भात आणि बिर्याणी

भात या खाद्यप्रकाराचे का कुणास ठाऊक, ऐदीपणाशी एक नाते जोडले आहे. 'गरमगरम तूपभात खाऊन...' च्या समोर 'झोपणे' हेच क्रियापद आपसूकपणे येते! 'चांगला रबरबीत कालवलेला दहीभात खाऊन तो रणरणत्या उन्हात सायकल हाणीत कामावर गेला' हे वाक्य काही केल्या मनाला पटत नाही.भातासारख्या अद्वितीय खाद्यप्रकारावर हा जरासा अन्यायच आहे असे म्हणवे लागेल. भाताचा आजारपणाशीही असाच एक अनाकलनीय  संबंध जोडला गेला आहे. 'जराशी कणकण वाटत होती, म्हणून वरणभात खाऊन गुरगुटून झोपलो...' असे सांगणाऱ्याला 'मित्रा, अरे कणकण यायची वाट कशाला बघतोस?  बरं वाटत असतानाही कधीकधी वरणभात खाऊन गुरगुटून झोपत जा...' असं सांगावसं वाटतं! 'मला भात आवडत नाही' असे सांगणाऱ्यांकडे मी केवळ दयार्द्र करुणाकटाक्ष टाकतो!

  भात! नुसता उकडलेला तांदूळ, पण स्थळकाळ पाहून कसे फुलावे , ते माणसाने त्याच्याकडून शिकावे! सभ्य, समारंभी जेवणात तो पांढराशुभ्र कुडता घालून, वरणाचा पिवळाधमक फेटा नेसून कपाळाला उभे गंध लावून येतो. नारळीपौर्णिमेला तो ताज्या नारळाच्या किसाच्या जोडीने बहिणीच्या आग्रहाच्या ताटातून येतो.नारळीभात खाणे गावंढळपणाचे वाटते म्हणून लोक हल्ली साखरभात खातात. साखरभाताचे पेशवाई महत्त्व सोडले तर तो त्याच्या आकर्षक रंगामुळे आणि त्यातल्या लवंग- काजूंमुळेच अधिक ध्यानात रहातो. पण नारळीभाताला कसे 'कॅरॅक्टर' आहे! बाकी एक खरे, एखाद्या कसलेल्या गवयाचे गायन जसे साथीला तितकेच तयार तबलजी असताना अधिक खुलते तशी या नारळीभाताची  खरी लज्जत त्यावर सढळ हाताने सोडलेल्या साजूक तुपाच्या चमचमच्यांबरोबर खुलत जाते! 'कोलेस्टेरॉल' हा शब्ददेखील विसरायची तयारी असेल तरच या वाटेने जावे. दाक्षिणात्य सांबारभाताचे गोळे रिचवणाऱ्या मद्रदेशीयाचे चित्र काही फारसे लक्षात ठेवावे असे नसते, पण काजूची फोडणी घेऊन  सकाळीसकाळीच  भेटायला येणाऱ्या पोंगलने जिभेचे जीवन धन्य होते.सुब्बालक्ष्मीचे वेंकटेशस्तोत्र लागले की हाच भात बिचारा डाळींच्या आणि कढीलिंबाच्या गराड्यात ’बिशीबेळी भाता’ होऊन सतरंज्या उचलायला लागतो. त्यापेक्षा काळा मसाला घालून केलेला कोल्हापूर सांगलीकडचा 'काळा भात' कधीही सरस. त्यातच तोंडली, छोटी छोटी वांगी किंवा दोडक्याचे छोटे काप घालून केलेले प्रकारही अप्रतिम.

'दही भात' हा लहानपणी जसा खाल्ला तसा परत कधीच खायला मिळाला नाही. उन्हाळ्याच्या सुट्टीचे दिवस असायचे, आते-मामे भावंडं रहायला आलेली असायची. 'कारट्यानो, उन्हात वर वर हिंडू नका. कुठं नाही बाहेर जायचं आता...' असा दम देऊन पोरांना दडपून झोपवलं जायचं . चार वाजता वडीलांनी माडीच्या पत्र्यावर टाकलेल्या चुळीचा  आवाज यायचा. सताड जागीच असलेली मुलं उठून बसायची. दुपारचा चहा ही फक्त मोठ्या माणसांची चैन असायची. मुलांसाठी सकाळचा उरलेला भात कालवला जायचा. खापरीसारखी साय धरलेलं म्हशीचं दूध, कवडीदार दही आणि अगदी होय की नाही इतके मीठ असं सगळं घालून आई किंवा आत्या भात कालवायच्या. ताटल्या भरल्या जायच्या. भरड भरड कुटलेल्या शेंगदाण्याच्या चटणीची - आम्ही त्याला 'शेंगदाण्याचं तिखट' म्हणत असू- त्या पांढऱ्याशुभ्र भातावर पेरणी व्हायची. बघता बघता ताटल्या रिकाम्या व्हायच्या. ताटलीत शेवटचे बोट फिरवून ते जिभेने चाटले, की हात धुवून चला क्रिकेट खेळायला! दही भात हा असा कुळाचार पाळून करावयाचा प्रकार आहे. स्टेनलेस स्टीलच्या चमच्याने काचेच्या 'बाऊल' मध्ये दहीभात कालवणारे काय, आमटीतल्या शेवग्याच्या शेंगा सुरी आणि काटेचमच्याने देखील  खातील! लहानपणी खाल्लेला हा दही भात आजही माझ्या स्वप्नात येतो.

भाताची 'पुणेरी मसालेभात' नावाची एक झक्क फसवाफसवी आहे. 'कोबी भात'. 'पनीर भात. 'मोती पुलाव' हे एखाद्या संमेलनाच्या मेनूत शोभून दिसणारे प्रकार, पण त्यांना काही खानदान नाही. भातात अस्सल राजघराणे बिर्याणीचे. चारमिनारची किंवा हजरतगंजची वाट असावी, हवेत बेगम अख्तरच्या गजलेचे स्वर असावेत, कुठेतरी हुक्क्याचा सुगंध दरवळत असावा, शायरीच्या किताबाची काही पाने फडफडावीत, एखादा जाम किणकिणावा आणि मेंदीने रंगलेल्या दाढीवाल्या उस्तादांनी आपल्या बुजुर्ग हातानी बिरयानी पेश करावी! शाकाहार, आरोग्य, हिंदू संस्कृती आणि मुगल साम्राज्य अशा शेंड्या धारण करणारे उग्र आठ्याळ पंचेधारी आचार्य पंचक्रोशीतही नसावेत. ‘गोश्त’ म्हणायला जुबान चाचरावी अशा त्या चावलबरोबर हमसफर झालेल्या अन्नब्रम्हाने घासाघासाला जन्नतची याद द्यावी. तुपात तळलेल्या कांद्याने केलेली कुरकूरही कानाला तंबोऱ्याच्या सुराइतकी गोड लागावी. एखाद्या राजपुत्रासारख्या भेटीस आलेल्या खानदानी आख्ख्या काजूने अदब वाढवावी. मधूनच झणझणणाऱ्या मसाल्याने तोंड, नाक, कान व डोळे यांचे अद्वैत सिद्ध करावे. ‘कबाब गर्म हैं जनाब, शौक फरमायेंगे?’ अशी विचारणा व्हावी . कुठे शौकीनांनी दिलेल्या ‘वक्कटे तीस्कोंडी’ च्या फरमायशीने वातावरणातली जान वाढवावी. ‘आता पुरे’ असा शरीराने आणि मनाने खुषीचा इषारा द्यावा. नरम जिभेच्या लोकांनी मीठी लस्सी मागवावी आणि मर्दांनी जर्द्याचे खुशबोदार पान! 
‘मानवी जीवन धन्य झाले….’ म्हणून जगाला दुवा देत बाहेर पडावे!

'कुठेतरी चार सुखाचे घास खायला मिळावेत..' अशी कामना करणाऱ्यांना घास म्हणजे भाताचेच घास - मग तो दही भात असो की बिर्याणी - अभिप्रेत असावेत अशी माझी धारणा आहे!

अवांतर: या लेखासाठी मी एका चर्चेत लिहिलेल्या माझ्याच प्रतिसादाचा आधार घेतला आहे.