अमेरिकायण! (भाग ३: न्यूयॉर्कशी भेट)

न्यूयॉर्क! जगातील मोठ्या शहरांचा राजा. पण माझ्यासाठी हे शहर फार विशेष ठरलं कारण या शहराचं असलेलं मुंबईशी साधर्म्य. मला इथे जागोजागी मुंबई भेटत गेली किंबहुना अजूनही भेटते. ज्याप्रमाणे मुंबई भारताची प्रदर्शिका (शोकेस) आहे त्याप्रमाणे न्यूयॉर्क जगाची प्रदर्शिका आहे. इथे साऱ्या रंगांचे, वंशाचे, देशांचे, हरतऱ्हेच्या संस्कृतीचे लोक आहेत. इथे लोकलची गर्दी आहे, धक्के खात होणारा प्रवास आहे, गाड्यांनी तुडुंब फुगलेले आणि तितकेच माणसांनी फुललेले रस्ते आहेत, छोट्या छोट्या गल्ल्या आहेत, तिथे खाण्याच्या गाड्या आहेत, चणे शेंगदाण्यापासून ते कपड्यांपर्यंत सगळं काही विकणारे फेरीवाले आहेत, रस्त्यांत खेळणारी पोरं आहेत; अगदी भिकारीसुद्धा आहेत.

अश्या ह्या न्यूयॉर्कमध्ये मिसळायला मला काहीच कष्ट पडले नाहीत. माझा ऑफिसचा पहिलाच दिवस. नशिबाने पाऊस नव्हता. 'जरनल स्वेअर'ला 'पाथ' नावाच्या 'भूमिगत' गाडीने WTC ला जाता येतं. तिथे तिकिट पंच करून घ्यावं लागतं. मी अमेरिकेत नुकताच आलो असल्याने म्हणा किंवा मुंबईचा असल्याने म्हणा लगेच मनातल्या मनात तुलना सुरू केली. इथे ज्याप्रमाणे स्टेशनमध्ये शिरताना तिकिट पंच करून घ्यावं लागतं, तसंच मुंबईत करता येईल का? मग माझ्या विचारांच मलाच हसू आलं, डोंबिवली अथवा बोरिवली एकदम डोळ्यासमोर आलं.. आणि जर इतक्या गर्दीत ही एक "पंचिंग" अडचण मध्ये ठेवली तर काय गोंधळ होईल असं वाटून गेलं

एका मीटरगेज गाडीतून आमचा 'भूमिगत' प्रवास चालू झाला. गाडिला अगदी मुंबईसारखी चिक्कार गर्दी होती. तरीही दोन मूळ फरक होते, एकतर गाडीचे दरवाजे बंद असल्याने कोणी लोंबकळत नव्हतं आणि कोणीही घामाने थबथबलेलं नसल्याने घुसमटणारा वास नव्हता. सगळे प्रवासी कसे छान कपडे घातलेले, टापटीप, सुवासिक फवारणी केलेले होते. काही प्रवासी तर फ़ारच सुंदर  ! प्रत्येक जण आपापल्या दुनियेत पूर्ण बुडलेला होता. जवळजवळ ६०% मंडळी कानात यंत्रांनी गाणी ऐकत होती, बाकिची वृत्तपत्र, मासिकं, पुस्तकं वाचण्यात दंग होती (उभ्या उभ्याच). माझ्यासारखे एखाद दोघे रसिक आजूबाजुची (पुलंच्या भाषेत सांगायचं तर...) चालती बोलती (वाचती) प्रेक्षणीय स्थळ पाहण्यात गुंतले होते.ह्या पाथचे गाडीवानही तसे मजेशीर, अनेकदा रोजचीच एका ठराविक साच्यातली उद्घोषणा करताना एखादवेळी विनोद करतात. (मग अख्खी पाथ हसते. फ़ारच सावधपणे वाचन करतात बुवा हि मंडळी ).

असो. तर अश्या ह्या 'पाथा'वरुन आम्ही WTCला पोहोचलो. आपण येथे पोहोचतो तेच मुळात प्रसिद्ध "ग्राउंड झिरो" वर. प्रचंड मोठा रिकामा परिसर. वाटलं एकेकाळी हाच परिसर जगातील सगळ्यात उंच इमारतींमुळे दिमाखात वावरत होता, आता इथे अगदी भकास झालाय. तरीही इथे पाहिलं तर अगदी आपल्या 'चर्चगेट'सारखी तोबा गर्दी, आणि तरीही हि पंचींग "गतीद्वारं" (टर्नस्टाईल्स) अजिबात अडचण करत नव्हती. सगळी जनता अगदी सहजपणे गाड्या पकडत होती (अगदी धावपळ करून!!). ती गर्दी पाहिल्यावर खात्री पटली, की आपल्याकडेही अशी 'पंचिंग' व्यवस्था चालवता येईल (भाग२ च्या प्रतिक्रियेत प्रियाली यांनी नमूद केल्याप्रमाणे, शेवटी प्रश्न सवयीचा आहे  )

बाहेर न्यूयॉर्क माझ्या स्वागताला सज्ज होतं. टोलेजंग इमारती (इतक्या उंच की पाहणाऱ्यांची टोपी पडावी), नानाविध लोकांनी भरलेले रस्ते, रस्त्यावर इथल्या नगरपालिकेने खणलेले रस्ते (म्युनसिपालटी म्हटलं की खड्डे खणायचे ही जागतिक सवय आहे, मग म्युनसिपालटी मुंबईची असो की व्हेनेझुएलाची [किंवा न्यूयॉर्कची] इति: पुल), पर्यटकांची गर्दी या साऱ्यांनी माझं मनापासून स्वागत केलं. न्यूयॉर्क इतकं 'जिवंत' आहे, की एखाद्या पाषाणाला किंवा दगडालाही एका जागी राहणं कठिण जावं. ज्या मंडळींना मुंबई इथल्या गर्दीमुळे, घाणीमुळे, लखलखाटामुळे आवडत नाही, त्यांना कदाचित न्यूयॉर्कही भावणार नाही. पण ज्याला ह्या गडबडीतही लय दिसते, मोटारींच्या गजराने ज्याला जाग येते, ज्याला घड्याळ तासाप्रमाणे मिनिटालाही बांधलेलं असणं आवडतं, ज्याला आजूबाजुची पर्वा न करता कुठेही चविष्ट खायला आवडतं, ज्याला रमणीय शांतता विरंगुळा म्हणून / बदल म्हणून आवडते त्याच्यासाठीच मुंबई, न्यूयॉर्क अशी शहरं राहण्यासाठी असतात!

असो! तर, स्टेशनच्या समोरच एक पेपरवाला उभा असतो (अमेरिकेत पेपर फुकट मिळतो  ). त्याचं ते "गुऽऽऽऽऽऽऽऽऽड मॉर्निंग एऽम न्यूयॉर्क" अशी आरोळी ताजतवानं करून जाते. तो एखाद दिवशी तिथे नसेल तर उगाचच चुकल्या चुकल्या सारखं वाटतं. पुढे 'ऍलन' नाम धारण केलेल्या बांगलादेशी न्याहरीवाल्याची गाडी लागते. पहिल्याच दिवशी त्याने "वी मेक व्हेरी गूड फ़लाफ़ल, प्युअर इंडियन व्हेज" असं सांगून गिऱ्हाईक पटवायच्यासाठी म्हणा पण एका "कॉप्लिमेंटरी फ्री फ़लाफ़ल"चं कार्ड हातावर टेकवलं.

खरंतर डाऊनटाउन हा भाग म्हणजे कचेऱ्या आणि बँकांची मांदियाळीच.पण मला इथे भावली ती लोकांची माणूस म्हणून आनंदी राहण्याची धडपड. इथे तू कोण आणि मी कोण हा प्रश्न विचारायची सवड आहेच कुणाला? आला दिवस आनंदात 'हवा तसा' घालवणे हेच इथे मुख्य उद्दिष्ट असतं. काही वाचन करतात, ज्यांना हवं ते स्केटिंग करतात, काही मंडळी ऐन बागेत बुद्धिबळ खेळत बसतात, त्यांच्या भोवतीची गर्दीही जाणकार नजरेने तो खेळ पाहत असते. अगदी उडव त्या हत्तीला, ती राणी का ठेवलीस असा साला मारामारीचा सीन असतो. कुठे एखादं जोडपं आपल्याच रंगात रंगलं असतं, (आणि कोणीही त्या रंगाचा बेरंग करत नाही).पण मला आवडल्या त्या इथल्या आज्या. मस्त साठी-सत्तरी ओलांडलेल्या, सोळावं लागल्या प्रमाणे गळ्यात कॅमेरा अडकवून फुटाण्यांप्रमाणे सगळीकडे नाचत असतात. आपलं उत्तर आयुष्य असं बागडून मजेत व्यतीत करत असतात. 

थोडक्यात काय तर, तऱ्हेतऱ्हेच्या किंबहुना हरतऱ्हेच्या फुलांनी हि न्यूयॉर्कची बाग सजली आहे. आता प्रश्न तुमचा आहे, की बागेत काय करायचं. तुम्ही इथे "सतत काहीतरीच घडतंय" असं म्हणून डोळे मिटून घेऊन ध्यान लावू शकता, किंवा डोळसपणे सभोवतालच्या नव्या "सतत काहीतरी घडणाऱ्या" बागेतील सौंदर्याकडे ध्यान देऊ शकता. मी दुसरा पर्याय निवडला.

(क्रमशः)

-ऋषिकेश