संकेत पौर्णिमेचा (लोकल गोष्टी-२३)

एखादी डेली सोप सिरीयला बघताना त्यात कोणकोण पात्र आहेत, त्यांच्या भूमिका काय आहेत, कथानकाचा सूर कसा आहे.. वगैरे वगैरे कळल्यानंतर मधला(मधले) एखादा डेली सोप चुकला तरी काही फारसा फरक पडत नाही.. नेहमीच्या प्रेक्षकाला सुटलेलं कथानक बरोबर जुळवून घेता येत. किंवा मग समोर टीव्ही लावलेला आहे म्हणून दिसणारी पडद्यावरची हालती बोलती चित्र ओळखीची होऊन जातात, आणि नकळत आपण पुढच्या कथानकाशी जोडले जातो. कथानकातली सिंड्रेला तिचे कष्ट, तिचा छळ, तिचं मनातल्या मनात घायाळ होणं, पावसाच्या धारांसोबत स्फुंदून स्फुंदून रडणं, इवल्याश्या किरणाच्या स्पर्शाने तेजस हसणं.. आपलेपणानं साठवत जातो. तिला कष्ट देणारे तिचा दुश्वास करणारे आपल्याला बोचू लागतात. तिच्यावर मायेची पाखर करणारे.. तिच्या मुक्या आसवांना हलकेच टिपून घेणाऱ्यांशी आपलेही स्नेह रज्जू जुळतात.

ती तिची सुख-दुःख..
ती तिचे मान-अपमान..
ती तिच्या व्यथा-वेदना..
ती तिचा संयम-संवेदना..
ती तिची ध्येयं- स्वप्न...... आपल्याला बांधून घालतात. आणि आपण आपल्या नकळत तिच्या हितचिंतकांच्या, तिच्या चाहत्यांमधील एक होऊन जातो. मग तो डेली सोप टीव्हीच्या छोट्या पडद्यावरचा असो की जगाच्या मोठ्या कॅनव्हासवरचा. कधीतरी दाटून आलेलं मन डोळ्यांवाटे बरसूदेणं.. मनात उमलेला आनंद चेहराभर पसरून घेणं.. क्वचित कधी तिच्यासाठी हुरहुरणं.. कधी तिच्या नशिबावर चुकचुकणं.. बस्स एवढीच आपली भूमिका कारण शेवटी आपण फक्त प्रेक्षकच असतो ना..!

ती तिचा भाऊ तिचे स्वर्गवासी आई वडील,    तिला आश्रय देणारे तिचे चाचाजी,    त्यांचा घर परिवार,    पोरकेपणाचा आतल्या आत धुमसणारा सल,    भावाच्या बेजबाबदार बेलगाम वागण्याच ओझं..   त्याच्यासाठी हळवं होणारं त्याला पाठीशी घालणारं प्रेमळ नातं,    सगळ्या आघाड्यांवर पुरं पडता पडता होणारी जीवाची दमछाक,    त्यानंतर घेरून टाकणारं एकटेपण समजून,   ऐकून घेणारी तिची सखी.. यांची दररोज प्रसंगा प्रसंगातून उलगडत जाणारी एक कहाणी मी लोकलमधून जाताना अशीच कधी मधी तुकड्या तुकड्यात ऐकली.. डोळ्यातून टपकणाऱ्या आसवांत पाहिली.. गळ्याशी अडकून राहिलेल्या हुंदक्यात अनुभवली.   

सुनिती आणि सौरभ त्यांच्या मम्मी डॅडींसोबत सुखात राहत होते. वडिलांचा कसलासा बिझनेस होता. घरात समृद्धी नांदत होती. साहजिकच हवी असलेली प्रत्येक वस्तू मागायच्या आधी हातात पडायची.. आवडी निवडीचा मऊसूत घास मम्मी भरवायची. माझी सुनिती अशी माझा सौरभ असा म्हणत कौतुकाची तर बरसात असायची. सगळं कसं छान सुरळीत चाललं होतं आणि त्यातच तो काळा दिवस उजाडला. उजाडला कसला हसत्या खेळत्या घराला उजाड करून गेला. सुनीता, सुहासचे मम्मी डॅडी टूरवर गेले असता त्यांच्या कारचा एका सुसाट ट्रकने पार चेंदामेंदा केला. मुलं मायेला पारखी झाली.

पाहुण्या-रावण्यानी गजबजलेलं राहणार घर अचानक ओस पडलं, एक चाचाजी आणि एक मामाजी तेवढे वस्तीला येऊन राहिले.. बँकेची खाती विम्याच्या पॉलिसीज ऑफिसातला कारभार हेच विषय बोलण्यात.. जोडीला थोडी कळकळ. त्या दोघांच्या चढाओढीत कोण चांगलं कोण वाईट काही कळेना. सोळा सतरा वर्षांच अर्धवट वय पाठचा भाऊ आणखीनंच लहान त्यामुळे कोणावर तरी विश्वास ठेवायलाच लागणार होता. सरते शेवटी चाचाजींची निवड करण्यात आली आणि त्या निर्णयाने मामाजी दुरावले. चाचाजींच्या आश्रयाला जाताना राहत घर शेजार मित्र मैत्रिणींना सोडून जावं लागलं.. भावाची शाळा बदलली. चुलती चुलतं भावंड तिच होती तरी नात्याची वीण बदलली. पूर्विची दंगामस्ती मोकळेपणा जणू हरवून गेला. वाढीव जबाबदारीमुळे चुलतीची चिडचिड वाढली. चुलत भावंडांच्या वागण्या बोलण्यातली अरेरावी वाढत गेली.

सुनिती मोठी, समंजस, त्यात मुलगी. जाणारा प्रत्येक दिवस तिला अधिक अधिक मोठं करत गेला.. चुलतीला स्वयंपाकघरात मदत करणं, कधी काही कारणांवरून वाद भांडणं झालीच तर पडतं घेणं, आपल्या गरजा कमीत कमी ठेवून काही मागण्याची वेळ न येऊ देणं तिने जमवून घेतलं. सौरभच्या मात्र काही केल्या हे बदल अंगवळणी पडेनात. त्याच चुलत भावंडांशी बरोबरी करणं त्यांना मिळणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळाल्याच पाहिजेत म्हणून अग्रही असणं त्यासाठी भांडणं वाद घालणं चालूच होतं.. त्यातूनच तो दुखावला जाऊन कटुता वाढणं हे आलंच. या सगळ्यात पिसली जायची ती सुनीता.

चुलत्यांची माफी मागायची.. भावाची समजूत काढायची, भावाची चिडचिड.. चुलत्यांची बोलणी तिनेच ऐकून घ्यायची. भाऊ अजून लहान आहे.. म्हणून आपलीच समजूत काढताना, चुलत्यांशी आर्जव करताना तो कधी मोठा होईल म्हणून वाट बघत राहायची. तेव्हा मग मन हलकं करण्यासाठी ती लोकल मधल्या तिच्या मैत्रिणीला सगळा वृत्तांत सांगत राहायची.. आज काय तर भावाला कॉलेजच्या ट्रीपसाठी शॉपिंग करायची होती. मग त्याला मोटर बाइक हवी म्हणून चुलत्यांशी लाडीगोडी करायची.. मग काय तर भावाच वेळी अवेळी येणं-जाणं हुंदडणं कोणाच्यातरी डोळ्यात यायचं की झालं.. सगळ्या चांगुलपणावर लागलीच हरताळ फासला जायचा. नीट नेटक्या जीव ओतून केलेल्या कामामध्ये खोट काढली जायची. चेहऱ्या चेहऱ्यावर पसरून राहिलेली नाराजी मनाला कुरतडत राहायची.

त्या दिवशी बाइक मिळणार नाही कळल्यानंतर सौरभ तावातावाने भांडून डोक्यात राख घालून निघून गेला.. आणि नेहमी प्रमाणेच सुनिती सगळ्यांच्या रागाला बळी पडत राहिली. चाचीसाठी आम्लेट, चाचाजींच कॉनफ्लेकस, मोठ्या भैय्यासाठी टोस्ट.. दूध.. फ्रूटस, दीदीसाठी लेमन टी, छोटीसाठी मोसंबी ज्यूस, चाचा- चाचींचा चहा सगळं हातात नेऊन दिल्या नंतर.. छोटीने तिला मोसंबी ज्यूस नाही ऑरेंज ज्यूस हवा होता म्हणून केलेला अकाड तांडव हा त्याचाच एक भाग. किती किती आरोप केले छोटीने तिच्यावर तिला म्हणे कामच नको असतात.. काही काम केलीच तरी करायची म्हणून.. त्यात प्रेम आपुलकी काही नसते. भावाला बाइक मिळणार नाही म्हणून मला हवा तो ज्यूसही मिळायला नको असच असणार हिच्या मनात. मुद्दाम बदला घ्यायचा ठरवून सुनीतानं मला मोसंबीचा ज्यूस दिला. सुनितील आताशा अशा प्रकारांची सवय झाली होती. बोलणी संपल्या संपल्या ती मोसंबी ज्यूस आत घेऊन गेली झटपट ऑरेंज ज्यूस बनवला आणि छोटीला नेऊन ही दिला. अधिक उणं बोलण्यात काही अर्थ नव्हताच त्यात तिला ऑफिसला जायला उशीर होत होता. घरातली भांडणं मान-अपमान यांचा कामकाजावर परिणाम होवू देऊन चालणार नव्हतं. आता कुठे तिला तिची दिशा गवसली होती.

घरातली कामं, कॉलेजचा अभ्यास, भावाची काळजी, आणि आपलं दुःख, एकटेपण, उदासी.. सगळ्या आघाड्यांवर झटताना या सगळ्याचा परिणाम म्हणून ती खूप जिद्दी, मेहनती, आणि ध्येयवादी बनत गेली. कॉलेजचं शिक्षण पूर्णं झालं ग्रॅज्युएशनची पदविका हातात पडली.. आणि तिने आपल्याच कंपनीचा कारभार समजून घेण्यासाठी चाचाजींच्या हाताखाली उमेदवारी सुरू केली. जोडिला आपले आपल्या भावाचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी कायद्याचा अभ्यास सुरू केला. पैसा फार वाईट तो सरळ साध्या माणसाचाही शैतान करून टाकतो.. आणि (यायचीच असली तर वेळ काय सांगून येते..! ) आपणच सावध असलं की झालं. भावाने फक्त जरा शहाण्यासारखं वागायला हवं..   तिचे डोळे त्याला वडिलांच्या जागेवर बसलेलं पाहण्यासाठी कित्येक वर्ष कुलूप बंद असलेल्या आपल्या घरात राहायला जाण्यासाठी इतके आतूर झाले होते की त्यासाठी तिने असे कितीही कष्ट, अपमान हसत झेलले असते.

घरातली काम हाता वेगळी करून सुनिती ऑफिसमध्ये पोहचली.. तो दिवसच तसा गडबडीचा होता. आज दुपारच्या प्रेझेंटेशनसाठी तिला बरीच तयारी करायची होती. त्यात वेळ कसा गेला ते कळलंच नाही. सकाळच्या गोंधळात ती नाश्ता दुपारचा डबा दोन्ही विसरूनच आली होती.. तसाही जेवायला किंवा दुःख उगाळत बसायला तिच्याजवळ वेळही नव्हताच. प्रेझेंटेशन छान पार पडलं. त्यानंतर पाचच मिनिटं ती स्वस्थ बसली असेल नसेल तेवढ्यात चाचाजींच्या केबिनमधून तिला बोलावणं आलं.

आजच्या दिवसापुरती काम झाली होती. नाही म्हटलं तरी सकाळचा हंगामा आठवलाच. आता आणखीन काय ऐकायला लागतंय म्हणत तिने मनाची तयारी केली. घोटभर पाणी पिऊन ती चाचाजींच्या केबिनकडे रवाना झाली. चाचाजी तिच्या वडिलांच्या जागी बसले होते.    या केबिनमध्ये आलं की ती खुर्ची आणि खुर्चीतले चाचाजी बघून तिच्या मनात नेहमीच मम्मी-डॅडींची आठवण ताजी होत असे.   आताही नेहमी प्रमाणेच हळव्या होणाऱ्या मनाला निग्रहाने आवरत ती चाचाजींच्या समोरील खुर्चीत बसली.

घरच्या कटकटींमध्ये विशेष लक्ष न घालणारे मितभाषी,    तितकेच करारी चाचाजी एक एका शब्दावर जोर देत संथपणे बोलू लागले..    " बेटा घरमे क्या क्या होता हैं मुझे सब पता है.    तुम काफी समझदार हो हलात का सामना करना जानती हो.    मुझे बहुत खुशी हुई के घरमे झगडा होनेके बाद,    तुम्हे झुटेनाटे बोल लगानेके बावजूद तुम वक्तपर दफ्तर आई  हो..    पुरा ध्यान लगाकर काम किया,    अपना बरताव साधारण रखा..    अच्छा है.    ऐसेही सोच समझकर चलते रहना..    मुझे यकीन है तुम अपने माता-पिताका का नाम रोशन करोगी.    प्रत्येक शब्द इतका हळुवार मायेने ओथंबलेला होता की त्या क्षणापर्यंत मन घट्ट करून बसलेल्या सुनितीच्य्य डोळ्यांचा बांध फुटला.

आता चर्चगेटाला जाताना डबडबल्या डोळ्यांनी ती हेच तिच्या मैत्रिणीला सांगत होती.. चाचाजींचे शब्द आणि त्या नंतर त्यांनी खांद्यावर ठेवलेला हात. त्यांचा तो स्पर्श इतका आश्वासक होता.. की आता तिच्या मनात कोणताही किंतु राहिला नाही. तिची स्वप्न तिचं ध्येय आता फार दूर नाहीत बोलतानाचा तिचा विश्वास म्हणजे जणू अमावास्येच्या काळ्या रात्री नंतरचा प्रतिपदेच्या चंद्रासारखा पुढे येऊ घातलेल्या पौर्णिमेचा संकेत होता.

======================
स्वाती फडणीस........................... ०४-०३-२०१०