४१. चांगलें नाम गोमटें रूप । निवती डोळे हरती ताप ।
विठ्ठल विठ्ठल हा जप । प्रगट स्वल्प अति सार ॥१॥
शस्त्र हें निर्वाणींचा बाण । निकट समयो अवसान ।
कोठें योजेल दश दान । खंडी नारायण दुःख चिंतनें ॥धृ॥
सकळ श्रेष्ठाचें हें मत । पावे सिद्धि पाववी अनंत ।
म्हणोनि व्हावें शरणागत । आहे उचित एवढेंचि ॥३॥
म्हणोनि रुसलों संसारा । सर्प हा विखार पांढरा ।
तुजशीं अंतर रे दातारा । याचि दावेदारानिमित्त ॥४॥