तेजस्विनी-७
"तुला लाज कशी नाही वाटली असले प्रकार करताना ? कमीत कमी आपल्या वडिलांच्या प्रतिष्ठेचा विचार तरी करायचा " प्रिया आपल्या भावाची बिनपाण्याने हजामत करत होती. समोर प्रियांक मान खाली घालून उभा होता. तर मालती वहिनी बेडच्या कोपऱ्यावर हताशपणे बसून मुलाकडे बघत होत्या. प्रियाने झाला प्रकार आईपासून लपवून न ठेवण्याचा निर्णय घेतला होता व ते एका अर्थी बरेच झाले होते. प्रियाला दुर्लक्षीत करण्याइतपत प्रियांकचे वय नक्कीच होते.
"जरा विचार कर; उद्या राजाभाऊंनी प्रियाला असली वागणूक दिली तर तुला कसे वाटेल " मालती वहिनी उसळून म्हणाल्या.
"सर असे वागायला, उकिरड्यावरचे शेण थोडंच खातात" प्रिया फणकाऱ्याने बोलली.
"आज पासून सुरेखा वहिनींच्या आजू बाजूने फिरकलास किंवा दुसऱ्या कुठल्याही बाईकडे मान वर करून बघितलेस तर घराबाहेर हाकलून देईन" मालती वहिनींनी त्याला बजावले.
"बाबांना कळले तर चाबकाने फोडून काढतील तुला.... असले प्रकार करण्यापेक्षा अभ्यासात लक्ष दे नाहीतर त्या पाटलांच्या पोरांसारखा नावारूपाला येशील" प्रिया लहान भावावर तोंडसुख घेत होती. दोघाही मायलेकींना प्रियांकने केलेल्या प्रकाराची लाज वाटत होती.
"तुझ्या ऐवजी आता मी जाऊन सुरेखाताईंची माफी मागणार आहे" मालती वहिनी बोलल्या.
"हो आई, तूच माफी माग म्हणजे त्यांना जरा धीर येईल व कळेलही की ह्या दिवट्याला आपण पाठीशी घालणार नाही ते " प्रिया म्हणाली.
"जा आता, तोंड काळ कर आमच्या समोरून" ह्या मालती वहिनींच्या वाक्यावर प्रियांकने मान खाली घालून चालायला सुरुवात केली.
मालती वहिनींनी सुरेखा ताईंशी त्यावर बोलून त्यांची समजूत काढण्याचे ठरले व मग तो विषय तेथेच संपला होता.....
एका स्त्रीला ह्या जगात कसले अनुभव घ्यावे लागतात ह्या विचारांनी प्रियाचे अंग नकळत शहारले.
********************
कालच्या दणदणीत सभे नंतर जाहीर सभांचा व प्रचाराचा काळ संपला होता. आचारसंहिता अजूनच कडकपणे राबवली जाणार होती. फक्त वैयक्तिक भेटीगाठींमार्फत प्रचार मोहीम राबवली जाणार होती. भा.ज.मो.च्या तरुण कल्पक कार्यकर्त्यांनी मात्र पथनाट्ये बसवून लोकांना मतदान करण्यास प्रवृत्त करायला सुरुवात केली होती. सुनील पाटलाने त्यावर आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला परंतू हा 'कुठल्याही पक्षाचा प्रचार नसून, आम्ही मतदारांना उत्स्फूर्त मतदान करण्याचे आव्हान करीत आहोत' असे सांगून भा.ज.मो. ने त्या आक्षेपाची पार बोळवण करून टाकली.
मतदार राजा सुज्ञ होता, कोणास काय म्हणायचे आहे, ते तो चांगलाच जाणून होता......