मे २०१६

चिंता करी जो विश्वाची ... (४)

चिंता करी जो विश्वाची
समर्थ रामदास स्वामींनी  लोक जागृतीचे कार्य आरंभिले होते. चांगले काय ? वाईट काय?  ते कसे ओळखावे? वाईट गुण त्याजून चांगुलपणा कसा आत्मसात करावा? हे  आपल्या प्रवचनांतून सांगत असत. त्यांची फक्तं शिकवणूकच नाही, तर त्यांचे  स्वतःचे वर्तन , जीवनक्रम देखिल त्या प्रमाणेच असे. " बोले तैसा चाले - त्याची वंदावी पाउले " ही म्हण, समर्थांच्या बाबतीत अक्षरशः  खरी होती. अनेकांनी त्यांचे शिष्यत्व स्वीकारले होते. समर्थांच्या शब्दाखातर कार्य करण्यास अनेकजण प्रवृत्त होत होते. समर्थ जरी आपल्या ग्रंथाद्वारे, उपदेशाद्वारे लोकांमध्ये विचार जागृती करत होते, तरी त्यांना नुसती वाचाळता अथवा श्रवणभक्ती बिलकुल मान्यं नव्हती. जे विचार ग्रहण केल, ते आचरणात देखील आणले गेले पाहिजे यावर त्यांचा कटाक्ष होता.

फुकाचे मुखी बोलतां काय वेचे (खर्च होते ) । 
दिसेदिस अभ्यंतरी (मनात) गर्व साचे ।
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे । 
विचारें तुझा तूंची शोधूनी पाहें ॥ 

नुसते बोलायला काहीच कष्ट होत नाहीत. पण जो बोलल्याप्रमाणेच वागतो .. तोच आदरणीय असतो. आपली वाचा आणि क्रिया ही विवेकाने नियमित केलेली असावी अन्यथा जनांमध्ये आपली बेअब्रू होते असे ते सांगत. 

विवेके क्रिया आपुली पालटावी ।
अती आदरे शुद्ध क्रिया धरावी ।
जनी बोलण्यासारखें चाल बापा ।
मना कल्पना सोडी संसारतापा ॥ 

समर्थांचे ध्येय /उद्दिष्ट एकच होते.. सर्वसामान्य जनास ज्ञानमार्गी  लावावे. अज्ञानामुळे निर्माण होत असलेल्या व्याप आणि तापां पासून लोकांची सुटका करावी. त्यांचा जीवनमार्ग सुकर करावा.  स्पष्टवक्तेपणा हा समर्थांचा स्थायीभावच होता. आडून , उद्देशून वगैरे बोलणे नाही. जे सांगणे आहे ते सूर्यप्रकाशाइतकेच स्पष्ट . जे उणे जाणवते, ते तसेच सांगत . लोकांना बरे वाटावे म्हणून  आडपडद्याने वगैरे नाही. म्हणूनच त्यांनी मूर्खलक्षणे अगदी विस्तृतपणे कथन केली. त्यात कुणाचा उपहास करणे हा हेतू नसून लोकांना सावध करण्याची प्रामाणिक इच्छाच दिसून येते. सर्व लक्षणे सांगून ते उपदेश करतात -- " उत्तम लक्षणे घ्यावी । मूर्ख लक्षणे त्यागावी । 

आता ही उत्तम लक्षणे कोणती ? त्याचे ते वर्णन करतात. ते सांगतात अनोळखी वाटेने जाऊ नये, वाटेवर पडलेली वस्तू (जी आपली नाही ) उचलू नये, जे फळ तुम्हाला माहिती नाही असे फळ खाऊ नये अन्यथा त्याचे दुष्परिणाम सहन करावे लागतात. 

अती वाद करू नये । पोटी कपट धरू नये । 
शोधल्यावीण करो नये । कुलहीन कांता ॥ 

असा उपदेश ते करतात. संन्यासी आश्रमात राहून देखिल व्यावहारिक बाबींशी त्यांचा परिचय किती दृढ होता हेच दिसून येते. त्यांनी हे जाणले होते की सामान्य जनांस त्यांच्या जीवनाशी सुसंगत असाच उपदेश देणे जरुरीचे आहे. त्यांच्या नित्य व्यवहारा संबंधीचे ज्ञान त्यांना मिळाले पाहिजे.  आत्मा , परमात्मा   इत्यादीवर प्रवचन देऊन त्यांना   स्व-ज्ञानाने  दिपवून टाकता येईल,  पण त्याचा, त्या सामान्य जानांना उपयोग काही होणार नाही.  म्हणून समर्थांनी अतिशय व्यवहारी आणि वास्तववादी असेच तत्त्वज्ञान आपल्या उपदेशातून सांगितले. 

उत्तमगुण कोणते याचे विस्तृत विवेचन समर्थ करतात. त्यांचे अचूक निरीक्षण आणि व्यवहारज्ञान खरोखरीच आचंभित करणारे आहे. ते सांगतात की रात्रीच्या वेळेस प्रवास करू नये, संशयास्पद दिसणाऱ्या व्यक्तीस मार्ग कसा आक्रमावा असे विचारू नये. पुढे ते म्हणतात की, परक्या अथवा दूरस्थ व्यक्तींबद्दल मनामध्ये  आकस ठेवू नये, कुणाची  निंदा करू नये अथवा द्वेष ही मनात बाळगू नये. विचार विनिमय केल्याशिवाय कुठल्याही कार्यास आरंभ करू नये, आपली मर्यादा ओळखून त्यांनुसार आपले वर्तन ठेवावे. विद्याभ्यास करावा आणि तो मध्येच सोडू नये पूर्णत्वास न्यावा. 

"मूर्खांच्या नादी कधीच लागू नये " अशी मराठीत एक म्हण आहे. समर्थही तेच सांगताहेत --

तोंडाळासी भांडो नये । वाचाळाशी तंडो नये ।
संतसंग खंडो नये । अंतर्यामी । 

भांडकुदळ लोकांपासून दूर राहावे , परंतु संतसंगतीचा लाभ घेण्यास कधीच चुकू नये असे समर्थ सांगतात. कारण सज्जनांच्या योगे आपल्या अवगुणांचा देखील निचरा होऊन आयुष्य निर्मळ होते. 
मग ते अजून पुढे सांगतात --  स्व-पराक्रमाच्या बढाया मारू नये. परंतु कुणी अडचणीत असल्यास त्याची मदत करण्यास अनमान देखिल करू नये. जास्त वाचाळपणा करू नये, परंतु सभास्थानी अथवा जिथे योग्य तेथे नेमके आणि स्पष्टं बोलण्यास लाजू नये. लहानसहान बाबींचा राग मनात ठेवू नये , आळशी पणा करू नये आणि आपले वर्तन "आधी केले मग सांगितले " असे असावे. ज्ञान संपादन करण्याचा कधीही कंटाळा करू नये. संकटकाळी कुणाची साथसंगत सोडू नये. आपल्या सामर्थ्यानिशी त्यांस सहकार्य करावे. हे सर्व उत्तमगुण आहेत. 

क्षणाक्षणा रुसो नये । लटिका पुरूषार्थ बोलो नये । 
केल्याविण सांगो नये । आपला पराक्रमू ॥ 

समर्थांना सामान्य जनांच्या रागलोभाची , गुणावगुणांची, तसेच सामर्थ्याची आणि कमकुवतपणाची देखिल नेमकी माहिती आहे. म्हणूनच ते उपदेश करतात --  कुणी कुणाची चहाडी सांगत असेल तर त्यांवर विश्वास ठेवू नये. आपले वर्तन आणि कार्य पूर्ण विचाराअंतीच करावे. प्रयत्नांमध्ये कधीही कसूर करू नये. कष्ट करावे लागतात, याचे दुः ख मानू नये. कुणाशी पैजा लावून इरेला पडू नये कारण त्यात शहाणपणा नक्कीच नाही. मग समर्थ लिहितात अती चिंता करू नये पण बेपर्वाईने देखिल वागू नये. परस्त्री कडे पाप बुद्धीने पाहू नये.  कुणाचे उपकार घेऊ नये. घ्यावे लागल्यास त्याची परतफेड त्वरेने करावी म्हणजे मिंधेपणा येणार नाही. दुसऱ्याला काही कारण नसताना  त्रास देऊ नये आणि कुणाचाही विश्वासघात करू नये. कारण असे केल्याने त्या वेळेपुरते जरी समाधान प्राप्तं झाले तरी पुढील आयुष्यात हाच कलंक तुमचा नाश घडवून आणतो. 

यानंतर समर्थ नित्य व्यवहारातले वर्तन कसे असावे ते सांगतात.
आपली नित्यकर्मे वेळच्यावेळी, नित्यनियमाने करावी. मळलेली वस्त्रे परिधान करू नये. अती निद्रा त्यागावी. तसेच आयते मिळालेले अन्न भक्षण करू नये. आपला भार इतरांवर घालू नये. परगृही जास्त दिवस पाहुणचार स्वीकारू नये. एखाद्याविषयी मनात आदरभाव नसताना खोटी स्तुती करू नये. आपणच आपली स्तुती करू नये, तसेच इतरांचे उणेदुणे काढून उगाच हसू नये. दुसऱ्याच्या वस्तूची चोरी करू नये. तोंडी शिव्याशाप येऊ देऊ नयेत. आपल्या स्वकीयांशी , आप्तेष्टांशी  वैर करू नये. परंतु कुणी केलेला अपमान देखील सहन करू नये. वाचाळांशी मैत्री संबंध कधीच ठेवू नयेत आणि कसलेही काम न करता राहू नये ( रिकामटेकडेपणा करू नये ) .

येकाचा (कुणाचाही ) घात करू नये । लटिकी गोही (साक्ष) देऊ नये । 
अप्रमाण वर्तो नये । कदाकाळी ॥
चहाडी चोरी करू नये । परद्वार करू नये । 
मागे उणें बोलो नये । कोणीयेकाचे ॥ 

नित्य व्यवहारात आणि सामान्य जीवनात अनुसरावे असे उत्तम गुण समर्थ वर्णन करतात. यात समग्र आयुष्याचा चिकित्सक वृत्तीने केलेला विचार प्रकट होतो. समर्थानी स्वतः संन्यासी धर्म स्वीकारून सर्वसंगपरित्याग केलेला होता. सर्वसामान्यापेक्षा त्यांचा जीवनक्रम अगदीच वेगळा होता. तरीही समाज जीवनाचा एक घटक म्हणून आपल्या कर्तव्याकडे त्यांनी कधीही पाठ फिरवली नाही अथवा इतरांस संसाराचा त्याग करण्याचा उपदेशही केला नाही. संसारात राहूनही उत्तम कार्याद्वारे परमार्थ साधता येतो असाच उपदेश त्यांनी केला. आपल्याप्रमाणेच इतरांनीही कर्तव्याचे पालन करण्यास चुकू नये हेच  त्यांचे उद्दिष्ट होते. 

समई यावा (धैर्य) चुको नये । सत्त्वगुण सांडूं नये ।
वैरियांस दंडूं नये । शरण आलिया ॥ 
अल्पधनें माजों नये । हरिभक्तीस लाजों नये । 
मर्यादेविण चालो नये । पवित्र जनी ॥ 

थोड्या थोडक्या मिळालेल्या यशाने धुंद होऊन अनाचार करू नये, वल्गना करू नये. दया, शांती हे गुण अंगी बाणवावेत. जीवहत्या करू नये, निष्ठुरपणा करू नये. अपकीर्ती होईल असे वर्तन कदापि करू नये, असत्य भाषण करू नये. इतरां घरी,  पाऊस काळात  अथवा दुष्काळी परिस्थिती असताना जाऊ नये. म्हणजेच आपण ज्या घरी पाहुणे म्हणून जाणार त्यांना कसली अडचण तर नाही ना तसेच ते कुठल्या संकटात न तर नाहीत  ना , याची खातरजमा करावी अन्यथा आपण जाऊन त्यांच्या अडचणी वाढवणे चूक आहे. असा उपदेश समर्थ करतात. ते सांगतात असत्य गोष्टी सांगून त्याचा अभिमान बाळगणे सर्वथा चुकीचे आहे. नित्य-नैमित्यिक धार्मिक कृत्ये, सणवार, कुलाचार योग्य प्रकारे करणे अत्यंत जरूरीचे आहे असे समर्थ सांगतात. नवस बोलला असल्यास त्याची पूर्तता करणे जरुरीचे आहे. तसेच देवधर्म, पूजाअर्चा कधीही टाळू नये असे ते सांगतात. कारण त्या योगे आपली धार्मिक, पारमार्थिक उन्नती साध्य होत असते असेच  त्याचे मानणे होते. 

सभा देखोन गळो नये । समई उत्तर टाळो नये । 
धिःकारिता चळो नये । सामर्थ्य आपुले । 

योग्य वेळेस, आपले म्हणणे धीटपणे मांडता यायलाच हवे. तितका आत्मविश्वास प्रत्येकाला असायला हवा. इतरांनी तुमचे म्हणणे नाकारले अथवा त्यावर अविश्वास दाखवला तर घाबरून आपले सांगणे सोडू नये. असा उपदेश समर्थ करतात. असत्याचा मार्ग सोडून सत्य अनुसरावे तसेच यश, कीर्ती, वैभव हे शाश्वत नसते या सत्याचा स्वीकार करावा असे ते म्हणतात. योग्य, अयोग्य ओळखण्याची कुवत आपल्यामध्ये यावी यासाठी योग्य त्या गुरुकडून उपदेश घ्यावा म्हणजे जीवनाचा दुष्कर मार्ग सोपा होईल असे ते म्हणतात. 

अशा प्रकारे उत्तम गुणांची लक्षणे समर्थ वर्णन करतात आणि ते गुण आत्मसात करण्याचा मार्गही दाखवितात. त्यांचे म्हणणे नुसता उपदेश ऐकून घेण्याने ईश्वरप्राप्ती होणार नाही. तर जे ऐकले , वाचले  त्यातून जे जाणले ते अनुसरायचा प्रयत्न करायला हवा. नुसत्या कल्पनेच्या भराऱ्या उपयोगी नाही तर त्याला सप्रमाण आणि सदविवेकी क्रियेची जोड असायला हवी. अन्यथा केलेला सर्व उपदेश व्यर्थ जाईल. 

क्रियेवीण नानापरी बोलिजेतें । 
परी चित्त दुश्चित तें लाजवीते ॥
मना कल्पना धीट सैराट धांवे ।
तया मानवा देव कैसेनी पावे ? ॥ 

(क्रमशः) Post to Feed
Typing help hide