माझ्या समोर बसलेली ती;

माझ्या समोर बसलेली ती;
=============

तारीख, वार, वेळ.. काही काही आठवत नाही आहे, आठवती आहे.. ती, फक्त ती..
माझ्या समोर बसलेली ती;

मी पार्लं की सांताक्रुझ या पैकी कोणत्या तरी स्टेशनवर लोकल मध्ये चढले, ती माझ्या आधीच लोकल मध्ये बसलेली होती. लोकल मध्ये फारशी गर्दी नव्हती.. नाही..! गर्दी नव्हतीच. मला बसायला विंडो सिट मिळाली. ती वाऱ्याच्या दिशेस असलेल्या सिट वर बसलेली होती, खिडकी जवळची जागा रिकामी असून तिथे न बसता थोडंसं अंतर सोडून.. की दुसऱ्या कोणाला ही बसता येऊ नये.. तशी मी सहसा बसायला जात नाही, दारा जवळच उभी राहते.. त्या दिवशी थोडा थकवा जाणवत होता.. म्हणून आत गेले, बसले. ती ही निवांत बसलेली.. तिची सैल सोडलेली मान मागे डब्याच्या पार्टिशनच्या आधारे टेकली होती.. डोळे मिटलेले.. चेहऱ्यावर थोडी उदासी, थकवा, दुःख, वेदना की काहीतरी..? होत. मलाही प्रचंड थकवा जाणवत होता..! मी सिट वर टेकले.. तिच्याच सारखी मान मागे झोकून दिली.. डोळे मिटून घेतले.. दोन एक मिनिटं अशीच गेली.. आणि तिचा फोन वाजला.

कोणतंसं बोबड्या मुलीच्या आवाजातलं गाणं सुरू झालं.. खूप संथ, सौम्य, मधुर.. तरी पण शांततेला तडा गेलाच..! नाला छानशी गुंगी येत होती.. सगळ्या जाणीवा बधिर झाल्या होत्या.. एक शांतशी लहेर कवेत घेत होती.. मी डोळे उघडले नाही. अगदी मनातल्या मनातही चुकचुकले नाही..! पुन्हा एकदा गुंगीच्या आधीनं जाण्याचा प्रयत्न केला.. तिने फोन कट केला. मी सुखावले..! पुन्हा एकदा निरवतेने बाहू पसरले.. या वेळेला शांततेला वेदनेचा स्पंद होता..! मनाला अस्वस्थता डाचत होती,
कुठून तरी हलकीशी मुसमूस कानी आली.. पापण्यांनी उघडण्यास नकार दिला.
कोणी तरी रडतंय..
कोणी तरी रडतंय..!
कोणी तरी रडतंय.
संवेदना जाणीवांना जागवू लागली..
क्षणभर डोळे उघडले..
परत बंद झाले.
फोन वाजला..
फोन बंद झाला..
फोन परत वाजला..
परत, परत, वाजतच राहिला..!

You're my Honeybunch, Sugarplum
Pumpy-umpy-umpkin, You're my Sweetie Pie
You're my Cuppycake, Gumdrop
Snoogums-Boogums, You're the Apple of my Eye
And I love you so and I want you to know
That I'll always be right here
And I love to sing sweet songs to you
Because you are so dear..

इतक्यांदा! की.. तो रिंग टोन, ते छानसं, माला गाणं पाठ झालं. गाण्याच्या शब्दांमधला अर्थ झिरपत राहिलं..! आणि माझा थकवाही बराचसा कमी झाला. ती फोन घेतच नव्हती.. आणि ते यायचे बंदही होत नव्हते. माझं कुतूहल उगाच चाळवलं जात होत. तरी तशीच डोळे मिटून बसून राहिले.. बऱ्याच वेळा मला गाणं ऐकवल्या नंतर.. शेवटी एकदाचा तिने फोन घेतला..

"हॅलो..! "
"हॅलो ऽऽऽ.. "
"कोई मुझे थोडी देर चैनसे जिने क्यो नही देता.. यार "
म्हणत तिने फोन कट केला.. आणि ती अचानक रडायलाच लागली. म्हणजे मगाचचा रडण्याचा आवाज हिचाच होता तर..!
काही विचारावं का? छे..! पण कशाला.. तिला शांत राहायचं आहे, आणि मलाही.. कोणी सांगितलाय नाही तो उपद्व्याप. आपण आपले डोळे बंद करून घेतले की झालं.. सगळं जग पापण्यांच्या पलीकडे... ( डोळे बंद करून ) तरी नुसते डोळे बंद केल्याने शांतता मिळत नाही.. नाही..? कान बंद करण्यासाठीही काही करता यायला हवं होत. ते जरी झालं तरी तेवढ्याने काय होणार.. दृश्यांवर पडदा टाकता येईल.. गोंगाट म्युट करता येईल.. पण मन, डोकं, ते जाग असलं की पापण्यांच्या आडही दृश्य दाखवतं.. आवाज करतं. आताही माझे डोळे बंद असताना त्याला जाग आली होती.. आणि पापण्यां पलीकडे थांबवलेली ती जशीच्या तशी दिसत होती..

माझ्या समोर बसलेली ती;
हमसून हमसून रडत होती..
जराही का गती मंद न करावी,
झुलता झुलता म्हणत होती..!

माझं मन दृश्याला शब्दात रंगवू लागलं.. आणि पुन्हा फोन वर तेच गाणं सुरू झालं.. माझ्या शब्दांची लय बिघडली.. आता डोळे बंद करून बसण्यात काहीच अर्थ नव्हता.. मी ते उघडेच ठेवून समोर दिसेल ते ऐकायचं बघायचं ठरवलं. त्या नंतर तिच्या मोबाईलवर फोन येतच राहिले.. कधी मैत्रीण, कधी मित्र, कधी आई, सर, मित्र, मैत्रीण.. उफ..! तिला आणि तिच्या फोनला क्षणभराचीही उसंत म्हणून नव्हती.

You're my Honeybunch, Sugarplum
Pumpy-umpy-umpkin,
" हॅलो.. "
" तुला माहिती आहे.. आज काय झालं ते.
पहिल्यांदा, लाईफ मध्ये पहिल्यांदाच गं.. मला कमी मार्क मिळाले.
मला कधी कमी मार्क्स मिळूच शकत नाहीत का..?
मी नेहमी फस्ट सेकंड येतेच ना..!
मला माहिती आहे,, मला कमी मार्क पडलेत.
फस्ट टाइम..!
फस्ट टाइम इन लाईफ.. "
हू ऽ ऊह ऽ उहू ऽऽऽ
स्स.. स.. ऽऽऽ
"अगं रडू नाही तर काय करू...
हु ऽ ऊह ऽ उहू ऽऽऽ
थांब.. थांब... मी तुला नंतर कॉल करते..
आईचा फोन येतोय..
हो.. करते गं तुला फोन.
आधी मम्मीशी बोलूदे.. मगाच पासून तीनदा कॉल येऊन गेलाय माहिती आहे.
तिच्यासाठी मी म्हणजे अजून कुक्कुलं बाळच आहे. "

"हॅलो..
मम्मी तू सारखा सारखा फोन का करती आहेस..! तुला एकदा सांगितलं ना मी माझी काळजी घेऊ शकते.
मी घरी येत नाहीये, तू वाट नको बघूस..
अगं.. ज्यूस..!
माझ्या कडे वेळ नाहीये गं..!
बाहेर कुठे ज्यूस मिळतच नाही का..?
मी घेईन ज्यूस.. आता तू फोन ठेव. मला कोणाचातरी कॉल येतोय.
नको करूस काळजी..! "
( फोन कट करून )
हू ऽ ऊह ऽ उहू ऽऽऽ
स्स.. स.. ऽऽऽ

You're my Honeybunch, Sugarplum
" हॅलो"
हो आताचं पायलंचा फोन येऊन गेला..
हो रे..
एक तर मला टेस्ट मध्ये कमी मार्क मिळालेत.. आणि कोणी मला साध रडूही देत नाहीये...! पायल, मम्माचा, आणि सरांचा.. या फोन नि नुसता वैताग आणलाय..!! तुला माहिती आहे.. मला सर काय म्हणाले.. त्यांना म्हणे माझ्याशी बोलायचं आहे.. अरे मग फोन केला आहे ना तर बोलाव ना..! तर नाही मी परत क्लास कडे जायला पाहिजे मग हे मला डोस देणार.. आणि मी डफ्फर सारखी हो.. नाही..! हो.. नाही..! करत राहणार.. यांना कळतच नाही का..? मला ठाऊक आहे, मला कमी मार्क मिळालेत.. हे महत्त्वाच वर्ष आहे.. मी अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे.. हेच सगळं मला ते पुन्हा पुन्हा सांगणार..! बरं समोरच बोलायचं होत तर क्लास नंतर लगेच बोलता नसतं का आलं..? मी ही एवढी लांब आल्यावर मला परत क्लास मध्ये कसे बोलावतात हे..!
आणि साधी टेस्टच होती ना रे..!
फस्ट टाइम..
लाईफ मध्ये फस्ट टाइम..
सिक्सटीन आऊट ऑफ ट्वेंटी मिळाले.. तर काय आकाश कोसळलं का..?
मी कधी थोडंसं रिलॅक्सही होऊ नये का?
चलं.. रे..! मी तुला नंतर फोन करते.. पायलचा फोन येतोय.

मला काही न बोलता.. काही न विचारता एक एक करून तिच्या उदासीची कारणं कळत होती..

माझ्या समोर बसलेली ती;
हमसून हमसून रडत होती..
त्याच त्या आवर्तनात,
व्यथा तिची गुंजत होती..!

हॅलो..!
माझा फोन ना.. वाजतोय.. सारखा सारखा वाजतोय..!
अग एंगेज येईल नाहीतर काय होईल.. मघापासून इतके फोन येऊन गेलेत.. की काय सांगू.. एक फोन ठेवायच्या आधी दुसरा.. आधी सर, मग पायल, मम्मी तर सारखीच कॉल करती आहे.. आताही मला पायलचा फोन असेल वाटलं तर तू आणि सगळ्यांनची आपली एकच चौकशी.. कोणाला कधी कमी मार्क पडतच नाहीत का..? मग सगळे माझ्याच मागे का लागलेत.. माहीतिये..! पप्पा मुळे.. तो डीन आहे ना.. त्यामुळं हे सगळं.

हू ऽ ऊह ऽ उहू ऽऽऽ
स्स.. स.. ऽऽऽ

तुला सांगू मगाशी सरांचा फोन आला होता.. मला परत क्लास मध्ये बोलावता आहेत.. मी कशासाठी विचारलं तर म्हणे आल्यावरच बोलेन.. आता मी परत क्लासला जाऊ का..? तिकडून मम्मीचे कॉल वर कॉल येता आहेत.. अजून घरी का आली नाहीस.. ज्यूस करून ठेवलाय.. किती काळजी करणारही आता मी काय कुक्कुलं बाळ आहे का..? मी बाहेर ज्यूस पिऊ शकते ना..! बाहेर कुठे काही मिळतच नाही का..? इथे सर मला क्लास मध्ये परत बोलावतायत.. ते झालं की मला लग्गेच दुसऱ्या क्लासला जायचंय.. वेळ आहे का मला घरी जयाला..? सरांना नाही येत म्हणाले तर ते घरी फोन करतो करून धमकावतायत. म्हणजे अजून एक लेक्चर..! आता पर्यंत त्यांनी घरी फोन केलाही असेलं माहीत नाही आता घरी जाऊन काय काय ऐकाव लागेल.. मला खूप कंटाळा आलाय गं.
त्यात हे फोन.. मला कोणी सुखानं रडूही देत नाही..! फोन ठेवते हं.. प्लिज रागवू नकोस..!!

माझ्या समोर बसलेली ती;
हमसून हमसून रडत होती..
मायेच्या रेशमी वेढ्यात,
फूलपंखी कोंडली होती..!

अशीच फोनवर बोलत बोलत कधी तरी ती ट्रेन मधून उतरून गेली, आणि मी ती दिसेनाशी होई पर्यंत तिच्या पाठमोऱ्या आकृती कडे बघत राहिले. इतका वेळ तिच्या भावनांच्या उमाळ्यापुढे, शब्दांच्या धबधब्यात तिच्या दिसण्याकडे फारसं लक्षच गेलं नाही. त्यामुळे स्मृतीत ठसली ती तिची पाठमोरी आकृती. लाल टीशर्ट.. काळी जिन्स, नाजूक पट्टीचे सॅंडल्स, मऊसूत लांबलचक केसांचा पाठीवर झुलणारा पोनी.. असलेली ती छोटीशी मुलगी हळूहळू नजरेआड जात चालली आहे.

मी तिच्याशी बोलावं की नाही.. हा प्रश्न मुळी नव्हताच, इतक्या वेळात रडताना.. बोलताना.. मी तिच्या खिजगणतीत नव्हतेच. कदाचित तिला तिच्या मित्र-मैत्रिणींच्या बोलण्याचाही त्रासच होत होता.. (खरंच..? ) सरांनी दाखवलेली आपुलकी, आईचं काळजी करणं जाचक वाटत होत. पण या अशा वेळी कोणीच तिच्याकडे लक्ष दिलं नसतं तर तिला आवडलं असतं का? ती चं तिच जाणो..
मला मात्र हा संवाद प्रत्येक व्यस्त मुला-मुलींच्या आप्तांपर्यंत पाहचावा असं वाटलं.. म्हणून हा लेखन प्रपंच.

अशा वेळी प्रश्न पडतो.. मोबाईल फोन शाप की वरदान..?
कधीही कोणालाही हाकेच्या अंतरात आणून ठेवणारं हे तंत्रज्ञान माणसाचा असला नसला निवांतपणा हिरावून तर घेत नाहीये ना..!

माझ्या समोर बसलेली ती;
हमसून हमसून रडत होती..
माझे मज हवे.. क्षण काही,
समजून घ्या म्हणत होती..!

माझ्या समोर बसलेली ती;
हमसून हमसून रडत होती.

आणि तरी मी फक्त शांतपणे बघत होते. कधी कधी काही न करणंच करण्यासारखं असतं नाही..!

===========================
स्वाती फडणीस....................... १०-०७-२००९