आमच्या "शहरी' श्रावणखुणा!!
'क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनि ऊन पडे' ..."श्रावणा'च्या कवितेतल्या या ओळी सहजपणे आठवाव्यात, असा श्रावण सध्या इथेही, आमच्या शहरातही बरसतोय. पहाटेच्या निळ्याशार आकाशातल्या पूर्वेला तांबडं फुटत असतानाच अचानक माथ्यावरच्या आकाशावरला एखादा काळा ढग हातपाय पसरायला लागतो आणि बघताबघता चारी दिशा कवेत घेतो. पूर्वेची लाली पार काळवंडून जाते, आणि पहाटस्वप्नातून जागे हाऊन किलबिल करणाऱ्या चिमण्यापाखरांची पळापळ सुरू होते. सिमेंटच्या जंगलातल्या एखाद्या कोपऱ्याला पत्र्याच्या आडोशाखाली काडीकाडी जमवून बांधलेल्या घरातून बाहेर पडून आताआत्ता घुमायला लागलेली जंगली कबुतरं भेदरल्यागत फडफड करत बसतात, आणि बिल्डिंगच्या आडोश्याला विसावून मिटल्या डोळ्यांनी आकाशाकडे माना लावून बसतात. पिवल्या फुलांचा बहर ओसरलेल्या बाहव्याच्या एखाद्या फांदीवरच्या एखाद्या विस्कटलेल्या, अस्ताव्यस्त दिसणाऱ्या घरट्यातली कावळ्याची पिल्लं उगीचच कलकलाट करायला लागतात, आणि चहूबाजूंनी कावळ्यांचा एकच कल्ला सुरू होतो. बिचाऱ्या चिमण्या त्या कलकलाटातच कुठेतरी हरवून गेल्यासारख्या चिडीचिप होऊन पाऊस झेलायच्या तयारीत पंख फुगवून बदामाच्या झाडावरल्या एखाद्या रुंद पानाखाली आसरा घेऊन दडी मारतात, आणि काळवंडलेलं आकाश एकदम ओथंबल्यागत होऊन सरसरा जमिनीवर बरसायला लागतं... एक सणसणीत सर मिनिटभरासाठी कोसळते आणि घराघरातला पंख्याचा वेग काहीसा मंदावतो... दमट, घामेजलेल्या हवेला एक थंडशी शिरशिरी येते आणि जराकुठे गारगार वाटायला लागतंय, तोवर ती सर गडप होऊन पुन्हा उन्हाचे कवडसे घराच्या खिडक्यांमधून आत दाखल होतात. पुन्हा तोच घामट उकाडा सुरू होतो, आणि पंख्यांच्या वेग वाढतो... श्रावणसरींचं सुख अनुभवू म्हणताम्हणता त्या सरीच गायब होऊन जातात, आणि झाडाच्या पानांआड, पत्र्याच्या आडोशाने आणि काटक्यांच्या घरट्यात घाबरून बसलेली तमाम पाखरं पुन्हा पंख पसरून बाहेर पडतात. क्षणभराच्या काळोखीनं केलेली फजिती लपविण्यासाठी, जणू काहीच झालंच नाही, अशा थाटात पुन्हा चिमण्यांचा चिवचिवाट सुरू होतो. आपल्या कोवळ्या पिल्लांवर डाफरल्यागत आवाज काढत कावळीही पुन्हा पंख पसरते, आणि मानेभोवती चोची खुपसून उगीचच साफसफाई केल्याच्या ढोंगात कबुतरं बुडून जातात. एखादं कबुतर मस्तपैकी गिरकी मारून पुन्हा येऊन विसावतं आणि घुमतघुमत, सारंकाही "आलबेल' असल्याचा इशारा देतं... मग अवघी फौज आकाशात भरारी मारायला पंख पसरते... एक काळा ढगच जणू एखाद्या इमारतीच्या भिंतीआडून आकाशाकडे झेपावतो...