नोव्हेंबर २७ २०१६

चिंता करी जो विश्वाची ... (१७)

चिंता करी जो विश्वाची
श्री समर्थ रामदास स्वामींनी ईश्वर भक्तीचे महत्त्व सांगितले आहे. श्रद्धा आणि भक्तिपूर्वक ईश्वराची उपासना केल्यास समाधानी आणि आनंदी जीवनाची प्राप्ती होते असे त्यांचे सांगणे होते.  ज्याच्या चित्ती ईश्वर सामावलेला आहे, त्यास द्वेष, कपट, मत्सर, वैरभाव इत्यादी दुर्गुणांची लागण होत नाही. चित्त आणि बुद्धी दोषरहित झाल्याने अधिक चांगल्या आणि विधायक पद्धतीने कार्य करण्यास प्रवृत्त होते. परिणामी मनुष्याची आणि समाजाची प्रगती आणि उन्नती साधता येते. म्हणून एकाग्रतेने ईश्वरभक्तीचा मार्ग अनुसरावा असा उपदेश समर्थ त्यांच्या शिष्यगणास आणि श्रोत्यास करतात. 

भक्तियोगाची पहिली पायरी म्हणजे श्रवणभक्ती. याचे विवेचन आपण मागील भागात पाहिले. भक्तियोगाची दुसरी पायरी आहे हरिकीर्तन. हरिकथा आणि कीर्तनात समय व्यतीत केल्यास तो सत्कारणी लागतो. ईश्वराचे गुणगान गाणे हे हरिकथेचे उद्दिष्ट. नानाप्रकारे ईश्वराची स्तुती करावी, म्हणजेच जे उत्तम आहे , पवित्र आहे, वंदनीय आहे, त्याचे स्मरण करावे आणि इतरांसही सांगावे. अशा करण्याने सद्गुणांची लक्षणे सर्वामुखी होतील. आदर्श काय आहे? अनुकरणीय काय आहे ? हे समस्तास ज्ञात होईल. ज्यायोगे लोकशिक्षण होऊन सुसंस्कारित समाजाची जडणघडण होईल असे समर्थांचे सांगणे आहे. 

सगुण हरिकथा करावी । भगवत्कीर्ती वाढवावी ।
अखंड वैखरी वदवावी । यथायोग्य ॥
बहुत करावे पाठांतर । कंठी धरावे ग्रंथांतर ।
भगवत कथा निरंतर । करीत जावे ॥ 

हरिकथा आणि कीर्तन करताना त्यात काय सांगितले जावे याचेही समर्थ सविस्तर वर्णन करतात. कीर्तनामध्ये पुराणकथा आणि देवादिकांच्या कथांचा समावेश असावा. त्यातील व्यक्तिविशेषाचे गुणवर्णन करावे. कथेतील पात्रे उत्तम गुणांनी युक्त असावीत. त्यांची चारित्र्ये उज्वल असावीत. कथेमध्ये त्यांचा पराक्रम, दातृत्व, सत्यनिष्ठा, दयाळुपणा, क्षमाशीलता इत्यादी सत्त्वगुणांचे वर्णन असावे. कथेतील व्यक्तींचे रूपवर्णन करावे. त्यांची वस्त्रे, शस्त्रे, आभूषणे कशी ते सांगावे. त्यांचे ज्येष्ठ, ज्ञानी, पराक्रमी, अधिकारी, ब्राम्हण, व्यापारी, शूद्र, स्त्रिया, बालके, सेवक इत्यादींबरोबर वर्तन कसे ते वर्णन करावे. त्यांचे व्यवहार, दैनंदिन जीवन (जे आदर्श असते) या संबंधी सांगावे. लोकरंजन व्हावे म्हणून असत्य माहिती अथवा घटना कथन करू नयेत. खोटी स्तुती आणि खोटी निंदा वर्ज्य मानावी. जे सिद्धांत, नियम इत्यादी सांगणार त्यास शास्त्राधार असावा. अनुमानाने बोलणे टाळावे. ग्रंथामध्ये जे अंकित आहे, अथवा अनुभवाने सिद्ध झालेले आहे असेच कथन कीर्तनामध्ये समाविष्ट होणे उचित आहे. कीर्तनामध्ये नवरसपूर्ण कथा काव्याचा अंतर्भाव करावा, ज्या योगे कीर्तन सुरस आणि श्रवणीय होईल. 

नाना नवरसिक शृंगारिक । गद्यपद्याचे कौतुक ।
नाना वचने प्रस्ताविक । शास्त्राधारे बोलावी ॥ 
भक्तिज्ञानवैराग्यलक्षण । नीतिन्यायस्वधर्मरक्षण ।
साधनमार्ग अध्यात्मनिरूपण । प्रांजळ बोलावे । 

कीर्तन करताना प्रथम कथेचा पूर्वपक्ष उलगडवा. त्यानंतर कथेचा गाभा आणि तदनंतर कथेचे सार चित्रित करावे. यासाठी कथेकऱ्यास कथेच्या शास्त्राधाराचे पक्के ज्ञान असणे जरूरीचे आहे. अन्यथा ती कथा कीर्तनामध्ये सांगणे अयोग्य आहे. कथेमध्ये ब्रह्मज्ञाना संबंधी माहिती असावी. उत्तम गुरूची स्तुती आणि उत्तम शिष्याची लक्षणे वर्णावी. देवादिकांच्या अथवा उज्वल चारित्र्य असलेल्यांच्या कथा सांगितल्याने श्रोत्यांवर सत्त्वगुणांचा प्रभाव पडेल आणि सुसंस्कारित समाजाची जडणघडण होण्यास मदत होईल. 

असे प्रबोधनपर कीर्तन करण्याचा अधिकार कोणास असावा ? समर्थ म्हणतात, जो उपदेश करतो तो स्वतःही उत्तमगुणांनी युक्तं असायला हवा. कथेकऱ्याने नुसते बोलून, सांगून प्रबोधन न करता, स्वतःच्या वर्तणुकीतून तो आदर्श दर्शवला पाहिजे. कथेकरी ज्ञानी असायला हवा, त्याचप्रमाणे उत्तम वक्ता असला पाहिजे. कथा आणि कथेचे निरूपण तितक्याच रसाळपणे करण्यास सक्षम असायला हवा. श्रोत्यांच्या समस्यांचे, शंकांचे त्याला समाधान करता यायला हवे. 

असो वगतृत्वाचा अधिकार । अल्पास न घडे सत्योत्तर । 
वक्ता पाहिजे साचार । अनुभवाचा ॥ 
सकळ रक्षून ज्ञान सांगे । जेणे वेदज्ञा न भंगे ।
उत्तम सन्मार्ग लागे । प्राणीमात्रासी ॥ 

अशा प्रकारे ज्ञानी आणि उत्तम वक्त्याने, सर्व शास्त्राधार प्रमाण मानून  केलेले हरिकीर्तन श्रवण केल्याने श्रोत्यास ज्ञान प्राप्ती होते. आदर्श जीवनशैलीचा वस्तुपाठ प्राप्तं होऊन, उत्तम मार्गाने आयुष्याची कालक्रमणा करण्याची प्रेरणा मिळते. हरिकथा, कीर्तनांच्या श्रवणाने चित्तशुद्धी होते. मनामध्ये सत्त्वगुणांचा संचार होतो. वाईट असेल त्याचा त्याग करून, जे चांगले ते आत्मसात करण्याची इच्छा निर्माण होते. तसेच पुराणातल्या कथा स्मरून, काहीवेळा स्वतःच्या समस्या, अडीअडचणी सोडविण्याचा मार्ग देखिल मिळतो. म्हणून हरिकथा करणे आणि ऐकणे हे समाजासाठी हितकारक आहे. 

कीर्तने माहादोष जाती । कीर्तने होये उत्तमगती ।
कीर्तने भगवत्प्राप्ती । येदर्थी संदेह नाही ॥ 
कीर्तने वाचा पवित्र । कीर्तने होये सत्पात्र ।
हरिकीर्तने प्राणीमात्र । सुसिळ होती ॥ 
कीर्तने अवेग्रता घडे । कीर्तने निश्चये सांपडे ।
कीर्तने संदेह बुडे । श्रोतयांवक्तयांचा  ॥

(क्रमशः) 

संदर्भग्रंथ : - श्री ग्रंथराज दासबोध Post to Feedहे

Typing help hide