बोलपाखरं ( लोकल गोष्टी-१५ )

.
.

ट्रेनमधल्या गदारोळात खरं तर आपण आपला आवाजच हरवून जातो.. अगदी शेजारी उभ्या असलेल्या मैत्रिणीशी देखील घसा फाडूनच बोलावं लागतं. मग तिचं एखाद्या दिवशी दूर उभी असेल तर.. खाणा-खुणांची बोली सुरू होते.. काही खुणा समजतात काही समजून घेतल्या जातात.. तर काही उगाच हसून सोडून द्याव्या लागतात.. आपण अशा न समजलेल्या खाणा-खुणा सहज सोडून देतो.. कारण आपल्याला शब्द उच्चारता येतात.. आवाजांनी बोली भाषेत संवाद साधून आपले विचार भावना व्यक्त करता येतात.. पण खाणाखुणांची बोलीच ज्यांच्या जीवनाचा  अनिवार्य भाग त्या काय करत असतील नाही!... हाताच्या बोटांनी बोललेला प्रत्येक शब्द प्रत्येक संवाद त्या पूर्णपणे एकमेकींपर्यंत पोहचवू शकत असतील का..? त्यांची एकमेकांना समजून घेण्याची शमता आपल्या कैक पट जास्त असेल नाही..! आणि मजेशीर ही.. ( एखादा मुकपट पाहिल्यासारख किंवा कठपुतलीचा खेळ बघताना जसं वाटतं ना, अगदी तसंच या बाहूल्यांना बघून वाटतं ) अशी एखादी बोलकी भावली दिसली की लागलीच असे काहीबाही विचार मनात येऊन जातात.. आणि आवाजाच्या ( ऐकण्या बोलण्याच्या ) कमतरतेवर मात करणाऱ्या त्या हालत्या डुलत्या बोलिकांच खूप खूप कौतुक वाटतं.. आणि त्याच वेळी कुठेतरी आपला आपल्यातल्या कमतरतेचा राग ही येतो.. समोरच्याच म्हणणं ऐकून घ्येण्यासाठी कान लाभले असताना आपण किती वेळा समोरच्याला समजून घेतो.. आपले विचार.. आपल्या शंका.. आपल्या भावना पोहचवण्यासाठी लाभलेल्या वाकदेणगीचा आपण खरंच कितीसा उपयोग करून घेतो.. आणि त्या पुढे या बोलिका!

मी कॉलेजमध्ये असताना अशाच काही बोलक्या पाखरांचा थवा आमच्या कंपार्टमेंटमध्ये असायचा. अगदी तुमच्या माझ्यासारख्याच.. कोणत्याही शाळकरी मुलींप्रमाणे आनंदी खेळकर उत्साहाने सळसळणाऱ्या एकमेकींच्या गळ्यात गळे घालणाऱ्या मुली फक्त त्या एका मुकबधीर शाळेच्या विद्यार्थिनी होत्या. निळा पिनोफ्रॉक आणि लाल पांढऱ्या रंगाच्या बारीक चौकटी असलेला टॉप, लाल रिबीनींची फुलं बांधलेल्या वेण्या, निळे कॅनव्हासचे बूट आणि पाठीला आडकवलेली भली मोठ्ठी दप्तरं असा ( कोणत्याही शाळेचा असतो तसा ) त्या मुलींचा युनिफॉर्म  आणि त्यांची ती लयदार बोली त्यांना सगळ्यांपासून वेगळं करायची.. माझ्यासमोरच्या या मुली इतर मुलींसारख्या चिवचिवत नव्हत्या.. टाळ्या हास्याचे फवारे आणि उत्साहाने भरलेला आवाज तो तेवढा बंद टीव्हीवर एखादा धमाल कार्यक्रम चालू असावा आणि कोणीतरी व्हॅल्युम म्युट करून ठेवला असावा असं काहीसं.. हो पण तो फक्त आपल्यासाठी. त्या अगदी मन मोकळेपणाने संवाद साधत होत्या.. कमी असेल तर ती पाहणाऱ्यांच्या नजरेत.. असा खट्याळ भाव (आत्मविश्वास) त्यांच्या डोळ्यात चमकत होता..

लोकलच्या या डब्याला त्यांच्यापेक्षा आम्हीच अनोळखी होतो.. आणि आम्हाला पूर्णं डबा.. जीवनाच्या गाडीन नुकताच ट्रक बदलला होता.. मागे पडणारी झाडं.. जुनी ओळखीची स्थानकं.. सगळं सुटत चाललेलं.. नवा मार्ग.. नवं कुतूहल.. नवी धास्ती.. नवा संघर्ष.. नवा वेग.. एक एक गोष्ट अंगवळणी पडत जाताना ओळखीची होताना अशीच कधीतरी त्या बोलपाखरांशीही ओळख झाली.. शब्दांची खुणांशी तोंडओळख वाढू लागली.. निर्मळ मन, नाविन्याचं कुतूहल, अमाप उत्साह आणि काय लागतं मैत्री जुळायला..! अगदी भाषाही नाही लागत.

मी कॉलेजमध्ये असताना अशाच काही बोलक्या पाखरांचा थवा आमच्या कंपार्टमेंटमध्ये असायचा. अगदी तुमच्या माझ्यासारख्याच.. कोणत्याही शाळकरी मुलींप्रमाणे आनंदी खेळकर उत्साहाने सळसळणाऱ्या एकमेकींच्या गळ्यात गळे घालणाऱ्या मुली फक्त त्या एका मुकबधीर शाळेच्या विद्यार्थिनी होत्या. निळा पिनोफ्रॉक आणि लाल पांढऱ्या रंगाच्या बारीक चौकटी असलेला टॉप, लाल रिबीनींची फुलं बांधलेल्या वेण्या, निळे कॅनव्हासचे बूट आणि पाठीला आडकवलेली भली मोठ्ठी दप्तरं असा ( कोणत्याही शाळेचा असतो तसा ) त्या मुलींचा युनिफॉर्म  आणि त्यांची ती लयदार बोली त्यांना सगळ्यांपासून वेगळं करायची.. माझ्यासमोरच्या या मुली इतर मुलींसारख्या चिवचिवत नव्हत्या.. टाळ्या हास्याचे फवारे आणि उत्साहाने भरलेला आवाज तो तेवढा बंद टीव्हीवर एखादा धमाल कार्यक्रम चालू असावा आणि कोणीतरी व्हॅल्युम म्युट करून ठेवला असावा असं काहीसं.. हो पण तो फक्त आपल्यासाठी. त्या अगदी मन मोकळेपणाने संवाद साधत होत्या.. कमी असेल तर ती पाहणाऱ्यांच्या नजरेत.. असा खट्याळ भाव (आत्मविश्वास) त्यांच्या डोळ्यात चमकत होता..

लोकलच्या या डब्याला त्यांच्यापेक्षा आम्हीच अनोळखी होतो.. आणि आम्हाला पूर्णं डबा.. जीवनाच्या गाडीन नुकताच ट्रक बदलला होता.. मागे पडणारी झाडं.. जुनी ओळखीची स्थानकं.. सगळं सुटत चाललेलं.. नवा मार्ग.. नवं कुतूहल.. नवी धास्ती.. नवा संघर्ष.. नवा वेग.. एक एक गोष्ट अंगवळणी पडत जाताना ओळखीची होताना अशीच कधीतरी त्या बोलपाखरांशीही ओळख झाली.. शब्दांची खुणांशी तोंडओळख वाढू लागली.. निर्मळ मन, नाविन्याचं कुतूहल, अमाप उत्साह आणि काय लागतं मैत्री जुळायला..! अगदी भाषाही नाही लागत.

काही दिवसातच आम्ही एकमेकींच्या परिचयाच्या झालो.. त्या पुढे मैत्रिणी.. आणि मग विद्यार्थिनी.. त्या बोलपाखरांकडून आम्ही हळूहळू त्यांची बोली शिकू लागलो.. आधी अक्षर मग शब्द आणि त्यानंतर वाक्य.. अशी रोजच्या रोज आमची शिकवणी चालू झाली.. आम्ही देखिल एक एक अल्फाबेट बोटांवर नाचवू लागलो.. बोलपाखरांशी बोटांनी बोबडा संवाद साधू लागलो.. त्यांची आधीची ती शांतता नजरेने वाचू लागलो.. त्याचबरोबर आम्ही आमच्या विश्वात ही रुळत होतो.. गुंतत होतो.. आमच्या आमच्या विश्वातल्या ओळखी दृढ होत होत्या.. आणि त्याचबरोबर त्या अगम्य हातवाऱ्यामधलं आमचं कुतूहल धीमे-धीमे ओसरत होतं.  

आम्ही आता परत एकदा सहप्रवासी झालो.. फक्त सहप्रवासी.. आपापल्या विश्वात गर्क असणारे प्रवासी.. येता जाता दूरूनच ओळख दाखवणारे.. कधी एक दोन वाक्यात खुशहाली विचारणारे.. खुशहालीच हं!.. (प्रवासी सहसा कोणाला त्यांची दुख विचारायला जात नाहीत. ) त्यांची ती बोली आता आम्हाला तितकीशी अपरिचित राहिली नव्हती.. तरी तोंडानं उच्चारांनी बोलू शकणाऱ्या आमचं बोटांच्या बोली वाचून काहीच अडत नव्हतं.. ती बोली आमचा अविभाज्य भाग बनली नव्हती बनणार नव्हती.. कारण उच्चार भाषा.. लेखा भाषा.. आणि चित्र भाषा.. अशी इतर तीन प्रबळ साधन आमच्या पाशी आम्हाला व्यक्त होण्यासाठी होती.. त्यातल्या चित्र भाषेचे धडे रेखण्यात आम्ही पूर्णं पणे रंगून गेलो.

याचा अर्थ आमच्या या मैत्रिणींशी जुळलेले संवाद धागे जीर्ण झाले असा मुळीच नाही..   या बोलक्या भावल्यांच्या जीवनातली वेदना,   त्यांची दुःखं,   अडचणी,   त्यांना घ्यावे लागणारे अतिरिक्त कष्ट याची जाणीव झालीच नाही असही नाही..   त्यांचं त्यांना सगळ्यांपासून वेगळं करणार एका कोपऱ्यातलं वेगळेपणच तर आम्हाला त्यांच्यापर्यंत घेऊन गेलं होत..   हो पण तेव्हा त्या सदा आनंदी प्रफुल्ल चेहऱ्यांवर बोटांबरोबर नाचणाऱ्या हर्षित डोळ्यात दुखरी रेघ कधी दिसलीच नाही..   आजही कधीही आठवल्या की त्या तशाच आठवतात..   हसऱ्या..   नाचऱ्या..   बोलक्या..   पऱ्या..  

त्यांना मी बोलपाखरं म्हणते ते तेवढ्याचसाठी..!   त्यांचे सतत हालणारे हात मला फुलपाखरांच्या पंखासारखेच वाटायचे..   फुलपाखरांना कोणी चंचल म्हणून हिणवतं..   कोणी त्यांच्यात निव्वळ तारुण्य बघतं..   कोणी त्यांच्या अभिरुची संपन्नतेला भुलतं..   कोणाला त्यांचं नाजूक अंग दिसतं..   कोणाला आनंद..   कोणाला वेदना..   फुलपाखराची वेदना..!   दीर्घ काळ अंधाऱ्या कोशात राहिल्याची..   प्रकाशाला पारखं झाल्याची वेदना..   आणि त्यांनी त्यावर केलेली मात..   माझ्या या सख्या त्या फुलपाखरांसारख्याच तर होत्या आवाजापासून पूर्णंपणे तोडल्या गेलेल्या..   आणि त्यांची ती नाचरी बोटं त्यांचे हात त्यांनचे डोळे म्हणजेच त्यांचे पंख आणि त्या हालचालींतलं चापल्य हा त्यांनी कमावलेला आनंद..!  

अजूनही कोणी हातवारे करत बोलू लागलं की माझ्या नजरेसमोर ती बोलपाखरं भिरभिरू लागतात..   पण आता त्यात फक्त आनंद-रंग नसतो..   तेव्हा न जाणवलेल्या, न समजलेल्या त्यांच्या पंखातली ठुसठुस पुढे हळूहळू वाढत गेली..   माझ्या डोळ्यांना बोलपाखरं निरखण्याची सवयच लागली..   कधीही कुठेही गेलं तरी ही बोलपाखरं माझ्या नजरेस पडायचीच.

तेव्हाच कधीतरी "संजीव कुमार" आणि "जया भादूरी" (बच्चन) यांचा "कोशिश" नावाचा चित्रपट पाहण्यात आला.. आणि त्या नाचऱ्या पंखांमधली वेदना अधिक अधिक उमगत गेली.. बोटांनी बोलणारे हे आपल्या सारखेच जीव आपल्यात किती बाजूला पडले जातात ते कळलं.. त्यांच्या अधुरेपणामुळं त्यांच्या जीवनात घडू शकणारे उत्पाद समजले.. त्यांचा जीवन संघर्ष..    थोडाफार कळला. थोडाफारच..! कारण या प्रत्येकाची एक वेगळी कहाणी असेल.. वेग वेगळी संकट असतील.. जी एकट्या कोशिश मधून सांगता समजता येण्यासारखी नव्हतीच. त्याचबरोबर कोशिशने काही अगदी हेवा करावेत असे सुखद क्षण ही पोहोचवले.. भर रस्त्यात त्यांचं खुलेआम भांडणं.. मनोगत व्यक्त करणं आणि तरी ते फक्त त्यांचं त्यांच्यापुरतं राहणं..    त्यांच्या स्पेसची एक सुखद छटा.. पूर्णं पिक्चर कायमचा मनावर ठसला.. त्यात संजीव कुमारचं जया भादुरीच्या आईला आपलं स्वतःच नाव सांगणं.. इतका साधा प्रसंग.. हरीचरण फक्त एक शब्द, एक नाव सांगायला त्याला घ्यावी लागलेली मेहनत, कसरती पाहिल्या की त्यांच्या दैनंदिन जीवनातलं दैन्य मनभर तडतडत जातं. ( शेवटी तो हिरवी मिर्ची तिच्या आईच्या चरणांवर ठेवतो आणि त्यावरून तिने बांधलेल्या अनेक अंदाजातला एक अंदाज बरोबर निघतो.. ) आपल्याला हे अशा प्रकारे बोलावं लागलं तर.. या विचारानीच अंगावर काटा येतो.. ही कोशिशची करामत.. सुख-दु:ख.. वेदनेचं जिवंत चित्रण..

बघता बघता वर्ष सरलं.. मी फर्स्ट क्लासचा डबा सोडून सेकंड क्लासच्या डब्यातून प्रवास करू लागले.. मी चढायचे बांद्र्याला आणि उतरायचे व्हीटीला, त्यामुळे चढता उतरताना धक्काबुक्की होण्याचा प्रश्नच नव्हता.. मधेअधे पास संपला असताना कधीतरी मैत्रिणीसाठी तिच्याबरोबर असा दोन-तीनदा सेकंड क्लासने प्रवास करून झालेला.. लोकल ट्रेनच्या फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लास मध्ये तिकिटाच्या रकमे व्यतिरिक्त काही खास फरक नसतो हे लक्षात आले.. त्यात लेडीज फस्टक्लासचा डबा बऱ्याचदा अस्वच्छ असे.. मग जनरल कंपार्टमेंटमध्ये जावं लागायचं.. त्यापेक्षा लेडीज सेकंड क्लासनंच जावं असा विचार मनात आला.. आम्हाला विद्यार्थी म्हणून पासच्या रकमेत बरीच सूट होती.. तरी फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लासच्या पासच्या रकमेतही बराच फरक होता.. माझे बरेच पैसे वाचणार होते.. आमचा अभ्यासक्रम जरा खर्चीकच वर्षाच्या सुरवातीला एकदा पुस्तकं घेऊन न भागणारा.. रंग, ब्रश, पेपर्स.. टूल्स.. आणि काय काय.. दर दोन-तीन दिवसांनी काहीतरी नवीन लागणार.. आणि बाबा देत असलेली ठराविक रक्कम याचा कुठेच ताळमेळ बसत नव्हता.. त्यामुळे पुढे चारही वर्ष मी सेकंड क्लासनेच प्रवास केला.. तेव्हा फर्स्ट क्लासचा पास काढणं हा वेडेपणा वाटायचा..   मी फर्स्ट क्लासचा डबा सोडून सेकंड क्लासने ये-जा करू लागल्यापासून बोलपाखरांचा तो थवा मला कायमचा दुरावला.. पण त्यांचे बोल, त्यांचा लळा.. जिव्हाळा.. कायम बरोबरच राहणार होता..

फर्स्ट क्लासचा डबा सोडून मी सेकंड क्लासच्या डब्याने प्रवास करू लागले.. गेल्या वर्षभर ज्या सख्यांसोबत येता-जाताना वेळ कापरासारखा उडून जायचा त्या सगळ्या सख्या फर्स्ट क्लासच्या डब्यात आणि त्यांच्यातली मी एकटी इकडे.. सुरवातीला खूप चुकल्या चुकल्यासारखं वाटायचं.. इथेही मला मैत्रिणी होत्या.. आणि माझ्या सख्या बाकी दिवसभर कॉलेजमध्ये भेटतातच करून मीच माझी समजूत काढली आणि गर्दीत हरवायचा प्रयत्न करू लागले.. गर्दी माला तिच्यात मिसळून घेत होती.. मी आता याच गर्दीची होत होते.. सेकंड क्लासचा डबा कधीच शांत नसतो.. तिथं अविरत काहींना काही घडत असतच. मी गर्दीशी मैत्री करत गेले आणि गर्दी माझी झाली.. आता माझ्यासाठी काही चेहऱ्यांवर स्मित उमटत होतं.. कुणी कधी हात हालवून ओळख सांगत होत.. कोणी हाक घालून जवळ बोलवत होत.. इथे चेहरेही भरपूर.. सगळ्यांशी नजर ओळख असणं ही मुष्कील.. अशाच एका गर्दीतल्या दिवशी मला ती चिमुरडी दिसली.. निळा पिनो-फ्रॉक आणि लाल पांढऱ्या रंगाच्या बारीक चौकटी असलेला टॉप, लाल रिबीनींची फुलं बांधलेल्या वेण्या, निळे कॅनव्हासचे बूट आणि पाठीला अडकवलेलं भली मोठ्ठ दप्तर.. छोटंसं बोलपाखरू!.. तिला पाहून माझा चेहरा आनंदाने फुलला.. जणू त्या डब्यातली ती पाखरं पुन्हा भेटली.. आणि मग त्या दिवसापासून मला ती रोज दिसू लागली..

स्टेशनवर पोहचले की माझे डोळे आपसुकच तिचा शोध घ्यायला लागायचे..   डब्यात चढताना ती नीट चढतेय ना..! याच्या कडे लक्ष असायचे.. तशी ती छोटी बरीच धिटुकली होती.. मी तिच्यापेक्षा इतकी मोठी असूनही मला गर्दी धक्का-बुक्की यांची जरा भीतीच वाटायची.. मी नेहमीच गर्दीत घुसणं टाळायचे.. तसं हे ट्रेनचं पहिलंच स्टेशन असल्यामुळे ट्रेन खरंतर  भरलेली नसायचीच तरी या बायका एवढी चेंगराचेंगरी का करतात याचं मला कायम आश्चर्य वाटायचं..   चढणाऱ्यांची हमरी-तुमरी संपली गर्दी शांत झाली की मग मी डब्यात चढायचे.. आणि त्याचवेळी ही धिटुकली केव्हाचीच पुढे घुसून तिच्यासाठी आणि तिच्या आईसाठी खिडकीतली जागा पटकावून तिची वाट बघत असायची.. गर्दी ओसरताना माझ्यापुढे मागेच कधीतरी तिची आई कडेवरच्या पिटुकल्या बाळाला घेऊन डब्यात चढायची.. तेव्हाचे त्या धिटुकलीचे डोळे अगदी बघत राहावे असे. (अंहं.. ) ऐकत राहावे इतके बोलके असायचे..! आई वरच प्रेम.. तिने गाजवलेलं शौर्य.. आणि या दोन्हीचा तिच्या निर्मळ निरागस मनाला झालेला आनंद.. आणि काय काय तिचे पिटुकले डोळे माझ्या कान झालेल्या नजरेशी बोलत राहायचे.

काळ्या सावळ्या रंगाची ही धिटुकली  पिटुकली.. अंगाने अगदी लहानखुरी होती. तिच्या छोट्याश्या गोल चेहऱ्यावर तसंच छोटंसं नकटं नाक.. अबोलीच्या पाकळ्यांसारखी नाजूक जिवणी.. मुलायम रेशमी केसांचा पुढे फ्लिक्स असलेला बॉबकट आणि त्या महिरपीतून विशेष उठून दिसणारे तिचे काळे भोर टपोरे बोलके डोळे.. अबोलीची जाई जुई करून टाकायचे.. तिच्या बोटांमध्ये अजून त्या बाहुल्यांसारखी सफाई आली नव्हती.. तसं काही दिवस गमती गमतीत घेतलेलं माझं ज्ञान सुद्धा अगाधाचं होतं.. दोन ग्रहांवरच्या लोकांसारख्या आम्ही दोघी ओठ फाकवत.. बोटं मोडत.. कधी तरी  दूरूनच बोलायला लागलो.. माझ्या मनात साठलेलं कौतुक तिच्याही नजरेनं  ऐकलं असावं.

तिचं खरं नाव काय होतं ते माहीत नाही..   पण तिची आई तिला मोना म्हणून हाक मारायची (का? ) मी ही मगाशी तिला अबोली म्हणालेच की..!   हो..   पण मोना अबोल नक्कीच नव्हती.   तिच्या शब्दांना वंचित असलेल्या ओठांनी..   सगळ्यांशी हसायची..   आणि डोळ्यांच्या भाषेत बोलायची..   मोना वयानं ६-७ वर्षांची म्हणजे पाहिली दुसरीत शिकणारी असावी.   मोना बांद्रा इस्टला खेरवाडीत टाटा वसाहतीत राहायची..   तिची आई मोडक्या तोडक्या बंबय्या हिंदीत अखंड अघळ-पघळ बडबडत असायची..   तिच्या हातातलं बाळ अविरत चुळबूळ करून तिला हैराण करायचं..   त्या दोघां समवेत असलेली मोनात्यांच्या समोर फार बिच्चारी वाटायची..   अगदी सिंड्रेलाच्या गोष्टीतल्या सावत्र बहिणी आणि सावत्रआई सोबत राहणाऱ्या सुस्वभावी..   समजूतदार..   सोशिक सिंड्रेलाच.  

पण नाही..   ती नक्कीच मोनाची सावत्रआई नव्हती.   ती तशी असती तर टाटा वसाहतीत राहणारी मोना इतक्या लांब डॉकयार्डला कधीच शाळेत गेली नसती..   ज्या वस्तीत धडधाकटांनाही अक्षर ओळख नसते अशा वस्तीतली बाई आणि तिची मुकी बहिरी मुलगी..   कशी शिकू शकली असती?   मोना इतक्या लांब रोज शाळेत जात होती तिची अम्मा कुरकुरतं का होईना पण तिला शाळेत घेऊन जात होती..   हे काय कमी आहे..  

पण तिच्या त्या लहानग्या वयाला बहरण्यासाठी याहून थोड्या जास्त आधाराची गरज होती.. ती, तिची अशिक्षित, दरिद्री  आई आणि आईच्या ओढणीशी अविरत झोंबणारा तो चळवळ्या मुलगा मला रोज दिसत होते. रोज तेच सारं.. त्या सगळ्या दिवसांमध्ये एकदाही त्या बाईंनी आपल्या भुकेल्या मुलाला पाजलं नाही.. तो तसाच झोंबत राहायचा.. ती त्याला आवरत राहायची. ( की ती मुलाला पाजून घराबाहेर पडायची ) खरं तर या अशा बायकांना तशी अंगावर पाजणं-बिजण्याची लाज वाटत नाही.. आणि असलीच लाज वाटत तर निदान दुधाची बाटली तरी सोबत ठेवायची.. पण तेही नाही, तो मुलगा भुकेनं चाळवलेला.. त्याची हैराण झालेली आई.. आणि या सगळ्यात एकटी पडलेली मोना. खरं तर ती तिच्या आईची ही एवढी नाममात्र सोबतही पुरवून घ्यायची. तिच्या आईला हे कळतच नसेल का..? तिचं आपलं स्वतःचंच रडगाणं सुरू असायचं लोकांना तिची दया वाटावी असं काहीसं तिला वाटत असावं. तिच्याकडे बघणाऱ्या प्रत्येकाकडे ती तसेच काहीसे लाचार, अगतिक भाव आणून सहानुभूती मागत राहायची. कोणी लक्ष दिलं नाही की, "बेटा, तू अकेली स्कूल जायेगी..? " म्हणून विचारून विचारून आपल्याच मुलीला घाबरवून सोडायची.. तेव्हाचे त्या लहानग्या मुलीच्या चेहऱ्यावरचे ते असाहाय्य एकटेपण त्या आईला दिसायचं की नाही..? फार फार तर आणखीन एक दोन वर्षच तिला ही ने आण करावी लागणार होती. त्या नंतर मोना न घाबरता आईशिवाय शाळेत गेलीच असती. ( ती तितकी धीट नक्कीच होती. ) पण तिच्या आईला मात्र तेवढाही धीर नव्हता. ती आपली तरीही, "मै उतर जाऊ..? " करून विचारत त्या चिमुरडीचा मानसिक छळ करायची.

ते सर्व पाहून अस्वस्थ होत  मी फक्त त्या बोलपाखराच्या पंखात लवकरात लवकर बळ येऊन तिला तिचे आकाश सापडावं म्हणून मनोमन प्रार्थना करत राहायचे. (तेव्हा डोळ्यांसमोर फर्स्ट क्लासमधला तो हसऱ्या नाचऱ्या पाखरांचा थवा असायचा. )

========================================
स्वाती फडणीस....................................................................... २००४