अखेर मी विद्यापीठात पदार्थविज्ञान शिकायला दाखल झालो. खरं तर बरीच वर्ष मला पदार्थविज्ञान कशाशी खातात हेच माहीत नव्हतं. पदार्थविज्ञान म्हणजे निरनिराळ्या खाद्यपदार्थांच्या कृतींचे शास्त्र असणार अशी माझी 'जिव्हा'ळ्याची समजूत होती. अर्थात इतर अनेक समजूतींप्रमाणे ही पण यथावकाश निकालात निघाली.
पाळण्यात असताना पाय सतत तोंडात घालण्याच्या माझ्या सवयीमुळे जाणकारांनी मी पुढे लहान तोंडी मोठा घास घेणार असं भाकीत केलं होते म्हणे, जे फारच बरोबर निघालं. पण बाबांचे माझ्याबद्दलचे भाकीत साफ चुकलं.