तिखा चटणी मिठा चटणी ( लोकल गोष्टी -२५)

तिखा चटणी मिठा चटणी
================

अगदी कालचीच गोष्ट.. ऑफिस नंतर नेहमीच्याच वेळेला मी घरी चालले होते. अंधेरी लोकल मिळाल्यामुळे डब्यात फारशी गर्दीही नव्हती दोनच भाग असलेल्या डब्याच्या एका बाजूस पाच-सहा मुली/बायका बसल्या होत्या आणि दुसऱ्या भागात दोन-तीन मुली बसल्या होत्या.. मी आणि माझ्यासारख्या आणखीन दोघी तिघी दाराशी उभ्या होतो.. गाडीच्या वेगामुळे छानसं वारं येत होतं. माहीमची खाडी ओलांडताना जरा नकोसं झालं पण आता त्याला काही इलाज नाही करून जरा वेळ नाकावर रुमाल दाबून धरला.. बांद्रा स्थानकात पोहचता पोहचता नाकातले केस जाळणाऱ्या त्या वासापासून सुटका झाली.. बांद्रा स्टेशनवरच्या पाट्या बघता बघता घरा जवळ आल्यासारखं वाटून गेलं.

बांद्रा स्टेशनवर गाडी थांबली दोन-तीन मुली उतरल्या एक-दोन चढल्या.. एक भिकाऱ्यासारखा दिसणारा दहा-बारा वर्षांचा लहान मुलगा हातात ब्रेडचे स्लाइस घेऊन चढला. त्याला कोणी आडवालं नाही उतर म्हणून बोललं नाही.. त्याने गाडी अंधेरी जायेगी ना.. म्हणून विचारलेल्या प्रश्नाला नीट उत्तर देण्यात आलं. मग तो सरळ एका बाजूच्या भागात सीटवर जाऊन बसला.. आणि स्टेशन वरील स्टॉलवाल्या कडून त्याने मिळवलेले ब्रेडचे स्लाइस खाऊ लागला.. सगळं कसं ठीक चाललं होतं.

ब्रेडचे कोरडे तुकडे तो अगदी मन लावून खात होता.. मग खाता खाता तो काही काही गुणगुणायला लागला.. तो खूश असावा असं मला वाटलं. एक एका घासा सरशी त्याच्या त्या गुणगुणण्याचा आवाज वाढत गेला आणि मग तो बोलत होता ते शब्द स्पष्टपणे ऐकू येऊ लागले.. " तिखा चटणी मिठा चटणी .. तिखा चटणी मिठा चटणी "

ब्रेडचे कोरडे तुकडे तो अगदी मन लावून खात होता.. मग खाता खाता तो काही काही गुणगुणायला लागला.. एक एका घासा सरशी त्याच्या त्या गुणगुणण्याचा आवाज वाढत गेला आणि मग तो बोलत होता ते शब्द स्पष्टपणे ऐकू येऊ लागले.. " तिखा चटणी मिठा चटणी.. तिखा चटणी मिठा चटणी " करत त्याचा आवाज कर्कश होत गेला.. (त्या मुलाला ब्रेडचे स्लाइस देऊ करणाऱ्याने त्याला चटणी दिली नव्हती. )

काही घास पोटात गेल्यावर त्याला आणखीन जोर चढला आणि मग हातात ब्रेडचे अर्धवट खाल्लेले तुकडे घेऊन आपल्या त्या द्विपदीच्या तालावर तो डब्यात वाकडे तिकडे हातवारे करत उड्यामारत नाचायला लागला.. या भागातून त्या भागात मधल्या मोकळ्या जागेत माझ्या समोरच्या लोखंडी खांबालाही एक दोनदा झुलून गेला.. तेव्हा मात्र मी त्याला हटकलं. दुसऱ्या दाराकडे जायला सांगितलं.. त्यावर शब्द प्रतिशब्द त्याचा युक्तिवाद ( पोरगा खूपच चुणचुणीत होता ) उद्धटपणा (या सगळ्या मध्ये देखील वेळ काढून तो त्याच गाणं गातच होता.. वेडा म्हणावा तर छान डोकं वापरून बोलत होता. ) करत शेवटी तो खार स्टेशनवर उतरून गेला आणि मला बरं वाटलं.

तो आनंदात होता / चिडलेला / दुखी होता की आणखीन काही ते मात्र अजूनही कळू शकल नाही.

====================
स्वाती फडणीस.............. ०९०४१०