लोकल गोष्टी
- लोकल प्रवास
- १. फर्जाना यादव
- ३. नटवर
- २. हातातला खजिना
- ४. माझ्या समोर बसलेली ती;
- ५. आईचा मुलगा हरवला..
- ६. गर्दीतले चेहरे..
- ७. ओळख; पहीली आणि शेवटची.
- ८. मैत्री एक्सप्रेस
- ९. दहशत
- १०. मेलडी
- ११. भिकारी पोट्टा
- १२. लेडीज कंपार्टमेंट आणि पुरुष प्रवासी
- १३. मरणघाई
- १४. नव्या जगात प्रवेश
- १५. बोलपाखरं
- १६. हादरे)
- १७. काही नमुने..
- १८. नावड
- १९. शहाण्या आणि वेड्यांच्यातलं अंतर
- २०. हाता तोंडाची गाठ
- २१. अंधाऱ्या बोळाच्या टोकावर
- २२. पहिली खेप
- २३. संकेत पौर्णिमेचा
- २४. "गॉड ब्लेस यू..! "
- २५. तिखा चटणी मिठा चटणी
- २६. असाही दहशदवाद
- २७. वेगळा-वेगळा
- अच्छा तो हम चलते है..! ( लोकल गोष्टी-२८)
दहशतवाद जगाच्या कानाकोपऱ्यात पसरू लागलाय आज इथे तर उद्या तिथे जगात कुठे ना कुठे दररोज काहीतरी होतच असत. हे आपल्याला माहीतच आहे, तशाच आणखीन एका दहशतीचा आपण वर्षोवर्षं सामना करत आहोत.. ते आपल्या घरात, ऑफिसात, दुकानांत, वाहनांमध्ये,,, कधीही सहज प्रवेश करतात. त्याच्या वर केलेले उपाय हे नेहमीच तात्पुरते ठरतात. आणि आपण पुन्हा पुन्हा त्यांच्या आक्रमणांनी बेजार होत राहतो. असे दहशतवादी म्हणजे झुरळं, उंदीर, आणि पाली. कुठे कोणाकडे झुरळं जास्त उच्छाद मांडतात तर कुठे उंदीर हैदोस घालतात तर कुठे पाली गोंधळ उडवून देतात.. एक वेळ दहशतवाद्यांचा बंदोबस्त करणं शक्य होईल पण झुरळांचा कायम स्वरुपी बंदोबस्त करणं कठीण. पिसाळल्या वाघाची शिकार करणं सोपं जाईल पण उंदराच लहानसं पिल्लू तावडीत सापडणं महा मुष्कील. पालीच तर नुसतं नाव काढायचा अवकाश की ती अंगावर पडल्यासारखी शिसारी कित्येकांना येते. मारणं पकडणं ह्या तर दूरची बात.
सांगायची गोष्ट म्हणजे.. अशा या दहशत वाद्यांपैकी एक त्या दिवशी आमच्या लोकलच्या डब्यात शिरला होता. काळा कुळकुळीत दोन पेर लांबीचा उंदराचा बच्चा. उंदीर जितका लहान तितका जास्त भयंकर.. तुरुतुरू पळणारं हे पिल्लू कधी कुठे पळेल आणि कुठू कसं घुसेल याचा नेम नाही. त्यात महिलांचा डबा. पहिल्यांदा स्वस्थपणे गप्पा मारणाऱ्या एका चौकडीतल्या एकीच्या पायावर आपल्या पायांची वेगवान हालचाल करून उंदीर महाशयांनी आपल्या डब्यातल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली.. आणि काय होतंय कळायच्या आधी एकीच्या पर्सवरून दुसरीच्या ओढणीवर तिथून तिसरीच्या सीट मागे असे करत धूम ठोकली.
सगळ्या जणींनी सुटकेचा श्वास घेतला.. आणि आपापल्या जागांवर बसून उंदराच्या दर्शनाने मध्येच तुटलेली संवादाची लिंक जुळवून घेतली न घेतली तोच एकीच्या भयप्रद चीत्कारांनी पुन्हा सगळा डबा सावध झाला.. तेव्हा हा उंदराचा बच्चा चक्क एकीच्या पदरा आड दबा घेऊन बसला होता. समोरच्या मुलीचे विस्फारलेले डोळे आणि रोखलेली नजर यावरून कळायचे ते कळल्यावर त्या बाईंनी जी काय उडी मारली ती बघून उंदराच्या पिल्लानंही दाद दिली असावी. टुणकन उडी मारून ती पन्नाशीची बाई सरळ मधल्या पॅसेज मध्ये आली. एकीला हे असं घाबरवण्यात यशस्वी झाल्यावर उंदराला ही जोष चढला.. डब्यातल्या एका बाजूच्या बायकांना जागा सोडायला लावून तो दुसऱ्या भागात आपलं कर्तब दाखवण्यासाठी घुसला.
या वेळेला त्याने पाया पायातून पळण्याचा आपला जुना पवित्रा बदलून सीटच्या पाठीवरून कोणा कोणाच्या खांद्यांवरून पलीकडे डोकावता येईल असा नवा मार्ग निवडला होता.. झालं डब्याच्या दुसऱ्या भागातली शांतताही संपुष्टात आली.. अघोषित आणीबाणी असल्या सारखे डब्यातले दोन्ही भाग ओस पडले, सगळ्या बायका मुलींनी मधल्या पॅसेजचा आसरा घेतला. एवढ्यावरच संपेल तर तो दहशतवाद कसला..!
आमचा डबा त्या छोट्या उंदरानं चक्क आपल्या ताब्यात घेतला होता. पण आता त्याला आमचे त्या डब्यात असणेच नको होते या भागातून त्या भागात करता करता त्यानं पॅसेजमध्ये उभ्या असलेल्या महीला वर्गाला सळोकीपळो करून सोडलं पुढच्याच स्टेशनवर उंदराच्या कारवायांपासून वाचण्यासाठी काही जणींनी बसला डबा सोडला.. काहींनी तरी बरं उंदीर आहे झुरळ असतं तर मी ही उतरून गेले असते.. म्हणत आपल्या शौर्याचा प्रत्यय दिला. पण परत आपल्या जागांवर बसायला काही गेल्या नाही. तसं धाडस सुद्धा कोणी करून नये म्हणून उंदराच पिल्लू डब्याच्या दोन्ही भागात सतत गस्त घालत होतं. मी नेहमीच उभी असते.. आज मात्र डब्यात कोणीच बसलं नव्हतं.
=========================
स्वाती फडणीस.................. १०-०४-२०१०