हे कोडे सोडवायला शाळेत शिकलेले प्राथमिक बीजगणित पुरेसे आहे. कोणतीही सूत्रे पाठ असण्याची गरज नाही. पण बुद्धी, कल्पकता, आडवा विचार, डोके चालवणे इ. आवश्यक आहे.
याचे मला माहीत असलेले उत्तर ३ पायऱ्यात येते.
आता कोडे -
अ, ब, क या धन पूर्णांक संख्या (म्हणजे आपले नेहमीचे नॅचरल अंक) आहेत. किंवा दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर ही डायोफ़ंटीय समस्या आहे.
अ, ब, क असमान आहेत. म्हणजेच अ ~= ब ~= क.
आणि अ^३ + ब^३ = क^४
प्रश्नः वरील समीकरणाचे समाधान करतील (किंवा जेणेकरून हे समीकरण बरोबर ठरेल) अशा अ, ब, क च्या किमती शोधून काढा.
उदाहरणादाखल अ=ब=क=२ ही किंमत यात घातली तर समीकरण बरोबर ठरते, पण हे उत्तर चालणार नाही कारण येथे घेतलेले अ,ब,क हे असमान नाहीत.
प्रश्नाची पुरवणी अटः शिवाय एका उत्तरसंचाने माझे समाधान होणार नाही तर असे हवे तितके उत्तरांचे संच (अ,ब,क = क्ष१,य१,झ१; क्ष२,य२,झ२; क्ष३,य३,झ३; इ. इ.) शोधून काढण्याची एखादी तरी पद्धत (किंवा अल्गॉरिदम) तुम्ही द्यायची आहे.
कोडे संगणकावर टाकून पाशवीबळाने (ब्रूट-फ़ोर्सने) मिळतील तेवढी उत्तरे काढायचा प्रयत्न करू नये, श्रम वाया जातील, मला हवे असलेले उत्तर त्त्यातून निघणार नाही. निव्वळ आडाखे-तपासणी (ट्रायल-अँड-एरर) च्या पातळीवरचे कोडे नाही हे.
(आणि हो, तसल्या प्रकारची संगणकआज्ञावलीसुद्धा उत्तर म्हणून स्वीकारली जाणार नाही.)
घ्या, करा सुरू!
(उत्तरे व्यनिने पाठवावीत, जाहीर उत्तर येत्या बुधवारी)