लोकल गोष्टी
- लोकल प्रवास
- १. फर्जाना यादव
- ३. नटवर
- २. हातातला खजिना
- ४. माझ्या समोर बसलेली ती;
- ५. आईचा मुलगा हरवला..
- ६. गर्दीतले चेहरे..
- ७. ओळख; पहीली आणि शेवटची.
- ८. मैत्री एक्सप्रेस
- ९. दहशत
- १०. मेलडी
- ११. भिकारी पोट्टा
- १२. लेडीज कंपार्टमेंट आणि पुरुष प्रवासी
- १३. मरणघाई
- १४. नव्या जगात प्रवेश
- १५. बोलपाखरं
- १६. हादरे)
- १७. काही नमुने..
- १८. नावड
- १९. शहाण्या आणि वेड्यांच्यातलं अंतर
- २०. हाता तोंडाची गाठ
- २१. अंधाऱ्या बोळाच्या टोकावर
- २२. पहिली खेप
- २३. संकेत पौर्णिमेचा
- २४. "गॉड ब्लेस यू..! "
- २५. तिखा चटणी मिठा चटणी
- २६. असाही दहशदवाद
- २७. वेगळा-वेगळा
- अच्छा तो हम चलते है..! ( लोकल गोष्टी-२८)
फर्जाना यादव
त्या दिवशी रोजच्या सारखीच मी ऑफिसला निघाले होते तसं फारसं काम नव्हत, शनिवार.. आणि सोनूच्या शाळेला दिवाळीची सुट्टी असल्याने घरीही सगळे जरा सैलावले होते.. त्यामुळे मलाही ऑफिसला जावेसे वाटत नव्हते.. ऑफिसला दांडी मारावी असा विचार सारखा सारखा मनात येत होता.. पण बहादूर (आमचा ड्रायव्हर) दारात येऊन उभा राहिला.. त्यामुळे मग मी ही आळम-टळम न करता गाडीत जाऊन बसले.
रोज सोनू आणि मी आमच्या गाडीने त्याच्या शाळेला जातो.. आणि मग तिथूनच मी ऑफिसला जाते. आता सोनूचा शाळेला सुट्टी असल्यामुळे बहादूर माझ्या दिमतीला आहे.. त्यामुळे बसची वाट न बघता किंवा रिक्षावाल्यांचे नखरे ऐकायला न लागता आज मी थेट स्टेशनला पोहचणार होते.. ( आहा! केवढ सुख)
स्टेशनच्या रस्त्यावर रोजचीच तुफान गर्दी.. त्या गर्दीतून वाट काढत आमची कार हळूहळू कासवाच्या चालीन चालली होती.. खरंतर तेवढ्याच वेळात चालतही स्टेशनवर पोहचता आलं असत पण चालण्या करता फुटपाथ असा उरलाच आहे कुठे? दुकानदार ठेलेवाले यांनी तो केव्हाच बळकावला.. तरी चालणारे त्यातूनही चालतात.. दुकानदारांनी फुटपाथ अडवला.. हे रस्ता अडवतात.. त्यांत मी ही मोडते.. पण आज मात्र अजिबात चालावेसे वाटत नव्हते.. तशी फारशी गडबड नव्हती.. उलट रोज पेक्षा लवकरच निघाले होते त्यामुळे तशीच गाडीत गाणी ऐकत बसून राहिले.. हातात काम नसताना आठ-नऊ तास कॉंप्युटर समोर बसून राहणं म्हणजे अगदी शिक्षाच वाटते.. सर्फिंग चाटींगमध्ये वेळ छान जातो.. पण तेही किती वेळ करणार..! आजच्या दिवसातलं माझं सर्वात मोठ्ठ काम होत ते म्हणजे हजेरी लावणे.. त्यामुळे पावलांना वेग असा येतच नव्हता.. गाडीतून उतरले एक एक करून पायऱ्या चढून-उतरून प्लॅटफॉर्मवर पोहचले. प्रवासाचा एक टप्पा पार झाला.
मी स्टेशनवर पोहचले तेव्हा ९: ३० झाले होते.. इंडिकेटरवर ९: ३२ ची चर्चगेट लोकल लागली होती.. या लोकलला खूपच गर्दी असते.. बोरिवली वरून येतानाच ती अगदी गच्च भरून येते.. इतकी की दारातून आत शिरायलाही जागा नसते.. त्या एकमेकींना धक्के मारत आत घुसणाऱ्या बायका.. ( बाई! बाई! बाई! ) नकोच ती लोकल आणि ही धक्काबुक्की. या लोकल नंतर अंधेरी चर्चगेट लोकल असते. त्यात निदान दारात उभं राहण्यापुरती जागा मिळते.. म्हणून मी त्या लोकलची वाट बघत प्लॅटफॉर्मवर थांबून राहिले.
: ३५ च्या लोकलची आगाऊ सूचना झाली.. एक लोकल रोळांवरून धडधडत येताना दिसली.. मी आणि माझ्या सारख्या इतर बऱ्याचजणी लोकल मध्ये चढायच्या तयारीत उभ्या राहिल्या आणि ते धूड तसंच धडधडत आमच्या स्थानकावर न थांबता पुढे निघून गेलं.. त्या पाठोपाठ रेल्वेचे कर्णे फास्ट लोकल येत असल्याची सूचना देत सावधगिरी बाळगण्याबाबत नेहमीची टेप वाजवू लागले.. ( तो पर्यंत दोन-चार जण सहज यमसदनी जाऊ शकले असते. ) त्या मागे एक लोकल दूरवर ठिपक्यासारखी दिसत होती.. आता येईल.. आता येईल.. करत आम्ही वाट बघत राहिलो.. ९ : ३५ ची लोकल ९ : ४५ झाले तरी आली नव्हती.. आता मात्र मला उशीर होत होता.. ( काम नसलं म्हणून काय झालं वेळेवर पोहचलंच पाहिजे! ) मी तिथल्या तिथे प्लॅटफॉर्मवर येरझाऱ्या घालत फिरू लागले.. लोकल आली ती.. बाराडब्बा.. ( ९ : ३५ ची लोकल नऊ डब्बाच असते.. ) पुन्हा पळापळ.. फक्त नऊ डब्बा लोकलच्या लेडीज कंपार्टमेंट पासून बारा डब्बा लोकलच्या लेडीज कंपार्टमेंट पर्यंत.. पण गर्दीच्या वेळेला लोकल आली असताना ही अडथळ्याची शर्यत पार करणं खरंच कर्म कठीण असत.. त्यात माझं लोकल कडे लक्ष नव्हत त्यामुळे स्टार्ट घ्यायला झालेला उशीर वेगळाच. ( नऊ डब्याची लोकल असो वा बारा डब्यांची लोकल असो लेडीज कंपार्टमेंट एकाच जागेवर येईल एवढी छोटीशी गोष्टही आपलं रेल्वे प्रशासन का करू शकत नाही देव जाणे! ) छ्या..! ही ही लोकल गेली..
बारा डब्बा लोकल पकडण्यासाठी धावत गेलेल्या महिलांपैकी निम्म्या अधिक धापा टाकत परत आल्या.. त्यातल्याच काही नऊ डब्बा आणि बारा डब्बा लोकलचे कंपार्टमेंट येतात त्याच्या मध्यावरच उभ्या राहिल्या.. नंतरची लोकल आलीच ती १० : ०० वाजताची लेडीज स्पेशल.. ही लोकल मला सोडायची नव्हती. तुडुंब भरलेल्या या लोकलच्या फस्ट क्लास मध्ये न चढता जरा पुढे जाऊन मी सेकंड क्लास मध्ये चढले.. ( फस्ट क्लासचा पास असण्याचा आणखीन एक फायदा. ) डब्बा बराच भरला होता.. तरी निवांतपणे उभं राहायला जागा होती. मी दारा जवळ वाऱ्याच्या दिशेने तोंड करून उभी राहिले.. डब्यातून बायकांचा कलकलाट ऐकू येत होता.. तो सेकंड क्लासच्या डब्यात असतोच! त्यामुळे मी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. मी माझी माझ्यातच हरवले होते.. गाडी सुरू होताच चेहऱ्यावर मस्त वारा येऊ लागला.. आणि मी सगळ्या तक्रारी, कुरकुरी विसरून गेले..
सुरू झालेल्या गाडीचा डूकूडूकू ताल.. हवी तशी जागा.. चेहऱ्यावर येणारा वारा.. आहा! हा! माझा मूडचं बदलून गेला.. मी पर्स उघडून माझा मोबाईल पर्समधून बाहेर काढला, आणि हेडफोन लावून फमवर गाणी ऐकू लागले.. तशीच दोन तीन मिनिटं गेली असतील.. डब्यात प्रचंड गोंगाट चालू होता.. आता मला त्या गोंगाटातील वेगळेपणा जाणवू लागला.. हा नेहमीचा बायकांच्या बडबडीचा किंवा बाचाबाचीचा आवाज नव्हता.. त्या आवाजात ( भांडणातले ) फारसे चढ उतार ठसका नव्हता.. बऱ्याचजणी एकदम तिच ती वाक्य परत परत बोलत असाव्यात.. नीट ऐकल्यावर त्यांच्या बोलण्यातले भीतीयुक्त उद्गार माझ्या ध्यानात आले.. मग मात्र मला राहवेना.. मी माझी मोक्याची जागा सोडून डब्यात काय गडबड आहे शोधू लागले..
फस्ट क्लासच्या लेडीज कंपार्टमेंटच्या मनानं सेकंड क्लासचा लेडीज कंपार्टमेंट बराच मोठा असतो.. मी उभी असलेल्या दारापासून चार बाकडी सोडून पुढे पाचव्या बाकड्याजवळ बऱ्याच बायका घेराव करून दाटीवाटीने उभ्या होत्या.. डब्यातल्या इतर जणीही आपापल्या जागेवर उभ्या राहून काय झालंय ते पाहण्याचा प्रयत्न करत होत्या.. काहीतरी नक्कीच झाले होते.. पण नक्की काय? ते अजूनतरी कळत नव्हते.. मी तशीच आणखीन पुढे सरकत राहिले.. तोपर्यंत डब्यातल्या बायकांच्या बोलण्यातून कोणीतरी चक्कर येऊन पडले, एवढं समजल.
ऑक्टोबर महिना.. भर उन्हाची वेळ.. त्यात डब्यातली ही एवढी गर्दी.. या बायका काय काय आवरून घराबाहेर पडतात.. सकाळ पासून काही खाल्लं प्यायलं असेल-नसेल.. त्यात टिपीकल बायकी जुनाट विचार.. दुखणी अंगावर काढण्यातच भूषणं वाटत यांना.. चार डगरींवर नाचण्यासाठी तेवढं बळ नको का अंगात.. मग रोजच रहाटगाडगं ओढता ओढता आणखीन काय होणार.. सोसवली नसेल दगदग बिचारीला!.. या बायकांच पूर्णं दिवसभराच रूटीन दाखवायला पाहिजे बायकांच्या नावाने खडे फोडणाऱ्यांना.. कशा कोणकोणत्या अवस्थेत राबतात बिचाऱ्या.. आणि त्यांच्यासाठी दोन तीन राखीव सिट ठेवल्या तरी पोटशूळ उठतो काहींना..
पानी..! पाणी मारा तोंडावर.. पानी मारो पानी!.. चप्पल सुंगाओ.. अरे किसीके पास निमू शरब है तो देखो.. चॉकलेट दो.. कॅडबरी खिलाओ.. जीला जे काही सुचत होत ते त्या साऱ्यांना सुचवत होत्या.. त्याचाच हा एवढा कलकलाट बनला होता. परत कोणीतरी ओरडली.. पानी मारो पानी..! अब बस्स बहोत हो गया पानी.. त्यातलीच कोणीएक मोठ्यांदा बोलली.. हे अस केव्हापासून चाललं होत कोणजाणे..
असा काही लहान मोठा प्रसंग घडला की त्यातून समाजाची उदासीन मनोवृत्ती दिसून येते. आपल्या पुरते पाहण्याचा कातडी बचावूपण जिथे तिथे बोकाळलाय.. फक्त सरकत राहायचं कणाहीन प्राण्यांसारखं.. तो ही स्वतः हून सरपटतो आपण मागच्याच्या धक्क्यानं पुढे रेटले जातो.. दोन्ही डोळ्यांना झापडे बांधून. तरी वारंवार येणाऱ्या आपत्तींमुळे मूर्च्छित माणुसकीला शुद्ध येऊ लागली आहे! आपल्यावर ही कधी कोणताही प्रसंग येऊ शकतो या जाणीवेनं का होईना दुसऱ्यांना मदत करणारे हात पुढे येऊ लागलेत. हेच वाईटातलं चांगलं..! तसं हे वर्ष फारच वाईट गेलं.. आणि पुढे काय काय पाहव लागणार आहे कोण जाणे!.. कलयुग जगबुडी या गोष्टी खऱ्या वाटू लागल्यात.. जगाचा शेवट जवळ येत चाललाय असच वाटत कधी कधी. असो. जे व्हायचंय ते होणार होतच राहिलं तो पर्यंत प्रत्येकानं वर्तमानाशी समरसून जगायचं ठरवलं तरी बरंच काही साध्य होईल! ( आत्ता जे घडतंय ते महत्त्वाच. )
ए देखोतो ये कैसे कर रही है. होश भी नही आरहा.. कोन है इसके साथ? आह! इसके हाथ तो देखो कितने थंडे पड रहे है.. मसाज करो बदन मे थिडी गर्मी आयेगी.. ( डब्यात मराठी माणस असली तरी ती बोलताना हिंदीतच बोलतील..! )
आत्ता पहिल्यांदा मला ती चक्कर येऊन पडलेली मुलगी दिसली.. चांगल्या घरातली वाटत होती.. वयही फार नसावं.. गळ्यात मंगळसूत्र दिसत होत.. म्हणजे विवाहित होती. आत्ता या क्षणी तिची अवस्था अतिशय वाईट दिसत होती. तिचं नाव ती कुठे चालली आहे हे कोणालाच माहीत नव्हतं.. ( या लोकलची रोजची प्रवासी.. म्हणून फक्त चेहरा ओळखीचा.. ) बिचारी पाण्यातून बाहेर काढलेल्या माशासारखी तडफडत होती.. तिला श्वास घेता येत नव्हता.. अरे किसीको माउथ ब्रिदींग देना आता है.. ( शांतता) तिची ती तडफड बघून मला आमच्या आजींचे शेवटचे क्षण आठवले.. तिला तातडीच्या मदतीची नितांत आवश्यकता होती.. आता वेळ घालवण्यात काहीच अर्थ नव्हता.. डब्यात कोणी डॉक्टर असती तर एव्हाना पुढे आली असती.. पण तशी कोणी नसल्यामुळे त्या मुलीला डब्याबाहेर नेणे जरूरीचे झाले.
माझं लक्ष एकाच वेळी डब्यातली लाल रंगाची चेन.. आणि त्या खालील सुचने कडे गेलं.. (किसीभी प्रकार की दुर्घटना के वक्त ट्रेन रोकने केलिये इस चेन का प्रयोग करे.. समाधान कारक कारणं के न रहते चेन खिचने पर.. चेन खिचने वाले/वाली को रुपये १००० तक जुर्माना तथा एक साल तक कैद होसकती है.. ) लोकलने प्रवास करणाऱ्या प्रत्येकाने आपतकाली ट्रेन रोखण्या विषयीच्या सूचना नक्की वाचल्या असणार... आणि त्या वरून केलेले जोक ही एकले असणार.. ते सगळे जोक मला त्या परीस्थितीत ही आठवून गेले.. ( विशेषतः मी रोज दोन हजार रुपयांची बचत करतो हा. )
लहान मुलं कशी एखादी गोष्ट करू नको म्हणून सांगितलं की तिच गोष्ट मुद्दामहून करून बघतात.. तसं आपल्यात ही एक खोडकर नाठाळ मुलं कायम लपलेलं असत.. आपण फक्त मोठेपणानं दामटून त्याला गप्प बसवतो.. अस काहीस त्यावेळी जाणवलं.. आणि कुणाला असेल नसेल मला मात्र त्या लाल रंगाच्या चेनच नेहमीच आकर्षण वाटत आलं आहे.. आज मी ती चेन ओढणार होते.. शरीरात एकदम वेगळंच काहीतरी सळसळल.. (थरार थरार म्हणतात तो हाच असावा! )
त्या निनावी बेशुद्ध मुलीला मदत मिळवून देण्यासाठी तत्परतेनं दंडाची भीती न बाळगता मी चेन ओढली.. गाडी खार स्टेशन जवळ आली होती.. प्लॉटफॉर्मवर येताच गाडी नेहमी प्रमाणे थांबली.. आम्ही काही जणी त्या मुलीला उचलून घ्यायला पुढे सरसावलो.. ती चांगलीच धष्टपुष्ट होती.. आम्ही पाच-सहा जणीनी मिळून तिला उचललं.. मी पाय पकडले होते.. त्या तेवढ्या वजनाने हातात लचक भरली.. पण आता माघार घेऊन चालणार नव्हत..! डब्यातली गर्दी बेंच आमचा घोळका आणि तिच धूड.. आम्ही कसेबसे दारापर्यंत आलो.. आणि तेवढ्यात ट्रेनने स्टेशन सोडलं.. चेन ओढल्याने ट्रेन थांबली नव्हती.. त्या क्षणी भीतीची लहर अंगभर पसरली.. आत्ता या क्षणी जर आम्ही अर्धवट उतरलो असतो तर..! काय झालं असतं..!! ( बापरे..!!! ) या विचारानंच अजून ही पोटात धडकी भरते.. आम्ही पाच-सहा जणी ती बेशुद्ध मुलगी.. आई गं..! नकोच.. तो विचार.
आम्ही दोघी तिघींनी मिळून परत.. परत चेन ओढली.. ट्रेन काही थांबायचं नाव घेत नव्हती.. आता आम्हाला खुप्च जलद हालचाल करावी लागणार होती आम्ही त्या मुली जवळ परतलो काही जणी अजून ही चेन ओढत होत्या.. वांद्रे स्थानक आलं.. आमच्यातल्या कोणी तरी समोरच्या पुरुषांच्या गर्दीला हाका घातल्या.. (आमचे तिला घेऊन उतरण्याचे प्रयत्न चालूच होते) एक जण काही पुढे येईना.. कोणी तरी एकीनं खाली उतरून समोर बाकड्यावर बसलेल्या दोघांना जवळ जवळ ओढून डब्याकडे आणलं.. मग ते दोघ.. आणि आम्ही पाच-सहा जणीनी मिळून तिला तिच्या सर्व वस्तूंसकट घेऊन डब्यातून खाली उतरलो.. या वेळेला ट्रेन बराच वेळ स्टेशन वर थांबली होती.. ( मगाशी ट्रेन थांबत नाही म्हणून वारंवार चेन ओढणाऱ्या माझी ट्यूब लाइट स्टेशन वर उतरता उतरता फकक्कन पेटली.. खरंच अधेमध्ये ट्रेन थांबली असती तर काय करणार होतो आम्ही..! ( पण मग आग लागते तेव्हा किंवा कोणी ट्रेन मध्ये घुसून लुटालूट करत तेव्हाही ट्रेन अशीच स्टेशन वर जाऊन थांबते का? )) मागे एकदा डब्यात आग लागल्याच्या कारणावरून महिलांनी चालत्या गाडीतून उड्यामारल्याची पेपर मध्ये आलेली बातमी आठवली.. त्या वेळी त्या किती गोंधळल्या असतील याची आत्ता कल्पना येत होती..! चेन सोबत लिहिलेल्या सुचने बरोबर ति चेन ओढल्यावर गाडी कुठे आणि कधी थांबते हे ही नमूद करायला हवे म्हणजे असे गोंधळ उडणार नाहीत. ( आज आम्ही ही मरता ( तिला) मारता वाचलो होतो. )
आम्ही पाच-सहा जणी.. ती बेशुद्ध मुलगी.. तिचे मगाशी काढलेले स्पोर्ट शूज.. सॅक.. पाण्याची बाटली.. सगळे व्यवस्थित प्लॅटफॉर्मवर उतरलो.. (हुश्श ) समोरच्या बाकड्यावरील माणसांना उठवलं.. ती मुलगी अजूनही बेशुद्ध अवस्थेतच होती.. तिला बेंचवर नीट आडवं करतो न करतो तोपर्यंत आमच्या भोवती ही एवढी बघ्यांची गर्दी जमली.. परत एकदा सूचनांचा प्रश्नांचा भडिमार.. पानी मारो.. शक्कर दो.. हवा छोडो.. मालीश करो.. पुलीसको बुलाओ.. काय आणि किती.. तीच शरीर मध्येच आचके देत असल्या प्रमाणे उसळत होत.. तिला खरंच मदतीची गरज होती.. आणि ही नुसती गर्दी.. त्या क्षणी बघ्यांचा अतिशय राग आला.. त्याच रागाच्या भरात मी गर्दीला दूर हुसकावून लावण्यात यशस्वी झाले.. आमच्यात जरी वीरश्री संचारली असली तरी आत्ता पर्यंत आम्हाला आमच्या ताकदीचा अंदाज आला होता.. आमच्यातल्या दोघींनी ट्रेन सुटता सुटता मोहिमेतून माघार घेतली.. आता आम्ही तिघी उरलो.. अजून तरी कुठेच पोलीस दिसत नव्हते.. (? ) (ही अशी सुरक्षा).. मी तशीच पळत ब्रिज पर्यंत गेले.. समोरून चार हवालदारांचा जथा येताना दिसला.. त्यांना बरोबर घेऊन मी परत तिच्या जवळ पोहचले.. ( चला आता तिला नक्की मदत मिळेल ) तिथे आमच्या तिघींमधील एकीला ऑफिस गाठण्याची अत्यंत घाई झाली होती.. ( असेल काही ) तीन मी येताच मोठ्या कष्टानं आमचा निरोप घेतला.. आता उरलो आम्ही दोघी ती आणि पोलीस..
मी पोलिसांसोबत ती आणि माझ्या मदतनीस सहप्रवाशांपर्यंत पोहचे पर्यंत त्यांनी त्या मुलीच्या सॅक मधला तिचा नोकिया कंपनीचा सुरेख हॅंड सेट बाहेर काढला होता.. पण बॅटरी चार्ज नसल्यामुळे तोही तिच्या सारखाच असून नसल्यासारखा.. पोलिसांनी रेल्वेचा स्टेचर मागवला.. ( या स्टेचर वरून कोणाकोणाला कशा अवस्थेत हालवलं गेलं असेल..! ) आणि तिला आधी प्लाटफॉर्मवरच्या पोलीस चौकीत हालवलं.. ( खरंतर हॉस्पिटलालाच नेणं जरूरीच होतं.. ) केबीन मधला एककुलता एक टेबल फॅन बाहेर आणून लावला.. परत चेहऱ्यावर पाणी मारलं.. इथे बघ्यांची गर्दी नव्हती.. पुरेशी मोकळी हवा मिळू शकत होती.. आता तिला जरा बरं वाटायला लागलं असावं.. अजून तरी ती पूर्णं शुद्धीत आली नव्हती.. मध्येच डोळ्यांची किंचित हालचाल करायची ती तेवढीच.. परत एकदा सूचनांची फैर झडली.. तिच्यात अजून डोळे उघडण्याचंही त्राण नव्हत.. पण ( देवाची कृपाच )तिला आमचं बोलणं ऐकू येऊ लागलं.. आम्ही तिचा एखादा शब्द ऐकायला अगदी आतूर झालो होतो.. तिच्या ओठांची जराशी हालचाल आमच्यासाठी केवढी दिलास्याची होती म्हणून सांगू..! तिला चमच्यानं थेंब थेंब पाणी पाजलं.. बाजूच्या स्टॉलवरून साखर आणून चिमूटभर साखर तिच्या तोंडात सारली.. ती अजून ही शुद्धीत नसल्यामुळं.. आम्हाला याहून जास्त काही करायला भीती वाटत होती.. पोलीस कोणत्याही प्रकारचा पुढाकार न घेता कुठेतरी गायब झाले.. एक महीला पोलीस आमच्या सोबतीला चौकीत पाठवली गेली.. आता आम्हालाच पुढच्या गोष्टी करणे भाग होते.. आणि नक्की काय करावे तेच कळत नव्हते.. तिच नाव काय? तिला असा त्रास नेहमी होतो का? तिचा कोणी डॉक्टर आहे का? पोलीस काहीच का करत नाहीत? किती प्रश्न.. (गोंधळात गोंधळ)
आम्हाला तिचे नाव तिच्या घरच्या किंवा ओळखीच्या कोणाचातरी नंबर मिळणे आवश्यक होते.. आम्ही दोघीच तिला उचलून डॉक्टर पर्यंत नेऊ शकत नव्हतो.. आम्हाला पोलिसांची स्टेचरची आवश्यकता होती.. आणि इथे कोणीच नव्हते.. चौकीच्या राखवाली साठी बसलेली महीला पोलीसही अतिशय उदासीन होतो.. मी त्या महीला पोलिसाशी हुज्जत घालायला सुरुवात केली तिला हॉस्पिटल कडे न्यायला हवे आहे याची पुन्हा.. पुन्हा जाणीव करून दिली.. तेव्हा आणखीन एक शिपाई उगवला.. त्याने आम्हाला कसलासा फॉर्म भरायला सांगितला.. आणि रेल्वे पोलिसांची मदत हवी असेल तर तिला फक्त भाभा हॉस्पिटलाला नेण्यात येईल ही अतिरिक्त माहिती दिली.. तेवढ्यात माझ्या सहप्रवासी महिलेने त्या मुलीच्या सॅक मधून मनी पर्स बाहेर काढली त्यात दोन तीन कार्ड होती.. मी तिच्या जवळ गेले.. त्या कार्ड पैकी या मुलीचे कार्ड कोणते..? काहीच अंदाज लागेना.. तेवढ्यात आम्हा दोघींना एकदमच आणखीन एक कल्पना सुचली.. आम्ही तिच्या मोबाईलचे सिम कार्ड काढून आमच्या मोबाईल मध्ये घातले.. ती नाही पण तिचा फोन शुद्धीवर आला..
फोनच्या लिस्टमध्ये आम्ही होम किंवा ऑफिस शोधू लागलो.. होम टायटल असलेला एक नंबर मिळाला.. ( केवढा मोठ्ठाशोध... होता तो तेव्हा ) नंबर डायल केला.. रिंग वाजू लागली.. रिंग वाजत राहिली.. एकदा.. दोनदा.. तीनदा.. त्या घरात फोन उचलण्यासाठी कोणीच नव्हत..! आता जरा वैताग यायला लागला होता.. तिला पोलिसांच्या हाती सोपवून निघून जावं अस वाटू लागलं.. आणि तिच्या कडे बघून पायही निघेना..! ती अगदीच असाहाय्य होती.. बिचारी!.. आम्ही परत एकदा तिला जाग करण्याचा प्रयत्न केला.. पाणी मारलं.. तिला तिच नाव विचारत राहिलो.. मोठ्या मुष्किलीने तिनं ओठ हालवले.. फ... आम्ही कानात प्राण एकवटून तिच्या जवळ गेलो.. फर्जाना.. तिच नाव "फर्जाना" होत..!
फर्जाना आम्हाला ऐकू शकत होती.. एखादा शब्द का होईना बोलू शकत होती.. तिचा श्वास बराच स्थिरावला होता.. ती मगाच पेक्षा खूपच हुशारल्यासारखी दिसत होती.. त्यामुळे आमच्याही जिवात जीव आला.. आमचा उत्साह दुणावला.. काही वेळा पूर्वीचा वैताग निराशा कुठच्या कुठे पळून गेली.. आता आम्ही फर्जानाला आणखीन बोलत कराचा प्रयत्न करू लागलो.. आम्हाला तिच्या कडून एक फक्त अजून एक छोटंसं सहकार्य हवं होत.. तिच्या मिस्टरांचा नंबर.. तो इथे फक्त तिलाच माहीत होता.. आम्ही नंबर विचारू लागलो.. ती परत निर्विकार... आमचं बोलणं तिच्यापर्यंत पोहचणं खूप खूप आवश्यक होत.. ( अगदी दोन मिनिटं पण एक.. बोल.. डोळे उघड ) आम्ही मनातल्या मनात देवाचा आणि तोंडाने फर्जानाचा धावा करू लागलो.. आणि फर्जाना पावली.. तिनी परत एकदा डोळ्यांची हालचाल केली.. तिच्यात नंबर सांगण्या एवढं त्राण नव्हतं.. आम्ही मोबाईल धरून तिला डायल करायला सांगितलं.. खूप धीमे.. बऱ्याच कष्टांनी तिनं एक नंबर लावला..
आम्ही आमच्या परीनं तिला मदत करायला पाहत होतो.. फर्जाना अजूनही ग्लानीतच होती.. मगाशी पाहिलेल्या एका कार्डावर फर्जाना यादव हे नाव पाहिल्याच आठवलं.. आणि तेच पूर्णं नाव घेऊन मी फोन वर बोलू लागले.. ( क्या आप फर्जाना यादव को जानते है.. ) समोरून होकारार्थी उत्तर आलं.. (हुर्रे) आम्ही निम्मी मोहीम जिंकली.. (ये कहाँ का नंबर है..? आप उन्हे किस रिश्तेसे जानती है..? ) तो तिच्या ऑफिसचा नंबर होता.. समोरून बोलणारी व्यक्ती तिच्या ऑफिसची रिसेप्शनिस्ट होती.. ते एका मोबाईल कंपनीच ब्रांच ऑफिस होत.. मी त्या रिसेप्शनिस्टला फर्जानाची सद्य स्थिती सांगितली.. आणि तिच्या एखाद्या फ्रेंडला किंवा तिच्या वरिष्ठांना फोन जोडून देण्याची विनंती केली.. (जे तिची योग्या माहिती देतील किंवा पुढची जवाबदारी घेऊ शकतील.. )
पलीकडे कोणतं तरी गाणं वाजू लागलं.. गाण्याचे बोल माझ्या डोक्यात शिरत नव्हते.. मी कधी एकदा ते गाणं संपतंय आणि समोरून कोणी बोलतंय याची अस्वस्थपणे वाट पाहू लागले.. गाणं थांबलं.. हॅलो..! पलीकडून एका महिलेचा नाजूक आवाज कानावर आला.. ( आता तिच मला फर्जाना बद्दल माहिती देऊ शकेल.. या विचाराने मी तिला एकामागून एक प्रश्न विचारत गेले.. हॅलो!.. आपण फर्जानाच्या कोण?.. पलीकडे तिची बॉस बोलत होती.. हॅलो!.. हॅलो!... मी अत्ता बांद्रा स्टेशनवरून बोलती आहे.. फर्जाना आमच्या सोबत ट्रेन मध्ये होती.. तिला एकदम भोवळ येऊन ती डब्यात पडली.. अजूनही पूर्णंपणे शुद्धीवर येत नाहीये.. तिला असा काही आजार आहे का?.. तुम्ही तिला कधीपासून ओळखता?.. तिच्या मिस्टरांचा नंबर मिळू शकेल का?.. वगैरे.. वगैरे.. मी एवढी जीव तोडून बोलत होते.. अणी समोरून अगदी थंड प्रतिसाद.. विचारलेल्या प्रश्नांची जेवढ्यास तेवढी उत्तरे देऊन तिने फोन रिसेप्शनवर परत ट्रांस्फर केला.. ( परत एकदा निराशा पदरी पडली. )
फर्जाना गेली तीन वर्ष या कंपनीत याच बॉसच्या हाताखाली काम करत होती.. ती कोणतीही मेडिकल हिस्ट्री नसलेली एक सुदृड मुलगी असल्याच तिच्या बॉसनं मला सांगितलं.. फर्जानाचे मिस्टर "नितीन यादव" हे देखिल त्याच कंपनीच्या स्टाफ पैकी एक होते.. ते त्या कंपनीच्या अंधेरी ब्रांचला असल्याच फर्जानाच्या बॉस कडून कळलं.. त्यांचा ( फर्जानाच्या मिस्टरांचा ) नंबर मला रिसेप्शन मध्ये मिळेल सांगून त्यांनी फोन रिसेप्शनकडे फिरवला.. या रिसेप्शनिस्ट कडूनच मला फर्जानाच्या बॉसच म्हणजे रीमा पारसकरच नाव कळलं.. आणि काही उलट सुलटं माहितीही समजली ज्यामुळे मी आणखीन गोंधळून गेले.. तरी या रिसेप्शनिस्ट कडून नितीन यादवांचा नंबर मिळाल्या मुळे तिचे आभार मानून फोन कट केला.. आता फक्त आणखीन एक फोन करायचा होता.. ( मग आम्ही मोकळ्या होणार होतो.. )
इतक्यात आतापर्यंत अनुपस्तीत असलेले.. स्टेशन मास्तर कुठुनसे प्रकटले.. परत एकदा प्रश्नोत्तरांची.. सूचनांची टेप वाजली गेली.. आतापर्यंत तऱ्हेतऱ्हेच्या वस्तूंचे नजराणे नाकारलेल्या फर्जानाला.. स्टेशन मास्तरांनी थंडा घेण्यास सुचवले.. त्याला बाईसाहेबांनी अनुकूल प्रतिसाद दिला.. मगाशी आमच्या सेवेत रुजू झालेल्या पोलीस शिपायानं बाजूच्या स्टॉलवरून थंडा आणून पेश करण्याचा हुकूम झाला.. ( हल्ली लिंबू सरबत पेक्षा थंडाच जास्त चालतो.. ) परत एकदा स्टेशन मास्तरांचा मोहरा आम्हा दोघींकडे वळला.. " हॉ अब मुझे बताओ इनकी तबियत पहिलेसे बेहत्तर है.. या बिगड गयी है.. "( आम्ही परत टेप रिव्हाईंड करून वाजवली.. ) अच्छा!.. इनके साथ कोई है?.. ( आम्हीच ) नही!.. लेकीनं अभीअभी इनके मिस्टर का नंबर मिला है.. तो ठीकं है.. आप बात करो.. मै यही बाजू मे हू.. (चला.. हे एक बरं झालं )
शिपाया करवी मागवलेला थंडा फर्जाना प्यायली.. चला.. हे ही नसे थोडके.. (कोणाच्या आरवण्याने का होईना पण उजाडूदे!.. )म्हणून मी पुढचा फोन करायला घेतला.. दोन तीनदा रिंग देऊनही कोणी फोन उचलेना.. तो पर्यंत आमची सहप्रवाशी माझी मदतनीस.. ऍना फर्जानाला आणखीन बोलत करू पाहत होती.
फोन लागला! हॅलो!.. पालीकडून आवाज आला.. फर्जानाच्या मि. ना फर्जानाला आलेली चक्कर.. तिच बेशुद्ध होणं.. आचके देणं.. आम्ही केलेला उद्योग.. सगळं सविस्तार पणे सांगितलं.. तिची तब्बेत आता सुधारत असल्याच ही कानावर घातलं.. गेला तासभर ती बेशुद्ध होती.. अजून अर्ध ग्लानीत असून तिच्या जवळ ते लवकरात लवकर कधी पोहचू शकतील म्हणून विचारणा केली.. तर कसलं काय! हे महाशय थंड.. कोणती चलबिचल नाही.. काळजी नाही.. (असला कसला हा नवरा! ) सगळ्यांना झालंय तरी काय?.. कोणालाच कशाची पर्वा नाही!.. ( आणि आम्हीच का वेड्यासारख्या अडकून पडलोय.. ) स्वतःचाच खूप राग यायला लागला.. पण करता काय? आता घेतलेली कामगिरी पूर्णं करायलाच हवी होती.
फर्जाना थोराड असली तरी वयानं लहान वाटत होती.. लग्नाला फार दिवस झाले नसावेत.. ही फर्जाना ते नीतीन.. चक्क आंतरधर्मीय विवाह.. प्रेम विवाहच असावा!.. इतक्यात आटलं प्रेम.. आपला समाज अजून एवढा पुढारलेला नाही की अशी लग्न ठरवून व्हावीत.. ठरवून फार पुढची गोष्ट.. दोघांच्या घरनं संमती मिळणंही मुष्कीलच.. आधीच कोड बनलेल्या फर्जानाच्या भोवती आणखीन काही प्रश्नांचं रिंगण उभं राहिलं.. तिच्या मिस्टरांनी चक्क ते स्टेशनवर येऊ शकत नाहीत म्हणून सांगितलं. काय पाहिलं या मुलीनं त्यात कोण जाणे!.. आम्ही फर्जानाला तिच्या ऑफिसकडे पोहचत कराव अस मि. यादव यांच म्हणन होत..
मि. यादवनी सांगितल्या प्रमाणे आम्ही फर्जानाच्या ऑफिसमधून फोन येण्याची वाट बघत थांबलो.. ते तिच्या ऑफिसशी संपर्क करून कोणाला तरी तिच्या मदतीस पाठवण्याची व्यवस्था करणार होते.. किती तरी वेळ लोटला कोणाचाच फोन आला नाही.. त्यामुळे आता परत एकदा आम्हालाच फर्जानाच्या ऑफिसशी संपर्क साधणे भाग होते.. ( काय करता.. अडला हरी!.. ) आणखीन जराशी वाट पाहून आम्ही परत एकदा फर्जानाच्या ऑफिसचा नंबर फिरवला.. फोन मागच्या वेळी उचललेल्याच रिसेप्शनिस्टने उचलला.. झाला प्रकार तिला माहीतच होता.. यावेळी ऍना तिच्याशी बोलत होती.. तिने मागच्या कथितात सध्य स्तितीची भर घालून फोन फर्जानाच्या बॉसला जोडून द्यायला सांगितला.. मॅडम कामात खूपच व्यस्त होत्या.. त्यामुळे ऍनाला बराच वेळ गाणं ऐकत राहव लागलं.. बऱ्याच वेळांनी मॅडम लाइनवर आल्या.. फर्जानाच्या मिस्टरांचा फोन त्यांना पोहचला असावा.. यावेळी त्या जरा आस्थेनं बोलत होत्या.. मुख्य म्हणजे ऑफिसची काही माणसे पाठवायला राजी झाल्या.. फर्जानाचे मिस्टरच आले असते तर फार बरं झालं असत.. ( तिलाही बरं वाटलं असतं! ) ज्याच माणूस त्याच्या हाती सोपवून आम्हाला निश्चिंत होता आलं असतं!.. ( नाही तर नाही ) जो येईल तो माणूस नीट असावा.. एवढीच आशा आम्ही करू शकत होतो..
जस जसा वेळ जाऊ लागला तस तशी माझी अस्वस्थता वाढू लागली.. आम्ही चुकत तर नाही आहोत ना!.. फर्जाना आता पहिल्या पेक्षा खुपच स्वस्थ असली तरी.. तिला डॉक्टरी उपचारांची गरज होतीच.. आणि त्यात ही दिरंगाई!.. न्याव का तिला भाभा हॉस्पिटललाच?.. उगाच उपचारांना उशीर नको व्हायला... या विचाराशी आम्ही येईपर्यंत एक जण आमच्या दिशेन येताना दिसला.. त्याचे कपडे बोलणे एकूणच आवतारावरून आम्ही आणखीन साशंक झालो.. तो बहूतेक चपराशी असावा.. फर्जानाला त्याच्या हवाली करण काही मनाला पटेना.. तसाही तो एकटा तिला घेऊन जाऊ शकलाच नसता.. आम्ही त्याला भाभा हॉस्पिटलला जाण्याविशयी सुचवलं.. पण त्याला तशा सुचना न्हव्हत्या.. आणि स्वतःचा निर्णय घेण्याचा आधीकर इच्छा दोन्ही च्या नावाने ठणठणाट.. त्यावर त्यानं आणखीन पुड्या सोडायला सुरवात केली..
तो फर्जानाला तिच्या नेहमीच्या डॉक्टरकडे घेऊन जातो म्हणू लागला.. त्याच्या म्हणण्या प्रमाणे तिला असा त्रास वारंवार होत होता.. जे आम्हाला आतापर्यंत कळलेल्या माहीतीच्या अगदी विरुद्ध होत.. मगाशी जरा शुद्धीत असताना फर्जानानेही आपणाला असला कोणताच त्रास नसल्याच सांगितलं होत.. आणि हा बाताड्या एकावर एक थापा मारत सुटला होता.. कस सोडायच तिला अशा थापाड्या बरोबर.. आम्ही परत आडकलो.
एवढ्या वेळात आमची मनही फर्जानात गुंतली होतीच..! परत एकदा फोनाफोनी झाली.. परत एकदा वाट पाहण आलं.. प्रतीक्षेचा काळ गेला.. फर्जानाच्या मॅडम बांद्रा स्टेशनला पोहचल्याचा फोन आला.. आम्ही पोलीस चौकीतच होतो.. तिथे फर्जानाचा आणखीन एक सहकारी आला( मि. शबीर ).. तो जरा बरा वाटत होता.. बरोबर मॅडम ही असणार होत्या फर्जाना त्यांबरोबर जाऊ देण्यास आमची काहीच हरकत नव्हती.. फक्त तिला आणि दवाखान्यात नेल जाव एवढीच इच्छा आम्ही बोलून दाखवली.. पण तोही हुकूमाचा ताबेदार होता.
शेवटी बऱ्याच समजा-समजविनंतर सगळ्या तांत्रिक अडथळ्यांना पार करत.. मी. शबीरनी पोलिस स्टेशन मध्ये ते त्यांच्या जवाबदारीवर फर्जानाला घेऊन जात आहेत असे लिहून दिल्यावर.. फर्जाना.. फर्जानाला स्ट्रेचरवर घेतलेले दोन कुली.. एक हवालदार.. आम्ही दोघी.. आणि तिचे दोन सहकारी अश्या आम्हा आठ जणांची वरात बांद्रा वेस्टला रवाना झाली.. स्टेशन बाहेर एका मारुती कार मध्ये फर्जानाची बॉस बसली होती.. हे काम पुर्ण झाले असे मला वाटू लागले..!
पण मारूतीची शेपटी संपता संपेना.. आमची मदतनीस ऍना.. आता हट्टून बसली. फर्जानाला भाभालाच घेऊन जाव.. असा तिचा हट्ट होता.. ती या कोणावरही विश्वास ठेवायला तयार नव्हती.. मि. नितीनच न येणं.. ऑफिसमधल्या लोकांची टाळाटाळ.. तिला खुपच खटकली होती.. तिने स्वतः त्यांच्या बरोबर जायचे ठरवले.. व मलाही साथ देण्यासाठी आग्रह करू लागली.. परत एकदा आम्ही बघ्यांच्या घेरावत अडकलो.. खरंतर आता असं अडून राहण काही कामाच नव्हतं.. फर्जानासोबत तिला ओळखणारी माणसं होती.. ती तिची योग्य ती काळजी घेतीलच नाही का..! आता मला आणखीन पुढे जाण्यात स्वरस्य नव्हतं.. इतका वेळ धाऊन धाऊन आता मलाच गरगरायला लागल होत. आणखीन थांबले तर कोणालातरी मलाच पोहचवायला लागेल अस वाटून मी ऍनाला सोबत करण्यास नकार दिला.. माझी ताकद संपली होती. फर्जानाच्या सगळ्या वस्तू तिच्या सहकाऱ्यांकडे सोपवून मी स्टेशनच्या दिशेने चालू लागले.
स्टेशन प्लॅटफॉर्म आपल्या नेहमीच्या गतीत मग्न होते.. जणू काहीच झालं नव्हतं.. खरच तर आहे..! तस फार विषेश अस काहीच झालं नव्हतं.. मी तीन नंबर प्लॅटफॉर्मवर लेडीज फस्ट क्लासच्या दिशेन चालू लागले.. मगाचच्याच स्टॉलवर लेमनएड घेऊन प्यायले.. खरच खूप फ्रेश वाटलं बरोबर कोणाच्यातरी उपयोगी पडल्याच समाधानही होतं..
मला घरातून निघून दोन तास उलटून गेले होते.. ऑफिसला पोहचायला कमीत कमी आणखीन अर्धा तास लागणार होता.. फर्जानाचे पुढे काय झाले असेल.. हा विचार मनात रेंगाळत होता.. ती नीट असावी अशी मी मनोमन प्रर्थना केली.. योग असेल तर असेच कधीतरी गर्दीत वाहत वाहत पुन्हा भेटूच.. कदाचीत फर्जाना मला ओळखू शकणार नाही. पण मी मात्र फर्जानाला कधीच विसरू शकणार नाही.. यापुढे जेव्हा केव्हा ट्रेनची चेन बघेन तेव्हा तेव्हा मला फर्जाना दिसणार होती..
आज मला ती खरच दिसली.. पलीकडच्या डब्यात बसलेली.. मी आनंदान नकळत हात हलवला.. ती मला ओळखत नव्हती.. तरी तिच अस दिसणं मला एक दिवस सार्थकी लागल्याच समाधान देऊन गेलं.. ते कायमसाठी!
================================================ स्वाती फडणीस................. २००७