माणसे: अरभाट आणि चिल्लर - १ येथून पुढे.
मास्तरांच्या स्वतःच्या शिक्षणाची झालेली परवड आम्हा सगळ्यांना माहीत होती. शाळेत वार्षिक परीक्षा आली की, आई किंवा वडील हटकून आजारी पडत व औषधपाण्यातच त्यांचे वर्ष फुकट जात असे. आपल्या हयातीतच मास्तरांनी बी. ए. व्हावे अशी त्यांच्या वडिलांची फार इच्छा होती, पण ते मात्र घडले नाही. नंतर बऱ्याच वर्षांनी हिंदी विषय घेऊन बनारसला जाऊन मास्तर बी. ए. झाले व मोठ्या कष्टाने मिळवून टिकवून धरलेली त्यांची नोकरी सुसूत्र झाली. "तुमचे पेपर कसे गेले?" असे अनेकदा मास्तर विद्यार्थ्यांना विचारतात, पण खुद्द मास्तरांनाच तसे विचारण्याची संधी आम्हाला मिळाली. आम्ही तसे विचारले तर दातार मास्तर हसून म्हणत, "कसे गेले म्हणजे काय? गेले एका लहान पेटाऱ्यातून !" ते पास झाले हे समजताच आम्ही गोंगाट करून त्यांच्याकडे पेढे मागू लागलो. एरव्ही मास्तरांनी म्हटले असते, "आता जर आवाज कराल तर भोपळ्यांनो, तुम्हाला सगळ्यांनाच पाठवीन प्रिन्सिपलकडे. तेथे मग मिळतील वाट्टेल तेवढे पेढे !"