एकतर महागड्या वस्तू वापरायची आपली लायकी नाही. दुसरं म्हणजे, लहानपणापासून कधी तशी सवय नाही. स्वस्तातल्या वस्तू घ्यायच्या, म्हणजे त्या संख्येनं जास्त घेता येतात, असेच बाळकडू. त्यामुळं आयुष्यात पहिल्यांदा, वयाच्या तेविसाव्या वर्षी स्वतःच्याच पैशांनी सहाशे रुपयांची कॉटन पॅंट घेतली, तेव्हा केवढं अप्रूप वाटलं होतं मला स्वतःलाच! घड्याळं, पेनं, कुठलीच वरच्या श्रेणीतली गोष्ट घ्यायची सवय नव्हती. नाही म्हणायला, अलीकडे, विशेषतः लग्नानंतर बायकोच्या आग्रहाला, हट्टाला बळी पडून कधीमधी अशा खरेद्या करू लागलो होतो.