माणसे: अरभाट आणि चिल्लर - ३ येथून पुढे.
पण मला नेहमी नवल वाटायचे ते एका गोष्टीचे. दिवेकर तिसरीत दोनदा नापास झाला होता. जाधव गणितात उत्तम होता, पण त्याला इंग्रजी येत नसे. त्या दोघांचे होमवर्क अनेकदा मीच करून देत असे. पण निबंधात मात्र त्यांना नेहमी दहापैकी आठ-नऊ मार्क पडत. एक दिवस मी रागारागाने त्यांना विचारले, तर ते एकमेकांना ढकलत हसतच राहिले. मग दिवेकर म्हणाला, "तू माझा जिगरी दोस्त म्हणून सांगतो. यातली ग्यानबाची मेख अशी आहे बघ. माझ्याकडे दोन वर्षांच्या जुन्या वह्या आहेत. जाधवचे दोन भाऊ येथेच शिकून गेले. त्यांच्या वह्या त्याच्याजवळ आहेत. सडेकर मास्तरांचे सहा-सात विषय ठरलेले असतात. भारतातील बेकारी, युद्धे कशी थांबतील, दारुबंदी, प्रयत्ने वाळूचे, जातिभेद, खेड्यातील जीवन. दर खेपेला आम्ही तेच जुने निबंध उतरुन काढतो. मास्तर कधी तरी दोनचार वह्या पाहतात, आणि बाकीच्या वह्या त्यांची बायको तपासते. म्हणून आम्ही आमच्या निबंधावर दहापैकी आठ किंवा नऊ असे मार्क सुद्धा लिहून ठेवतो. मास्तरांना वाटते, बायकोने आधीच मार्क दिले आहेत. तर बायकोला वाटते मास्तरांनी या वह्या आधीच तपासलेल्या आहेत. आता बघ पुढल्या खेपेला देशभक्ती हा विषय येतो की नाही ते !"