संप्रदायांच्या व्युत्पत्ती

      कधी कधी शब्द, पद किंवा वाक्य यांचा उपयोग त्यांच्या मूळ अर्थाहून भिन्न अर्थाने भाषेत रुढ झालेला असतो.अशा शब्दांना,पदांना किंवा वाक्यांना संप्रदाय (idiom) म्हणतात. अशा काही संप्रदायांच्या व्युत्पत्ती.
      डबघाईला येणे----(डफ +घाई) डफावर गाणं म्हणताना गाणं संपण्याच्या वेळेला डफ फार घाईने वाजवतात.यावरून डबघाईला येणे म्हणजे नाशाची वेळ जवळ येऊन ठेपणे.
      साळसूद----शाळाशुद्ध म्हणजे चांगले शिक्षण मिळालेला सरळ,सालस माणूस.    
      चिठ्ठीचपाटी----जुन्या काळी पत्रांना लांबलचक कागद वापरत व कागदाची घडी न करता नळकांड्यासारखी त्याची सुरनळी करून ठेवीत असत.किरकोळ कामासाठी तळहाताएवढे कागदाचे तुकडे वापरत.त्यावर लिहून पाठवलेल्या मजकुराला चिठ्ठी म्हणत. चिठ्ठी कागदाच्या एकाच बाजूला लिहिली जाई. मागच्या बाजूला तिचं उतर लिहिलं जाई.'चिठ्ठीचे पाठी' याचंच बोलीत 'चिठ्ठीचपाटी' असं रुपांतर झालं. 
      पोरसवदा----रूढार्थ क्षुल्लक किंवा लहान. जिचा सवदा मोठा होतो अशी उंची वस्तू ती थोरसवदा आणि जिचा सवदा अगदी किरकोळ ती पोरसवदा. 
      सतीचे वाण----शास्त्रांमध्ये असं सांगितलं आहे की एखादी स्त्री पहिल्या शोकाच्या भरात सती जाते म्हणाली तर तिचे मन परोपरीने वळवावे. पण तरीही तिने हट्टाने स्वतःचा मळवट भरला की तिने सतीचे वाण उचलले असे समजावे.त्या नंतर आपल्या निश्चयापासून ढळण्याचा तिला अधिकार नाही.ते अशुभ आणि घराण्याला कलंकासारखं समजत.या वरून सतीचे वाण घेणे म्हणजे प्राणांचीही पर्वा न करता अवघड कार्य तडीस नेणे.  
      अद्वातद्वा बोलणे----अद्वा तद्वा हे यद्वा तद्वा या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश आहे. मूळ संस्कृत श्लोक असा आहे
                 यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि भिंश्रितं
                 यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति 
      याचा अर्थ कोणत्या तरी झाडाचे मूळ घ्यावे,ते कशावर तरी घासावे,कोणाला तरी द्यावे म्हणजे काहीतरी होईल. यावरून अद्वा तद्वा बोलणे म्हणजे असंबद्ध बोलणे.  
      बट्टा लावणे----या वाक्प्रचाराचे मूळ जुन्या काळच्या सराफी धंद्यात आहे. त्या काळी सराफ नाणी पारखून घेत. नाण्यात ठराविक प्रमाणात सोनं किंवा चांदी नसेल तर त्या नाण्यांची किंमत उतरवत. यावरून बट्टा लावणे म्हणजे कमीपणा आणणे. 
      शाबासकी ---- पूर्वी इराणमध्ये शहा अब्बास नावाचा एक शूर पराक्रमी राजा होऊन गेला. काही अभिनंदनीय कृत्य केलं की शहा अब्बासला शोभण्यासारखं झालं अशा अर्थानं शाबास हा शब्द रूढ झाला.
      कोडगा--- कोडगा हे महाभारतातील कोटिगा या व्यक्तीच्या नावाचं अपभ्रष्ट रूप आहे.कोटिगा हा जयद्रथाचा लोचट खुशमस्कऱ्या. द्रौपदीला वश करण्यासाठी जयद्रथाने त्याला वारंवार पाठवला होता आणि दरवेळी तिने त्याचा धिक्कार करून त्याला परत पाठवलं होतं.
      धांगडधिंगा----हा स्वतंत्र शब्द नसून धां,गड ,धिं, गा अशी तुटक अक्षरं आहेत. हे मृदंगाचे बोल आहेत.वादक जेव्हां मृदंग वाजवताना बोलही मोठ्याने तोंडाने म्हणतो तेंव्हा सामान्य श्रोत्याला तो नादाचा गोंधळ वाटतो. यावरून धांगडधिंगा म्हणजे गोंधळ.
      अठरा विश्वे दारिद्र्य----विश्वा म्हणजे विसावा अंश. विसापैकी अठरा म्हणजे जवळ जवळ पूर्ण दारिद्र्य. 
                                   वैशाली सामंत. 


.