चिमा्ने जन्म दिलेल्या दोन छाव्यांमुळे अगदी नवजात अर्भक ते पूर्ण वाढलेलं मांजर इथपर्यंतचा प्रवास आम्हाला खूप जवळून पाहता आला, अनुभवता आला. चिमाला मोजून दोनच पिल्ले

झाल्याने त्यांना सांभाळणं तसंही अवघड नव्हतंच. (तेव्हा आम्ही पहिल्या मजल्यावर रहायचो. पण मांजरं बाळगण्याच्या दृष्टीने तळमजला असलेला सर्वात योग्य असं मला कायम वाटतं). 'इवली' या शब्दाला सर्वात समर्पक असं उदाहरण म्हणजे मांजरीची नवजात पिल्लं! खरोखर इतके छोटे जीव असतात ते! डोळेही मिटलेली ती नाजूक त्वचेची, चिमणीपेक्षा बारीक आवाजात म्यावम्याव करणारी नाजूक बाळें पाहून यांचेच पुढे इरसाल बोके किंवा लबाड मांजरी होतील असं अजिबात वाटत नाही!
आमच्याकडचे हे दोन चिरंजीव रंगारुपात जवळपास सारखे होते, काळे-पांढरे. सिनेमात कसा जुळ्या भावांमध्ये तीळ किंवा जन्मखूण असा एकच फरकाचा मुद्दा असतो तसा यांच्यातही एक फरक होता. त्यापैकी एकाच्या कपाळावर, डोळ्यांच्या मधोमध चांगला मोठ्या टिकलीएव्हढा काळा ठिपका होता. त्यामुळे आम्ही ठेवलेल्या नावाव्यतिरिक्त 'टिकलीवाला' हे विशेष बिरुद त्याला माझ्या आजोबांकडून मिळालं होतं. पुढे मोठं झाल्यावर दोघांचे स्वभाव, आवाज इतके भिन्न झाले की बोलून सोय नाही. या दोन सख्ख्या भावांचं नाव आम्ही 'चंगू मंगू' ठेवलं. कपाळावर टिकली असलेला मंगू आणि दुसरा चंगू.
जन्मत:च मांजरांचे डोळे मिटलेले असतात. अर्थात नंतर ते उघडतात पण तेव्हा ते गडद काळेच दिसतात. छोटे काळे मणी जणू. मोठे होऊ लागतात तसतसा त्यातला घारा अंश दिसू लागतो. या नवजात बालकांना हात लावायचा नाही अशी सक्त ताकीद मिळालेली असल्याने त्यांचं निरीक्षण करण्याव्यतिरिक्त फारसं काही करता यायचं नाही. तसंही या वयातील पिल्लांशी फारसं खेळताही येत नाही हेही खरंच कारण अजून तितकी मोठी ती झालेली नसतात. पण ही जोडी मोठी होऊ लागली तशी लुटुलुटु चालूही लागली. दिसेल तो पदार्थ हुंगुन खाण्यालायक आहे का ही सवय लागण्याचा हाच तो काळ. दुडदुडत त्यांनी त्यांच्या संचाराचा परीघ आधी टोपलीतच, टोपलीच्या बाहेरील परीसर, मग पूर्ण गॅलरी आणि मग पुढे अगदी घरभर असा क्रमाक्रमाने वाढवत नेला. या वयातली पिल्लं निरागस मुलांसारखी निर्व्याज आणि अबोध वाटतात. मोठेपणातले बिलंदर भाव चेहेर्यावर उगवायला अजून बराच अवकाश असतो ना!
सर्वत्र संचारी चंगूमंगूच्या लटक्या मारामार्या, पळापळी आणि लुटुपुटीची भांडणं वगैरे पाहून एकाऐवजी घरात दोन समवयीन मांजरे असल्याची मजा काही औरच असल्याचा साक्षात्कार झाला. तसंही एकच मांजर असलं तरी ते आपल्याशी किंवा आपण त्याच्याशी कसंही खेळू शकत असल्याने मजा ही येतेच पण दोन मांजरं असली तर आपण स्वत:ही खेळाडू बनण्यापेक्षा निरीक्षकाची भूमिकाच हळूहळू आपल्या अंगवळणी पडत जाते. कारण बहुतेक वेळेस दोन पिल्लं आपापसातच खेळत असतात. आपण एखादा खेळ सुरु करुन द्यायला निमित्त होतो इतकंच. पुढे फक्त ती गंमत अनुभवायची.
पण एकमेकां

शी खेळून पोट भरलं की कधीकधी दोघं गुपचूप चोरपावलांनी मोर्चा आमच्याकडेही वळवायचे. वर्तमानपत्र पूर्णपणे जमिनीवर अंथरुन वाचायची सवय मला बराच काळ होती. मग आता ही वाचतेय तर आपल्याकडे लक्ष वेधून कसं घ्यायचं याची चांगली क्लृप्ती त्यांनी शोधून काढली होती. चंगूमहाराज सरळ मी वाचत असलेल्या बातमीवरच येऊन बसायचे! तसंच अभ्यास करायला चटई घालून बसलं की अभ्यास कसा न होईल या दृष्टिने अथक परिश्रम ही जोडगोळी करायची. लिहित असले तर हलणार्या पेन्सिलीवर डावल्याच मार, दप्तर जरा उघडं दिसलं की त्यात घूस, कंपासपेटीत तोंड घाल एक ना दोन!
दोघे जसजसे मोठे होत गेले तसतसा त्यांच्या आवाजात, अंगलटीत आणि स्वभावातदेखील फरक पडत गेला. चंगूचा आवाज तर काय सांगू! त्याच्या आवाजाने "चि. चंगू हल्ली दुपारी वरचेवर शेजारच्या बोक्याशी उंच स्वरात बोलत असल्याने आमच्या बाळूचा अभ्यासात अडथळा निर्माण होतो. बाळूचे सध्या दहावीचे वर्ष असल्याने या गोष्टीची त्वरीत दखल घ्यावी" अशाप्रकारच्या चिठ्या मिळतायत की काय अशी भिती वाटायला लागली. कारण चि. चंगूचा आवाज कर्कश्य, घोगरा, चिरका, फाटलेला की काय म्हणतात तसल्या प्रकारांत मोडायचा. पण त्याला हे कळलं होतं की काय माहित पण जरुरीशिवाय त्याने कधी आपला आवाज ऐकवला नाही. त्यामुळे सुदैवाने चिठ्याही आल्या नाहीत. पण एक आवाज सोडल्यास चंगू हे एक सडपातळ, हुशार, चपळ आणि स्मार्ट मांजर होते. अगदी त्याच्या भावाविरुद्ध.