हादरे (लोकल गोष्टी-१६)

.
.
रुळावरून धावणाऱ्या लोकलवर त्यावरून जाणाऱ्या मोठ्याशा पाइप लाइनचा भाग निसटून पडतो आहे.. अशी ऍनिमेटेड मॉडेलची चित्रफीत टीव्हीवर दाखवली जात होती. सीएसटी-कल्याण लोकलवर मुलुंड-ठाणे दरम्यान घडलेली ही दुर्घटना मी गणपतीपुळ्याला हॉटेलमधल्या टेलिव्हिजन संचावर बघितली. लोकलच्या केबिनची चेंदामेंदा झालेली अवस्था बघून अंगावर काटा आला.. त्या सोबत पुढची विस्तृत बातमी कानावर आदळत राहिली.. दोघा जणांचा मृत्यू नऊ जण जखमी. ( आजकाल मरण यायला काहीही निमित्त पुरत नाही! ) बॉंबं स्फोट, दहशतवाद्यांच्या रायफलीतून सुटलेल्या बेबंद फेऱ्या, हे असे छोटे मोठे अपघात.. अगदी काही ही. दम तोडत चाललेल्या यंत्रणेत आणि कुठे कुठे मृत्यू असाच दबा धरून बसलेला असेल? विचारा सोबत चार-पाच महिन्यांपूर्विची स्मृती उसळून वर आली.

बांद्र्याला लोकल खाडीवरून जाते, त्या जरा आधी लोकल ट्रेनच्या मार्गावरून ( बांद्रे पश्चिम, माहीमकडे जाणारा ) उड्डाण पुल जातो.. त्या पुलाखालचा बराचसा भाग पडून पुल कित्येक दिवस एका मुठी एवढ्या जाडीच्या एका रॉडवर टेकून होता. जवळच पुलाच्या पडझड झालेल्या भागाचे अवशेष असेच पडले होते. ट्रकवरून दर तीन मिनिटांना धडधड करत भरधाव पळणाऱ्या लोकल त्यांचे हादरे, वरून बस, गाड्या, ट्रक सारख्या अवजड वाहनांची अखंड वर्दळ ( त्यांना या पडझडीची कल्पना असेल नसेल).. पुलाच वजन.. आणि हा असा निष्काळजीपणा मी कित्येक दिवस बघत होते. ( तुम्हाला ही कुठे कुठे असा धोका जाणवत असेल ) नंतर एक दिवस पुलाचा पडलेला भाग उचलला गेला.. ( पुल तसाच ) मग कधीतरी पुलालगत बांबूच्या पराती बांधल्या गेल्या.. त्यानंतर कासवाच्या गतीने महिना दीड-महिन्याचा वेळ घेऊन पुलाची डागडुजी पूर्णं झाली. ( कोणताही अपघात ओढवला नाही. ) हे महत्त्वाच.

घरातल्यांना पूर्वी सांगितलेली ही गोष्ट त्या ओघात परत सांगताना मनात येत गेले की फक्त बघ्याची भूमिका न वठवता आपण अशा घटना घडूनयेत म्हणून काही करू शकतो का?

===========================
स्वाती फडणीस....................... २८-१०-२००९