अमेरिकायण! (भाग २० : लास वेगास १ - तोंडओळख)

हळूहळू उन्हाळा उतरू लागला होता. साऱ्या अमेरिकन सृष्टीला "फॉल" चे वेध लागले होते. हवेतला गारवा वाढला होता. ही वेळ वेगास जाण्यासाठी उत्तम असा विचार करून एक चांगला दीर्घ सप्ताहांत वेगासवारीसाठी राखून ठेवला. शिवाय एखादा दिवस सुट्टी टाकून एकूण चार साडेचार दिवसांचा जय्यत कार्यक्रम तयार झाला.
आम्ही नेहमीचेच (यशस्वी) कलाकार होतो. मी कार्यक्रम आखला असल्याने मी सोडून सारे निश्चिंत होते  . असो, अटलांटिक सिटी जर एक द्युतक्षेत्र असेल तर वेगास ही तर साक्षात द्यूतपंढरी!! इथला एकेक कसिनो म्हणजे मोठ्ठेच्या मोठ्ठे द्युतमहालच! न्यूयॉर्क वरून वेगास बरंच लांब. विमानाचा चार साडेचार तासांचा प्रवास होता. विमान जवळजवळ अख्खी अमेरिका पार करून दुसऱ्या टोकाला जाणार होतं.
विमानाने टेक ऑफ घेतला आणि नेहमीप्रमाणे भुरळ घालणारं न्यूयॉर्क बघता बघता आम्ही ढगाआड गेलो. हळूहळू ढग निवळले आणि खाली अमेरिकेचे वेगवेगळे भाग दिसू लागले. जसजसं जर्सी मागे पडलं तसतशी मध्य अमेरिकेतील शेती खालून जात होती. अनेक हेक्टरच्या हेक्टर जमीन ही शेतीखाली होती. आणि त्या उंचीवरून ते शेताचे गोल (हो! तिथे पट्टे नसून शेतजमीन गोलाकारात नांगरली होती. कारण कळले नाही  ) खूप सुंदर दिसत होते. इथे विमानाने फवारणी, पेरणी करावी लागते इतकी मोठी शेते असल्याचे ऐकून होतो. इतक्या उंचीवरूनही दूरदूरपर्यंत दिसणारी शेते खरोखरच प्रभावीत करून गेली.
पुढे शेताचा पट्टा (की टप्पा) संपला आणि पर्वतराजी सुरू झाली. हीच ती प्रसिद्ध रॉकी पर्वतराजी! दूरदूरपर्यंत आता केवळ दऱ्या आणि डोंगर दिसत होते. पण हे डोंगर छान हिरवेगार नसून अतिशय शुष्क आणि कोरडे आहेत. मधूनच नदी/तलाव असला की भोवती गर्द झाडी असते अन्यथा केवळ उघडे बोडके अक्राळ विक्राळ उंचच्या उंच पर्वत! हे पर्वत कमी कमी होऊ लागले पण दूरवर असणारा शुष्कपणा तसाच होता. एखादा प्रदेश वाळवंट असतो म्हणजे वाळूचे थरच्या थर असतात असा माझा बाळबोध समज या वाळवंटाने खोटा पाडला.
ह्या निर्जीव, शुष्क, भकास वाळवंटाकडे पाहत असतानाच "पट्टे आवळा"ची सूचना झाली. म्हटलं हे का इथे काहीच दिसत नाही आहे. साधारणतः शहर जवळ आलं की आधी छोटी छोटी नगरे खाली दिसू लागतात. पण इथे तर होतं केवळ वाळवंट. आणि अचानक त्या वाळवंटाच्या मधोमध एक नगर दिसू लागलं... वेगवेगळ्या इमारती, उंचच्या उंच टॉवर दिसू लागले आणि हे सारं डोळे भरून पाहायच्या आत विमानाने जमिनीला पंख टेकवलेसुद्धा!! वरून झालेल्या क्षणभर दर्शनाने एका 'माया'नगरीत शिरतोय याची खात्रीच झाली आणि त्या शहराला भेटायला सरसावलो.
अमेरिकेत फिरण्याचा उत्तम मार्ग म्हणजे  कुठेही गेल्यागेल्या गाडी भाड्याने घेणे. इथे बऱ्याच कंपन्या आहेत ज्यांच्याकडून एका शहरात गाडी घ्यावी भरपूर चालवावी आणि काम झालं की जिथे असाल तिथल्या त्यांच्या केंद्रावर द्यावी. त्यात आम्हाला वेगास बरोबर ग्रँड कॅनियन पण करायचं असल्याने आम्ही विमानतळावरच ही गाडी घेतली. विमानतळापासून हॉटेलचा नकाशा बरोबर होताच. त्याआधारे शहराच्या अंतरंगात प्रवेश केला

लास वेगास!! कसिनोचं शहर! अत्यंत टुमदार शहर. विमान उतरतानाच त्याचा "आखीव" बांधा जाणवला होता. आता शहरात शिरतानाही प्रचंड सरळ आणि मोठे रस्ते, शेजारी कलात्मक इमारती आणि तऱ्हेतऱ्हेच्या जाहिराती. मुख्य म्हणजे जाहिराती इतक्या कल्पकतेने लावल्या होत्या की त्याने शहराच्या सौंदर्याला किंचितही बाधा पोचत नव्हती, खरंतर सौंदर्यात भरच पडत होती. आत हळूहळू कसीनोच्या इमारती जवळ येत होत्या. एक काय पिरॅमिडच्या आकाराची, एकासमोर काय स्वातंत्र्यदेवीचा पुतळा असा अंदाज दूरूनच नवखेपणाने घेत होतो. इतक्यात मित्राने गाडीचा वेग मंदावला बघितलं तर पुढे अनेक गाड्या अशा रस्त्याच्या कडेला थांबल्या होत्या आणि एका बोर्डापुढे फोटो काढायला 'ह्हीऽ' गर्दी होती. हेच ते अनेक चित्रपटांत पाहिलेलं होर्डिंग "Welcome to Fabulous Las Vegas". शहरातील सारे कसिनो "स्ट्रिप" म्हटल्या जाणाऱ्या एकाच लांबलचक रस्त्यावर आहेत. खरंतर सुस्वागतमच्या पाट्या एखाद्या खुर्द आणि बुद्रुक असे विभागांच्या वेशीवरही असतात. पण का कोण जाणे ही वेलकमची पाटी एका आनंदनगरीत तुम्हाला भरभरून बोलावते आहे असे वाटले.

पुढे सामान हॉटेलात टाकले आणि पोटपूजेसाठी भारतीय रेस्टॉरंटचा शोध सुरू केला. केवळ मीच जर्सीतून असल्याने भारतीय खाण्याचा मी सोडून सगळ्यांना प्रचंड सोस होता. त्या भारतीय रेस्टॉरंटसमोरच एक पक्षांचा खेळ चालू होता. एक मोठा गरूड आणि लव्हबर्डसारखे छोटे पक्षी तऱ्हेतऱ्हेच्या मजा करून दाखवत होते. मंडळी देखील शिट्या वाजवून मनसोक्त दाद देत होती. बऱ्याच दिवसांनी अश्या खुल्लमखुल्ला शिट्या वाजवायला मिळाल्याने आम्ही देखील शिट्या वाजवून घेतल्या  . पोटाला शांत करून आम्ही पहिल्या कसिनोत गेलो. ह्या कसिनोचे नाव अलादिन होते. हा कसिनो मला तरी सगळ्यात बोरिंग वाटला. खरंतर कसीनोपेक्षा ते एक शॉपिंग सेंटरच होते. इथले छत म्हणजे मात्र कल्पकतेचा उत्तम नमुना म्हणता येईल. छतावर आकाशाचेच चित्र आहे. आणि प्रकाशयोजनाही अशी आहे की आता कधीही पाऊस पडेल असेच वाटत राहते. आणि गंमत म्हणजे मध्येमध्ये खरंच पाऊस पडतो. तुम्हाला कळायच्या आत गडगडाट होतो विजा चमकतात आणि छतातून एक पाण्याचा शिडकावा होतो. बच्चेकंपनी त्यामुळे एकदम खूश. बाकी इथे येण्याचे दुसरे प्रयोजन असे की इथे आम्हाला वेगास मधी प्रसिद्ध शोजची तिकिटे त्यादिवशी सवलतीत मिळणार होती.

बाहेर आलो तोपर्यंत मध्यान्ह ऐन उत्साहात होती आणि सूर्य जरा जास्तच खुशीत होता. आपण वाळवंटाच्या मध्यावर आहोत हे भोवतालच्या इमारतींनी जाणवत नसलं तरी तापमान पुरेपूर जाणीव करून देत होतं. आम्हाला त्या उकाड्यापुढे नमतं घ्यावंच लागलं. आम्ही आणखी काहीही बघायच्या फंदात न पडता हॉटेल गाठलं. वेगास रात्रीच का रंगतं याच आणखी एक कारण आम्हाला मिळालं होतं. वेगास मध्ये येऊन बराच वेळ झाला होता. गाडीतून दिसणारं वेगास भन्नाट होतं. पण उष्णता दुपारी बाहेर पडू देत नव्हती. आता सूर्यराजाच्या मावळण्याची वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हतं.. वेगास अनुभवण्याची उत्सुकता रात्रीपर्यंत रोखून रात्र जागवण्याचा उद्देशाने ती वेगासमधली अतिगरम दुपार आम्ही निद्रादेवीच्या अधीन झालो. उठल्यावर वेगासचे एक वेगळे रूप दिसेल ही अपेक्षा मनात होतीच...

(क्रमशः)
-ऋषिकेश