एप्रिल १४ २०१६

चिंता करी जो विश्वाची .... (२)

चिंता करी जो विश्वाची
समर्थ रामदासस्वामी यांचे वास्तव्य नेहमीच डोंगरांवर, गुंफेमधे, अथवा गड- किल्ल्यांवर असे. एकांतवास त्यांना प्रिय होता. मानवी वस्तीपासून काहीसे दूर, कमीतकमी जनसंपर्क होईल अशा ठिकाणी ते मुक्काम करीत.  परंतु असे असले तरी  मनात सदैव जनसामान्याचा विचार असे. बुद्धी सतत लोकोद्धाराचे मार्ग शोधण्यात मग्न असे. त्यांच्या शिष्यगणांनी जागोजागी मठाची स्थापना केली होती. त्यातून समर्थांचे विचार शिकविले जात, बलोपासनाही होत असे. समर्थांच्या लेखी  संन्यासी व्रत आचरणे  म्हणजे आजूबाजूच्या परिस्थिती कडे दुर्लक्ष करून फक्त रामनामाचा जप करत राहणे असा अजिबात नव्हता. संन्यासश्रम हा समाजाचाच एक घटक आहे असेच त्यांचे मानणे होते आणि वागणेही होते.  

समर्थ स्वतः सतत कार्यरत राहत असत. आळशीपणा त्यांना नामंजूर होता. आळसापायी काहीच साध्य होत नाही असे ते सांगत. चिंतन, मनन, वाचन, श्रवण, लेखन आणि लोकशिक्षण हा त्यांचा नित्यक्रम होता. तसेच सार्वत्रिक संचारही  होता. लोकांमध्ये असलेले अज्ञान आणि त्या पायी त्यांचे होणारे हाल त्यांना पाहवत नसत. मग ते त्यांच्यापुढे  आपल्या अनुभवांच्या भांडारातल्या माणिक मोत्यांची रास मांडत असत. आयुष्य कसे जगावे, व्यवहार कसे असावेत, आचार विचार कसे असावेत, कुणाची संगती चांगली, कुणाला अनुसरावे असे सारे काही सांगत. भाषा साधी, सोपी तरीही  रसाळ आणि  प्रासादिक.  लेखन आणि त्यातील विचार अत्यंत परखड. सत्य तेच सांगणारे.   कुणाची खोटी स्तुती करणार नाहीत तसेच निंदा नालस्तीही नाही. वैयक्तिक असे त्यांचे काहीच नसे. जे काही आहे ते लोकांचेच...  

समर्थ श्रीरामाचे भक्त होते. भगवान राम त्यांचा आदर्श. श्रीरामाला आठवून आपले नित्यव्यवहार करावेत , असे केल्याने जीवन सफल होते, अनेक दोषांपासून मुक्त होत असे त्यांचे सांगणे असे.

प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।
पुढे वैखरी राम आधी वदावा ।
सदाचार हा थोर सोडूं नये तो ।
जनी तोची तो मानवी धन्य होतो ॥
असा उपदेश ते करीत होते. 

समर्थांना बेगडी अथवा कृत्रीम असे काही आवडत नसे. त्यांनी स्वतः आयुष्यभर ध्येयपूर्ती साठी तन-मन अर्पून अहर्निश आणि अविश्रांत अशी साधना केली. त्यात कुठलेही हीण नव्हते. आपल्या संप्रदायातील भक्तजनांनी देखिल तोच मार्ग अनुसरावा असे त्यांना वाटत असे. व्यक्तिपूजा न करता विचारांपासून बोध घ्यावा असे त्यांचे सांगणे होते. ते सांगत मी असेन किंवा नसेन.. परंतु माझे विचारधन हे अविनाशी आहे. म्हणून तुम्ही त्याचे स्मरण करा.  

माझी काया आणि वाणी । गेली म्हणाल अंतः करणी ।
परी मी आहे जगजीवनी । निरंतर ॥
आत्माराम दासबोध । माझे स्वरूप स्वतःसिद्ध । 
असता न करावा हो खेद । भक्तजनी ॥

एका शुभदिनी शिवथरघळीतील एका गुंफेमध्ये, आपल्या निवडक शिष्यांच्या  सान्नीध्यात -- समर्थांनी दासबोध या ग्रंथाची रचना करण्यास प्रारंभ केला. समर्थ आपल्या मुखाने एकेक शब्द उच्चारित आणि त्यांचे शिष्यगण आपल्या लेखणीने ते अक्षरबद्ध करीत असत. असेच बहुत काळ चालले आणि अंती एका महान ग्रंथाची सिद्धता झाली. असा अद्वितीय ग्रंथ, की जो आज  चार शतकांनंतरही तितकाच मूल्यवान आणि प्रेरणादायी आहे.  

श्री दासबोधाची सुरुवात अर्थात गणेश स्तवनाने होते. गणपती ही विद्येची देवता. त्यांनी आपल्या ओघवत्या वाणीने विनायकाचे रुपवर्णन, गुणवर्णन केले आहे. आणि हे ग्रंथ लेखनाचे कार्य सिद्धीस जावो अशी प्रार्थना केली आहे. ब्रम्हादिक देव, देवता देखिल श्री गणेशाला प्रथम वंदन करतात कारण तो विघ्नहर्ता आहे. सुख समाधानाची वर्षा करणारा असा आहे. तसेच त्याच्या उपासनेमुळे असलेले अवगुण नाहीसे होऊन हाती घेतलेल्या कार्यात यशप्राप्ती होते. म्हणून प्रथम वंदन श्री गणेशाला.  

जयासि ब्रम्हादिक वंदिती । तेथे मानव बापुडे किती ।
असो प्राणी मंदमती । तेही गणेश चिंतावा ॥ 
जे मूर्ख अवलक्षण । जे का हीणाहूनी हीण ।
तेचि होती दक्ष प्रविण । सर्वविशई ॥
ऐसा जो परम समर्थ । पूर्ण करी मनोरथ ।
सप्रचित (अनुभवयुक्त) भजनस्वार्थ ।
कल्लौ चंडीविनायेका ॥
ऐसा गणेश मंगळमूर्ती । तो  म्यां स्तविला येथामति ।
वांछ्या धरूनि चित्ती । परमार्थाची ॥

त्या नंतर कलेची आणि विद्येची देवता सरस्वती शारदेस वंदन केले. देवी शारदा सर्व शब्द भांडाराची उत्पत्ती आहे. तिच्या योगे बुद्धी आणि वैखरीचे कार्य सिद्धीस जाते. देवी देवता देखिल नित्य जिचे स्तवन गातात अशा शारदेस समर्थ सादर प्रणाम करतात. मती, बुद्धी आणि वैखरीची अधीष्ठात्री देवता जी शारदा , हिच्या मंगलमय स्मरणाने आपले कार्य सिद्धीस जावो अशी कामना करतात.
शारदेचे वर्णन करताना ते लिहितात --

जे महंतांची शांती । जे ईश्वराची निज शक्ती ।
जे ज्ञानियांची विरक्ती । नैराशशोभा ( निःस्पृहतेचे वैभव/तेज )  ॥ 
 
सरस्वती देवी ची उपासना का करावी? कारण ती वैखरीची म्हणजेच वाणीची देवता आहे. तिच्या योगे विद्या प्राप्ती होते कारण ती  विद्यादायिनी आहे. या जगी कला गुणांची उत्पत्ती तिच्या योगे  झाली म्हणून ग्रंथनिर्मितीच्या प्रारंभी  देवी शारदेचे  स्मरण --

जे ब्रम्हादिकांची जननी । हरीहर जयेपासूनी ।
सृष्टीरचना लोक तिनी । विस्तार जयेचा ॥ 

देवी आणि देवतांना वंदन केल्यानंतर अर्थात स्मरण सद्गुरूचे. समर्थ सांगता गुरुचा महीमा थोर आहे जो शब्दात वर्णन करता येत नाही. परीस, सागर, मेरू, जळ, कल्पतरू, कामधेनू इ. ची उपमा ते गुरूसाठी योजतात, परंतु त्यांना प्रत्येकात काही ना काही न्यून अढळते जे सद्गुरूमध्ये नाही. म्हणून ते म्हणतात सद्गुरूची थोरवी वर्णनातीत आहे, शब्दातीत आहे. उत्तम गुरूचे थोरपण उत्तम शिष्यच जाणू शकतो.  अज्ञानाच्या अंधः कारातून जो ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेतो त्या सद्गुरुला शत शत प्रणिपात समर्थ करतात.
सद्गुरू ची महती ते अशाप्रकारे वर्णन करतात-- 

हरीहर ब्रम्हादिक नाश पावती सकळीक ।
सर्वदा अविनाश येक । सद्गुरूपद ॥
तयासी उपमा काय द्यावी । नाशिवंत सृष्टी आघवी ।
पंचभूतिक उठाटेवी । न चले तेथे ॥
म्हणौन सद्गुरू वर्णवेना । हे गे हेची माझी वर्णना ।
अंतरस्थितीचिया खुणा अंतर्निष्ठ जाणती ॥ 

सद्गुरुंना आदरभावाने नमन केल्यानंतर समर्थ  संतसज्जनांपुढे नतमस्तक होतात. सज्जन सहवासाची महती गाताना ते सांगतात, की अनेक अशा गोष्टी आहेत ज्याचे आकलन काही केल्या स्व बुद्धीस होत नाही. सारे तर्क-वितर्क हार मानतात. अशा समयी संत सज्जनांची संगती कामास येते. ज्या प्रमाणे प्रखर सूर्यप्रकाशात पृथ्वीवरील अणू-रेणू प्रकाशमान होतो, तद्वत संताच्या सहवासात अशी अनेक रहस्य ज्ञात होतात.  

जें त्रैलोक्याहून वेगळे जे वेदश्रुतीसी नाकळे ।
तेंचि जयांचेनि वोळे ( प्रकटते) । परब्रम्हं अंतरी ॥
ऐसी संतांची महिमा । बोलिजे तितुकी उणी उपमा ।
जयांचेनि मुख्य परमात्मा । प्रगट होये ॥ 

असे संतांचे महत्त्व आहे. ज्ञानप्राप्तीसाठी संत सज्जनाचे मार्गदर्शन उपकारकच ठरते. म्हणून त्यांच्यापुढे सदैव लीन असावे असे समर्थ सांगतात.

त्यानंतर श्रोते आणि सभा हेही महत्त्वाचे घटक आहेत. उत्तम वक्त्यास  उत्तम श्रोत्याचा लाभ झाल्यास त्याच्या ज्ञानाचे तेज द्विगुणित होते, अन्यथा त्याचे सारे ज्ञान उपड्या घड्यावर केलेल्या जलाभिषेकाप्रमाणे व्यर्थ जाते. समर्थ श्रोत्यांस विनवणी करतात की त्यांनी सारे अवधान कथनाकडे द्यावे. सांगत असलेल्या ज्ञानाचे आकलन करावे आणि त्यात जर काही कमी राहिलेले असेल तर ते पूर्ण करावे. ते म्हणतात मी काही चुकीचे बोललो तर मज सांभाळून घ्यावे.  

आपुलेचि बोल वाउगे । त्याची संपादणी करणे लागे । 
परंतु काही सांगणे नलगे । न्यून ते पूर्ण करावे ॥ 

मी ज्ञानी आहे, म्हणून मी बोलेन तेच योग्य आहे. त्यावर शंका घेण्याचा अथवा काही सुचवणुक करण्याचा कोणास अधिकार नाहीच असा गर्व नाही. इतरांकडून होते तशी माझ्याकडूनही चूक होणे शक्य आहे तरी  तुम्ही ती दाखवून द्यावी अशी विनवणी ते आपल्या श्रोत्यांना करतात. यातून रामदास स्वामींची  निगर्वी वृत्ती आणि आपल्या कार्याप्रती असलेली निष्ठाच दिसून येते.     ते करत असलेली ग्रंथरचना बिनचूक व्हावी, त्यात काही न्यून राहू नये ही तळमळही दिसून येते.  

समर्थ आता  कवी, रचनाकाराचे महत्त्व वर्णन करतात. कारण ग्रंथ रचना हे शब्दप्रभुंचे कार्यक्षेत्र. त्यांच्या आशीर्वादाचे महत्त्व मोठे आहे हे समर्थ जाणतात. त्यांचे ऋण स्मरतात. ते म्हणतात कवी, लेखक, रचनाकारांमुळे पृथ्वीवरील ज्ञानवैभव सकाळांसाठी खुले झाले. अशा पूर्वसुरींनी केलेले लेखन वाचून अनेकांना  पांडित्य प्राप्त झाले आहे.  या पुढेही अनेक साहित्यकार होतील आणि हा ज्ञानगंगेचा ओघ वाहता राहील.  

पूर्वी काव्ये होती केली । तरीच वित्पत्ती  प्राप्त जाली ।
तेणें पंडिताआंगी बाणली । परम योग्यता ॥ 
ऐसे पूर्वी थोर थोर । जाले कवेश्वर अपार ।
आतां आहेत पुढे होणार । नमन त्यांसी ॥ 

अशारितीने समर्थांनी मोठा ज्ञानयज्ञाच मांडला होता. सर्व इष्ट देवी, देवता, संत, महंत सज्जन यांना आवाहन करून झाले. आता ज्या श्रोता समुहा समोर आपले ज्ञान प्रकट करायचे त्यांना ते अभिवादन करतात. उत्तम वक्ते आणि श्रोते जेथे जमले आहेत, अशा सभे मध्ये ज्ञानाचे अदान, प्रदान, चर्चा होते.  जेथे चित्तातील विकल्प गळून पडतात, अनेक आशंकाचे समाधान होते अशा सभेमध्ये वावरल्याने ज्ञानवृद्धी होते असे समर्थ म्हणतात. आणि म्हणून अशा सभेस आणि सभाजनांस ते विनम्रतापूर्वक अभिवादन करतात.  

शांती क्षमा दयासीळ । पवित्र आणि सत्त्वसीळ । 
अंतरशुद्ध ज्ञानसीळ । ईश्वरी पुरूष ॥
ऐसे जे का सभानायेक । जेथे नित्यानित्य विवेक ।
त्यांचा महिमा अलौलिक । काय म्हणौन वर्णावा ॥ 
असे सांगून ते म्हणतात --
ऐसे परमेश्वराचे जन । त्यांसी माझे अभिवंदन ।
जयांचेनि समाधान । अकस्मात बाणे ॥ 

सभेस, सभाजनांस अभिवादन केल्यानंतर आता रामदासस्वामी  परब्रम्हाचे परमार्थाचे स्मरण करतात.  परमार्थाचे स्वरूप ज्यांस आकळत नाही त्यांचा जन्म व्यर्थ गेला असे ते मानतात. परमार्थाचे श्रेष्ठत्व वर्णन करताना ते म्हणतात -- 

अनंत जन्मीचे पुण्य जोडे । तरीच परमार्थ घडे ।
मुख्य परमात्मा आतुडे । अनुभवासी ॥ 
जेणें  परमार्थ वोळखिला । तेणें जन्म सार्थक केला ।
येर तो पापी जन्मला । कुलक्षयाकारणे ॥ 

अशा प्रकारे समस्तास श्रेष्ठतानुक्रमे अभिवादन करतात. आपण सुरू केलेल्या कार्यास त्यांचे शुभाशीर्वाद मागतात. आपले विचार ग्रंथबद्ध करण्याचे जे कार्य आहे त्यास या सार्वांनी  साहाय्य करावे, आशीर्वाद द्यावे अशी विनंती ते करतात. तसेच ते करत असलेली ग्रंथरचना बिनचूक असावी / व्हावी म्हणून  त्याचे योग्य ते परीक्षण देखिल व्हावे अशी इच्छा व्यक्त करतात.  

काही दुर्जन महान कार्यात अडथळे आणण्यात नेहमीच धन्यता मानतात. दुसऱ्यांच्या श्रेष्ठत्वाचा अशी माणसे मत्सर करतात. येनकेनप्रकरणे कार्य करणाऱ्यास नीच दाखविण्याचा  प्रयास करतात.  समर्थांना अशा कंटकांची आणि अपवृत्तीची देखिल  पूर्ण जाणीव आहे. अशा लोकांपासून ते पसरवत असलेल्या चुकीच्या प्रवादांपासून लोकांनी सावध असावे असे त्यांचे सांगणे आहे. टीका जरूर करावी परंतु ती योग्य असावी. संपूर्ण ग्रंथाचे परिशीलन केल्यानंतर केलेली प्रामाणिक असावी असे त्यांचे मागणे आहे.  

पूर्ण ग्रंथ पाहिल्यावीण । उगाच ठेवी जो दूषण ।
तो दुरात्मा दूराभिमान । मत्सरे करी ॥ 
अभिमाने उठे मत्सर । मत्सरें ये तिरस्कार ।
पुढे क्रोधाचा विकार । प्रबळे बळें ॥
ऐसा अंतरी नासला । कामक्रोधे खवळला ।
अहंभावे पालटला । प्रत्यक्ष दिसे ॥ 

म्ह्णून अशा व्यक्तींचे सांगणे न ऐकता आपण स्वतः अनुभव घ्यावा. ग्रंथ वाचावा, तपासावा आणि मग त्याबद्दल मत बनवावे अशी कळकळीची विनंती समर्थ करतात. ते सांगतात ज्याचे जसे विचार, रूची तसे त्यांस या ग्रंथाचे आकलन होईल.  

जयास भावार्थ जैसा । तयास लाभ तैसा ।
मत्सर करी जो पुसा (पुरूष ) । तयास तेंचि प्राप्त ॥ 

(क्रमशः ) 


Post to Feed
Typing help hide