अंधश्रद्ध - भाग १ वरून पुढे चालू....
पुढचा संपूर्ण आठवडा वसुंधराताईंना कोणतेही स्वप्न पडले नाही. रोज रात्री त्यांना शांत झोप लागत होती. त्यानंतरही बरेच दिवस उलटले. त्यांच्या मनातील भीतीही कमी झाली होती. दर शुक्रवारी रात्री १० वाजता रीमाच्या कार्यक्रमाचे प्रसारण होत असे. मनात धाकधूक ठेवूनच त्या टीव्ही सुरू करत परंतु गेले काही आठवडे विशेष घडले नव्हते.
आजही रीमाचा कार्यक्रम पाहण्यासाठी त्या आणि नानासाहेब रात्रीची जेवणे झाल्यावर दिवाणखान्यात काहीतरी वाचत बसले होते. रात्री दहाच्या सुमारास त्यांनी टीव्ही सुरू केला. आजचा कार्यक्रम अघोर विधी आणि पूजांबाबत होता. त्यासाठी रीमा आणि तिचा चमू मुंबईला लागून असलेल्या कान्हेरी जवळच्या जंगलात गेले होते. तेथील एका आड गुंफेत अघोर पंथाचे विधी चालतात आणि अमावास्येच्या रात्री काही विशेष पूजा तेथे केल्या जातात असा त्यांना सुगावा लागला होता.
कार्यक्रमाला सुरुवात झाली तेव्हा कान्हेरीतील एका अंधाऱ्या आड पायवाटेवर कॅमेऱ्यासमोर रीमा आपले छोटेखानी भाषण देत होती.
"या जगात कोणीही अश्रद्ध नाही. प्रत्येक माणूस सश्रद्धच असतो. प्रत्येकाच्या श्रद्धा वेगळ्या असतात, त्याची खोली वेगळी असते, आयाम वेगळे असतात. ज्या श्रद्धांवर आपला विश्वास नाही त्याला आपण अंधश्रद्धेचे नाव देतो. एखादा माणूस देवावर अजिबात श्रद्धा ठेवत नसेल परंतु आपल्या आईवडिलांवर श्रद्धा बाळगून असेल, तर एखादा आपल्या कामावर श्रद्धा बाळगून असेल, गुरुवर, कलेवर, अभ्यासावर. माणसाच्या श्रद्धा आणि श्रद्धास्थाने वेगवेगळी असतात. एखादी विद्या, शास्त्र पुरातन आहे, आज तिचे महत्त्व उरले नसेल किंवा कमी झाले असेल म्हणजे ते थोतांड असेलच असे नाही. एक उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर, एखाद्या प्राण्याला किंबहुना कुत्र्याला माणसाच्या शरीराचा, त्याने वापरलेल्या वस्तूचा, हातरुमाल किंवा चपला यांचा अचूक वास येतो. त्यावरून तो हरवलेली गोष्ट, जागा, माणूस हुडकून काढू शकतो. समजा घ्राणेंद्रिय जागृत करण्याची ही कला किंवा ज्याला सिद्धी असे म्हणू माणसाने अवगत केली तर केवळ एखाद्याच्या हातरुमालाचा, केसांच्या पुंजक्याच्या आणि अशा इतर लहानसहान गोष्टींवरून इतरांचे स्वभाववर्णन करता येईल, त्या माणसाबद्दल बरेच काही सांगता येईल. तंत्रसाधनेतून अशा अनेक सिद्धी प्राप्त होतात असे काही तज्ज्ञांचे मत असते, जे इतर वेळेस भोंदूबाबांकडून चमत्कार, सिद्धी, जादू म्हणून खपवले जाते. हे करणी, नवस, जादूटोणा कुठेतरी याच विचारांशी संलग्न आहेत.
याच पार्श्वभूमीवर आज आम्ही अघोरींना भेट देत आहोत. अघोर म्हणजे रक्त पिणारे, बळी देणारे, मृत व्यक्तीचे मांसभक्षण करणारे असा सर्वसाधारण समज असतो परंतु अघोर म्हणजे ज्याने स्वत:ला आठ प्रकारच्या दुर्गुणांपासून मुक्त केले आहे तो. हे दुर्गुण म्हणजे अपेक्षा, अभिमान, भीती, हाव, घृणा, बीभत्स, शारीरिक सुख आणि दांभिकता. यापासून मुक्ती मिळाली तर जीवाला कोणताही घोर राहत नाही आणि म्हणून यावर विजय मिळवणार्याला म्हणतात अघोर आणि साधनेला म्हणतात अघोर विद्या. जो हे साधतो तो शिव म्हणजे पवित्र असतो आणि त्याला अनेक सिद्धी प्राप्त होतात, तांत्रिक विद्येत तो प्रगती करतो.
तरीही आजच्या या युगात अशा शक्तींच्या मागे लागलेल्या व्यक्तींना या साधनेची काहीही माहिती नसते आणि अर्धवट ज्ञानाच्या आधारे ते आपली शक्ती व्यर्थ घालवतात याचे आम्ही आज चित्रण करणार आहोत."
रीमाचे भाषण ऐकून वसुंधराताईंना शिसारी आली. "अहो, यावेळी तुम्हीच तिला सांगा की ही असली कामं करू नकोस म्हणून. कुठे जाते ही पोरगी रात्रीबेरात्री या आडरानात. हे सर्व पुरे झालं आता. मला भीती वाटते हे सगळं बघून. तिला वेळीच थांबवायला हवे."
"गप गं! मला कार्यक्रम बघू दे आणि तिची आख्खी टीम आहे तिच्याबरोबर. उगीच काळजी करत बसतेस. काही होत नाही. अशा ठिकाणी साध्या वेषातले दोन पोलिसही बरोबर येतात म्हणून सांगत होती मागे ती." नानासाहेब उद्गारले.
"तुमचीच फूस आहे तिला. सोन्यासारखी एकुलती एक मुलगी, तिला काही होऊ नये एवढीच माझी इच्छा," वसुंधराताईंच्या आवाजात काळजी भरली होती, त्यांनी आपले लक्ष पुन्हा टीव्हीकडे वळवले.
रीमा आणि तिचे सहकारी पूजेच्या ठिकाणी पोहोचले होते. समोरचे दृश्य पाहून वसुंधराताईंना मळमळून आले. जटा वाढवलेले आणि अंगाला भस्माचे पट्टे लावलेले काही साधू धीरगंभीर आवाजात काही मंत्रोच्चार करत होते, आजूबाजूला कोंबड्यांच्या रक्ताचा सडा पडला होता. जमिनीत त्रिशूळ खोचलेले होते, भिंतींवर मशाली पेटवल्या होत्या. जवळच कालीच्या मूर्तीची पूजा सुरू होती. धुरकट आणि कोंदट वातावरणात रीमा आणि तिचे सहकारी कार्यक्रमाचे चित्रण करत होते. अचानक कॅमेरा हालल्यासारखा वाटला आणि सोबत काहीजणांचे चढवलेले आवाज.
"यहाँ आना मना है। किसने आने दिया? चले जाव वरना नतीजा अच्छा नहीं होगा।"
"हम ये विधियाँ लोगोंतक पहुँचा रहे हैं। यही हमारा काम है, क्यों नहीं कर सकते?"
आवाज चढले होते. आपापसातील बाचाबाची वाढत चालली होती. कॅमेऱ्याशी हिसकाहिसकीही सुरू होती. इतक्यात पन्नाशीच्या आसपासचा एक जटाधारी साधू कॅमेऱ्यासमोर येऊन उभा राहिला, त्याच्या घार्या डोळ्यात खुनशी भाव होते. त्याने रीमाकडे नजर रोखली आणि थंड आवाजात तो म्हणाला, "लडकी यहाँ से निकल। यहाँ आकर बहुत बडी गलती कर दी। इस साधनाको आप लोगोंने खंडित किया, नतीजा तो भुगतनाही पडेगा।"