जुलै १२ २०१६

चिंता करी जो विश्वाची ... (११)

चिंता करी जो विश्वाची
श्री समर्थ रामदास स्वामींच्या चिंतन, लेखनामध्ये जराही खंड नव्हता. दुःख, दैन्य आणि दारिद्र्य या सर्वांचे मूळ कारण 'अज्ञान' हेच आहे-- या बद्दल त्यांच्या मनात जराही किंतु नव्हता. ते अज्ञान दूर करावे, लोकांना सुखी , समाधानी जीवनाचा मूलमंत्र द्यावा, असा त्यांनी ध्यास घेतलेला होता. त्यासाठी अखंड आणि अथक परिश्रम करीत होते. 

अनेक गुण आणि अवगुणांची त्यांनी सविस्तर चर्चा केली, मूर्ख लक्षणांचे वर्णन केले, सद्गुरू ची महती गायली आणि सुविद्येचे अनेकानेक इष्ट परिणाम सांगितले. जीवनसमराला सुरूवात करण्यासाठीची ही केवळ पूर्वतयारी होती. ज्या प्रमाणे योद्धा रणभूमीवर जाण्यापूर्वी शस्त्रसज्ज होतो, तद्वतच जीवनाच्या आरंभी, जे जे अनिष्ट आहे त्याचा त्याग करून , चांगले जे आहे त्याचा स्विकार करायला पाहिजे. त्यायोगे पुढे येणाऱ्या अनेक आपदांचा सामना करणे शक्य होते. कठीण समय पार करता येतो. म्हणूनच उत्तम गुण, उत्तम ज्ञान, उत्तम आचार विचार - कोणते आणि ते कसे आत्मसात करावे , याचा उपदेश समर्थांनी केला आहे. 

 जन्म, मृत्यू आणि त्या मधील असणारे जीवन, या बद्दल उहापोह करण्यास त्यांनी आरंभ केलेला आहे. सुरूवातीलाच ते सांगतात, सर्व दुःखाचे मूळ  तर मनुष्य जन्म हेच आहे. पण जन्म मृत्युचा फेरा कुणास चुकविता आलेला नाही. मनुष्याने कितीही वल्गना केल्या, उच्च ज्ञान प्राप्तं केले, तरी अजूनही जन्म आणि मृत्यू या दोन घटनांवर त्याचे नियंत्रण नाही. त्यासाठी नियतीस शरण जाणे भाग आहे. समर्थ आपल्या श्रोत्यांस सावध करण्यासाठी सांगतात --

जन्म दुःखाचा अंकुर। जन्म शोकाचा सागर ।
जन्म भयाचा डोंगर । चळेना ऐसा ॥ 

साऱ्या माया आणि मोहजालाचे मूळ कारण आहे जन्म. जन्मा मुळे मुक्त असलेला आत्मा फिरून पुन्हा शरीरात बद्ध होतो. त्यानंतर मनुष्य जन्माचे सारे भोग भोगणे त्यांस प्राप्त होते. पण सामान्य मनुष्यास ही जाणीव नसते. त्याला जन्म ही एक आनंददायी घटना वाटते, कारण पुढे उभे असलेले कर्मभोग त्यांस अज्ञात असतात. मनुष्य आपल्या जन्मात अनेक दुर्गुणांचा आधार घेतो. अनंत पापांचे ओझे त्यांस वागवावे लागते, कारण आपल्या वर्तनाचे, कर्माचे उत्तरदायित्व आपणासच निभवायचे आहे याचे भान त्यांस नसते. आला क्षण जगणे, भौतिक सुख आणि वासनांच्या मायाजालात अडकणे, हेच तर जन्माचे लक्षण असते. असे जगत असताना आपल्या पापपुण्याचा हिशोब कुणीतरी , कुठेतरी ठेवतो आहे, हे मनुष्यास समजत नाही. आणि अंती जेव्हा कर्माची फळे पदरी पडतात तेव्हा भय, शोक आणि चिंता साऱ्या अयुष्यास व्यापून उरलेल्या असतात. पण त्यातून सुटकेचा मार्ग दिसत नाही. मग आपल्या नशिबाला दोष देत जीवनाच्या दुःखदायक अंताकडे अपरिहार्यपणे  वाटचाल सुरू होते. 

जन्म मायेचे मैदावे (लबाडी) । जन्म क्रोधाचे विरावे (शौर्य) ।
जन्म मोक्षास आडवे । विघ्न आहे ॥
जन्म जिवाचे मीपण । जन्म अहंतेचा गुण ।
जन्म हेचि विस्मरण । ईश्वराचे॥ 

मनुष्य जन्म,  अनेक प्रकारच्या आधी-व्याधींनी व्यापलेला असतो. अनेक विटाळ-किटाळांपासून त्याची उत्पत्ती होते.मानवी  शरीर, हे  अनेक प्रकारांच्या दुर्गंधीयुक्त घाणीने आणि स्त्रावांनी लडबडलेले असते. अस्थी, चर्म , मेदमांस यांनी बनलेले  मानवी शरीर, अनेक अशुद्धींची खाण असते. तरीही मनुष्यास त्या शरीराचा मोह सुटत नाही. असे शरीर राखण्यासाठी, घडविण्यासाठी, सजविण्यासाठी तो जीवापाड धडपड करतो. त्यांस लक्षात येत नाही, की तो जे करतो आहे, ते फक्त बाह्योपचार आहेत. आंतरशुद्धी त्याच्या आवाक्याबाहेर असते. परंतु त्याला त्याची पर्वा नसते. 

वरी वरी दिसे वैभवाचे । अंतरी पोतडे नर्काचे ।
जैसे झाकणे चर्मकुंडाचे । उघडितांच नये ॥ 

असे हे नश्वर मानवी शरीर प्राप्तं करण्यासाठी, सर्वांना गर्भाच्या कारावासाचे हाल सोसावे लागतात. गर्भवासी जीव असताना, मातेसही अनेक यातना सहन कराव्या लागतात. वेदनांनी ती तळमळते, आक्रंदते. काही वेळा,  तिला आपल्या जीवाचे मोलही द्यावे लागते. या सर्वातून सोडवणूक करावी म्हणून तो जीव ईश्वराची प्रार्थना करतो, आणि गर्भवासातून त्याला मुक्ती मिळते. 

गर्भी म्हणे सोहं सोहं । बाहेरी पडता म्हणे कोहं ।
ऐसा कष्टी जाला बहू । गर्भवासी ॥ 

इतक्या साऱ्या यातना सोसलेला जीव जेव्हा पृथ्वीतलावर येतो, तत्क्षणी तो सारे दुःख, वेदना  विसरतो, आणि आनंदाने, अपेक्षेने जीवनास सामोरा जातो.

सुंन्याकार जाली वृत्ती । काही आठवेना चित्ती ।
अज्ञाने पडिली भ्रांती । तेणे सुखची मानिले ॥ 

 जन्मानंतर त्याला मनुष्यजन्माचे  सारे बरे-वाईट भोग प्राप्तं होतात. दैवाचा फेरा मागे लागतो. या चक्रात गरगरताना तो आपले मूळ विसरतो. आपला देह  मृण्मय असून नाशिवंत आहे,  हे सत्य ज्ञात असूनही दृष्टीआड करतो. परंतु जे घटीत आहे ते चुकत नाही. जेव्हा सारे सामोरे येते. तेव्हा भय, शोक, चिंता त्याच्या मनीमानसी व्यापून राहतात. आणि शेवटी त्याला ईश्वराचे स्मरण होते. 
समर्थ अशा संसारी जनांस  उपदेश करतात --

ऐसे दुःख गर्भवासी । होते प्राणीमात्रांसी ।
म्हणोनिया भगवंतासी । शरण जावे ॥ 
जो भगवंताचा भक्त । तो जन्मापासून मुक्त ।
ज्ञानबळे विरक्त । सर्वकाळ ॥ 

या जन्मीचे वास्तव सामोरे येताच भयभितीचा वेढा मनुष्याच्या चित्तास पडतो. जन्म आणि मृत्यूचे आवर्तन भयप्रद वाटते. परंतु त्यातून आपली सुटका कशी करून घ्यावी हे समजत नाही. अशा लोकांना समर्थ सांगतात, स्वत : स  ईश्वराचे विस्मरण कधीही होऊ देऊ नये. कारण तोच कर्ता, करविता, निर्माता आणि अंती विनाश घडविणारा देखिल आहे. बाह्य रुपास भुलून सत्यास अंतर देऊ नये असे समर्थांचे सांगणे होते. मनुष्य देह हा नाशिवंत आहे, आणि अंती मृत्तीके मध्ये मिसळणार आहे याचे स्मरण सदा असू द्यावे. 

मना वासना चूकवी येरझारा ।
मना कामना सांडि रे द्र्व्यदारा ॥
मना यातना थोर हे गर्भवासी ।
मना सज्जना भेटवी राघवासी ॥ 

मनुष्य जन्म प्राप्तं होताच, असंख्य वेदना, चिंता आणि दुःखांचा ससेमिरा पाठीस लागतोच. परंतु आरंभी हे लक्षात येत नाही. मनुष्य मिळालेल्या जन्माचे सार्थक हे सुखोपभोगात आहे, असे समजून वर्तन करीत असतो. संसारसुखामध्ये तो पूर्ण गुरफटून जातो. संसाराची अनावर ओढ आणि त्या मुळे उद्भवणारी दुःखे भोगणे, हे क्रमप्राप्तच असते. म्हणून समर्थ सांगतात,  मुळात मनुष्यजन्म हा दुःखदायक आहे .  तो कुणाही मानवाच्या नियंत्रणात नाही.   परंतु विरक्त वृत्तीने,  सत्त्वगुणांचा अंगिकार करून, हा जीवनसागर सुखाने तरून जाता येतो. परंतु बहुसंख्यास विरक्त, सन्यस्त जीवन जगणे अशक्य असते. अशा लोकांचे वर्णन समर्थ करतात .. 

गर्भदुःख विसरला । तो त्रिविधतापे पोळला ।
प्राणी बहुत कष्टी जाला । संसारदुःखे ॥ 

बालकाचा जन्म होताना त्यांस आणि मातेस अपरंपार वेदना होतात. परंतु त्याचे नंतर विस्मरण होते. आई - वडील नवजात बालकाचे कोडकौतुक करतात. त्याला जीवापाड जपतात. त्याचे दुखणे, खुपणे, आजार, व्याधी यांची काळजी घेतात. उत्तम कपडेलत्ते , दागिने, खेळणी देऊन हौस पुरवितात. असा बाळ वाढत असतो. आणि एकादिवशी विवाहयोग्य होतो. संसाराचे सत्यस्वरूप त्या आजाणास माहीत नसते. तो या साऱ्या सुखसोहोळ्यात रंगून जातो. 

वऱ्हाडी वैभव दाटले । देखोन परमसुख वाटले ।
मन हे रंगोन गेले । सासुरवाडीकडे ॥ 

मुलाचा ओढा सासुरवाडीकडे वाढू लागतो. मायबापा पेक्षा सासू-सासरे महत्त्वाचे वाटू लागतात. मातापित्यांनी आपल्यासाठी केलेले कष्ट विसरून, त्याला पत्नी प्रिय वाटू लागते. इतकेच काय, माता, पिता, बंधू, भगिनी त्यांस नकोसे वाटू लागतात.

आंतर्भाव ते सासुरवाडी । मायेबापे राहिली बापुडी ।
होताती सर्वस्वे कुडकुडी । तितुकेच कार्य त्यांचे ।
मायबाप बंधू बहिणी । नोवरी न दिसता वाटे काणी (अप्रिय वाटतात) ।
अत्यंत लोधला (लिप्त झाला)  पापिणी । अविद्येने भुलविला ॥ 

अशा प्रकारे स्त्रीमोहाने मनुष्य संसारात गुंततो. काहीवेळा बाहेरचे कार्यकाज देखिल त्यांस नकोसे वाटते. आपल्या इतर कुटुंबिया बाबतीतील कर्तव्ये तो पूर्णतः विसरून जातो. पत्नीच्या सांगण्यावरून तो मातापित्यास दुरुत्तरे करतो. त्यांचा तिरस्कार करतो.  समाज जीवनात देखिल मन रमेनासे होते. पत्नीची हौस पुरविण्यासाठी नीच मार्गाने  द्रव्यार्जन करतो. पाप-पुण्य, इष्ट-अनिष्ट या सर्वांचा त्यास जणू विसर पडतो. धर्म- अधर्माचे भान नाहीसे झालेले असते.  परमार्थाचा त्याग करून अत्यंत स्वार्थी आणि हीन अशी जीवन पद्धती स्वीकारतो. 

कदा नावडे हरिकथा । देव नलगे सर्वथा ।
स्नानसंध्या म्हणे वृथा । कासया करावी ॥ 
अभिळाषे सांची वित्त । स्वये करी विस्वासघात ।
मदे मातला उन्मत्त । तारूण्यपणे ॥ 

अशा प्रकारे अनीतीचे वर्चस्व त्याच्या जीवनावर होते. स्त्रीमोहाने तो सत्त्वगुण त्यागून, रजोगुणी आणि तमोगुणी होतो. त्यानंतर होते अपत्य प्राप्ती. आपत्याप्रतीची  अतिरेकी माया, त्यास संसारपाशात बद्ध करते. आता त्याच्या मनात आपत्याचेच विचार भरून राहतात. तो त्या साठीच जणू जगत असतो. परंतु संसारचक्राचे नियम त्यांसही लागू होतात. वृद्धत्वाने शरीर दुर्बळ होते. त्यातच अनेक रोग व्याधी, शरीर पोखरत असतात. पत्नी ची साथ देखिल तितकीशी मिळत नाही. तरूण झालेली आपत्ये त्यांच्या आयुष्यात मग्न होतात. मग एकाकी, जर्जर वृद्धत्व तेव्हढे उरते. 

आता मरण दे गा देवा । बहुत कष्ट जाले जीवा ।
जाला नाही नेणो ठेवा । पातकाचा ॥
दुःखे घळाघळा रडे । जो जो पाहे आंगाकडे ।
तो तो दैन्यवाणे बापुडे । तळमळी जीवीं ॥ 

असे दुर्दैव सामोरे येते. परंतु इतके होऊनही शहाणपण काही येत नाही. संसाराची माया सुटत नाही. रोगव्याधीतून मुक्ती मिळाल्यावर,  पुनःपुन्हा  संसाराचा मोह होतोच. अशा लोकांची  कधीच सुटका होत नसते. जाणूनबुजून ते या संसाररथाला स्वतः स जुंपून घेतात. संसारचक्रामध्ये अविरत फिरत राहणे, हेच त्यांचे भागधेय असते. त्यांना त्यातच सुख वाटते. 

जिवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगोनी गेले ।
परी जीव अज्ञान तैसेची ठेले ॥
देहेबुद्धिचे मर्म खोटे टळेना ।
जुने ठेवणे मीपणें आकळेना ॥ 

(क्रमशः) 

Post to Feed
Typing help hide