माणसाचे मन ही मोठी अजब गिजबीज आहे. मनाचे व्यापार, भावना आणि माणसाचे वर्तन यातल्या फार कमी गोष्टींचा विज्ञानाला उलगडा झाला आहे. मानसिक रोगांचीही तीच कथा आहे. मनोरुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असली तरी त्यांची कारणे आणि नेमके उपचार याबाबतचे माणसाचे ज्ञान मर्यादितच आहे. मनोरुग्णांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोनही फारसा बदललेला नाही. भारतात तर नाहीच नाही.
स्किझोफ्रेनिया किंवा दुभंगलेले व्यक्तिमत्व हा असाच एक गंभीर मानसिक आजार. 'देवराई' मधला शेष देसाईला हा आजार झाला आहे. मुळातच काहीसा एककल्ली, आत्ममग्न, सतत कसला ना कसला विचार करत राहणारा, पण अतिशय बुद्धीमान असा हा शेष हळूहळू जास्तजास्त चिडचिडा, तापट होत गेला आहे. त्याचे वडील लहानपणीच गेलेले, आई आणि धाकटी बहीण सीना, एवढेच त्यांचे कुटुंब. पण शेषची खरी जवळीक आहे ती कल्याणीशी. कल्याणी शेष आणि सीनाची मामेबहीण. तिची आई गेल्यावर ती तिच्या आत्याकडे, शेष आणि सीनाच्या आईकडेच वाढली आहे. कल्याणी, शेष आणि सीना यांचे बालपण कोकणातल्या त्या गावात मोठ्या मजेत गेले आहे. गावाजवळ देवराई आहे. देवराई म्हणजे सेक्रेड ग्रोव्ह - देवाच्या नावाने वाढलेले, वाढवलेले जंगल. ते तोडायचे नसते. लहानपणापासून शेषला देवराईचे वेड आहे.त्यातच वाडीवर काम करणाऱ्या पार्वतीमध्येही शेषची काही चमत्कारिक भावनिक गुंतवणूक झाली आहे, पण पार्वतीचे गावातल्यच शंभूशी लग्न झाले आणि शेषचे सगळे बिनसायला सुरुवात झाली. शंभू दिसायला दांडगा, पार्वती एवढीशी, नाजूक. शेषचा विक्षिप्तपणा वाढतच गेला. त्यातच परिस्थितीने असे काही चमत्कारिक वळण घेतले की कल्याणीला ताबडतोब तिथून निघून जावे लागले. सीनाचेही लग्न झाले. मुळात एकांडा असलेला शेष आता पार एकाकी झाला. त्याचे शिक्षण अर्धवटच राहिले होते. त्याला जे मनापासून करायचे होते, ते देवराईवरचे संशोधन तसेच राहिले. लग्न वगैरे झाले नाहीच. मुळात अतिशय बुद्धीमान असलेलेया शेषच्या आयुष्याची अशी वाताहात झाली. त्याच्या मनात विचारांचा, कल्पनांचा एक भलामोठा गुंता झाला. त्याच्या मनातल्या दोन हळव्या बिंदूंची - पार्वतीची आणि देवराईची - गल्लत होऊ लागली. गावाजवळून जाणाऱ्या रस्त्यात देवराई तोडली जाणार असे ऐकताच तर शेषचा स्फोटच झाला. देवराई? की पार्वती? देवराई तोडणार? म्हणजे पार्वतीला मारणार? कोण? शंभू? मग हे सगळं सांगायचं कुणाला? सीना? कल्याणी? पार्वती? देवराई....