लोकल गोष्टी
- लोकल प्रवास
- १. फर्जाना यादव
- ३. नटवर
- २. हातातला खजिना
- ४. माझ्या समोर बसलेली ती;
- ५. आईचा मुलगा हरवला..
- ६. गर्दीतले चेहरे..
- ७. ओळख; पहीली आणि शेवटची.
- ८. मैत्री एक्सप्रेस
- ९. दहशत
- १०. मेलडी
- ११. भिकारी पोट्टा
- १२. लेडीज कंपार्टमेंट आणि पुरुष प्रवासी
- १३. मरणघाई
- १४. नव्या जगात प्रवेश
- १५. बोलपाखरं
- १६. हादरे)
- १७. काही नमुने..
- १८. नावड
- १९. शहाण्या आणि वेड्यांच्यातलं अंतर
- २०. हाता तोंडाची गाठ
- २१. अंधाऱ्या बोळाच्या टोकावर
- २२. पहिली खेप
- २३. संकेत पौर्णिमेचा
- २४. "गॉड ब्लेस यू..! "
- २५. तिखा चटणी मिठा चटणी
- २६. असाही दहशदवाद
- २७. वेगळा-वेगळा
- अच्छा तो हम चलते है..! ( लोकल गोष्टी-२८)
आईचा मुलगा हरवला..
=============
ऑर्कुटवरील 'काव्यांजली' या कवितासंबंधित फोरमचा ठाण्यात दुपारी चार वाजता काव्य वाचनाचा कार्यक्रम होता.. नाव चेहरे नसलेले लोक साक्षात एकमेकांसमोर अवतरणार होते.. यातले काही आधीच्या कार्यक्रमांमुळे जमणाऱ्यांच्या माहितीतले.. मी मात्र पहिल्यांदाच जात होते.. किंबहुधा काव्यवाचन ऐकायला आणि करायलाही पहिल्यांदाच जात होते.. त्यातून कार्यक्रम ठाण्याला जिकडे माझे सहसा जाणे होत नाही. त्यामुळे एक वेगळीच अस्वस्थता हुरहूर कम भीती मनाला घेरून होती. वेळेवर पोहचता यावं म्हणून घरातून मी दीड-पावणेदोन तास आधीच निघाले.. स्टॉपवर पोहचल्यापोहचल्या बस पुढ्यात आली त्यात चढून दहा-पंधरा मिनिटांतच कुर्ला स्टेशनला पोहचले. कुर्ला स्टेशनवरच्या गर्दीतून वाट काढत काढत.. तिकीट काढण्यासाठी गेले तर तिथे ही भली मोठी रांग त्या रांगेतून मुंगीच्या गतीने पुढे सरकत सरकत तिकीट मिळायला अर्धा तास लागला.. तिथेच खिडकीतील माणसाला ठाण्याला जाण्यासाठी किती नंबरच्या प्लॅटफॉर्म वर टेन मिळेल विचारून घेतलं. आणि प्लॅटफॉर्म क्रमांक तीनच्या दिशेने चालू लागले, प्लॅटफॉर्म सापडला.. आता लेडीज डबा कुठे येतो याचा शोध घेत नजर आजूबाजूला फिरवली.. हिरव्या पिवळ्या रंगाच्या पट्ट्या एका खांबावर मारलेल्या दिसल्या.. प्रवासाचा एक टप्पा पार पडला. आता ट्रेन आली की चढायचं.. आणि ठाणे आलं की उतरायचं आणि रिक्षा घेऊन दिलेल्या पत्त्यावर पोहचायचं एवढंच बाकी होतं.
दूर वरून ट्रेन येताना दिसली.. मी ती ठाण्यावरूनच जाणार असल्याची खात्री करून घेतली.. रविवारची दुपार असूनही प्लॅटफॉर्मवर माणसांचा अगदी बुजबुजाट झाला होता.. ट्रेन सोडण्याला, पुढच्या ट्रेनची वाट बघण्याला काहीच अर्थ नव्हता. लोकल ट्रेनचा सेकंड क्लासचा डबासमोर येऊन थांबला आणि चढणाऱ्या बायका मुलांची झुंबड उडली.. आज मी फस्ट क्लासकडेही जाऊ शकणार नव्हते.. त्यामुळे जराशी पुढे सरकले.. आणि गर्दीने मला डब्यात चढवलं.
गर्दीने माझा पुरता ताबा घेतला होता.. गर्दी नेईल तिकडे जायचं थांबवेल तिथे उभं राहायचं एवढंच माझ्या हातात होतं.. डोळ्यांसमोर कोणाकोणाचे हात, केस झुलत होते.. अशा अवस्थेत एक दोन स्टेशनं गेली आणि चढणाऱ्या उतरणाऱ्यांच्या रेटारेटीत मी पार्टिशनच्या बाजूला ढकलले गेले. इतकंच नाही तर धक्का-बुक्कीपासून बाजूला उभं राहण्या इतकी जागा ही मिळाली.
मी पहिल्यांदाच कविता वाचन करणार होते.. कधी नव्हे ते निवडलेल्या कवितांसाठी आदल्या दिवशी झोपता-झोपता प्रस्तावना लिहिल्या होत्या.. त्या किमान एकदा डोळ्याखालून घालाव्यात म्हणून मी बॅग मधली लहानशी फाइल बाहेर काढली.. आणि स्वतःच स्वतःला कविता व त्यांच्या प्रस्तावना ऐकवू लागले.. माझ्या कविता लहान असतात म्हणून एका कवितेसाठी एक मिनिट असा हिशोब करून मी साधारण पाच कविता वाचाव्यात असे मला सुचवण्यात आले होते.. तशा मी पाच कविता प्रस्तावनांसकट एकत्रित केल्या होत्या.. कोणती कविता आधी वाचायची कोणती नंतर कोणती शेवटी अशी क्रमवारीही केली होती.. व त्या पाच कवितांशिवाय आणखी चार-पाच माझ्या मलाच आवडणाऱ्या कविताही सोबत घेतल्या होत्या.. कुर्ला ते ठाणा या प्रवासात करण्यासाठी तेवढे पुरेसे होते.. आणि आवश्यकही.. त्यामुळे मी माझ्या हातातल्या कागदांमध्ये बुडून गेले. प्रस्तावना आणि कविता वाचता वाचता तो तो प्रसंग डोळ्यासमोर चित्रित होत होता..
खुणावते तुला दिशा
तेजस गोमटी,
नजरेत किरणे तुझ्या
राजस कोवळी.
घे निजून घे पाखरा
अंधार हा गर्भरेशमी,
का टोचती तुला चांदण्या
कापूस पिंजल्या बिछानी..?
घे पांघरून रे दुलई
मऊ उबदार मायेची,
घे उशाला तुझ्या
अढळ चांदणी गगनीची.
उजळता दिशा दिशा
घेशील उंच भरारी,
क्षितिज पुढे पुढे तुझ्या
धाव दीर्घ रिंगणी.
साठवून घे पंखांत
जिद्द आकाश तोलण्याची,
घे निजून घे पाखरा
अंधार हा गर्भरेशमी.
कवितेतले शब्द.. आणि त्यांतलं भावविश्व आज मला समोर बसलेल्या रसिक श्रोत्यांपर्यंत पोहचवायचं होतं.
तसं माझं सगळं लिखाण माझ्या आणि माझ्या छोट्याश्या जगाभोवतीच फिरतं.. त्यामुळे ते उलगडून सांगणं बिलकूल अवघड नव्हतं.. आणि तितकंच सोपंही नव्हतं..! खरं तर आपण इतरांबद्दल त्यांच्या बाबतीत घडलेल्या घटनांबद्दल खूप सहजतेने बोलू शकतो.. तितक्या सहजतेने.. त्रयस्थपणे आपल्याला आपल्याबद्दल बोलता येत नाही.. त्यामुळे कविता खूप आपलीशी वाटते..! अगदी जवळच्या मैत्रिणी सारखी, ती अशा बऱ्याच गोष्टी नकळत बोलवून घेते, आणि बोलताना कसलाच संकोच जाणवत नाही. आपण आपल्याशीच बोलल्या इतक्या सहजतेने भाव शब्दात उतरत जातात.. आणि तसंही मी माझ्यासाठीच तर लिहिते. त्यामुळे असेल, अजून कवितेला वृत्त, मात्रांच्या चौकटीत बसवायला जात नाही.. त्यानं तिच्या माझ्यातला मोकळेपणा निघून जाईल अस वाटतं.
त्याच काय झालं मध्ये माझ्या मुलाला झोपेत खूप स्वप्न पडत होती त्यामुळे तो मध्येच घाबरून उठायचा, अंग आक्रसून घ्यायचा, रडायचा, आणि काय झालं विचारलं की डास चावला म्हणून सांगायचा.. त्याला नक्की कशाची भीती वाटत होती ते काही कळले नाही. तो डासांना घाबरत मात्र होता.. अशाच एका रात्री तो सारखा सारखा उठत होता आणि तीन-चारच्या सुमारास "सकाळ झाली, आपण उठूया" म्हणत उठूनच बसला.. तेव्हा त्याला समजावून झोपवता-झोपवता जुळलेली ही कविता. तो झोपेत घाबरत असल्यामुळे तेव्हा माझी झोप इतकी सावध झाली होती.. की त्याची हलकीशी हालचालही मला झोपेत जाणवायची. माझंच कशाला प्रत्येकच आईच आपल्या मुलाकडे तितकंच बारीक लक्ष असतं, नाही..?
आपलं मन कधी कुठून कुठे पोहचेल काही सांगता येत नाही.. त्याला ना ट्रेनची गरज ना बस रिक्षाची जरूर.. आता मात्र पुढची कविता वाचायची होती.. त्या आधी कोणतं स्टेशन आहे बघण्यासाठी फाइलमधून डोकं वर काढलं.. तो पर्यंत ट्रेन मधली गर्दी जरा कमी झाली होती. मला समोर बसलेल्या बायका दिसत होत्या. सगळं काही नेहमी सारखंच तेच ते बायकांचे घोळके, त्यांच्या गप्पा, मांड्यांवर किंवा चिकटून बसलेली मुलं.. एक मध्येच बसलेली तिशी-पस्तिशीची बाई तेवढी जरा अस्वस्थ दिसत होती.. तिच्या डाव्या-उजव्या बाजूला बसलेल्या प्रत्येक बाईकडे ती वाकून वाकून बघत होती आणि अधिक अधिकच अस्वस्थ होत होती. त्याच बरोबर कोपऱ्यात खिडकीजवळ बसलेल्या तीन-चार वर्षाच्या लहानग्याकडेही तिचे वारंवार लक्ष जात होते. इतके की माझे कविता वाचण्यात मन लागेना.. आणि मी फाइल ठेवून तिच्याकडे बघू लागले.
तिच्या नजरेचा मागोवा घेत माझे डोळे तिच्या नजरेच्या जोडीने फिरू लागले.. या खिडकी पासून त्या खिडकीपर्यंत.. जाऊन तिच्याचसारखे त्या छोट्याजवळ जाऊन स्थिरावले.. पोरगं भारी गोड होत. गव्हाळ उजळ कांती, गोबरे गाल, मोठं किंचित बाक असलेलं कपाळ, त्यावर भुरभुरणारे मऊ रेशमासारखे मुलायम केस, तांबूस ठसठशीत ओठ.. आणि बाहेर निरखून बघणारे टपोरे डोळे. अंगात लाल रंगाचा फुलशर्ट, गडद चॉकलेटी रंगाची जीन्स त्यावर त्याच रंगाच उठावदार जाकीट घातलेला हा मुलगा शांतपणे आपल्या जागेवर बसून होता.
इतका शांत की त्याचे अस्तित्वही जाणवू नये.. जाचण्याच तर प्रश्नच नव्हता.. एवढा लहान मुलगा.. त्यात शांत आणि नीटनेटका त्याच्याकडे बघून बघून कोणी इतका अस्वस्थ का व्हावं..? त्याच्या शेजारी बसलेल्या बायका तर निवांत दिसत होत्या.. मग या बाईंना इतक्या दुरून अस काय दिसलं.. ज्यानं त्यांचा जीव खालीवर होऊन जावा..? काही कळेना..
थोड्याच वेळात त्या बाईची अस्वस्थता शिगेला पोहचली.. आणि न राहून तिने शेजारी डुलक्या घेणाऱ्या बाईंना ढोसून जाग केलं.. आणि काही तरी विचारलं.. असं काही की त्या बाईची झोप जादूमंतर केल्यासारखी छू झाली.. आणि त्याच बरोबर या बाईंनाही अस्वस्थतेची लागण झाली.. मग तिने तिच्या बडबड्या शेजारणीच्या गप्पांमध्ये व्यत्यय आणून तिला काही तरी प्रश्न केला.. असा की क्षणभर तिची बोलतीच बंद झाली.. तिनी समोरच्या दोघी तिघींकडे संशयानं बघून घेतलं.. एक तर तिच्या ओळखीचीच होती.. काय झालं कोण जाणे पण चारी जणींच्या माना एकसाथ डावी-उजवीकडे वळू लागल्या.. आणि मला पहिल्यांदाच एक शब्द ऐकू आला.. नाही नाही.. बस इतकंच.. आणि त्या चौघीही अस्वस्थ झाल्या.. इकडे त्या मध्ये बसलेल्या बाईंनी तिच्या दुसऱ्या बाजूला बसलेल्या बायकांना अस्वस्थ कारण सुरूच ठेवलं होतं.. मग तो खेळच सुरू झाला.. प्रत्येकीने तिच्या शेजारी बसलेल्या बाईला काहीतरी विचारायचं, दुसरीने-पहिलीला 'नाही' म्हणून सांगायचं नंतर दोघींनी आश्चर्य चकित होऊन खेळ पुढे चालू ठेवायचा.. असे एक दोन राउंड झाले असतील.. दारा जवळच्या दोन सिट मधल्या खबदाडात बसलेली, उभी असलेली प्रत्येक बाई आता वळून वळून त्या लहानग्या कडे बघत होती. आणि तो त्याच्या जगात निवांत होता.. त्याला न त्याच्या कडे बघणाऱ्या बायकांची खबर होती न त्यांना अस्वस्थ करून सोडणाऱ्या प्रश्नाची जाणीव. तो त्याच्या आधीच्याच एकाग्रतेने बाहेर दिसणारे दृश्य बघण्यात गुंग होता.
आतापर्यंत हलक्या आवाजात चाललेल्या या खुसफुशीचा स्वर हळूहळू उंचावत गेला.. आणि "हा तुमचा मुलगा आहे का..? " या प्रश्नाची जागा "कुणाचा मुलगा हरवला आहे का? " या आरोळी नि घेतली.. आणि सगळ्यांच्या अस्वस्थतेच कारण माझ्या पर्यंत पोहचलं. तो तीन-चार वर्षांचा लहान मुलगा तिथे एकटाच बसला होता.. त्याच्या सोबत कोणीही नव्हत.
डब्यात सर्वत्र अस्वस्थतेची साथ पसरत होती.. आरोळ्या वाढत होत्या. प्रत्येकीने तिच्या आजूबाजूला बसलेल्यांना हा प्रश्न विचारावा मग त्यांनी त्यांच्या आजूबाजूला बसलेल्या बायकांना तोच प्रश्न विचारावा.. व आधीच्या बाईकडून संपूर्ण किस्सा ऐकून घ्यावा व त्यावर आपली मत.. शंका.. सूचना मांडाव्यात असा खेळ रंगत होता.. श्वास घेण्याइतकी जागा असली तरी ट्रेन खचाखच भरलेलीच होती.. गर्दीच्या अडथळ्यांतून इकडच्या बायकांना तिकडचं आणि तिकडच्या बायकांना इकडच दिसण्याचा काहीच मार्ग नव्हता. जी ती 'पासिंग द पार्सलं प्रमाणे' 'पासिंग द क्वश्न' मध्ये ओढली जात होती.. एकत्रित गर्दीचा आरोळ्यांचा वेगळाच सूर ऐकू येत होता.. त्या वरून मला "आईच पत्र हरवलं ते मला सापडलं" या खेळाची आठवण झाली.. त्या खेळात कसं एक जण आईच पत्र हरवलं करून बसलेल्या सर्वांना विचारत असते.. आणि ते नक्की कुणाकडे आहे हे कुणालाच माहीत नसतं.. प्रत्येकाला ते आपल्या किंवा आपल्या जवळ बसलेल्या कोणा जवळ तर नाही ना? आशी शंका येत असते तसं शेजारी बसलेली कोणतीही अनोळखी बाई त्या मुलाची आई तर नसेल अशी शंका प्रत्येकीच्या मनात येत होती. आणि त्यांच्या प्रश्नोत्तरांचा गडबड गोंधळाचा वेगळाच एकत्रित आवाज ऐकू येत होता. जणू त्या आईच पत्र हरवलं प्रमाणे "आईचा मुलगा हरवला.. तो मला सापडला... " नावाचा खेळच खेळत होत्या.
"आईचा मुलगा हरवला.. तो मला सापडला..! " डब्याच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत आवाज फिरत होता.. आता पर्यंत जवळ जवळ प्रत्येक बाईकडे प्रश्न पास झाला असावा.. इतक्या झपाट्यानं बायका खेळात भाग घेत होत्या.. आरोळ्या देत होत्या.. की एखादीपर्यंत प्रश्न पास नाही झाला तरी आवाज नक्की पोहचेल. आता सगळा डब्बा एक्का सुरात एकच वाक्य बोलत होता.. आईचा मुलगा हरवला तो मला सापडला..! तरी त्या मुलाची आई मात्र सापडली नाही.
सगळ्यांना तीच एक गोष्ट सतावत होती.. कोण ही आई.. मुलाला असं एकट्याला सोडून कुठे गेली.. चढलीच नाही.. उतरून गेली.. चुकामूक झाली.. विसरली.. की सोडून गेली..?
उत्तराच्या प्रतीक्षेत पुन्हा पुन्हा आवाज फिरत होता..
आईचा मुलगा हरवला.. तो मला सापडला..
आणि त्याची आईच तेवढी या आवाजा कडे पाठ करून बसली होती.
मुलाच्या काळजीने अस्वस्थ बायकांचा धीर सुटत चालला होता.. कोणाला त्याच्या आईच्या निष्काळजीपणाचा राग येत होता.. काळच सोकावलाय अस कोणाच मत होतं.. ते काही असलं तरी "तो मला सापडला..! " म्हणणाऱ्या बायकांच्यावर त्याची जवाबदारी येऊन पडली होती. ती आता पार पाडणं भाग होतं.
शेवटचा उपाय म्हणून त्यांनी त्या मुलाला तो कोण, कुठे चालला आहे.. त्याच्या बरोबर कोण आहे विचारायला सुरुवात केली.. त्या मुलानं त्याच नाव 'मोहीत' असल्याच सांगितलं, तो त्याच्या घरी चालला होता.. त्याच्यासोबत त्याची मम्मी होती.. तो त्याच्या मम्मी बरोबर प्रवास करत असल्याच कळल्यावर सगळ्या जणींनी त्याला त्याची मम्मी कुठे आहे..? म्हणून विचारून विचारून भांडवून सोडलं, तसं त्याला तो एकटा असल्याची जाणीव झाली. आणि त्याने मम्मी.. मम्मी करून हाका मारत रडायला सुरुवात केली..! आधी गोंधळ होताच, त्यात त्याच्या रडण्याने आणखीनच भर पडली.
मोहीतच्या रडण्या ओरडण्याने त्याची आई हरवली असल्याच्या शंकेवर शिक्कामोर्तब झाले. मोहीत ज्या बाईंना सापडला.. म्हणजे तो एकटा, एकाकी प्रवास करत आहे हे ज्या बाईंच्या प्रथम लक्षात आलं त्यांना आता या जवाबदारीच ओझं जाणवू लागलं.. त्या बाईंना पुढच्याच दुसऱ्या का तिसऱ्या स्थानकावर उतरायचं होतं. पण आता या एकट्या मोहितला सोडून त्या उतरूही शकत नव्हत्या.. आता या मुलाच काय करायचं..? हा प्रश्न सगळ्यांच्याच मनात आला.. आणि तितक्याच त्वरित त्या प्रश्नाच उत्तरही प्रत्येकीने शोधलं होतं.. आणि ते म्हणजे मोहितला पोलिसांच्या ताब्यात देणं कारण त्याला तो त्याच्या मम्माच्या घरी चालला आहे या व्यतिरिक्त काहीच सांगता येत नव्हत. आणि आता तर तो असा काही रडत होता की कोणालाच त्याला काही विचारताही येत नव्हतं..! त्यामुळे त्याच्या आजूबाजूला बसलेल्या सगळ्या जणी हतबल होऊन गेल्या.. याच बायकांनी काही क्षणापूर्वी शांतपणे बसलेल्या मोहीतला प्रश्न विचारून विचारून भांडवून सोडलं होतं.. आणि आता त्याच्या रडण्या ओरडण्याने त्यांना सळो की पळो करून सोडलं. मोहीतला पोलिसांच्या ताब्यात द्यावं हे तर सर्वांमते ठरलंच पण कोणी..? या प्रश्नावर गाडी अडली. प्रत्येकीला तिच घरदार होतं, मुलं बाळ होती.. आपापल्या जवाबदाऱ्या आणि वेळांशी प्रत्येक बाई बांधलेली होती.. तू-मी.. तू-मी करत करत शेवटी दोघी तिघी तयार झाल्या.. त्यातल्याच एकीने सुचवलं, की आपण शेवटच्या स्थानकापर्यंत मोहीतसोबत जाऊया, कदाचित त्याची मम्मा जिथे कुठे असेल तिथून ती येईल आणि त्याला घेऊन जाईल. पण त्या बाईंना तर आता याच्या नंतरच्याचं स्टेशनवर उतरायचं होतं.. आणि त्या एकीने सुचवलेला पर्यायही विचार करण्यासारखाच होता.. त्यावर आतापर्यंत पुढाकार घेणाऱ्या दोघीचं एकमत झालंच आणि तिसरीला मुद्दा पटवून घ्यावा लागला.. की देव न करो पण त्या मोहीतला उतरवून पोलिसांत जायच्या आणि त्यांच्या अतिउत्साहामुळे मोहीत आणि त्याच्या न सापडणाऱ्या मम्माची ताटातूट व्हायची.
इकडे डब्याच्या एका कोपऱ्यात शोध.. तपास.. प्रश्नोत्तरे.. शंका.. सुचनांचे टप्पे पार पडून मोहीतला शेवटच्या स्थानकावरील पोलिस स्थानकात पोलिसांच्या हवाली करण्याचा प्रस्ताव पास झाला तरी उरलेल्या डब्यात.. आईचा मुलगा हरवला तो मला सापडला.. ची हाकाळी फिरतच होती. जिच्या तिच्या तोंडी एकच विषय आईविना सापडलेला मुलगा..! आणि जिचे तिचे तर्क वितर्क रंगत होते. असाच एक बायकांचा घोळका तो मुलगा बघायला म्हणून गर्दीतून वाट काढत काढत उतरण्याआधी मोहित असलेल्या दारापाशी पोहचला.. मोहितला बघून कळवळलेल्या मानांनी जोरजोरात त्या निष्काळजी आईला नावं ठेवत उतरण्यासाठी दाराशी पोहचला.. त्या तिथेच एक गलेलठ्ठ मावशी दाराशी फतकल मारून बसलेली होती. अख्ख्या डब्याच्या कानाकोपऱ्यात पोहचलेला प्रश्न, गोंगाट जणू दुसऱ्याच जगात असलेल्या तिने ऐकलाच नव्हता.. आणि काही नाही निदान मुलाचा आरडा ओरडा.. रडणं तरी पोहचावं. तर तेही नाही.. मोहीत ज्या शांत, निवांतपणे डब्याबाहेर बघत होता त्या आणि तितक्याच शांत पणे त्या मावशीही वारा खात होत्या. या उतरणाऱ्या बायकांच्या घोळक्याने उतरायला जागा मिळावी म्हणून या मावशीबाईंना हालवलं, जाता जाता त्या हरवलेल्या मुलाची कहाणी तिला ऐकवली.. तशी बसल्या जागे वरून डब्यात झुकून मावशीबाई "माझं पोरगं हाय बयांनो" करून कातावली.
मावशीबाई दिसण्यावरून तरी मोहीतची आई वाटत नव्हती. नाक, डोळे, मोहीतचा गोडवा.. नीटनेटकेपणा काही काही म्हणून मावशीबाईंमध्ये नव्हते. पिकलेले केस, सुटलेलं अंग, पानानं रंगलेलं तोंड.. ती मोहीतची मम्मा अजिबात वाटत नव्हती. तीन-चार वर्षाच्या मुलाची मम्मा ही अशी..? यावर माझाच काय कोणाचाच विश्वास बसू शकत नव्हता. ( मम्मा या संबोधनामुळे असेल पण एखादी मॉडर्न तरुणी समोर येईल अशी सगळ्यांचीच कल्पना झाली असावी. ) आता मम्मा सापडली म्हणून निःश्वास टाकावा की कोणीतरीच पोरावर हक्क सांगतंय म्हणून संशय घ्यावा..? कोणालाच कळेना..!
मावशीबाईंना पोराचा, साऱ्या गर्दीचा आवाज ऐकू आला नसला तरी त्यांच्या मुलाला मात्र " माझं पोरगं हाय बयांनो" लगेच ऐकू आलं, त्या सरशी बटण दाबून टेप बंद करावा तसं मोहीतच रडणं-ओरडणं थांबलं.. आणि त्याने दाराच्या दिशेने धाव घेतली. ती प्रौढ बाई मोहितची कोणी आहे की नाही याच उत्तर त्याच्या त्वरित झालेल्या कृतीतून मिळालं, तरी ती त्याची आई होती की नाही हा प्रश्न तसाच राहिला.. कोणती आई ही अशी मुलाला गर्दीत सोडून निवांतपणे कशी काय बसू शकते..? कोणती आई अशी असू शकते, जिच्या कानांना मुलाच्या रडण्याच्या आवाजाची ओळख लागत नाही..? आतापर्यंत समोर सगळं काही घडत असताना माझा "आईचा मुलगा हरवला".. या विधानावर विश्वास बसत नव्हता.. त्यामुळे मी जागच्याजागीच बघत उभी राहिले. आणि आता मुलाला अशी कुठेतरी सोडून देणारी बाई त्याची आई असू शकते हे मनाला पटत नव्हतं. ती त्याची आई असेल नसेल.. ( कदाचित दाई वगैरे असावी ) पण तरी तिला मोहीतने ओळखलं होतं. एवढ्या एका कारणाखातर सगळ्यांनी आपला संशय आवरता घेतला.
मोहीत आता एकटा नव्हता. तो त्याच्या मम्माच्या घरी पोहचणार होता.. पण या बायकांनी मघाशी घाई गडबडीत मोहितला जर खरंच गाडीतून उतरवलं असतं तर..? त्या बाईचा न हरवलेला मुलगा खरोखर हरवला असता..! एवढं तरी तिच्या लक्षात आलं असेल का..?
आपल्याला आपलं बालपण सगळ्यात जास्त जर कशामुळे आवडत असेल तर ते तेव्हाच्या निश्चिंततेसाठी..! आई-वडिलांच्या सोबतीचा मोठा आधार आपल्या मुठीत पकडून निर्धास्त चालल्या क्षणांमधल्या सुखाची सर इतर कशासही यायची नाही. पुढे कितीही बाल्य, बालपणीच्या आठवणी जपू म्हटलं तरी बालपण काही जपता येत नाही.. ते आपल्याला मोठं करून संपून जात.. नाही..? आज ज्या शांतपणे तो बाहेर बघत बसला होता तितक्याच शांतपणे पुढचा प्रवास त्याला करता येईल का? मोहितच्या मनातून ते काही क्षणांच एकटेपण पुसलं जाईल का? हे आणि असे कित्येक उगाचचे प्रश्न घेऊ मी ठाण्याच्या स्टेशनवर उतरले, ट्रेन तिच्या मार्गाने निघून गेली.
येता जाता काही घटना.. अशा उगाचच स्पर्शून जातात, त्यांचे ओरखडे मात्र कितीतरी काळ तसेच राहतात.
==========================
स्वाती फडणीस...................... २०-०७-२००९