भारत अधुन मधुन माझा देश आहे

भारत माझा देश आहे? खरंच आहे का? असेल बहुदा.

आजच्या दिवशी म्हणे भारताला स्वतंत्र्य मिळालं. हं, स्वातंत्र्य. हे बाकी चांगलं झालं हं. म्हणजे काय की प्रत्येक माणसाला स्वातंत्र्य हे हवंच. आत बघा आमची हयात गेली स्वातंत्र्य मिळवण्यात. म्हणजे लहान होतो तेव्हा अभ्यासापासून स्वातंत्र्य, थोडे मोठे झालो तसे पालकांच्या कटकटीपासून स्वातंत्र्य, मग वेगवेगळ्या गर्ल फ़्रेंड्स ना भेटताना ओळखीच्या माणसांच्या नजरांपासूनचे स्वातंत्र्य, लग्न करण्याचे स्वातंत्र्य, लग्नाआधी लग्नानंतरचे करायचे स्वातंत्र्य, आणि लग्नानंतर लग्नाआधीचे करायचे स्वातंत्र्य.

सगळ्या स्वातंत्र्याची भंकस झालेय यार, मग कसला स्वातंत्र्यदिन सेलेब्रेट करायचा. त्यात सेलेब्रेशन म्हणजे आधीपासूनच स्टॉक आणून ठेवायला लागतो. साला स्वातंत्र्यदिनाला तरी आम्हाला काय पाहिजे ते प्यायचे स्वातंत्र्य द्याल की नाही?

थोडक्यात काय? तर स्वातंत्र्य इज अ व्हेरी इंपॉर्टंट कमॉडिटी. म्हणजे कसं एकदम फ्री वाटलं पाहिजे यार. दारू पाहिजे तर दारू, गांजा पाहिजे तर गांजा, चरस पाहिजे तर चरस. काय? जे पाहिजे ते मिळालं पाहिजे. पण बघा ना. आता उद्या पकडलं मला गांजा पिताना तर माला आत घालणार पोलिस. माझ्या जागी कोणी इंफ्लुएंशियल पोरगा असला की पोलिस, त्याच्याबरोबर गांजा ओढणार. म्हणजे सगळ्या इंफ्लुएंशियल डुकरांना स्वातंत्र्य. पण आमच्या सारख्या नॉन इंफ्लुएंशियल..... घाबरू नका, माणसांचं म्हणत नाहीये......तर आमच्या सारख्या नॉन इंफ्लुएंशियल डुकरांचं काय? आम्हाला कसलं आहे स्वातंत्र्य? हे चिखलात लोळले तर हर्बल मड बाथ, आम्ही लोळलो की गटार काय?

रोजचंच झालंय यार. ये सिस्टिम ही साली सडेली आहे. काहीपण होणार नाही ह्या देशाचं. हं दर वर्षी स्वातंत्र्यदिन मात्र सेलेब्रेट करायचा आपण. सेलेब्रेशन्स तर काय चालूच असतात त्यात हे अजून एक सेलेब्रेशन.

सेलेब्रेशन वरून आठवलं. परवा आमच्या कॉल सेंटरमध्ये टार्गेट अचिव्हमेंट चं सेलेब्रेशन होतं. सगळे साले पिऊन टुन. पण एक आहे सालं, प्यायला ना की खोटं खोटं का होईना पण स्वातंत्र्य मिळाल्याचा भास होतो काय? सगळ्या कटकटीपासून मुक्ती. हं, तर तिथे ती सॅम भेटली. सालीचं नाव सीमा आहे पण हिला बोलवायचं सॅम. सॉलिड फटाकडी आहे.

तर मी सांगितलं तसं दारू पिऊन माला स्वतंत्र वाटतच होतं. म्हटलं बघूया स्वातंत्र्याचा काही उपयोग होतोय का तिला जरा खोपाच्यात घ्यायला. साली.. बिलकुल भाव दिला नाही. सतत त्या टकल्याबरोबर फिरत होती. टकल्या म्हणजे आमचा बॉस. यू.एस. ला पाठवतोय तिला ट्रेनिंगला. साली दिवसभर फोनवर कस्टमर्सची चाटते आणि संध्याकाळी बॉसची. पण तेही बरोबरच आहे. मी कितीही प्रयत्न केला तरी काय उपयोग. वो टकल्या गे थोडीना है. पण चांगलं झालं. स्वतंत्र झाली साली थोड्या दिवसांसाठी तरी. आता यू.एस. ला जायचं आणि एखादा गोरा टकल्या शोधायचा म्हणजे पर्मनंटली स्वतंत्र. शेवटी काय स्वातंत्र्य महत्त्वाचं, ह्या देशापासून, ह्या सिस्टिम पासून.

मरूदे. हम तो साला इधरिच सडेगा, पूरी जिंदगी. ते मरूदे. काल नवा नोकिया घेतला. तीस हजारको लिया बाप. पण मॉडेल कसलं आहे. आमचा तो घाट्या आहे ना, तो माला नेहमी म्हणतो की, थोड्या दिवसांनी घे म्हणजे स्वस्त होईल. त्या अनाड्याला कळत नाही, की माणसाने अप टू डेट असायला पाहिजे. नवीन मोबाईल, नवीन आयपॉड, नवीन ऍपल, नवीन ब्लु बेरी, अरे ह्यात जी मजा आहे ती काय चावून चोथा झालेली मॉडेल घेण्यात आहे. आपण नेहमी लेटेस्ट मॉडेल्स वापरतो काय, मोबाईल असो नाहीतर पोरगी.

कसं एकदम स्वतंत्र वाटतं. लहानपणापासून शिकत आलो, काटकसर करावी, जास्त पैसे खर्च करू नयेत. एकदम फ़्रस्ट्रेट व्हायचो यार. बांधल्यासारखं वाटायचं. वाटायचं काय नाकर्तबगार आहेत आपले पालक. शाळेतल्या पोरांचं सगळं नवीन, लेटेस्ट. आपलं सगळं जुनं. म्हणून आता स्वतंत्र वाटतं. आपणही त्या शाळेतल्या पोरांसारखे लेटेस्ट, अप टू डेट झालो असं वाटतं. तुला कळणार नाही यार काय फीलिंग आहे ते. असं समज, तू रात्रभर दारू पितोयस, पेगवर पेग. अप बॉटम्सवर बॉटम्स अप. कसं वाटतं? सगळी ऍग्विश आपल्या पोटात ठासून भरलेय असं वाटतं की नाही. तसं वाटायचं मला लहानपणी. आणि आता? ते सगळं असह्य होऊन भडभडा ओकल्यावर जसं वाटतं ना? तसं वाटतं. स्वतंत्र. मोकळं.

साल्या आज तू नुसती मजा बघ. न्यूज मध्ये भाषणं दाखवतील ना ती बघ. म्हणे तरुण पिढीने ह्यॅव केलं पाहिजे नि त्यॅव केलं पाहिजे. हे साले खादी चड्डी, ह्यांना कोण विचारणार त्यांच्या तरुणपणी त्यांनी काय केलं ते. साले आमच्या बळावर स्वतंत्र झाले स्वतःच्या गरिबीतून. एकेकाचे बंगले बघा. गाड्या बघा. स्वतःचा उत्कर्ष बरोबर साधला हरामखोरांनी. हे काय करत होते देशासाठी त्यांच्या तरुणपणी. काही केलं असतं त्यांनी तर झालो असतो का आपण असे. ह्यांनी केलेल्या बलात्कारातून जन्मलेली आहे आजची परिस्थिती आणि म्हणूनच आम्ही असे आहोत नपुंसक आणि हो स्वतंत्र.

जाऊदे यार. फार हाय लेव्हलचं मराठी बोललो. तुला नाही समजायचं. तुलाच काय कोणी मला ऐकवलं तर मलाही नाही समजायचं. शाळेत असताना पुस्तकं वाचायचो. टिळक, सावरकर, गांधीजी. बाबू गेनूची गोष्ट वाचून डोळ्यात पाणी यायचं. भगतसिंग, राजगुरूची गोष्ट वाचून अंगात स्फुरण चढायचं. वाटायचं आपणंही काही असंच करावं देशासाठी. मग वाटायचं त्यांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं पण आपण?

कॉलेजात मुलींची छेड काढली म्हणून गुंडांना हटकायला गेलो. तिथेच त्यांनी धुतला माला. आणि आंघोळीनंतर पंचा वाळत टाकावा तसा माला कट्ट्यावर टाकून निघून गेले.

पुढेपुढे त्याचीही सवय झाली. आपण षंढ आहोत हे मी स्वीकारलं. मला काय करायचंय? माझ्या बहिणीची तर नाही ना छेड काढली, मग मुझको क्या? ही वृत्ती बळावली. स्वतंत्र आहोत ना आपण? मग आपला एकट्याचा स्वतंत्र विचार करायला मी शिकलो. दुनिया गेली ... . देशभक्ती वगैरे सगळं झूट आहे रे. कसला देश? एकत्र केलेले जमिनीचे तुकडे आहेत हे. म्हणे देश. मी पहिला कोण भारतीय? का हिंदू, मुसलमान, ब्राम्हण आणि महार. पहिली माझी जात, पहिला माझा धर्म आणि मग मी, मग माझा देश. बरोबर आहे, स्वतंत्र आहोत ना आपण.

हे सगळं पहिलं की वाटतं, खरं स्वातंत्र्य मिळेल जेव्हा मी मरेन. ते खरं स्वातंत्र्य असेल. तोपर्यंत दर वर्षी आपण स्वातंत्र्यदिन साजरा करू. काय? फुल टाईट होवून. चिअर्स. तोपर्यंत भारत अधुन मधुन माझा देश आहे. जेव्हा टीम इंडिया क्रिकेट मॅच जिंकते तेव्हा....

---------------------------------------

हे साहित्य पूर्णपणे काल्पनिक असून, लिखाणात व्यक्त केलेली मते ही माझी वैयक्तिक मते नाहीत. काल्पनिक व्यक्तिने केलेले प्रथमपुरुषी निवेदन ह्या स्वरूपातील हे लेखन आहे. इंग्रजी आणि हिंदी वाक्याच्या वापराबद्दल क्षमस्व. वापर अनिवार्य होता असे वाटले.  

---------------------------------------

(काही भाग संपादित : प्रशासक)