नोव्हेंबर सरत आला की नाताळची चाहूल लागते.दुकानादुकानातून मोठीमोठी ख्रिसमसची झाडे सजू लागतात.दिव्यांच्या रोषणाईने करड्या,ढगाळ संध्याकाळी थोड्या रंगीत होतात,त्यात 'जान' आल्यासारखी वाटते.पोस्टातून भेटकार्डे, भेटपाकिटे पाठवण्यासाठी गर्दी होते.नाताळचे खास बाजार मैदानात,चर्चच्या आवारांत, नदीकाठी भरायला लागतात.हौशे,गवशे आणि नवशांची गर्दी तेथे व्हायला लागते.मेणबत्त्यांचे असंख्य प्रकार,चांदण्यांच्या आकाराचे आकाशदिवे, रेनडियरची वीजेवर लुकलुकणारी गाडी,दिव्यांच्या रंगीत माळा,फुगे, भेटकार्डे, नाताळभेटी देण्यासाठी आकर्षक डबे,रंगीबेरंगी भेटकागद, नाताळची चित्रे असलेले टी-सेट,पेले..काय नसतं तिथे? संध्याकाळी कळपाकळपाने लोक हिंडू लागतात.