली असेल हो तिला," असं म्हणून तो अंधारात दिसेनासाही झाला. त्याचा चेहराही दिसला नाही. धन्यवाद मानायचे दूरच राहिले. घरातून निघाल्याला आता बारा तास उलटून गेले होते. बसमध्ये तरी कितीवेळ बसून राहणार पण जायचं म्हटलं तर इतक्या अडचणी. डोळे मिटून शांत बसून राहाण्याखेरीज दुसरा कसलाही मार्ग दिसत नव्हता.


होता होता मध्यरात्र उलटून गेली. दिवस बदलला आणि चमत्कार व्हावा तशी ४-५ तरुण पोरं बसमध्ये घुसली. त्यांच्या हातात पाण्याच्या बाटल्या आणि बिस्किटांचे पुडे होते. त्यातल्या एक दोघांकडे सेल फोनही होते, "कुणाला घरी फोन करायचे आहेत का? त्यातल्या एकाने विचारले. पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी माझ्या बहिणीला फोन लावला आणि बसमध्ये आम्ही कसे अडकून पडले आहोत त्याची कल्पना दिली. आमच्यात जे बोलणं सुरू होत ते ऐकून त्यातला एक मुलगा म्हणाला, 'प्रभादेवी काही इथून फार दूर नाही. इथून १०-१५ मिनिटांच्या अंतराच्या रस्त्यावर पाणी आहे पण पुढे सैतान चौकीच्या आसपास रस्ता कोरडा आहे. तुम्हाला रस्ता माहीत नसेल तर आम्ही येतो तुमच्याबरोबर. घाबरू नका आपण सावकाश जाऊ. द्या तो फोन माझ्याकडे मी बोलतो तुमच्या ताईंशी.' फोनवरून त्याने भाऊजींना जिथे पाणी नाही तिथपर्यंत कार घेऊन या म्हणून सुचवले.


बसमधल्या बायकांची सोय या मुलांनी त्यांच्या इमारतीतील एका रिकाम्या फ्लॅटमध्ये केली. पुरुषांना काहीतरी खायला आणून देतो असं सांगून त्यातले चारजण आमच्याबरोबर यायला निघाले. बसमधून उतरून पुन्हा आम्ही छातीभर पाण्यातून हळू हळू चालू लागलो. रस्ता त्यांच्या पायाखालचा असल्याने काळोखातही ते सहज वाट काढत होते.आई बाबांच्या सोबत राहून, त्यांना व्यवस्थित सावरत, मध्येच माझ्या मुलीला माझ्या कडेवरून काढून स्वत:कडे घेऊन त्या मुलांनी आम्हाला सुखरूप ठरवलेल्या ठिकाणी पोहचवले. समोरचा रस्ता आता स्वच्छ होता आणि रस्त्याच्या कडेला भाऊजी कार पार्क करून वाट पाहत होते. त्यांना पाहून इतकं हायसं वाटलं की ते शब्दात व्यक्त करणे केवळ अशक्य.


त्या मुलांचे आभार मानून त्यांना पैसे हवे का म्हणून विचारले तर त्यांनी ठाम नकार दिला. निदान लोकांना मदत करताय म्हणून पैसे घ्या त्या पैशांनी थोडीफार मदत करा, फोनचे पैसे तरी घ्या म्हणून सांगितल्यावर त्यातला एकजण म्हणाला, 'ताई आमच्या घरची माणसं अजूनही घरी परतलेली नाहीत. माझा मोठा भाऊ अंधेरीला कामानिमित्त जातो त्याचा पत्ता नाही. ते जिथे अडकून पडले आहेत तिथे त्यांना कोणीतरी मदत करत असेलच ना. आम्ही जर तुमच्या घराजवळ असेच अडकलो असतो तर तुम्ही मदत केली असतीच ना... आणि पैसे घेतले असते का आमच्याकडून?' मी निरुत्तर झाले तसेही शब्दांनी आणि पैशांनी भरून निघण्यासारखे उपकार नव्हतेच त्यांचे.


पुढचे दोन दिवस आम्हाला ताईकडेच काढावे लागले. मुंबईतले पाणी ओसरले नव्हते आणि ओसरले तेंव्हा घरी वीज, पिण्याचे पाणी उपलब्ध नव्हते म्हणून जिथे होतो तिथेच राहायचे ठरवले. निदान ताईकडे सुखरूप पोहचलो ते काय कमी होते?


-----


 


HPIM0804


२७ तारखेचा दादरचा समुद्र


 



२७ तारखेच्या समुद्राचे आणखी एक रूप