वायुप्रदूषण कोण घडवितो? आपणच!
सार्वजनिक डासनिर्मूलन
महापालिकेने डासांच्या निर्मूलनासाठी अभिनव पद्धती विकसित केल्या आहेत. त्यात आहे एक विषाऱी धूर आणि आग ओकणारे यंत्र. हे यंत्र सांदिफटीत, गटारां-डबक्यांमध्ये, अडीअडचणीत, केरकचऱ्यांच्या ढिगांवर विषाऱी वायूंची फवारणी करण्यात वापरले तर नाट्यमयरीत्या डास कमी होतात ह्याचा अनुभव मी स्वत:च घेतला आहे.
पण डास मेल्यावर ह्या वायूंचे काय होते? हे वायू हवेहून जड असतात. ते उडून जात नाहीत. वातावरणातील त्यांचे प्रमाण वाढते. घनदाट लोकवस्तीत प्राणवायूचे प्रमाण तसेही कमीच असते. ते ह्या विषाऱी वायूंच्या भरीमुळे आणखीनच खालावते. शिवाय ह्या विषाऱी वायूंचा डासांप्रमाणेच माणसांनाही त्रास होतोच.
ही यंत्रे एकदा उपयोगाची ठरविली म्हणजे त्यांच्या अनिर्बंध वापराचा सोस/मोह लोकांना निर्माण होतो. अलीकडेच महापालिकेच्या आरोग्यखात्याने ही यंत्रे शहरातील प्रमुख रस्त्यांवरून, रस्त्याच्या मधून धूर सोडत फिरविणे सुरू केले आहे. वस्तुत: रस्त्याच्या मध्यभागी मुळीच डास नसतात. माणसेच असतात. आणि म्हणून ही यंत्रे डासांना सुरक्षित (त्यांच्या नैसर्गिक घरांमध्ये) ठेवून माणसांची दाटी साधून त्यांचेवर विषप्रयोग करावा तसा प्रभाव देत आहेत. ह्याने आरोग्य साधत नसून पराकोटीचे वायूप्रदूषण घडून येत आहे. महापालिकेने असे घडत आहे का? का घडत आहे? अनवधानाने, अज्ञानाने अथवा जाणून बुजून हे घडत आहे हे शोधावे. ह्या कृत्याचे समर्थन करावे अथवा ते तात्काळ बंद करावे आणि असले प्रकार घडवून आणणाऱ्यांवर यथोचित कारवाई करावी.
वैयक्तिक डासनिर्मूलन
मुंबई शहर डासांचे माहेरघर आहे. म्हणून प्रत्येक घराघरातील व्यक्ती डासनिमूलनाचे अनेकानेक प्रकार अहर्निश वापरत असतात. टनावारी मच्छर अगरबत्त्या भर गर्दीच्या ठिकाणी रात्रंदिवस जाळल्या जात आहेत. त्यांच्या सांनिध्यात डासही राहू शकत नाहीत. ते पळून घराबाहेर जातात. पण माणसे राहतात. माणसांवर त्यांचा काय परिणाम होतो? कितपत अपाय होतात. कितपत अवनती होते ह्याचा समाजसेवी संस्थांनी शोध घ्यावा.
मात्र, एकदा निर्माण झालेले हे विषारी वायू आसपासच्या वातावरणात कायमच भरून राहतात. ते हवेहून जड असतात. उडून जात नाहीत. प्राणवायूचे प्रमाण घटवतात. आजुबाजुच्या रहिवाशांना श्वसनविकार, अवनतीकारक रोग यांची कायमस्वरूपी देणगी देतात. डासांना पळवून लावण्याच्या रासायनिक परिणामांची शिकार माणसेच जास्त होतात असे वाटते. रोगापेक्षा औषध जीवघेणे असल्याचे ह्याहून उतम उदाहरण कोणते असू शकेल?
तेव्हा नागरिकांनो, जागे व्हा! डासांना हटविण्याचे सार्वजनिक स्वच्छता, मच्छरदाणीचा वापर इत्यादी उपायांवर भर द्या. रासायनिक विषद्रव्यांचा प्रयोग टाळा.
फटाक्यांचा धमाका आणि आतिषबाजी
आता दिवाळी तोंडावर आलेली आहे. सारेच जण फटाके फोडण्यात कृतकृत्यता मानणार. दूर खेड्यात, अत्यंत विरळ लोकवस्तीच्या जागी, भर अमावस्येला भीती पळवून लावण्यासाठी, अंधार दूर करण्यासाठी ज्या प्रथेचा उगम झाला तिची गरज आज मुळीच राहिलेली नाही. त्या जागेहून आपण योजने दूर आलेलो आहोत. ह्याचे भान ठेवा. आज आपण भर गर्दीच्या, घनदाट लोकवस्तीच्या, प्रच्छन्न प्रकाशाच्या समुद्रात आकंठ बुडालेलो आहोत. अंधाराचा मागमूस नाही. निरव शांतता मिळविण्यासाठी शेकडो किलोमीटर दूर प्रवास करून जावे लागते. मग फटाक्यांचा ह्या धमाका, झगमगाट, आतिषबाजी आपण काय म्हणून करीत आहोत. श्रवणसुखासाठी की नेत्रसुखासाठी?
वस्तुत: घनदाट लोकवस्तीत फोडलेले फटाके, ते फोडणाऱ्यांचेच आरोग्य, आयुष्य आणि शांतता देशोधडीस लावत असतात. फोडणाऱ्यांनी विचार करावा! आपल्या आजुबाजुस राहणाऱ्या लोकांमध्ये किती जण श्वसनरोगाने आजारी आहेत? किती जणांना आवाजप्रदूषण सहन होत नाही? शयनगृहातील उजेड तर दारे खिडक्या बंद करून आणि सर्व दिवे घालवूनही कमी होत नाही. हे सारे प्रदूषण आपणच ना घडवत आहोत?
फोडलेल्या फटाक्यांतील विषारी वायू कुठे जातात? कुठेही जात नाहीत. आपल्याभोवती भोवतीच राहतात. आपल्याच प्राणवायूचे प्रमाण कमी करतात. विषद्रव्यांचे प्रमाण वाढवितात. आपल्याला आरोग्यापासून वंचित करतात. आणि हे सारे आपण समजून-उमजूनही करीतच असतो.
आणि मग आमच्यातील समजदार लोक, आपण त्यांचे अजिबातच ऐकत नाही असे समजून परदेश स्वेच्छेने पत्करतात तेव्हा आपणच 'ब्रेन-ड्रेन'चा ओरडा करतो. समजदार लोकांनी आपल्यात राहावे असे ह्या आपल्या सवयींमध्ये काय आहे? आपण 'आरोग्यास अपायकारक' वागणे कधी थांबविणार?