लोकल गोष्टी
- लोकल प्रवास
- १. फर्जाना यादव
- ३. नटवर
- २. हातातला खजिना
- ४. माझ्या समोर बसलेली ती;
- ५. आईचा मुलगा हरवला..
- ६. गर्दीतले चेहरे..
- ७. ओळख; पहीली आणि शेवटची.
- ८. मैत्री एक्सप्रेस
- ९. दहशत
- १०. मेलडी
- ११. भिकारी पोट्टा
- १२. लेडीज कंपार्टमेंट आणि पुरुष प्रवासी
- १३. मरणघाई
- १४. नव्या जगात प्रवेश
- १५. बोलपाखरं
- १६. हादरे)
- १७. काही नमुने..
- १८. नावड
- १९. शहाण्या आणि वेड्यांच्यातलं अंतर
- २०. हाता तोंडाची गाठ
- २१. अंधाऱ्या बोळाच्या टोकावर
- २२. पहिली खेप
- २३. संकेत पौर्णिमेचा
- २४. "गॉड ब्लेस यू..! "
- २५. तिखा चटणी मिठा चटणी
- २६. असाही दहशदवाद
- २७. वेगळा-वेगळा
- अच्छा तो हम चलते है..! ( लोकल गोष्टी-२८)
=======================
वयाची पंचविशी गाठली की मोठं झाल्याच जाणवायला लागतं.. जबाबदाऱ्या स्वीकारायची पूर्ण करण्याची सवय होत जाते.. कधीतरी पाहिलेली स्वप्ने वास्तवात उतरवाविशी वाटू लागतात.. त्याच वेळेला काळ त्याच्या वेगाने धावतच असतो.. दिवसांमागून दिवस जात जात तिशी ओलांडली जाते.. हवेत भरारणाऱ्या स्वप्नांचे पाय जमिनीवर टेकतात.. तोपर्यंत आपला आवाका आपल्याला बहुतेकसा कळून आलेला असतो.. काही गोष्टी पूर्णं करण्यात यश आलेलं असतं काही मागेच सुटल्यासारख्या वाटतात.. तर काही अजूनही रात्रीचा दिवस करायला भाग पाडत राहतात.. त्याच बरोबर आणखीन एक विचार मनाला छळत राहतो की या इतक्या वर्षात आपण काय केलं..? साठ सेकंदांचं मिनिट.. साठ मिनिटांचा तास.. चोवीस तासांचा दिवस.. तीनशे पासष्ट दिवसांच वर्ष.. आणि अशा तीनशे पासष्ट दिवसांची तीस वर्ष..! आपण कशी आणि कुठे घालवली..? गेलेलं एक एक मिनिट हिशोब मागायला लागतं. आपण असदी सामान्य आहोत..!! (आलो तसेच एक दिवस जाणार) असं आपलंच मन हिणवायला लागतं. खरंच काहीच का केलं नाही मी..!? आणि केलं तर काय केलं..?
शालेय शिक्षणं.. कॉलेज.. नोकरी छोटे मोठे उद्योग.. लग्न.. मुलं.. दहा वर्षांचा संसार.. हे माझं सर्वसामान्य जीवन. सकाळी उठायचं घरातली काम आवरायची.. आपलं आटपायचं.. आणि ऑफिसकडे पळायचं... तिथला दिवस.. मग परत घर.. जेवणं.. टीव्ही.. मुलाशी केलेल्या गप्पा गोष्टी, अभ्यास.. आणि झोप. या दरम्यान घडलेले छोटे-मोठे प्रसंग डोळ्यासमोरून सरकत राहिले.. माझ्या या आयुष्यातही बरंच काही होतंच.
त्यातला सगळ्यात जास्त कंटाळवाणा समजला जाणारा.. आणि सहज निसटून जाणारा रोजच्या चाकोरीतल्या प्रवासातला काही वेळ.. म्हटलं तर धकाधकीचा, गजबजलेला.. म्हटलं तर निवांत, माझ्या एकटीचा.. माझ्याच जगण्याचा वेगळा पडलेला भाग.. फर्जानाच्या निमित्तानं त्यातले कित्येक विस्कळीत क्षण एका मागोमाग एक जोडले जाऊन कागदावर धावायला लागले. जणू त्यांना हेच सांगायचं होतं की, " प्रवास मग तो जगभराचा असो की जिथल्या तिथे गरगरणारा असो.. कुणा जग जेत्याचा किंवा सर्व सामान्य व्यक्तीचा.. त्यातला क्षण अन क्षण अनुभवांनी संपन्न असतो. "
=======================
स्वाती फडणीस............... २६-११-२००९