जी. ए. कुलकर्णी यांची 'माणूस नावाचा बेटा' ही कथा 'मनोगत' वर उतरवून काढताना मला खूप आनंद मिळाला. या निमित्ताने हीच कथा मला का लिहावीशी वाटली या प्रश्नाचे उत्तर मिळवण्याचा हा प्रयत्न:
जी.एं. चे लेखन इतके बहुस्पर्शी आणि विपुल आहे की ते सगळे वाचून पचवणे हेही तसे अवघडच. त्यात सरस निरस करणे तर जवळजवळ अशक्यप्रायच. तद्दन टाकाऊ किंवा हिणकस असे जी ए लिखाण जवळजवळ नाहीच. मग 'विदूषक', 'दूत', 'कसाब', 'अंजन' अशा कितीतरी एकाहून एक कथा असताना 'माणूस...' मला अधिक आवडली याचे पहिले कारण म्हणजे मला ती बरीचशी आत्मचरित्रात्मक वाटते. एखाद्या लेखकाच्या लिखाणावर प्रेम करणारा वाचक नकळत एक व्यक्ती म्हणून त्या लेखकातही गुंतत जातोच. जी.एं. चे व्यक्तिमत्व तर गूढ व त्यामुळे उत्सुकता अधिक चाळवणारे. स्वतःच्या आयुष्याला असे कडीकुलुपात बंदिस्त ठेवणाऱ्या जी.एं. नी एका बेसावध क्षणी एका झुळुकीसरशी आपल्या आयुष्यावरचा जाड पडदा किंचित बाजूला होऊ दिला आणि वाचकाला आपल्या खाजगी आयुष्यात थोडेसे डोकावू दिले. या कथेतील दत्तूसाठी जी.एं. ना दुसरीकडे कुठे पहावे लागले नसावेच.