गर्दीतले चेहरे..

गर्दीतले चेहरे..
===========

ट्रेन मधून प्रवास करताना, आतापर्यंत कित्येक चेहरे दिसले.. त्यातले लक्षात राहिलेले किती..? अगदी काही, बोटांवर मोजता येण्या इतकेच. आपल्याला दिसतो.. लक्षात राहतो तो गर्दीचा चेहरा. मग त्यात काही शाळकरी मुला-मुलींचे घोळके असतात.. कॉलेजला जाणाऱ्या जोड्या दिसतात.. ट्रेनच्या इतक्याच सातत्याने कामावरून जाणारे - येणारे जीवनसारथी.. अखंडपणे कार्यरत असलेल्या मुंग्यांसारख्या तुरुतुरू चालणाऱ्या बायका.. एक दोन मैत्रिणी सोडल्या तर चेहरा असा कोणालाच नाही. ( मलाही नाहीच )

त्यातल्याच कोणी कधी या सुईवरून त्या सुईवर टाके सांभाळताना दिसतात.. तर कधी एकच एक इवलीशी सुई घेऊन आपल्याच विणीत गुरफटून गेलेल्या असतात. कोणी मिळालेला क्षण अन क्षण सार्थकी लावण्याच्या खटाटोपात असतात.. त्यासाठी मग मांड्यांवर प्लॅस्टिकच्या पिशव्या घेऊन भाज्या निवडल्या जातात.. तर कधी मुलांची पुस्तकं उघडून उजळण्या केल्या जातात.. कोणी वीतभर आकाराच्या पोथ्या चार बोटांत पकडून त्याच्या पारायणात दंगलेल्या दिसतात.. तर कोणी वीत-वीत जाडीचे विटांसारखे दिसणारे ठोकळे डोळ्यांवर पेलत असतात.. आता तर काय कानांमध्ये हॉडस फ्री ची टोपण अडकवली की दुसऱ्याच जगात जातात. कोणाच्या हातात मासिक, कोणाच्या हातात माळा. प्रत्येक जण सुटा सुटा.. अशा या गर्दीत एखादा खळखळणारा कोपराही असतो.. आणि सगळ्या दृश्यांची प्रतिबिंब साठवणार एखादं शांत तळही असत.

मी पार्ला स्टेशन वरून ज्या लोकलने जायचे त्या डब्यात असाच एक उत्साह, जिव्हाळ्याने, रसरसलेल्या काही जणींचा मेळावा असायचा. वेगवेगळ्या स्थानकांवर चढणाऱ्या.. वेगवेगळ्या ऑफिसांमध्ये काम करणाऱ्या.. वेगवेगळ्या वयांच्या या बायका एकत्र आल्या की फक्त मैत्रिणी बनून जायच्या.. एकाच वेळेला, एका डब्यात, एकत्र जगायच्या.. त्यांचं हसणं, बोलणं, एकमेकींची काळजी घेणं.. नटणं, मुरडणं, प्रवासाचा सोबतीचा आनंद घेणं- देणं डब्यातल्या वातावरणात जीव ओतायचं. मीही त्यांच्याशी कधी बोलायचे.. ओळखीचं हसायचे.. त्यांच्या सहवासाने सुखावून जायचे.. त्यांचं मोकळेपणानं बोलणं, मोठमोठ्यांदा हसणं मला आवडायचं..! तरी मी दूरच उभी राहायचे. माझी मी आजपर्यंत मला जी ओळखते त्या नुसार कितीही आवडत असलं तरी मला त्यांच्यातली एक होणं जमलं नसतं. धबधब्याच्या जरा बाजूला उभं राहिलं की कसे मस्त तुषार अंगावर येत राहतात तसाच काहीसा अनुभव मी जवळ जवळ गेली दोन वर्ष घेत होते.

श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी आवर्जून नेसलेल्या काठा पदराच्या साड्या.. त्यावर वेळात वेळकाढूनं घातलेले शोभतील असे दागिने.. एखादीने सगळ्यांसाठी आठवणीने आणलेले गजरे.. एकमेकींची तोंडभरून केलेली कौतुकं.. कोणाकडे कसलासा कार्यक्रम आहे म्हणून एखादीने आग्रहाने देऊ केलेली नवीकोरी साडी. कोण आली कोण नाही आली याकडे असलेलं लक्ष, एखादी आजारी आहे कळलं तर विचारपूस करण्यासाठी केलेले फोन, कोणा एकीच्या मुलाच्या ऍडमिशनच सगळ्यांना आलेलं टेनशन, मॅरेज ऍनिव्हर्सरीवरून केलेली चेष्टा मस्करी.. काहीही कारण नसताना सगळ्यांसाठी बनवून आणलेले पदार्थ, रेसिपीज, टिप्स, आजीच्या मायेने घेतलेली काळजी, आईच्या हक्काने केलेली दटवणी, ताई बनून दाखवलेली दिशा.. लहान होऊन केलेले हट्ट, बरोबरीच्या नात्यानं केलेल्या गप्पा-गोष्टी.. आणि किती नि काय काय..! मी त्यांच्यात नसून अनुभवत होते.  

जगणं जगणं म्हणजे नक्की काय..? मला जर कोणी विचारलं तर मी निश्चित त्यांच्या दिशेने बोट करेन. कोणाचंही संपूर्ण आयुष्य अशा एवढ्याश्या तुकड्यातून नक्कीच कळणार नाही.. तरी तो जो काही काळ.. त्या एकत्र असत त्यातला क्षण आणि क्षण त्या साजरा करत.

त्याच डब्यात त्यांच्याच सारखं उत्साहानं सळसळणारं पण स्वतःत मग्न असलेलं अजून एक कारंजं असायचं मी बहुतेक वेळा तिच्याबरोबर असायचे. तिच नुसतं स्मित करणं ही हजार फुलांचा तजेला देऊन जाणारं.. तिच बोलणं किणकिणणाऱ्या घंटाच, आणि ती दिसायची तर इतकी लोभस की मुलींच्याही नजरा तिच्यावर खिळून राहाव्या.. पंजाबी ड्रेस, शर्ट पॅंट, स्कर्ट टॉप.. जगातले सगळेच्या सगळे पोशाख घालावे तर तिनेच..! इतकी प्रत्येक गोष्ट तिच्यावर शोभून दिसायची. माझी सकाळ तिच्या साध्याशा 'हाय' ने प्रसन्न होऊन जायची.

मला फुटबोर्डवर उभं राहायची सवय लागली ती तिच्याचमुळे.. भले संपूर्ण ट्रेन रिकामी असो ती नेहमी दाराशीच उभी राहायची. हातात आयपॉड कानात अडकवलेली टोपणं.. गुणगुणणारे ओठ, आणि तालात हेलकावणारी धुंदी. वाऱ्याच्या उलट दिशेने उडणारे तिचे मोकळे केस.. ते मात्र त्रासदायक वाटत, त्यामुळे मी समोरच दार गाठायचे.. वाऱ्याच्या झुळका मला स्पर्शून जायच्या.. त्या गारव्यात फुटबोर्डवर उभं राहण्याची भीती अशी उडून गेली.. की आता मीही रिकाम्या सिटकडे वळून बघत नाही.  

त्याच ट्रेनने जात असताना.. एक दिवस पास संपला म्हणून सेकंडक्लासचं तिकीट काढून एकदम पुढच्या डब्यांकडे गेले होते.. त्या डब्यात ही असाच एक सुरेल समूह होता.. त्यातल्या एकीकडे बऱ्याच हिंदी गाण्यांचे प्रिंटआऊट होते.. त्यातले सुर आळवता आळवता.. त्यांची छान मैफिल जमली होती. मी त्यांच्याचमध्ये ऐकत बसले होते.. मग त्या नंतर जवळ जवळ आठवडाभर सेकंडक्लासच्या त्या डब्यातूनच गेले.. त्या चौघींच्या सुरात सुर मिळवत मनसोक्त गाणी म्हटली.. मी कशी गाते, माझा आवाज कसा आहे..? याला तिथे काहीच महत्त्व नव्हते. मला माझा आवाज ऐकायचा होता.. माझे सूर जुळवायचे होते.. आणि त्यांची माझ्या त्यांच्यात मिसळण्याला, त्यांच्यासोबत गाणी आळवण्याला काहीच हरकत जाणवली नाही. कधीतरी गर्दीत आपला आवाज, आपलं अस्तित्व घुसळून काढल्यावर वेगळीच हुशारी येते.. नाही..!

तसंही फर्स्टक्लासपेक्षा सेकंडक्लासच्या डब्यातलं वातावरण मला नेहमीच जास्त जिवंत वाटत आलं आहे. याला बस्स त्या एका ग्रुपचा अपवाद. पण रोज रोज सेकंड क्लासने जाणयेण काही मला झेपणारं नव्हतं.. चढताना नसली तरी उतरतानाची भयंकर गर्दी आणि चेंगराचेंगरी.. घरी जातानाच तर बोलायलाच नको तेव्हाची धक्काबुक्की बघून मी प्लॅटफॉर्मवरच राहून गेले असते. त्यामुळे परत माझ्या  फर्स्टक्लासच्या दारापाशी उभी राहायला जाऊ लागले.

चेहऱ्यावर येणारा वारा.. ओळखीची गुणगुण, ओळखीच्या खळखळाटातली नेहमीची मी.

तो दिवस तर एकदम धमाल होता.. या डब्यातल्या त्या ग्रुपमधली एक सखी प्रेगनंट होती.. गेले कित्येक दिवस तिची आई माहीम स्टेशनवर तिच्यासाठी मोठा टीफीन घेऊन यायची.. बाकीच्या सगळ्या जणी ही तिची खूप काळजी घ्यायच्या डब्यात जागा असो वा नसो तिला नेहमी बसायला मिळायचं तिला उभं राहावंस वाटलं की बाकीच्या उभं राहायला जागा करून द्यायच्या.. आज तर काय सारा सखीपरिवार तिच्याचभोवती होता.. कोणीतरी मोगऱ्याचे भरपूर गजरे आणले होते. काही तिच्या केसात माळले.. काही मनगटावर गुंडाळले, बाकीचे सगळ्या सख्यांनी वाटून घेतले.. ओंजळ ओंजळ कळ्यांनी तिची ओटी भरली.. एक सुरेखसा पुष्पगुच्छ तिच्या हातात दिला.. सगळ्या जणींनी आपापल्या घरून आणलेले डबे पर्स मधून बाहेर काढले.. तिला एक पदार्थ निवडायला लावला.. वात्रट उखाणे घेतले गेले.. कुठली कुठली शोधून शोधून आणलेली गाणी म्हटली.. भेटवस्तू दिल्या गेल्या, पेढे वाटले गेले.. त्यांनी तिचं ट्रेनमधलं डोहाळजेवण साजरं केलं. माझ्याकडे तेव्हा शुभेच्छां व्यतिरिक्त देण्यासाठी काही नव्हतं. आणि त्या कोणाची तशी अपेक्षाही नव्हती. मला या कार्यक्रमाबद्दल आधी माहीत असत तर मी नक्की काही घेऊन गेले असते. ते राहीलच.. तरी खूप खूप मज्जा आली..! आतापर्यंत ट्रेन मध्ये हळदी कुंकू केलेलं पाहिलं होतं.. वाढदिवस साजरे केले होते.. आणि आता चक्क डोहाळजेवण. सुट्या सुट्या गर्दीला जोडणारा.. असा जिव्हाळा ही त्याच गर्दीत बघायला मिळतो.

हाच तो गर्दीचा चेहरा..!

=========================
स्वाती फडणीस...................... २४-०७-२००९