काळ्या चष्म्याआडचा माणूस
'आजारी माणसांना किंवा आजाराची शंका असणाऱ्यांना औषध घेण्यापासून परावृत्त करणे हे डॉक्टरचे एक महत्वाचे काम आहे' या अर्थाचे वरकरणी विरोधी भासणारे एक इंग्रजी वचन आहे. यश आणि यशातून मिळणारी प्रसिद्धी याबाबतही थोड्याफार फरकाने हेच म्हणता येईल. प्रसिद्धी मिळवण्यासाठी जेवढी तपश्चर्या करावी लागते त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रसिद्धी पचवण्यासाठी, ती डोक्यात जाऊ न देता पाय जमिनीवर रहावेत यासाठी करावी लागते.'अपयशापेक्षा यशानंच माणसं अधिक मुर्दाड होतात' असं पु. लं. म्हणतात.प्रसिद्धीच्या मागं लसलसून लागणारी आणि अर्ध्या हळकुंडानं पिवळी होणारी माणसं बघीतली की आभाळाएवढी प्रतिभा असूनही जाणीवपूर्वक अज्ञानाच्या काळोखात रहाणारी माणसं अधिकच मोठी वाटायला लागतात.
जी.ए. उर्फ गुरुनाथ आबाजी कुलकर्णी या खरेतर मराठी साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळण्याची योग्यता असलेल्या पण आयुष्यभर गूढपणाच्या वलयात लपून राहून अचानक लुप्त पावलेल्या लेखकाविषयी हेच म्हणता येईल. जी.एं विषयी तुसडा, माणूसघाणा, उर्मट असे असंख्य गैरसमज होते. 'आय लिव्ह ऑन प्रिज्युडिसेस' असे मानणाऱ्या जी.एं नी ते दूर करण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. मराठी साहित्यातील अनेक सन्मान त्यांच्याकडे चालून आले. पण ते नम्रतेने स्वीकारताना जी.एं नी त्या सन्मानासोबत आलेली झळाळी कटाक्षाने बाजूला ठेवली. साहित्यसंमेलने, चर्चा, परिसंवाद, सत्कार याकडे ते फिरकलेही नाहीत. काही मोजके अपवाद सोडले तर जी.एं नी आपले छायाचित्रही कुणाला काढू दिले नाही. 'रावसाहेबां' प्रमाणे हार पडले ते त्यांच्या मृतदेहावरच.
कोण होता हा माणूस? १९५० पासून १९८०-८५ पर्यंत मुंबई- पुणे- नाशिक या मराठी साहित्याच्या केंद्रबिंदूपासून कित्येक मैल लांब धारवाडसारख्या अमराठी ठिकाणी राहून मराठी प्रतिभेच्या इतक्या उत्तुंग भराऱ्या घेणारा? आपले लिखाण खूप लोकप्रिय झाल्यानंतरही बरेच दिवस आपल्या पुस्तकांच्या दुसऱ्या आवृत्तेच्या छपाईला नकार देणारा? अफाट प्रतिभा, ती व्यक्त करण्यासाठी लागणारे कष्ट करण्याची तयारी व क्षमता, जगातले सर्व प्रकारचे साहित्य, कला, संगीत याचा अत्यंत सखोल अभ्यास, अव्याहतपणे केलेले अर्थपूर्ण आणि प्रचंड वाचन, कांदेपोह्यापासून चमचमीत कोंबडीपर्यंतची खाद्यरसिकता आणि हे इतके सगळे असतानाच काटेकोरपणे आपले 'खाजगीपण' जपणारा?
जी.एं च्या कथांप्रमाणे त्यांचे आयुष्यही एका कोड्यासारखे वाटते. आणि ते तसे आहेही. घरची अत्यंत गरीबी, आई-वडीलांचे अकाली मृत्यू, मायेच्या अशा दोन सख्ख्या बहिणींचेही पाठोपाठ निघून जाणे, त्यामुळे आयुष्यात एक विलक्षण एकाकीपणा, काहीसा कडवटपणाही येणे, पण त्यामुळे जीवनात सगळीकडे भरून राहिलेल्या दुःखाची जाणीव अधिक टोकदार होणे.... हे सगळे जे. एं च्या एखाद्या कथेसारखेच वाटतें. नंदा आणि प्रभावती या दोन मावसबहिणींबरोबर जी.ए. बरीच वर्षे धारवाडात राहिले. स्वतःचे कुटुंब करण्याचा विचार त्यांच्या मनात आला नसेलच असे नाही. पण त्या विषयावर त्यांनी कधी चर्चाही होऊ दिली नाही. ( कदचित यामागेही त्यांचे काही 'खाजगी गूढ?' ). धारवाडमध्ये ते एक अत्यंत लोकप्रिय इंग्रजीचे प्राध्यापक होते. धारवाडमधील कडेमनी कम्पाउंडमेधील त्यांची ती जुनाट बंगली, तीभोवती जी.एं नी स्वतः खपून केलेली छोटीशी बाग, कर्नाटक विश्वविद्यालयाचे मुक्त वाचनालय, त्यांचा तो खाजगी क्लब, त्यांचे लिखाण,त्यांच्या सिगारेटस, पुण्यामुंबईच्या त्यांच्या साहित्यीक (पत्र)मित्रांशी असलेला अखंड पत्रव्यवहार ,...जी.ए. आनंदात होते. .
पण जी.एं च्या कथेत शोभावासा शोकांत याही गोष्टीला लाभला होता. जी.एं ची प्रकृती बिघडली. उपचारासाठी त्यांना त्यांच्या सर्वात नावडत्या गावी - पुण्याला यावे लागले. आपल्या हातून आता फारसे काही काम - विशेषतः लिखाण होणार नाही हे जी.एं नी ओळखले आणि ल्युकेमियासारख्या गंभीर आजारावर उपचार घेण्याचे साफ नाकारले. एवढेच काय, पण आपल्या बहिणींनाही त्यांनी आपल्या आजाराची कल्पना दिली नाही. नाइलाजाने एकदोन दिवस इस्पीतळात काढून जी.ए. अगदी गुपचुप 'खाजगीपणाने' आयुष्यभर त्यांना ज्याची ओढ होती त्या अज्ञाताच्या प्रवासाला निघून गेले!
पण जी.एं चे वेगळेपण - कुणी त्याला विक्षिप्तपणाही म्हणेल -एवढेच नाही. जी.एं च्या कुठल्याही पुस्तकातले कुठलेली पान काढून बघा.. हे पाणी काही वेगळे आहे हे पटकन लक्षात येते. एवढेच कशाला, जी.एं च्या पुस्तकांची नावे व त्यांच्या अर्पणपत्रिका जरी बघीतल्या तरी या सोनेरी पंखाच्या पक्षाची गगनभेदी झेप दिसून येते. 'पिंगळावेळ' हा कथासंग्रह आपल्या वडीलांना अर्पण करताना ते लिहीतातः
तीर्थरूप आबांस,
डोळे उघडून उठून बसत मी तुम्हाला नीट पहाण्यापूर्वीच
तुमची पावले उंबऱ्याबाहेर पडली होती.