डिसेंबर २७ २०१६

चिंता करी जो विश्वाची ... (१९)

चिंता करी जो विश्वाची
श्री समर्थ रामदास स्वामी श्रीरामचंद्रांचे परमभक्त होते. परमेश्वराच्या भक्तीने असाध्य ते साध्य होते, अनेक चिंतांचे हरण होते,नकारात्मक  प्रवृत्ती दूर होऊन व्यक्ती विकास होतो असे ते सांगत. ज्याच्या मनात, विचारात  देवाचे वास्तव्य आहे, असा मनुष्य अनेक दुर्गुण आणि पापांपासून दूर राहतो आणि सात्त्विक समाजाची निर्मिती होते. ज्या समाजात जास्तीतजास्त  सात्त्विक वृत्तीच्या व्यक्ती आहेत असा समाज शांतताप्रिय, तसेच द्वेष, वैर आणि कलह विरहित असतो. अशा समाजाची आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि भौतिक प्रगती होण्यास कसलाही अडसर उरत नाही. म्हणून नेहमी परमेश्वर भक्तीला अनन्यसाधारण महत्त्व असले पाहिजे असा उपदेश समर्थ श्रोत्यांना करीत असत. 

परमेश्वराची भक्ती कशी आचरणात आणावी याचे सविस्तर विवरण समर्थ करतात. भक्ती योगाची पाचवी पायरी म्हणजे देवपूजा. नित्यनियमाने देवतार्चन करण्यास कधीच चुकू नये. देवाची साग्रसंगीत आणि षोडशोपचारे पुजा करीत जावे. असे केल्याने चित्तवृत्ती पवित्र आणि शांत होऊन, परमेश्वराप्रती भक्तिभाव कायम राहतो. 

नाना आसने उपकरणे । वस्त्रे आळंकार भूषणे ।
मानसपूजा मूर्तिध्याने । या नाव पाचवी भक्ती ॥ 

पूजा कुणाची करावी? याचे उत्तरही समर्थ देतात.  देव, ब्राम्हण, साधू संत, श्रेष्ठ, ज्ञानी, बुद्धिवंत, गुणवंत इत्यांदींचे मनःपूर्वक पूजन करून आशीर्वाद प्राप्त करावेत. देवपूजेसाठी निरनिराळ्या पदार्थांपासून (जसे धातू, मृत्तीका, पाषाण, काष्ठ इ. ) घडवलेल्या मूर्ती वापराव्यात. पूजेसाठी निरनिराळी पत्री, फुले गंध, अक्षता, कुंकुम इ. चा वापर करावा. उद. धूपाचा वापर करावा, तसेच कर्पूर, निरांजने, समया याचा देखिल योग्य तिथे वापर करावा. परमेश्वरास नैवेद्य करून नंतर अन्नदान करावे. पूजासमयी शुचिर्भूत होऊन, पवित्र वसने नेसावी. पूजासमयी मंत्रोच्चार करून नंतर ध्यानधारणा करावी. अशा पद्धतीने पूजा केल्याने ईश्वर प्रसन्न होऊन आपणास वरदान देईल.
ज्या कुणाला अशी साग्रसंगीत पूजा करणे शक्य नसेल, त्याने मानसपूजा करावी असे समर्थ सांगतात. मानसपूजा करताना ईष्टदेवतेचे स्मरण करून, मनोमन आपणास जे पाहिजे त्याची क्ल्पना करून अर्पण करावे. 

मने भगवंतास पुजावे । कल्पून सर्वही समर्पावे ।
मानसपूजेचे जाणावे । लक्षण ऐसे ॥ 
जें जें आपणास पाहिजे । ते ते कल्पून वाहिजे ।
येणेप्रकारे कीजे । मानसपूजा ॥ 

अशा प्रकारे शास्त्रशुद्ध पूजा केल्यानंतर, मन:पूर्वक प्रणाम करणे, ही  परमेश्वर भक्तीची सहावी पायरी आहे. विनम्र वृत्तीने, निगर्वीपणे परमेश्वरासमोर नतमस्ततक होणे हे भक्तियोगातील एक महत्त्वाचे लक्षण. 

साहावी भक्ती ते वंदन । करावे देवासी नमन ।
संत साधू आणि सज्जन । नमस्कारीत जावे ॥ 

आपणाहून जे ज्येष्ठ, श्रेष्ठ आहेत त्यांस नमन करावे. तसेच जे ज्ञानाने, साधनेने, पुण्यसंचयाने आपणाहून श्रेष्ठ आहेत, त्यांस वयाची ज्येष्ठता ध्यानी न ठेविता प्रणिपात करावा. ज्यांना नमस्कार करावा अशा अधिकारी व्यक्ती कोण हेही समर्थांनी सांगितले आहे. 

भक्त ज्ञानी आणि वीतरागी । माहानुभाव तापसी योगी ।
सत्पात्रे देखोनी वेगी । नमस्कार घालावे ॥
देवज्ञ शास्त्रज्ञ आणि सर्वज्ञ । पंडित पुराणिक आणि विद्वजन ।
याज्ञिक वैदिक पवित्रजन । नमस्कारीत जावे ॥ 

नमस्काराचे भक्तियोगामध्ये अतिशय महत्त्व आहे. देव, देवता, आणि पवित्रजन यांना नमस्कार करावा. असे केल्याने काय साध्य होते याचे अनेक प्रकाराने वर्णन, समर्थांनी केले आहे. 

नमस्कारे लीनता घडे । नमस्कारे विकल्प मोडे ।
नमस्कारे सख्य घडे । नाना सत्पात्रासी ॥
नमस्कारे दोष जाती । नमस्कारे अन्याय क्षमती ।
नमस्कारे मोडली जडती । समाधाने ॥ 

अशा प्रकारे आदरपूर्वक मनोभावे केलेले नमन हे भक्तियोगाचे सहावे लक्षण वर्णिले आहे . 

आता भक्तियोगाची सातवी पायरी .. म्हणजे दास्य. दास्य म्हणजे बळजबरीने लादलेली गुलामगीरी नाही. समर्थांना अभिप्रेत असलेले दास्य म्हणजे  मनापासून स्विकारलेला  सेवाधर्म. मनामध्ये अपरंपार श्रद्धा आणि सेवाभाव ठेवून केलेले कार्य , हाही परमेश्वराप्रती भक्तिभाव व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे असे ते  सांगतात.  सदहेतूने केलेले कोणतेही कार्य ही परमेश्वराची सेवा आहे असे समर्थ सांगतात. समाजात जे न्यून जाणवेल त्याची पूर्तता करणे हेही देवकार्यच. 

नाना रचना जीर्ण शरीर । त्यांचे करावे जीर्णोद्धार । 
पडिले कार्य ते सत्त्वर । चालवित जावे ॥ 

कोणतेही सत्कार्य करण्यात कमीपणा मानू नये. जे पडेल ते आणि शक्य होईल तितके कार्य करीत राहावे. अखंड कार्यरत राहणे ही ईश्वरभक्ती आहे. कार्य कसे आणि कोणते करावे. तर त्यास कोणतीही सीमा नाही. नवीन वास्तु, गृह, मंदिरे यांचे निर्माण करावे. धरणे, वेशी, बंधारे बांधावे. गडकोट, किल्ल्याचे संवर्धन करावे. उपवने, उद्याने फुलवावी, शेती , फळबागा कराव्यात, तलाव, सरोवरे, नदीकाठ जोपासावेत. याचबरोबर नवीन शिल्पे घडवावी. नवीन पात्रे, आभूषणे घडवावी. वस्त्रनिर्मिती करावी. नाना प्रकारच्या औषधी बनवाव्यात, शस्त्रनिर्मिती करावी. म्हणजेच मनुष्यास जे आवश्यक त्याची निर्मिती आणि संवर्धन करणे ही ईश्वरभक्ती आहे असे समर्थ सांगतात. तसेच निरनिराळ्या उत्सवांचे, कार्यक्रमांचे आयोजन करणे. त्यानिमित्त जमलेल्या जनसमूहाची सेवा करणे हेही देवकार्यच समजावे.

जयंत्या पर्वे मोहोत्सव । असंभाव्य चालवी वैभव ।
जे देखता स्वर्गीचे देव । तटस्त होती ॥ 
ऐसे वैभव चालवावे । आणि नीच दास्यत्वही करावे ।
पडिले प्रसंगी सावध असावे सर्वकाळ ॥ 

अशी सातवी भक्ती समर्थांनी वर्णन केली आहे. रानावनात, आणि जंगल,गुहांमध्ये परमेश्वर नसून तो सर्वलोकी वसलेला आहे हेच ते परोपरीने सांगत आहेत. परमेश्वराची भक्ती करण्यासाठी सामान्य, सुखी आयुष्याचा त्याग करून संन्यासी होणे हे जरूरी नाही. स्वतः बरोबरच इतरांचे आयुष्य देखिल सुखी, संपन्न करणे हीच ईश्वरसेवा आहे. अशाप्रकारे कार्य करताना वाणी सदैव मधुर असावी, जेणेकरून ऐकणा ऱ्याचे समाधान व्हावे. मनामध्ये विनम्रता असावी. जनलोकांची सुखसमृद्धी हीच आयुष्याची इतिकर्तव्यता आहे असे समजावे. असे परमेश्वर भक्तीचे स्वरूप समर्थांनी सांगितले आहे.  

सदा देवकाजी झिजे देह ज्याचा ।
सदा रामनामे वदे नित्य वाचा ॥
स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा । 
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ 

(क्रमशः ) 

संदर्भग्रंथ : श्री ग्रंथराज दासबोध 
                 श्री मनाचे श्लोक  Post to Feed
Typing help hide