कांदा मुळा भाजी

बागकाम हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय. बाग म्हटलं की मन दहा बारा वर्षं मागे किर्लोस्करवाडीला जातं. माझा बालपण वाडीतील ज्या घरात गेलं तिथे घरापुढे आणि मागे छान अंगण आणि बाग होती. बागेत पेरू, सीताफळ, रामफळ, पारिजात अशी मोठी झाडं, तसंच मोगरा, गुलाब, जाई, कण्हेर, जास्वंद, कोरांटी अशी फुलझाडं पण होती. माझ्या आईला बागकामाची आवड आहे. जिथे कुठे एखादं नवीन रोपटं दिसेल - आवडेल तिथून ते आणून आपल्या बागेत ती हौसेने लावते. आता सुद्धा पुण्यात घराजवळच्या छोट्या जागेत आणि गच्चीवर जसं जमेल तसं, छोट्या छोट्या कुंड्यातून, बागकाम करत असते.

लहानपणी आई सकाळी लवकरच आम्हाला उठवून अंगणात काही ना काही कामासाठी पिटाळायची. एवढीशीच बाग असली तरी आम्हा पोरांसाठी कामं मात्र चिकार असत. अंगण झाडणे, सकाळी पाणी आल्यावर नळीने ते सर्व झाडांना घालणे, अंगणात सडा घालणे, पूजेसाठी फुले तोडून ठेवणे, पाणी तापवायच्या बंबासाठी वाळलेल्या काटक्या तोडणे, मागच्या अंगणात बसून बंबफोड तोडणे ही नित्यकर्मं आळीपाळीने माझ्या, माझ्या बहिणीच्या किंवा आमच्या घरीच राहणाऱ्या माझ्या आत्तेभावांच्या वाट्याला येत असत. शिवाय खुरपं घेऊन तण काढणे, नवीन रोपं लावणे, पावसाळ्या नंतर सर्व आळ्यातली माती सारखी करणे वगैरे नैमित्तिके पण होतीच. वाडीत जवळ जवळ सर्वांच्याच घरी अशी छोटी-मोठी बाग होती त्यामुळे या सगळ्याचं विशेष असं कधीच वाटलं नाही. वाडीत असे पर्यंत ऊस, पेरू, चिंचा, बोरं विकत आणून खाणं ठाऊकच नव्हतं. वाडीच्या आजूबाजूला सर्व परिसरात शेती होती. आजोबांच्या आणि बाबांच्या परिचयाचे अनेक शेतकरी मित्र होते. शाळेतल्या काही मित्रांच्या घरी देखील शेतीच होती. त्यामुळे शेतावर जाऊन ऊस, हरभरा, द्राक्षं खाणे हे सुद्धा नवीन नव्हत. या सर्व गोष्टींमुळे कळत नकळत कुठेतरी बागकामाच्या आवडीचं बीज मात्र मनात पेरलं गेलं.

शिक्षणासाठी पुण्यात आलो तो माझ्या मामाच्या घरी राहत होतो. तिथे मात्र बागेशी असलेले रोजचा संबंध थोडा कमी झाला. मामाकडे सुद्धा घरी छान बाग आहे, पण आठवड्यातून ३-४ दिवस माळीबुवा येऊन देखरेख करतात. त्यामुळे बागेतील नित्यकर्मांची काळजी नसे. तरी सुद्धा अधून मधून काही ना काही निमित्ताने हात मातीला लगत असत. इथे अमेरिकेत आल्यावर मात्र तेवढा दुवा पण नाहीसा झाला. इथे "अपार्टमेंट कॉम्प्लेक्स" किंवा "कम्युनिटीज" मध्ये एका जागेत २-३ गृह बंधूं बरोबर राहत होतो. आजूबाजूला प्रशस्त लॉनची हिरवळ इथे सर्रास सगळी कडे असते. त्यामध्येच विविध आकारच्या वाफ्यांमध्ये फुलझाडं पण असतात. पण ही सर्व कामं इथे व्यावसायिक माळीकाम करणारे लोक करतात. Landscaping हा इथे बराच मोठा उद्योग आहे. मोठे मोठे बंगलेवाले लोक, अपार्टमेंटवाले घरमालक या माळ्यांना कंत्राट देऊन आपापल्या बागा फुलवतात. त्यामुळे त्या झाडांशी जवळीक अशी कधी झालीच नाही. वसंतात इथे असंख्य  प्रकारची फुले बहरतात. ती कॅमेऱ्यातून टिपण्यापुरती काय जी ओळख व्हावी तेवढीच. अपार्टमेंटचा (अदृश्य) उंबरठा ओलांडला की आपलं राज्य संपलं... त्यामुळे रोप लावायला हक्काची माती अशी नाहीच.

लग्न झाल्यावर दोघे ज्या अपार्टमेंट मध्ये राहतो आहोत तिथे मात्र छोटीशी balcony आहे. त्यात मग शेवंती गुलाब वगैरे रोपं कुंड्यातून लावली. इथे ऑक्टोबर ते एप्रिल कडाक्याची थंडी असते. त्यात ही रोपं बाहेर जगत नाहीत. घरात आत आणून ठेवलं तरी पुरेसा उजेड न मिळून फारशी वाढतच नाहीत. त्यामुळे मे महिन्यापासून सप्टेंबर पर्यंत काय तो बागेचा आनंद. डिसेंबरात ख्रिस्टमसच्या वेळी फुलतील असे ग्लॅडी‍ओलस्, ट्युलिप वगैरे फुलांचे गड्डे मिळतात त्यांचा पण प्रयोग झाला. पण मातीत हात काळे करण्यातली मजा या कशालाच नव्हती. तीन वर्षांपूर्वी इथल्या "Centre for Sustainability" मध्ये थोड्याश्या कुतूहलापोटी स्वयंसेवक म्हणून जाऊ लागलो. तिथे bio-intensive gardening चे प्रयोग चलतात. त्यासाठी वाफे खणण्या करिता स्वयंसेवक मजूर हवे होते. ते काम करताना परत एकदा कुदळ-फावडं हाती आलं आणि खूप खूप बरं वाटलं. सेंटरच्या बागेत मुख्यतः भाज्या लावतात. सेंद्रिय (Organic) शेतीचे प्रयोग चालतात. त्यामुळे "कांदा-मुळा भाजी" लावण्याचं थोडं शिक्षण मिळालं.

दोन वर्षांपूर्वी सेंटरवर काम करताना एका गृहस्थाने स्टेट कॉलेज (इथं आमचं गाव) जवळच एक Community Garden सुरू झाली आहे आणि तिथे भाड्यानं बागे साठी प्लॉट मिळतात असं सांगितलं. "सामुदायिक बाग" हा प्रकार ब्रिटन मधून काही वर्षांपूर्वीच इथे अमेरिकेत आला आहे. तिकडे साहेबाला बागेची हौस तर अनेक पिढ्यांपूर्वीची. "प्रत्येक इंग्रजाला बाग आणि एक पाळलेला कुत्रा हवाच", असं काहीसं पु. लंच्या "अपूर्वाई" मध्ये वाचल्याचं आठवतं. वाढत्या शहरीकरणामुळे शहरवासियांची बागेची हौस पुरवायला तिथे हे सामुदायिक बागेचे प्रयोग सुरू झाले. शहराजवळ शेत जमीनीचे छोटे छोटे तुकडे म्हणजे प्लॉट भाड्याने देतात. ब्रिटनमध्ये यांना allotments म्हणतात. या बागेत कामासाठी अवजारं, जवळच पाण्याची सोय असं सर्व बागवालेच पुरवतात. सेंद्रिय खत किंवा कॉम्पोस्ट सुद्धा पुरवतात. रोपं, बिया, वगैरे आणि थोडा उत्साह मात्र आपण आणायचा आणि आपल्या तुकड्यावर आपली बाग फुलवायची. आमची Tudek Park Community Garden ही याच प्रकारातली.  माहिती मिळताच आम्ही दोघे आणि अजून एक मित्र जोडपे असे मिळून तिथे गेलो. त्या वर्षी प्रथमच या देशात आमची स्वतःची बाग मिळाली. उत्साहाच्या भरात मग त्यात अनेक भाज्या, फुलं लावली. काही नेम चुकले काही बरोबर लागले. त्यात आम्ही चौघे एक प्लॉट  सांभाळत होतो. त्यामुळे "too many cooks spoil the broth" या उक्ती प्रमाणे आमच्या बागेची थोडी दुरवस्थाच झाली. गेला उन्हाळा भारतात असल्याने प्लॉट घेणं जमलं नाही.

या वर्षी मात्र पुनश्च हरी ॐ म्हणून बागेचा प्लॉट घेतला. त्यात ठरवून मोजक्याच भाज्या लावल्या. सेंटरवर शिकलेली bio-intensive पद्धत वापरून कमी जागेत भरपूर भाजी लावण्याचा प्रयोग पण करून पाहतो आहोत. या वर्षी बऱ्यापैकी नियमाने बागेत जाणं होतं आहे. तिथे आता शेजारच्या दोनचार प्लॉटधारकांची ओळख पण झाली आहे. त्यांच्या बरोबर काही ना काही नवीन माहितीची देवाण घेवाण पण चालू असते. इथल्या अमेरिकन जेवणात कांदे, बटाटे, टॉमेटो आणि लेट्युस म्हणजे सॅलडची भाजी या भाज्याच प्रामुख्याने येतात. त्यांच्या बागेत मुख्य पीक याच भाज्यांचं. नावापुरती टीचभर कोथिंबीर किंवा बेसिल वगैरे इतर भाज्या ते लोक लावतात. "एवढ्या कोथिंबिरीचं आणि मुळ्याचं तुम्ही काय हो करणार?", या प्रश्नाला मग आम्ही कोथिंबीर आमटीत - पोह्यावर वगैरे घालतो(पोहे म्हणजे काय हा पुढचा प्रश्न!) झालंच तर त्याच्या वड्या करतो, हे सर्व इंग्रजीतून समजावताना मजा येते. कोबीची भाजी कशी करतात हे सांगताना, "फोडणी म्हणजे काय?" हे इंग्रजीतून सांगण्याची कसरत पण करून झाली. Cole Slaw नावाची कोबीची अमेरिकन कोशिंबीर कशी करतात ते आमच्या शेजारच्या प्लॉटधारिकेने आम्हाला शिकवलं.

मे महिन्यात लावलेली भाजी आता येऊ लागली आहे. मटार, कोथिंबीर, कोबी, मुळे, अशी भाजी आता आमच्या बागेतून काढतो. दोघांना पुरून उरेल इतकी भाजी आमच्या ३०० चौ. फूटी जागेतून येते. त्यामुळे सर्व मित्रमंडळींना सुद्धा भाजीचे आहेर देणं चालू आहे. बाजारात मिळते तशीच भाजी... पण आपण केलेल्या कष्टांमुळे की काय, स्वतःच्या बागेतल्या भाजीची चव औरच लागते. त्या कोथिंबिरीचा वास वेगळा वाटतो, मुळा जास्त ताजा वाटतो, मटाराचे दाणे पण अधिक टपोरे दिसू लागलेत. या वर्षी माझ्या आग्रहामुळे बागेत फक्त भाज्याच लावल्या... फुले लावणं झालं नाही म्हणून बायको थोडी नाराज आहे. "थोडी फुलं लावली असतीस तर बिघडलं नसतं. आता पर्यंत मिळाली असती" अशी तक्रार अनेक वेळा नोंदवून आता पक्का धडा मिळाला आहे. "पुढच्या वर्षी माझी फुलं माझी मी लावीन", अशी स्त्री स्वातंत्र्याची घोषणा पण झाली आहे.

या सामूहिक बागेच्या निमित्तानं परदेशाच्या मातीत सुद्धा बागकामाचं बीज रुजलं... मातीशी नात जुळलं... याचं थोडं समाधान वाटतं. देश कोणताही असो, माती सगळीकडे सारखीच. बी पेरलं की रोपटं उगवणारच.