मेलडी (लोकल गोष्टी-१०)

लोकलमधून प्रवास करताना दगदग, दैन्य, दहशतीचं ठायी-ठायी दर्शन घडतं. त्याच बरोबर काही आपले असे निवांत क्षण, माणुसकीचे दुर्मिळ नमुने, जिद्द, धैर्य, चैतन्य, उत्कटता, तसेच हवेच्या शीतल झुळकेसारखे आनंदाचे क्षणही वाट्याला येतात. खळखळून हसायला लावणारे निर्झरही भेटतात.. तर कधी तऱ्हे-तऱ्हेच्या फुलपाखरांचे थवेच्या थवे नजरेस पडतात.. मला माझी पहिली वहिली लोकल गोष्ट लिहायला भाग पाडणारा तो मुलगा ( नटवर ) अगदी फुलपाखरा सारखाच मनस्वी.. खिळवून ठेवणारा होता. मला रोज दिसणाऱ्या झाशीच्या राण्या.. फुलांच्या ताटव्याप्रमाणे प्रफुल्लित करणाऱ्या त्या सख्या.. एकमेकींना डोळ्यात साठवणाऱ्या पिकलेल्या मैत्रिणी.. आपल्या प्रत्येक लकबीमधून फिदा शब्दाचा साक्षात्कार घडवणारी स्वप्नजा.. हे सगळे मला याच रोजच्या पंचवीस तीस मिनिटांच्या प्रवासाच्या दरम्यान भेटले. दुःखद, आपतग्रस्त क्षण कदाचित जरा जास्त रेंगाळत असतीलही.. पण म्हणून हलके फुलके आनंदी क्षण मनात उमटतच नाहीत अस नाही. ति तर अलवार स्पर्शून जाणारी मोरपिसं..! बहुतेक हे असेच हलके फुलके क्षण रोजचा उत्साह टिकवून ठेवण्याचं काम करतात.

एक दिवस काही कामामुळे ऑफिस मधून परतायला उशीर झाला होता.. रात्रीचे साडेनऊ-पावणेदहा वाजले असतील.. फस्ट क्लासच्या डब्यात चढावं की नाही विचार करत-करत मी एकदाची चढले. डब्यात माझ्या शिवाय आणखीन दोन तीन मुली होत्या. मला हवी तशी खिडकीतली जागा मिळाली. राजसचा दोनदा फोन येऊन गेला होता.. मी घरी पोहचेपर्यंत तो झोपून गेला असणार..! त्याच्यासाठी घेतलेली चॉकलेट आता उद्या देईन. म्हणत पर्समध्ये ठेवून दिली. आणि डोळे मिटून बसून राहिले. राजस भेटणार नाही म्हणून मनात हुरहुर दाटून येत होती.. तेवढ्यात कोणाचे तरी गोड बोबडे बोल ऐकू आले. आणि मिटलेले डोळे आपोआपच उघडले गेले.

एक दीड-दोन वर्षांची चिमुरडी तिच्या आईला सोबत घेऊन लोकलच्या डब्यात चढत होती. आईच्या हातात टेडी आणि तिच्या हातात लहानगी बॅग, चढतानाही ती चिमुरडीचं आईचं बोट हातात घेऊन आधी चढली तिला चढू देऊन मग तिची आई तिच्या पाठोपाठ बोलत-बोलत डब्यात आली. शांत काहीसा मरगळलेला डबा तिच्या वरच्या पट्टीतील स्वरमालेनी जागा झाला. डब्यात पाय ठेवल्या पासून अखंड चबर-चबर सुरू.. या गुजराथी बायका हा एवढा उत्साह ऊर्जा कुठून आणतात कोण जाणे..!

गाडी दादर स्थानकावर थांबली होती. डब्यातील प्रवाशांची संख्या आणखीन दोन-तीन अंकांनी वाढली होती. डब्यात चढलेली ती छोटी डब्यातल्या प्रत्येकी जवळ जाऊन काहीतरी देत-देत माझ्यापर्यंत आली.. तिच्या लहानश्या हातात पकडलेलं मेलडी चॉकलेट माझ्या पुढे धरून लोभस हसली.. आणि मी तिच्या हातातलं चॉकलेट घेतलं.. मी ज्या सहजतेनं तिच्या हातातलं चॉकलेट घेतलं तितक्याच नकळत तिला पर्स मधली कॅटबरी काढून दिली. सोबत तिची आई होतीच.. बाकी शब्दांच्या देवाण घेवाणीसाठी तिच्या आईकडे पाहिलं..

तिची आई मी वर बघताच तिच्या मुलीहून गोड हसली.. तिच्या नजरेतून मुलीचं कौतुक अगदी ओसंडत होतं. आधीच मोकळ्या तोंडाची बाई त्यात मी दाखवलेली उत्सुकता यांमुळे तिने माझ्यासमोर आपल्या मुलीचे यथेच्छ गोडवे गायले..! तिच्या पायलला रोज वाढदिवस साजरा करायचा असतो.. पण तिचा वाढदिवस तर वर्षातून एकदाच येतो, म्हणून मग ति घरातल्या सगळ्यांचे तिच्या सगळ्या बाहुल्या, सॉफ्टटॉईज, कार, अगदी भातुकलीच्या सेटचाही वाढदिवस साजरा करते.. तसाच आज तिच्या टेडीचा बर्थडे होता. मला देण्यात आलेलं मघाचंच चॉकलेट त्याचंच. लहान मुलांच्या कल्पना किती सुंदर असतात ना! ( माझा मुलगाही असच काही काही करत राहतो. ) पायलने दिलेल्या मेलडीने.. आणि तिच्या आईने सांगितलेल्या मेलोडीयस स्टोरीनं ते काही क्षण चॉकलेटी होऊन गेले.. अगदी कधीही चघळावे असे..!
.
.


स्वाती फडणीस............................................... ०४-०९-२००९